scorecardresearch

टाळं लागलेलं जिणं

शेतकरी नवऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या विधवा गावोगावी मिळेल ते काम करून, तसंच आपल्या कुटुंबाच्या थोडय़ाथोडक्या जमिनीच्या तुकडय़ावर शेती करून कशीबशी हातातोंडाची गाठ घालत आहेत.

आधीच ‘टाळं लागलेलं जिणं’ वाटय़ाला आलेल्या या विधवा शेतकरी स्त्रियांची वाट बिकट होऊ नये..

सुवर्णा दामले – prakriti_ngp@bsnl.in

शेतकरी नवऱ्यानं आत्महत्या केल्यानंतर त्यांच्या विधवा गावोगावी मिळेल ते काम करून, तसंच आपल्या कुटुंबाच्या थोडय़ाथोडक्या जमिनीच्या तुकडय़ावर शेती करून कशीबशी हातातोंडाची गाठ घालत आहेत. मुलांना, सासू-सासऱ्यांना सांभाळत आहेत. ‘करोना’ आला, टाळेबंदी लागली आणि सगळ्या लहान रोजगारांना त्याचा पहिला फटका बसला. त्यातच असंख्य शहरी लोक मूळगावी परत आलेत. त्यामुळे अनेक घरात मिळकतीवरून कौटुंबिक वादालाही तोंड फु टलं आहे. खरीप हंगाम सुरू होतो आहे. अशा वेळी आधीच ‘टाळं लागलेलं जिणं’ वाटय़ाला आलेल्या या विधवा शेतकरी स्त्रियांची वाट बिकट होऊ नये..

गीताताईंच्या शेतकरी नवऱ्याच्या आत्महत्येला जवळपास सात र्वष झाली. तेव्हापासून त्या आपल्या एकुलत्या एक लहान मुलासह रोजची नवीन आव्हानं पेलत तग धरून जगताहेत. नवऱ्याच्या पश्चात दोन एकर शेत आणि राहत्या घराचा एक भाग त्यांना मिळाला. शेती हेच त्यांचं जगण्याचं साधन. मुलगा लहान असल्यामुळे स्वत:ची शेती दुसऱ्याला ठेक्यानं कसायला देऊन त्या जमेल तसं इतरांच्या शेतात मजुरीला जातात. गेल्या वर्षी पैसे कमी मिळत होते म्हणून त्यांनी स्वत: शेती करायचं ठरवलं. पिकवलेलं सोयाबीन टाळेबंदीपर्यंत घरीच पडलं होतं. त्या सोयाबीनच्या साठय़ावर उंदरांनी हल्ला चढवला. सोयाबीनबरोबरच घरातले कपडेसुद्धा उंदरांनी कुरतडून ठेवल्यामुळे शेवटी गीताताईंनी सोयाबीन बाहेर काढलं. चांगल्या स्थितीतलं सोयाबीन मिळेल त्या किमतीत त्यांना विकायचं आहे.

हातात काहीच पैसा नाही, त्यात मुलाचं सततचं आजारपण. यामुळे येणाऱ्या हंगामात शेतीला पैसे आणायचे तरी कुठून.. आता या ‘करोना’ संकटामुळे ठेक्यानं शेती दिली तर भाव आणखीनच कमी होईल. त्यापेक्षा शेत तसंच ठेवलं तर कमीत कमी पैसा तरी उभा करावा लागणार नाही, असा विचार त्यांच्या मनात येतो आहे.  शेजारीच त्यांच्या सासरची मंडळी राहतात, पण त्यांचा गीताताईंशी काहीच संवाद नाही. तरुण वयात वैधव्य आलं म्हणून गीताताईंच्या आई-वडिलांनी त्यांच्या पुनर्विवाहाचा प्रस्ताव मांडला. गीताताईंनीही संमती दर्शवली, पण त्यांचा मुलगा जरी लहान असला तरी लग्नाला परवानगी देत नाही. त्याला राहतं घर, गाव आणि आई काहीही सोडायचं नाही. गीताताईंनी मुलाला समजेल अशा शब्दांत समजावून सांगितलं, पण मुलगा आईच्या लग्नाची चर्चा जरी ऐकली तरी बिथरतो. यामागे कदाचित त्याला इतरांचे आलेले वाईट अनुभव असू शकतात.

गीताताईंसारख्या कितीतरी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या तरुण विधवा आहेत ज्या एकुलत्या एक अपत्यासोबत राहात आहेत. मूल लहान असल्यामुळे आणि त्याचा सांभाळ करणारं कुणी नसल्यामुळे त्यांना बाहेर पडून फारसं कामही करता येत नाही. सध्याच्या टाळेबंदीच्या काळात घरी राहून करता येणारी कामंदेखील मिळेनाशी झाली आहेत.  चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या प्रियांकानं कधी आपले वडील बघितले नाहीत. ती जन्माला यायच्या आधीच तिच्या वडिलांनी आत्महत्या केली आणि तेव्हापासूनच ती आईबरोबर, २८ वर्षीय जयाबरोबर तिच्या माहेरी राहते आहे. प्रियांकाचे आजी-आजोबाही आजारानं आणि वृद्धत्वानं जग सोडून गेले. त्यामुळे आता त्यांच्या घरात प्रियांका आणि जया दोघीच राहातात. जया शिलाईकाम करते. मात्र टाळेबंदी सुरू झाल्यापासून शिलाईसाठी फारसे कपडे येईनासे झाले. बाहेर जाऊन शिलाईची कामं आणावीत तर टाळेबंदीमुळे आणि एकू णच करोनाच्या भीतीमुळे तेही फारच कमी झालं आहे. ऐन लग्नाच्या हंगामात शिलाई मशीन बंद ठेवावं लागलं तर पुढे काय होईल, हा प्रश्न जयापुढे आहे. प्रियांकाचे आजी-आजोबा होते तोपर्यंत कुणी तरी नातेवाईक, गावातले शेजारीपाजारी त्यांच्या वयाचा मान ठेवून थोडीफार मदत करत होते. मात्र ते गेले तेव्हापासून  प्रियांका आणि जयानं माहेरच्या घरात राहू नये, असा दबाव तिच्याच चुलत्यांकडून येत आहे. सततच्या मानसिक ताणामुळे जयाला तीव्र डोकेदुखीचा विकार जडला आहे. डॉक्टरांनी तिला सकस आहार आणि विश्रांती घ्यायला, आनंदी राहायला सांगितलं आहे. सध्याच्या परिस्थितीत हे तीनही उपाय जयासाठी शक्य नाहीत. सध्या तरी तिच्याकडे जे काही थोडेबहुत कपडे येतात त्याच्या शिलाईतून केवळ भाजीपाला घेण्यापुरते पैसे  मिळत आहेत. बाकी रेशनवरचे गहू आणि तांदूळ एवढंच काय ते दोघी मायलेकींकडे खाण्यासाठी आहे. तेल, डाळ, साखर अशा ‘महाग’ वस्तू आणण्यासाठी पैसे नाहीत आणि त्याशिवाय नुसता भाजीपाला आणि गहू-तांदूळ घेऊन स्वयंपाक तरी कसा व काय करावा, हा प्रश्न दररोज पडत आहे.

टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्यांचे, श्रमिकांचे प्रचंड हाल झाले आणि होत आहेत. श्रमिकांचं मोठय़ा संख्येनं आपल्या मूळ गावी येणं सुरू आहे आणि सर्व जण आता गावातच शेती करून पोट भरू, असं म्हणत आहेत. या पाश्र्वभूमीवर शेतकरी वर्गाकडे विशेष लक्ष पुरवण्याच्या गरजेबाबत सार्वत्रिक उच्चार  होत आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं त्या शेतकऱ्यांच्या मागे राहिलेल्या विधवा आणि त्यांच्या मुलांची दुर्दशा पाहता, ही परिस्थिती शेतीकडे मोठय़ा संख्येनं वळू पाहाणाऱ्या कुटुंबांना परावृत्त तर नाही करणार ना, अशीही शंका येत आहे.

शिर्ला या गावाचं नाव हल्लीच करोनाविषयीच्या बातम्यांमध्ये समोर आलं होतं, कारण या गावात करोनाबाधित रुग्ण आढळले होते. याशिवाय हेच गाव यापूर्वी शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातसुद्धा समोर आलं आहे. याच गावातल्या मालाताईंनी तीन वर्षांपूर्वी शिर्ला गाव सोडलं, कारण नवऱ्याच्या आत्महत्येनंतर गावात राहात असताना त्यांच्या नऊ वर्षांच्या मुलाला गुटखा खाण्याचं व्यसन जडलं होतं, त्याचं अभ्यासावरचं लक्ष उडालं होतं, त्याचं वागणंही त्रासदायक होऊ लागलं.  नवऱ्याची साथ नसताना मुलांना वाढवायचं असलेलं दडपण आणि त्यातून मुलाला एवढय़ा लहान वयात लागलेलं व्यसन बघून मालाताईंनी धास्तावून गाव सोडून शहर गाठलं. नातेवाईकांच्या मदतीनं सासरे आणि मुलांसह त्या शहरात आल्या. शहरात सुपारी फोडणं, वाती आणि शेवया करणं इत्यादी व्यवसायांतून थोडीफार कमाई त्या करतात. टाळेबंदीच्या काळात ही सर्व कामं बंद झाली आणि त्यांना शहरातून गावात यायलाही शक्य झालं नाही. त्यांच्या गावातल्या रेशन दुकानदारानं सहकार्य केल्यामुळे त्यांच्या कुटुंबाचं रेशन त्यांना शहरात घरपोच मिळालं. मात्र हाती काहीच पैसा नसल्यामुळे नातेवाईकांकडून उसने पैसे घेऊन त्या कसे तरी दिवस ढकलत आहेत.

टाळेबंदीच्या काळात शेतीची कामं सुरू ठेवावीत, असं जरी सांगितलं, तरी प्रत्यक्षात शेतात कामं फार कमी झाली आहेत. जिथे २० स्त्रियांना मजुरी मिळायची तिथे चारच जणींना मजुरीसाठी बोलावलं जातं. परिणामी, मजुरी नसलेल्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. कल्पना, सुनीता, राधा, रंजना या सर्व शेतकरी विधवांनी जेव्हा रोजगार हमी योजनेमध्ये तरी काम द्या, अशी मागणी केली, तेव्हा सध्या रोजगार हमीची कामं मंजूर झाली नाहीत किंवा रोजगार हमीची कामं बायकांना झेपणारी नाहीत, अशी उत्तरं त्यांना मिळाली. टाळेबंदीच्या काळात एकदाही रोजगार हमी विभागाचे अधिकारी गावाकडे आले नाहीत आणि ग्रामसेवकही कधी तरी थोडय़ा वेळापुरतेच येत होते, मग आपली अडचण तरी कुणाकडे मांडायची, असं या चौघी विचारत होत्या.

शेतकरी पतीच्या आत्महत्येनंतर या विधवांना केवळ अर्थार्जनाचाच प्रश्न नाही, तर सासरी राहणाऱ्या स्त्रियांवर वृद्ध सासू-सासऱ्यांची काळजी घेण्याची आणि त्यांचं औषधपाणी करण्याचीही जबाबदारी आहे. सुनंदाताई नवरा गेल्यापासून सासू-सासऱ्यासोबत राहात आहेत. सासूबाईंचं निधन झालं आणि गेल्या काही महिन्यांपासून सासऱ्यांची तब्येत अतिशय खालावली आहे. सासऱ्यांना दिवसरात्र देखरेखीची गरज असल्यामुळे त्या मजुरीला जाऊ शकत नाहीत. शेती अत्यल्प असल्यामुळे उत्पन्न कमी झालं आहे. मग त्यांनी आपला मुलगा अठरा वर्षांचा आहे, असं खोटंच सांगून त्याला समृद्धी महामार्गाच्या कामावर पाठवलं. त्याच्या कमाईचा आधार झाला होता, मात्र टाळेबंदीमुळे महामार्गाची कामं मंदावली आणि सुनंदाताईंच्या मुलाला सध्या घरी बसावं लागत आहे. त्यांना सध्या संजय गांधी निराधार पेन्शन आणि उसनवारीवर दिवस ढकलावे लागत आहेत. घरी पुरेसं खायलाच नाही, तर सासऱ्यांचं औषधपाणी कसं करणार, हा प्रश्न आहे. शिवाय सासऱ्यांना वाऱ्यावर सोडलं आहे, असे लोकांचे टोमणेही त्यांना ऐकावे लागतात.

टाळेबंदीमुळे मोठे शेतकरीसुद्धा कित्येक क्विंटल कापसाच्या ढिगांकडे भकास डोळ्यांनी पाहात बसलेत, तिथे काही किलो चणा, तूर एवढंच उत्पन्न ज्या शेतकरी विधवांकडे झालं, त्या तर १०-१० किलो चणा आणि तूर पडेल त्या किमतीत गावात, नातेवाईकांना विकून हातात चार पैसे येण्याची तजवीज करीत आहेत.

अशा अनेक शेतकरी स्त्रिया आहेत, की ज्या एकटय़ा अपत्यासह राहात आहेत आणि त्यांपैकी बहुतेकींच्या मुलाला किंवा मुलीला काही ना काही आरोग्याच्या अडचणींनी ग्रासलेलं आहे. प्रतिभाताई त्यांच्या जय या एकुलत्या एक मुलासोबत स्वतंत्रपणे राहतात. त्यांच्या भावाचं त्यांच्याकडे लक्ष असतं, मात्र टाळेबंदीत भावाला स्वत:चंच कुटुंब पोसणं जड जात आहे, तर त्यात त्याच्याकडे कसं आणि काय मागायचं असं प्रतिभाताईंना वाटतं. या संकोचामुळे त्या भावासमोर आपलं गाऱ्हाणं मांडत नाहीत आणि भाऊही परिस्थिती समोर दिसत असूनही आपली हतबलता लपवण्यासाठी कानाडोळा करतो. प्रतिभाताई स्वत: सतत आजारी असतात, तर त्यांचा मुलगा जय अतिशय अशक्त आहे. त्यामुळे या दोघांचा अन्नापेक्षा औषधांचाच खर्च जास्त आहे. मात्र सध्या पैसे नसल्यामुळे औषधोपचार बंद आहेत. आता प्रतिभाताई आणि जय दोघंही घरीच राहून संजय गांधी निराधार पेन्शन आणि रेशनवर मिळालेल्या धान्याच्या आधारानं राहात आहेत.

ज्या शेतकरी स्त्रियांची मुलं वयानं साधारण पंधरा र्वष किंवा त्यापेक्षा मोठी आहेत, ती एरवीही काही तरी काम करून आईला हातभार लावतात. मात्र टाळेबंदीच्या काळात बहुतेक मोठय़ा मुलामुलींना मिळतील ती कामं करावी लागली. संगीताताईंची दोन्ही मुलं सोळा वर्षांपेक्षा मोठी आहेत. टाळेबंदीच्या काळात त्यांचा एक मुलगा इंधनाच्या काडय़ा वेचायला जायचा, तो काडय़ा वेचताना घसरून पडला आणि त्याचा उजवा हात मोडला. संगीताताईंकडे त्याचे उपचार करण्यासाठी पैसेच नव्हते. मग काही वेळ मुलाला तसंच वेदनेनं तळमळत ठेवत त्यांना मदतीसाठी धावधाव करावी लागली. शेवटी सरपंचांनी मध्यस्थी केली आणि त्याला दवाखान्यात नेण्यासाठी, औषधांसाठी उधारीवर पैसे मिळाले. आता दीड महिना त्यांना या मुलाची काहीच मदत होऊ शकणार नाही. उलट त्याच्या उपचारांसाठी उधार घेतलेले पैसेही परत करावे लागतील. दुष्काळात तेराव्या महिन्याची झळ केवळ संगीताताईंनाच नाही तर त्यांच्यासारख्या इतर अनेक स्त्रिया अनुभवताहेत.

या लेखात आधी उल्लेख केलेलाच आहे, की करोना टाळेबंदी ही श्रमिक वर्गासाठी फार क्लेशदायी ठरली आहे. या टाळेबंदीच्या काळात अनेकांचे रोजगार बुडाले, प्रचंड आर्थिक नुकसान झालं आणि करोनाचा सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या शहरांकडून आणि महानगरांतून श्रमिक वर्ग गावाच्या, कुटुंबाच्या ओढीनं आपल्या मूळ गावी परतू लागला. गावी आपली शेती आहेच, तीच आपलं आणि कुटुंबाचं पोट भरेल या आशावादावर आज लाखोंच्या संख्येनं श्रमिक गावी परत निघालेत आणि पोहोचलेही आहेत.  सर्वसाधारणपणे पश्चिम विदर्भातले शेतकरी हे मध्यम व अल्पभूधारक या गटात मोडतात. जेव्हा शेतीवर आश्रित असलेल्यांची संख्या पिढीगणिक वाढली आणि त्यात भागेनासं झालं, तेव्हा बऱ्याच कुटुंबांतील कुणा एका भावानं मजुरीसाठी किंवा नोकरीसाठी महानगर गाठलं, तर दुसऱ्या भावांनीही इतरत्र व्यवसायांत प्रयत्न केले. त्यांच्यातला जो भाऊ गावात राहिला त्यानंच शेती केली. ज्यांनी शेती केली त्यांच्यापैकी काहींनी आत्महत्या केली. तेव्हा गावाबाहेर पडलेल्या भावांनी आपले इतर व्यवसाय सांभाळून शेतीकडे लक्ष दिलं. मात्र आता टाळेबंदीमध्ये गावाबाहेर अर्थार्जनासाठी गेलेले भाऊही गावी परत आले आहेत आणि आता कुटुंबातल्या सर्वाचीच आर्थिक स्थिती कमकुवत झाली आहे. या परिस्थितीत ज्या शेतकरी विधवा एकत्र कुटुंबात राहात आहेत, त्या फारच  हवालदिल झाल्या आहेत, कारण आता त्यांना सासरे, दीर यांच्या मताप्रमाणेच राहावं लागत आहे. आपलं म्हणणं, गाऱ्हाणं मांडायची काहीच सोय राहिलेली नाही. असंच चित्र सध्या उगले यांच्या कुटुंबात आहे. दोन भाऊ त्यांच्या कुटुंबासह गावी परत आले आहेत आणि त्याच कुटुंबातल्या ज्या तिसऱ्या भावानं आत्महत्या केली होती, त्याची पत्नी वनिता आणि तिची दोन मुलंही तिथेच राहात आहेत. नवऱ्याच्या पश्चात वनिता सासू-सासऱ्यांच्या आधारानं शेती सांभाळत होती. त्यामुळे तिला थोडी आर्थिक मदत होत होती. स्वत:च्याच शेतीत काम करत असल्यामुळे सुरक्षितही वाटत होतं. टाळेबंदीमध्ये नवऱ्याचे दोन्ही भाऊ व त्यांचे कुटुंबीय परत आले तेव्हापासून कुटुंबात रोज वाद होत आहेत. दोन्ही भाऊ शेती विकून जो काही पैसा येईल त्यातून काही व्यवसाय सुरू करू, असं म्हणत आहेत. वनिता शेती विकण्याच्या कल्पनेनंच हादरली आहे. वनिताला शेती विकून तिच्या वाटय़ाचा पैसा मिळेलही, परंतु तो कायमसाठी पुरणार नाही. मग नंतर आपलं आणि मुलांचं काय होईल, या विचारानं सैरभैर झालेली वनिता माहेरी निघून जावं का, या निर्णयापर्यंत येऊन पोहोचली आहे.

आधीच कर्जबाजारीपणामुळे आणि हवामानाच्या लहरीपणामुळे त्रासलेल्या शेतकरी कुटुंबांना कौटुंबिक वादाच्या अशा विळख्यात सापडण्यापासून रोखायला हवं. म्हणूनच ग्रामीण भागाच्या बाबतीत केवळ शेतीच नव्हे, तर शेतीपूरक आणि त्या ठिकाणी रुजणारे इतर व्यवसाय, सेवा यांकडेही प्राधान्यानं लक्ष देण्याची गरज आहे.

खरीप हंगाम आला आहे. काही दिवसांत त्याला जोमानं सुरुवात होईल, आणि लाखोंच्या संख्येनं असलेली ग्रामीण कुटुंबं शेतीच्या आधारानं जगतील, असा सकारात्मक विचार तरी केलाच पाहिजे; पण या विचारासोबतच शेतीवर अवलंबून असणाऱ्या जुन्या आणि नव्याही कुटुंबातला शेतकरी आत्महत्या करणार नाही, याचीही काळजी आपल्याला घ्यावी लागेल.

टाळेबंदीच्या काळात शेतीची कामं सुरू ठेवावीत, असं जरी सांगितलं असलं, तरी प्रत्यक्षात शेतातील कामं फार कमी झाली आहेत. जिथे २० स्त्रियांना मजुरी मिळायची तिथे चारच जणींना मजुरीसाठी बोलावलं जातं. परिणामी, मजुरी नसलेल्या स्त्रियांची संख्या वाढली आहे. कल्पना, सुनीता, राधा, रंजना या सर्व शेतकरी विधवांनी जेव्हा रोजगार हमी योजनेमध्ये तरी काम द्या, अशी मागणी केली, तेव्हा सध्या रोजगार हमीची कामं मंजूर झाली नाहीत किंवा रोजगार हमीची कामं बायकांना झेपणारी नाहीत, अशी उत्तरं त्यांना मिळाली. शासकीय पातळीवरही मदत मिळत नाही आणि त्यासाठी संपर्क  कु णाला करायचा हाही प्रश्न आहे. टाळेबंदीमुळे मोठे शेतकरीसुद्धा कित्येक क्विंटल कापसाच्या ढिगांकडे भकास डोळ्यांनी पाहात बसलेत, तिथे काही किलो चणा, तूर एवढंच उत्पन्न ज्या शेतकरी विधवांकडे झालं, त्या तर १०-१० किलो चणा आणि तूर पडेल त्या किमतीत गावात, नातेवाईकांना विकून हातात चार पैसे येण्याची तजवीज करीत आहेत.

(अकोला आणि अमरावती जिल्ह्य़ांतील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या वास्तवावर प्रस्तुत लेख आधारित आहे. मात्र  त्यातील व्यक्तींची नावं बदलण्यात आली आहेत.)

(लेखिका नागपूर येथील प्रकृती महिला विकास व संसाधन के ंद्र येथील कार्यकारी संचालक आहेत.)

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Coronavirus pandemic lockdown life of farmers widows dd70

ताज्या बातम्या