आमचा ‘गोंडस’ कंटेंट!

इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ‘टिकटॉक’वजा इतर ॲप्सच्या माध्यमातून ‘शॉर्ट व्हिडीओ’ आणि रील्स आपल्या आयुष्यात आले.

आमचा ‘गोंडस’ कंटेंट!

प्रसाद शिरगावकर
इन्स्टाग्राम, फेसबुक आणि ‘टिकटॉक’वजा इतर ॲप्सच्या माध्यमातून ‘शॉर्ट व्हिडीओ’ आणि रील्स आपल्या आयुष्यात आले. या समाजमाध्यमी ‘कंटेंट’मधला एक सगळय़ात जास्त पाहिला, शेअर केला जाणारा प्रकार म्हणजे लहान मुलांचे व्हिडीओ. काही दिवसांची, महिन्यांची बाळं ते दोन-पाच वर्षांपर्यंतच्या बोबडं किंवा बालसुलभ ‘आगाऊ’पणानं बोलणाऱ्या लहानग्यांचे व्हिडीओ प्रचंड लोकप्रिय. यातली काही चिमुरडी समाजमाध्यमांवरच्या ‘सेलिब्रिटी’ होतात. ‘ब्रँड एन्डॉर्समेंट’ वगैरे मिळू लागतात आणि त्याद्वारे पैसेही (अर्थात पालकांना)! या सगळय़ाच्या केंद्रस्थानी असलेलं लहानगं स्वत:चं ‘कंटेंट’ झालेलं असतं. लाइक्स-कमेंट्सच्या सोसात त्या मुलाचा खासगीपणाचा अधिकार, बाललीलांमधली नैसर्गिकता आणि मुख्य म्हणजे लहानपणच्या अनुभवांवर अवलंबून असलेली पुढच्या आयुष्यातली मानसिक जडणघडण यांचं काय? याचा ऊहापोह करणारा हा लेख..

सोशल मीडियावर सध्या शॉर्ट व्हिडीओज किंवा रील्सचा महापूर आहे. रोज असंख्य नवे व्हिडीओज आपल्यासमोर येताना दिसतात. यात विशेष लक्ष वेधून घेणारे व्हिडीओज असतात ते लहान मुलांचे! लहान मुलांचे म्हणजे अगदी लहान बाळांपासून दोन-पाच वर्षांच्या मुलांचे. लहान मुलं गोंडस अन् निरागस असतात. बोबडे गोड बोल बोलतात. त्यांचं चालणं, बोलणं, खेळणं, हसणं, अगदी रडणंही बहुसंख्य प्रौढ माणसांना खूप आवडतं. कोणत्याही, कोणाच्याही लहान मुलाच्या ‘बाललीला’ बघत आपण रमून जाऊ शकतो. अर्थातच, प्रत्यक्ष भेटलेल्या लहान मुलांच्या लीला बघताना आपण जसे रमून जातो, तसेच सोशल मीडियावर दिसणारे लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओज बघूनही रमून जातो. याच कारणामुळे सोशल मीडियावरच्या अशा प्रकारच्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळताना दिसतो. लहानग्यांचे फोटो आणि व्हीडिओ बहुसंख्य वेळा त्यांचे पालकच तयार करून पोस्ट करत असतात. आपल्या आयुष्यात जे काही सुरू आहे ते सोशल मीडियावर ‘शेअर’ करत राहाण्याची प्रथा सध्या खूप मोठय़ा प्रमाणात निर्माण झाली आहे. किंबहुना ‘फेसबुक’ किंवा ‘इन्स्टाग्राम’सारख्या सोशल माध्यमांचा उदयच व्यक्तिगत अनुभव शेअर करणं या हेतूनं झाला होता. त्यांचं डिझाइन आणि वापरातला सोपेपणा आपल्याला आपले अनुभव शेअर करायला प्रवृत्त करत राहतो. तिथे मिळणारे ‘लाइक्स’ आणि ‘कमेंट्स’ आपला उत्साह वाढवणारे असतात. या उत्साहामुळे आपल्याला अधिकाधिक अनुभव शेअर करत राहाण्याला प्रोत्साहन मिळतं. हे सर्वच कंटेंटच्या बाबतीत घडतं, पण लहान मुलांच्या फोटो आणि व्हिडीओंबाबत जास्तच घडताना दिसतं.

मुलांच्या व्हिडीओजचा ‘ट्रेंड’
मुलांचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याची सुरुवात अनेकदा आपल्या आयुष्यातली आनंदाची गोष्ट, आनंदाचे क्षण आपल्या मित्रमैत्रिणींना कळवावेत या हेतूनं होत असते. बहुसंख्य पालक मुलाचा जन्म, बारसं, बोरन्हाण, वाढदिवस अशा प्रमुख घटनांचेच फोटो टाकताना दिसतात. पुढे बहुसंख्य पालक प्रामुख्यानं दर वाढदिवसाला मुलांचे फोटो टाकून शुभेच्छा देत आणि मागत राहातात. याबरोबर खेळांमध्ये किंवा कलांमध्ये काही विशेष नैपुण्य मिळालं, कुठल्या उपक्रमात भाग घेतला, कुठली स्पर्धा जिंकली, की त्याचेही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून दाद अन् वाहवा मिळवणं, आपल्या मुलाचं कौतुक करून घेणं हे पालक करत राहातात. शिवाय मुलाचं शैक्षणिक यश, विशेषत: दहावी-बारावीचे गुण सांगून अभिनंदन आणि कौतुक मिळवणं हे हमखास घडतं. दहावी-बारावीनंतर मात्र मुलांविषयी पोस्ट करणं कमी होत जातं. मुलं मोठी होऊन त्यांची स्वत:ची सोशल मीडिया अकाउंट्स झालेली असतात हे कारण असावं कदाचित. किंवा आता लहानपणीचा तो ‘गोंडसपणा’ जाऊन टीनेजर मुलांची बेदरकारी आणि बंडखोरी आलेली असते म्हणूनही असावं. पण हे होईपर्यंतच्या काळात, म्हणजे मुलांच्या जन्मापासून ते ती सोळा-सतरा वर्षांची होईपर्यंतच्या काळातली पहिली दहा-बारा वर्ष तरी पालक आपल्या मुलांविषयी भरपूर कंटेंट सोशल मीडियावर शेअर करताना दिसतात. मुलं अगदी लहान असताना, म्हणजे पहिल्या पाच-सात वर्षांतला कंटेंट लक्षणीयदृष्टय़ा जास्त असतो. गेल्या दोन-तीन वर्षांत याबाबतीत एक नवी पद्धत सुरू झालेली दिसत आहे. यात काही पालक आपल्या लहान मुलांच्याच नावानं ‘इन्स्टाग्राम’वर अकाउंट तयार करतात आणि ते चालवतात. अगदी एक-दोन-चार- सहा वर्षांच्या मुलांच्या नावानं अशी अकाउंट्स तयार केलेली दिसतात. ती मुलंच बोलत आहेत, अशा प्रकारच्या भाषेत तिथल्या पोस्ट्स लिहिलेल्या असतात. आणि अर्थात त्या मुलांचे व्हिडीओज आणि रील्सही असतात. काही अकाउंट्स ही ‘वडील अधिक मूल’, ‘आई अधिक मूल’ अशा प्रकारचीही असतात. तिथे त्या दोघांचे एकमेकांशी गप्पा मारण्याचे किंवा इतर काही उपक्रम एकत्र करत असण्याचे व्हिडीओ असतात. गंमत म्हणजे अशा फक्त लहान मुलांच्या किंवा पालक आणि मुलांच्या एकत्र असलेल्या अकाउंट्सना खूप मोठय़ा प्रमाणावर ‘फॉलोअर्स’ मिळत आहेत. काही मुलांच्या अकाउंट्सना तर लाखोंमध्ये फॉलोअर्स असतात! अशी अकाउंट्स, अशी मुलं ही ‘इन्स्टाग्राम सेलिब्रिटी’ मानली जातात. त्यांचे साधे-साधे व्हिडीओज आणि रील्सही प्रचंड व्हायरल होताना दिसतात. अशा अकाउंट्सचा पुढे व्यावसायिक वापरही केला जातो. ‘ब्रँड एंडॉर्समेंट’ म्हणजे एखाद्या सेलिब्रिटीनं ‘एखादं प्रॉडक्ट चांगलं आहे, मी ते वापरतो, तुम्ही ते वापरा’ असं सांगणं. आपण टीव्हीवर अनेक वर्ष अशा ब्रँड एंडोर्समेंट्स बघत आलो आहोत. तिथे प्रामुख्यानं एखादा प्रसिद्ध खेळाडू किंवा अभिनेता ती ब्रँड एंडॉर्समेंट करत असतो. ‘इन्स्टाग्राम’वर हेच लोण ‘इन्स्टाग्राम सेलिब्रिटीज्’मध्ये आलं आहे. बहुसंख्य ‘इन्स्टाग्राम सेलिब्रिटीज’ अगदी तरुण किंवा टीनेजरही असतात. आता लहान मुलांची, पालक चालवत असलेली अकाउंट्सही पैसे घेऊन ब्रँड एंडॉर्समेंट करताना दिसत आहेत. इथे एक गोष्ट स्पष्ट करायला हवी ती अशी, की याचं गणित तुमचे फॉलोअर्स संख्येनं किती जास्त आणि कोणते आहेत यावर अवलंबून असतं.
हे सगळं बघताना काही प्रश्न मनात येतात. आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर टाकत राहाणं हे योग्य की अयोग्य, हा पहिला प्रश्न! त्याचबरोबर असा कंटेंट टाकल्यानं खासगीपणा आणि सुरक्षिततेला काही धोका निर्माण होऊ शकतो का आणि अशा कंटेंटचा मुलांच्या भविष्यावर, भविष्यातल्या वागण्यावर काही नकारात्मक परिणाम होऊ शकतो का, हा तिसरा आणि सगळय़ात महत्त्वाचा प्रश्न.

बहुसंख्य पालकांना आपल्या मुलांविषयी प्रचंड कौतुक वाटत असतं. ते कौतुक जगासमोर मांडायला काहींना आवडतं आणि ते सोशल मीडियावरून तसं मांडायला लागतात. प्रत्येकानं आपल्या आयुष्यात काय करावं, आपल्या मुलांच्या बाबतीत काय करावं, हा ज्याचा त्याचा खासगी प्रश्न असला तरीही लहान मुलं असलेला कंटेंट, तो प्रकाशित करणाऱ्यांचे मित्रमैत्रिणीच नाही, तर पूर्णपणे अनोळखी लोकही बघत असतात. त्यातून त्या कंटेंटवर येणाऱ्या लाइक्समुळे पालक सुखावतात. असे लाइक्स सतत मिळावेत, अधिकाधिक मिळावेत असं काहींना वाटायला लागतं. हा लाइक्सचा अट्टहास सुरू झाला की काय पोस्ट करावं आणि काय करू नये यातल्या सीमारेषा धूसर व्हायला लागतात. मग लहान मुलांच्या निरागसतेमधून सहजपणे येणाऱ्या व्हिडीओंऐवजी मुद्दाम प्रसंग घडवून किंवा मुलांना काही विशिष्ट प्रकारे बोलायला/ वागायला लावून त्याचे व्हिडीओ करणंही अनेकदा सुरू होतं. मुलांना मुद्दाम हसवणं, मुद्दाम रडवणं, कविता, गाणी म्हणायला लावणं, ठरवून काही अचकट-विचकट बोलायला लावणं, हे केलं जाऊ लागतं, नव्हे, ‘इन्स्टा’वर एक फेरी मारून आलात तर अशी कित्येक उदाहरणं दिसतीलच. एखादं मूल सहज काही बोलत असेल, सहज काही खेळत असेल, तर ते रेकॉर्ड करणं वेगळं आणि त्याला पढवून काहीतरी वागायला-बोलायला लावणं वेगळं. आपल्या या वागण्याचा आपल्या मुलांवर नेमका काय परिणाम होत असेल याचा ते पालक विचार करतात का, असा प्रश्न पडतो. आपल्या प्रोफाइलवर येणाऱ्या लाइक्सच्या हव्यासापोटी आपण आपल्याच चिमुकल्यांवर मानसिक अत्याचार करत आहोत का, हा प्रश्न पालकांनी स्वत:ला विचारायला हवा.

दोन ते पाच-सहा वर्ष वयोगटातल्या मुलांना स्वत:चं म्हणणं सांगता येत नसतं. आई-वडिलांना ते ‘अमुक करा, तमुक करू नका’ असं स्पष्ट सांगू शकत नाहीत. आपले फोटो किंवा व्हिडीओ काढणं मुलांना आवडतंच असं नाही. ‘आपल्याला लोक हसत आहेत’ यानं लाज वाटणं नेमकं कोणत्या वयात निर्माण होतं हे सांगता येत नाही, पण बहुदा स्व-कल्पनेच्या जडणघडणीच्या पहिल्या काही वर्षांमध्येच हे होत असावं. ज्यामुळे आपल्याला लाज वाटेल असं पालकांनी काही करू नये हे मुलांना वाटत असावं, पण ते स्पष्टपणे सांगता येत नाही. काही मुलं रडून, चिडून, रुसून, असहकार करून आपला निषेध व्यक्त करायचा प्रयत्न करत असतात. पण तो प्रयत्न पालकांना समजतोच असं नाही. मुलं असं काही करत असतील तर त्यांचे फोटो किंवा व्हिडीओ काढणं तात्काळ थांबवलं पाहिजे. गंमत म्हणजे, मुलांच्या रडण्याचे अन् चिडण्याचेही व्हिडीओज करून तेसुद्धा पोस्ट करण्याचा पराक्रम काही पालक करताना दिसतात. मला तो अत्यंत क्रूरपणा आहे असं वाटतं.

अर्थात अगदी लहानपणी मुलांना पालक असे व्हिडीओ करतात याबद्दल काही वाटत नाही किंवा मुलं ते व्यक्त करत नाहीत. पण थोडी मोठी झाल्यावर मात्र अनेक मुलांना आपल्या बाललीलांच्या व्हिडीओंबद्दल लाज वाटू शकते. तसंच मुलांची स्वत:ची सोशल मीडिया अकाउंट्स जेव्हा होतात, तेव्हा त्यांचे लहानपणीचे व्हिडीओ त्यांचे मित्रमैत्रिणीही बघू शकतात आणि अशा व्हिडीओंवरून मित्रमैत्रिणी त्यांची चेष्टाही करू शकतात. त्यामुळे असे व्हिडीओ केल्याबद्दल आणि ते शेअर केल्याबद्दल मुलांना आईवडिलांचा राग येऊ शकतो. थोडी समज आलेली- म्हणजे अगदी सात-आठ वर्षांची मुलं हे आईवडिलांना सांगायला लागतात. मुलांना ज्याविषयी लाज वाटते असे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावरून काढून टाकले पाहिजेत. मुलांचा खासगीपणा, सुरक्षितता आणि भविष्य इथे दुसरा प्रश्न येतो तो खासगीपणाचा आणि सुरक्षिततेचा. आपण सोशल मीडियावर स्वत:विषयी काहीही शेअर करतो तेव्हा आपण आपली खासगी माहिती जगासमोर मांडत असतो. आपलं नाव, गाव, लिंग, वय, शिक्षण, नोकरी, फोटो, आवडीनिवडी, आचारविचार अशी स्वत:विषयीची प्रचंड माहिती आपण अखंडपणे चव्हाटय़ावर मांडत असतो. ही सर्व माहिती फक्त आपले सुहृदच वाचतात असं नाही, तर असंख्य अनोळखी लोकही बघत असतात. याचा उपयोग कोण कशा पद्धतीनं करेल याची आपल्याला काहीही कल्पना नसते. सोशल मीडियावर व्यक्त होणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ही खासगीपणा नाहीसा होण्याची जोखीम असते. प्रौढ व्यक्ती म्हणून जाणता-अजाणता आपण ही जोखीम स्वत:साठी घेतलेली असते. मात्र आपल्याला जसा खासगीपणाचा अधिकार आहे तसाच तो आपल्या लहान मुलांनाही आहे, याचा विचार आपण करतो का? अन् यापुढे जाऊन आपल्या लहान मुलांचा खासगीपणाचा अधिकार त्यांना न विचारता त्यांच्यापासून हिरावून घ्यावा का, असा प्रश्न आपण स्वत:ला विचारतो का? मुलांच्या व्हिडीओंना मिळणाऱ्या पाचशे-हजार लाइक्सनं आपल्याला बरं वाटतं यात गैर काहीच नाही, मात्र हे करताना त्यांच्या खासगीपणाच्या बाबतीत तडजोड करतो आहोत का किंवा ऑनलाइन वा खऱ्या आयुष्यातल्या सुरक्षिततेला धोका निर्माण करतो आहोत का, हा तारतम्याचा विचार प्रत्येक पालकानं केला पाहिजे. मुलांच्या नावानं अकाउंट्स तयार करून त्यांना ‘सेलिब्रिटी’ बनवायचा प्रयत्न करणाऱ्या पालकांनी थोडा अधिकच विचार करायला हवा. अगदी लहान वयात छान छान फोटो आणि ‘गोग्गोड’ व्हिडीओ यामुळे सोशल मीडियाच्या आभासी जगात मिळालेल्या सेलिब्रिटीपणाचा मुलांच्या भविष्यावर नेमका काय परिणाम होऊ शकेल याबद्दल खरंतर काहीही डेटा आज उपलब्ध नाही. मात्र चित्रपट अथवा टीव्हीमधून बालकलाकार म्हणून प्रकाशझोतात आलेल्या आणि अगदी लहानपणी प्रचंड प्रसिद्धी मिळालेल्या कलाकारांविषयी आपल्याला थोडीफार माहिती आहे. अशा असंख्य बालकलाकारांपैकी अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच मोठेपणीही त्याच क्षेत्रात यशस्वी होतात हे आपण बघत आलो आहोत. लहानपणी अफाट प्रसिद्धी मिळून सेलिब्रिटी बनलेल्या, पण पुढे त्या क्षेत्रात काहीही करू न शकलेल्या इतर असंख्य मुलांचं पुढे काय होतं हे आपल्याला माहित नाही. पुढे आयुष्यभर ही मुलं आपल्या लहानपणीच्या सेलिब्रिटीपणाचा अहंगंड बाळगून जगतात, की पुढे तसं यश न मिळाल्याचा न्यूनगंड बाळगून जगतात, हे आपल्याला माहीत नाही. पण यापैकी काही एक होण्याची शक्यता मात्र निश्चितच आहे. सोशल मीडियावर आपण आपल्या मुलांना मिळवून देत असलेलं सेलिब्रिटीपण हे तर प्रामुख्यानं बाललीलांच्या व्हिडीओंमधून मिळवून दिलेलं असतं. हे यश निश्चितच त्यांना आयुष्यभर पुरणारं नसतं. मग जी गोष्ट आयुष्यात पुढे उपयोगी पडणार नाहीये अन् जिच्यामुळे आयुष्यभराचा अहंगंड अथवा न्यूनगंड बाळगण्याची वेळ येण्याची शक्यता आहे, अशी गोष्ट आपल्या मुलांच्या बाबतीत करावी का?

आज पालक असलेल्या सगळय़ांच्या आयुष्यात सोशल मीडिया वयाच्या विशी-तिशीत आला. सोशल मीडियाचं आपल्या सगळय़ांच्या आयुष्यावर जे गारूड बसलं आहे, त्याचा नेमका काय दूरगामी परिणाम होईल हे अद्याप स्पष्ट व्हायचं आहे. असं असताना आपल्या लहानग्यांचं, आपल्या पुढच्या पिढीचं बालपण आणि कदाचित भविष्यही सोशल मीडियाच्या महापुरात आपण लोटून देतो आहोत का, हा प्रश्न पालक म्हणून आपण प्रत्येकानं स्वत:ला विचारला पाहिजे.
माझ्या मते, ‘गोंडस कंटेंट’ आणि ढीगभर लाइक्सच्या मागे लागण्याऐवजी मुलांसोबतचं सुदृढ नातं आणि समृद्ध आयुष्यासाठी प्रयत्न करत राहाणं अधिक चांगलं!
prasad@aadii.net
(लेखक मुक्तस्रोत तंत्रज्ञानामध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर काम करणारे प्रशिक्षक आणि वक्ते आहेत.)

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Content instagram facebook tiktok short video share amy

Next Story
मागे राहिलेल्यांच्या कथा-व्यथा : तुम बिन जाऊ कहाँ!
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी