scorecardresearch

लढा आपल्याच माणसांविरुद्धचा!

टाळेबंदीच्या दरम्यान पुण्यातील एका हेल्पलाइनला येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींचं प्रमाण ६३ टक्क्यांनी वाढलं आहे.

आज देशभरात वाढलेल्या हिंसाचाराच्या तक्रारीतून हेच स्पष्ट होतंय की, घराबाहेरचे आणि घरातलेही ताणतणाव आणि समस्यांना मजबुतीनं तोंड देण्यासाठी आपली कुटुंबव्यवस्था सक्षम नाही.
अ‍ॅड. अर्चना मोरे – marchanaqv@gmail.com

टाळेबंदीच्या दरम्यान पुण्यातील एका हेल्पलाइनला येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींचं प्रमाण ६३ टक्क्यांनी वाढलं आहे. या स्त्रियांपैकी ६० टक्के स्त्रिया उच्चशिक्षित, मध्यम वा उच्च मध्यमवर्गीय आहेत.  आज देशभरात वाढलेल्या हिंसाचाराच्या तक्रारीतून हेच स्पष्ट होतंय की, घराबाहेरचे आणि घरातलेही ताणतणाव आणि समस्यांना मजबुतीनं तोंड देण्यासाठी आपली कुटुंबव्यवस्था सक्षम नाही.

‘कोविड-१९’च्या साथीला आवर घालण्यासाठी शासनानं टाळेबंदी केली. ही टाळेबंदी व्यक्ती, कुटुंब, समूह आणि एकंदर समाजासमोर खूप वेगवेगळी आणि क्लिष्ट आव्हानं घेऊन आली आहे. या सक्तीच्या उन्हाळी सुट्टीत ताणतणाव हलके करण्यासाठी लोक अनेक नव्या-जुन्या खेळांमध्ये रमले आहेत. जुन्या खेळांपैकी लहानपणीचा ‘चल्लस-आठ’चा बैठा खेळ हा मुलींच्या आवडीचा. पाटावर आखलेल्या २५ घरांपैकी फुली मारून सुरक्षित केलेल्या ५ घरांमध्ये गेलं, की कोणी आपल्याला मारू शकत नाही, असा त्या खेळाचा नियम. त्यामुळे फुली मारलेल्या घरात गेलं, की कोण आनंद व्हायचा! दुसरा नियम म्हणजे कच्चं-पक्कं. आपल्या दोन कवडय़ा एकाच घरात आल्या, की ते ‘पक्कं’ झालं असं म्हणायचं. हे ‘पक्कं’सुद्धा कोणी मारणार नाही म्हणून सुरक्षित. म्हणजेच काय, तर जोडीदाराबरोबर किंवा घरात असताना तुम्ही सुरक्षित, असं ते गृहीतक!

वाढत्या वयानुसार समज वाढते, अनुभवाच्या कक्षा रुंदावतात, तसं ‘घर’, ‘पक्कं’, ‘जोडीदार’, ‘सुरक्षितता’ याबाबतचं वास्तव समजू लागतं. आई-वडिलांचं घर ‘कायमचं’, ‘हक्काचं’ नाही, आई-वडिलांनी फुली मारून निश्चित केलेल्या ‘त्या’ घरची सून झाल्यावर समजलं, की तारेवरची कसरत करूनही ‘त्या’ घरामध्ये सुरक्षिततेची हमी नाहीच. ‘घर’, ‘कुटुंब’ वगैरे व्यवस्थांमधील तथाकथित ‘सुख’, ‘सुरक्षितता’ यातील फोलपणा स्त्रीवादी चळवळीनं वेळोवेळी उघड केला आहे. तुमच्या हक्काच्या मानल्या गेलेल्या घरातच अनेकदा सर्वात जास्त निर्घृण छळ होत असतात, ही बाब दर वेळी नवनव्या आकडेवारीतून अधोरेखित झालीय. भूकंप, पूर, जात-जमातवादी दंगे वगैरे मानवनिर्मित आणि नैसर्गिक आपत्तींच्या झळा स्त्रिया, अल्पसंख्याक व इतर दुर्बल घटकांना अधिक तीव्रतेनं बसतात. अशा आपत्तींच्या दरम्यान घराच्या सुरक्षित चौकटीतच स्त्रियांवरील अत्याचारांचं प्रमाण वाढतं.  घराबाहेरच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये घरातून होणाऱ्या अत्याचाराविरोधात दाद मागण्यासाठी वावच नसल्यानं तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करण्याशिवाय हिंसाग्रस्त स्त्रियांसमोर पर्याय नसतो, हे आपण अनेकदा अनुभवलं आहे. मार्च २०२० पासून करोना विषाणूंच्या संसर्गाला अटकाव म्हणून केलेल्या टाळेबंदीच्या पाश्र्वभूमीवर कौटुंबिक हिंसेसंदर्भातल्या पूर्वीच्याच विदारक अनुभवांची पुनरावृत्ती दिसणे ही अत्यंत गंभीर बाब आहे.

‘घर दोघांचं आणि घरकामही दोघांचं’ असं मानणारी मंडळी नेहमीच घरातल्या जबाबदाऱ्या स्वीकारतात. टाळेबंदीमुळे घरी थांबलेले अनेक पुरुष नव्यानं घरकामात जोडून घेत आहेत. घरकामात तोचतोचपणा आहे, ते सतत आणि कटाक्षानं करावं लागतं, ते कंटाळवाणं आहे, थकवा, शीण येतो, अशी कबुलीही अनेक जण देतात. जबाबदार आणि संवेदनशील जोडीदारांच्या कुटुंबांमध्ये सक्तीची सुट्टी कंटाळवाणी होऊ नये म्हणून अनेक कल्पक उपक्रम सुरू आहेत. घरातली मुलं, वृद्ध यांच्याबरोबर जोडीदाराचीही काळजी घेतली जात आहे, पण हे चित्र सार्वत्रिक आहे की अपवाद?  जर अपवादात्मक असेल तर या अपवादांव्यतिरिक्त घरांच्या चौकटींमध्ये काय घडतंय हे पाहायला हवं. देशभरात व्यक्तिगत नातेसंबंध दुरावलेल्या कुटुंबांची संख्या कमी नाही. घरातली स्त्री म्हणजे ‘ट्रॅश कॅन’.

‘कोणीही यावं टपली मारूनी जावं’ याप्रमाणे राग, वैफल्य, संताप काढण्यासाठीची हक्काची जागा. तर काहींसाठी स्त्री जोडीदार म्हणजे हक्काचं माणूस. ‘‘तुला माहितीये ना माझा स्वभाव असा आहे, मग..’’, ‘‘मला राग सहन होत नाही हे तुला कळलं पाहिजे’’, ‘‘राग कोणावर निघणार!.. तुझ्याशिवाय माझ्या हक्काचं असं कोण आहे, सांग ना..’’,  असा भावनिक मुलामा चढवून अत्यंत निर्घृण वागणूक स्त्री जोडीदाराला दिली जाते. प्रसंगी मारहाणही करतात. अनेक महाभाग या क्रूर वागणुकीला प्रेमाचं नाव देऊन मोकळे होतात. ‘‘तू रात्री मला नाही का म्हटलीस?  मला नाही खपत तू नाही म्हटलेलं.’’, ‘‘माझं प्रेम आहे तुझ्यावर, तू असं रागावलेलं मला सहन नाही झालं, मग हात उठला माझा’’, असे ‘प्रेमसंवाद’ घराघरांत चालतात. तर काही ठिकाणी, ‘‘माझ्या घरात राहायचं असेल तर माझ्या पद्धतीनं आणि लिमिटमध्ये, नाही तर रस्ता सुधारा’’, अशी मग्रुरी, अरेरावीही दिसते.

अगदी टोकाला जाऊन, ‘‘उठता लाथ, बसता बुक्की’’, ‘‘लातोंके भूत बातोंसे नहीं मानते’’, या कुनीतीनं बायको आणि वृद्ध पालकांशी वागणारे, ‘‘माझी बायको माझ्यासमोर उभं राहण्याची हिंमत करत नाही कधी,’’ असं चारचौघांत दिमाखानं सांगणारे मर्दगडी.. यांचीही संख्या मोठी आहे. अशा असंवेदनशील, असमंजस, क्रूर जोडीदाराबरोबर बंद घरामध्ये असंख्य स्त्रिया कोंडल्या गेल्या आहेत. टाळेबंदीमुळे त्या घराबाहेर पडून कोणाची मदत घेऊ शकणार नाहीयेत आणि ही परिस्थिती पुढील काही दिवस तरी अशीच राहणार आहे या जाणिवेनं अंगावर सरसरून काटा येतोय.

गेल्या तीन आठवडय़ांत राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावरून पुढे आलेल्या आकडेवारीतून स्त्रियांवरील कौटुंबिक छळाचं वास्तव समोर आलं आहे. परदेशांतील पोलीस यंत्रणा, सामाजिक संस्था, हेल्पलाइन वगैरेंकडून प्रसिद्ध होत असलेल्या आकडेवारीतून हे खूप ठळकपणे दिसलंय, की तेथील टाळेबंदीच्या काळात जोडीदार करत असलेल्या छळाचं प्रमाण वाढून हिंसेच्या प्रश्नानं गंभीर स्वरूप धारण केलं आहे. याबाबतीत आपला देश अपवाद नाही.  राष्ट्रीय महिला आयोगानं दिलेल्या आकडेवारीनुसार भारतामध्ये टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर- २४ मार्च ते १ एप्रिल २०२० दरम्यान कौटुंबिक हिंसाचाराची ६९ प्रकरणं आयोगाकडे नोंदविण्यात आली. टाळेबंदीपूर्वीच्या आकडेवारीच्या तुलनेत या तक्रारी दुपटीने वाढल्या आहेत.

पुणे शहरात अत्याचारग्रस्त स्त्रियांसाठी ‘सखी हेल्पलाइन’ चालवण्यात येते. या हेल्पलाइनच्या समुपदेशक मुक्ता काळे यांच्या निरीक्षणानुसार टाळेबंदीच्या काळात हेल्पलाइनला येणाऱ्या कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारींचं- फोनकॉल्सचं प्रमाण ६३ टक्क्यांनी वाढलं आहे. या स्त्रियांपैकी ६० टक्के स्त्रिया उच्चशिक्षित, मध्यमवर्गीय वा उच्च मध्यमवर्गीय आहेत. पतीचं दारूचं व्यसन, टाळेबंदीमध्ये आर्थिक घडी विस्कटलेली असल्यानं आलेले ताण, घरून काम करणाऱ्या उच्चशिक्षित जोडप्यांमध्ये कामाच्या ताणाबरोबरच घरातल्या दैनंदिन कामांचं व्यवस्थापन, घर व मुलांची जबाबदारी सांभाळताना येणारा मानसिक, भावनिक ताण, त्यातून शारीरिक, मानसिक हिंसाचार वाढलेला आहे असे दिसतं. सतत वाढत्या प्रमाणात येणाऱ्या या तक्रारी काय सांगतात? त्यातून हेच स्पष्ट होतंय, की घराबाहेरचे ताणतणाव आणि समस्यांना मजबुतीनं तोंड देण्यासाठी आपली कुटुंबव्यवस्था सक्षम नाही.

सक्तीच्या सुट्टीत घरात अडकून पडलेल्या आणि कंटाळलेल्या प्रत्येकाच्या हातात चहाचा कप आणून देणं शक्य नाही हे कुटुंबातल्या सदस्यांना समजावण्यात गृहिणीला झगडावं लागतंय, प्रसंगी घरातल्या स्त्रीला स्वत:कडे वाईटपणा, नाही तर अपराधीभाव घ्यावा लागतोय. उदरभरण म्हणून नाही, तर कंटाळा घालवण्याचा हमखास मार्ग म्हणून जेवण-नाश्त्याची फर्माईश होते आहे आणि प्रत्येकाच्या आवडीचा मेन्यू ताटात पडत नाही म्हणून धुसफुस होतेय. मग दिवसभर राब-राब राबून तिच्या वाटय़ाला हक्काची विश्रांती सोडाच, पण सर्वासाठी केल्याचं साधं समाधानही मिळत नाही.

‘वर्क फ्रॉम होम’च्या कचाटय़ात सापडलेल्या स्त्रियांची वेगळीच कथा! घरात अडकलेल्या लहान मुलांची चिडचिड वाढू नये म्हणून त्यांचं खाणं, मनोरंजन आणि एकंदर वेळा सांभाळायच्या, नवरा ‘वर्क फ्रॉम होम’च्या ताणाखाली आहे म्हणून त्याला ‘समजून’ घ्यायचं, वृद्धांची, कुटुंबातल्या आजारी सदस्यांची विशेष काळजी घ्यायची, घराबाहेर सारखं पडता येणार नाही म्हणून उपलब्ध वस्तूंचा नियोजनबद्ध वापर करायचा, ऑफिसच्या कामाच्या ईमेल्स, फोन कॉल्स, रिपोर्ट्स सबमिशन, हे वेळच्या वेळी मार्गी लावायचं, या जंजाळात तिच्या मानसिक ताणाचा निचरा कुठे होणार? कसा होणार?

एक मैत्रीण म्हणाली, की फक्त ईमेल वा इंटरनेटवरून काम करता येणार असेल तर भाग वेगळा, परंतु दिवसभरात केव्हाही येणारे व्हिडीओ कॉल्स, झूम कॉल्स, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगसाठी सतत ऑफिसमध्ये बसल्यासारखं तयार असावं आणि दिसावंही लागतं. मग घराचं पार ऑफिस करून टाकलंय म्हणून घरातल्यांची चिडचिड, तिरपी नजर ही वेगळीच. तुमच्या ‘सबॉर्डिनेट्स’चं मनोबल वाढवण्यासाठी सतत कार्यक्षम आणि सर्जनशील  राहण्याचा ताण, तर तुम्ही व तुमची टीम काम करत असल्याची ‘हायर ऑथॉरिटी’ला खात्री पटवून देण्यासाठी सतत ‘अपडेट्स’ द्यावे लागतात आणि तेही वर दिलेली घरातली सर्व व्यवधानं सांभाळून. यात ताणाची भर घालणाऱ्या इतर अनेक बाबी पिंगा घालत येतात. नवऱ्याचे विवाहबाह्य़ संबंध किंवा त्याला तिच्या विवाहबाह्य़ संबंधांबाबत असलेला संशय, टाळेबंदीच्या काळात आर्थिक असुरक्षिततेची भीती,  टाळेबंदीदरम्यान काहींच्या नोकऱ्या गेल्यात, तर काहींना निम्म्या पगारावर काम करत नोकरी टिकवावी लागणार आहे, काहींचे व्यवसाय ठप्प झालेत, तर काही ‘यशस्वी’ पुरुष त्यांचे ताणतणाव घरातील हक्काच्या माणसांवर व्यक्त करीत आहेत. हे साचलेपण, तोचतोचपणा, मन मोकळं करण्याच्या संधी नाहीत, अशी ही यादी किती तरी मोठी होईल. अनेक घरात चार भिंतींमध्ये कधीही फुटू शकतील असे मानसिक ताणाचे टाइमबॉम्ब तयार होत आहेत. टाळेबंदीनंतर घटस्फोटाचं प्रमाण वाढण्याची चिन्हं आहेतच. या सर्व ताणावर समाज म्हणून आणि कुटुंबात, व्यक्तिगत पातळीवर लवकरात लवकर उपाय शोधायला हवेत.

या साथीच्या काळात घराबाहेर पडून काम करावं लागणाऱ्या स्त्रियांची कुचंबणाही समजून घ्यावी लागेल. ग्रामीण भागात आशा वर्कर्स, शहरातील आरोग्य कर्मचारी, परिचारिका, डॉक्टर्स, पोलीस कर्मचारी स्त्रियांचं रस्त्यावर फुलांच्या पायघडय़ा घालून किंवा थाळी वाजवून कौतुक होईलही, परंतु घरात मात्र आजार घेऊन आलेली ब्याद असंच स्वागत होतंय. साऱ्या कुटुंबाला ही खाऊन टाकणार, असे कटाक्ष झेलतच काहींना घरात प्रवेश करावा लागतो. घरी आल्यावर स्वच्छ आंघोळ करून घरकामाला, स्वयंपाकाला लागण्याला पर्याय नसतो, हे वास्तव डॉ. मनीषा गुप्ते आणि डॉ. सुचित्रा दळवी यांनी अलीकडेच आपल्या लेखनातून समोर आणलं आहे.

भटक्या जाती-जमातीतील स्त्रिया, गरीब वस्त्यांमधील स्त्रिया, मोलकरीण, असंघटित क्षेत्रातील इतर स्त्रियांच्या आयुष्यातही भयंकर आर्थिक ताण या टाळेबंदीमुळे आला आहे. एकीकडे नवऱ्याच्या हाताला काम नाही, व्यसनं, कर्ज, वसुलीसाठीचा तगादा, हे सर्व सांभाळताना आता घरी असलेल्या नवऱ्याचे दोन रट्टे ‘बोनस’ म्हणून स्वीकारून दोन वेळच्या जेवणाची जुळवाजुळव या कष्टकरी स्त्रियांना करावी लागते आहे, लागणार आहे. त्याची तक्रार के ली आणि त्याला तुरुंगात टाकलं तर सोडवून आणण्यासाठी जामीनदारांना द्यायला पैसे नाहीत आणि सुटल्यावर त्याच्या मारापासून पुन्हा कोण वाचवणार, म्हणून कदाचित या स्त्रिया आता कौटुंबिक छळाविरोधात बोलणंही बंद करतील. त्यातून त्यांची होणारी कोंडी, घुसमट, छळ याची कल्पनाही करवत नाही.

टाळेबंदीच्या काळात साथ नियंत्रण ही शासनाची प्राधान्यानं जबाबदारी असणार आणि तशी ती असायलाही हवी, पण त्याबरोबरीनं कौटुंबिक हिंसाग्रस्त स्त्रियांसाठीही काही प्रयत्न आवर्जून होत आहेत. जसं राष्ट्रीय महिला आयोगानं, केरळ राज्याच्या सामाजिक न्याय विभागानं खास टाळेबंदीच्या काळात समस्याग्रस्त स्त्रियांसाठी स्वतंत्र हेल्पलाइन सुरू केली आहे. पोलीस आयुक्त कार्यालयामध्ये ‘भरोसा सेल’, ‘स्पेशल सेल फॉर वुमेन अँड चिल्ड्रन’, ‘पोलीस हेल्पलाइन’ वगैरे यंत्रणा या स्त्रियांसाठी कार्यरत आहेत. शासनातर्फे चालवण्यात येणारी आधारगृहंदेखील स्त्रियांना चोवीस तास सेवा देत आहेत. हिंसाग्रस्त स्त्रीला  हिंसक जोडीदारापासून वेगळं होऊन तिच्या मुलांसह सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यासाठी पोलीस मदत करीत आहेत.  सामाजिक संस्थांशी संलग्न समुपदेशक, मानसतज्ज्ञ टाळेबंदीच्या काळात मनोबल टिकवून ठेवण्याच्या अनेक सूचना, युक्त्या समाजमाध्यमांद्वारे सांगत आहेत. माहितीपत्रकं, व्हिडीओ वगैरेंमधून बरीच माहिती ते लोकांपर्यंत पोहोचवत आहेत. आहे त्या परिस्थितीत मन दु:खी, निराश होऊ न देण्यासाठी काय करावं, असुरक्षितता, भीतीवर मात कशी करावी, ताणतणावात मन स्थिर ठेवण्यासाठी काय करावं, याबाबत सल्ला-मार्गदर्शन देणाऱ्या हेल्पलाइनही १२ तास सुरू असतात.

हेल्पलाइनवर येणारे फोनकॉल्स आणि इमेल्सची संख्या वाढणे हा हिंसाचार वाढत असल्याचा एकमेव निकष नाही. दिल्ली येथील ‘जागोरी’ संस्थेच्या संचालिका जया वेलणकर यांनी नोंदविलेल्या निरीक्षणानुसार हेल्पलाइनद्वारे मदत मागणाऱ्या  स्त्रियांच्या तुलनेत मदत मागण्याची संधीच न मिळू शकत नाही, हेल्पलाइनपर्यंत पोहोचू शकत नाहीत, अशा स्त्रियांची आकडेवारी खूप मोठी असणार आहे. टाळेबंदीनंतर स्त्रिया घराबाहेर पडून मदत घेऊ  लागतील. त्यातून नातेसंबंधांमध्ये सुधारणा व्हावी हीच अपेक्षा. मात्र एकंदर समाजाने आणि विशेषत: कुटुंबानं आपला पारंपरिक दृष्टीकोन, आग्रह सोडले नाहीत तर घटस्फोटांचं प्रमाण वाढू शकेल, अशी भीतीही विविध पातळ्यांवरून व्यक्त केली जातेय. टाळेबंदीच्या काळातील आणि नंतरचीही ही आव्हाने लक्षात घेता समाजानंही या प्रश्नाकडे गांभीर्यानं पाहण्याची गरज आहे. अन्यथा आपलेच जिवलग कुटुंबव्यवस्थेच्या आणि पितृसत्तेच्या विषाणूला बळी पडतील.

शेवटी काय, तर ‘चल्लस आठ’मधील फुली मारलेलं घर सुरक्षित नाही किंवा जोडीदाराबरोबरचं ‘पक्कं’ही सुरक्षित नाही. घराबाहेर आणि घरातही आपलं स्वत्व टिकवून ठेवण्यासाठी झगडावं लागणारच आहे. पण तुम्ही एकटय़ा नाहीत. निश्चय करा, पाऊल टाका, चालायला सुरुवात तर करा, मार्ग निश्चित मिळत राहतील.

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coronavirus pandemic lockdown increase in domestic voilance dd70