सोनाली आदिनाथ लंके
तनुजा मॅडम माझ्या रोल मॉडेल. त्यांच्यासारखं राहावं, वागावं, बोलावं अशी फार दिवसांची इच्छा. त्यांचा कोपिष्ट स्वभाव मात्र कोणाला जवळ येऊ देत नसे. पण एक दिवस मात्र असं काही घडलं की ताजमहालाखाली कबर असते याचं भान आलं.

आणखी एक सकाळ. घड्याळात दहाचे टोले पडले आणि कार्यालयातील सर्वांच्या छातीत धस्स झालं, कारण तनुजा मॅडमचा प्रवेश होत होता… तनुजा मॅडम म्हणजे शिस्त, ओसंडून वाहणारा कामाचा उत्साह, करारीपणा, जबाबदारीची जाणीव असणार्‍या एका आंतरराष्ट्रीय कंपनीच्या व्यवस्थापक. त्यांच्या रागाचा पारा कधी चढेल आणि वड्याचे तेल कोणत्या वांग्यावर निघेल याचा नेम नसे. म्हणूनच कार्यालयातील सगळे त्यांच्यापासून चार हात लांबच राहायचे.

तशा बाई एकदमच रुबाबदार होत्या. त्यांचे कपडे, त्यांची प्रत्येक स्टाइल, कपड्यांची, मॅचिंग दागिन्यांची निवड आणि त्याला साजेचा मेकअप पाहून मला माझ्या अवस्थेची दयाच यायची. आपणही त्यांच्यासारखं व्हावं, राहावं असं वाटायचं. अजूनही वाटतंच! त्यांच्या समाजमाध्यमांवरील ‘पोस्ट’ पाहून, वाचून तर मी मनोमन त्यांनाच माझं ‘रोल मॉडेल’ मानलं आहे.

मी घरी आल्यावर माझ्या नवर्‍याला- विनयला ऑफिसमध्ये जे काही घडत असे त्या सर्व गोष्टी सांगत असे. या संभाषणात माझी लेकही असे. तसा विनय मला रोज म्हणत असे, ‘‘तू एकदा तरी तनुजा मॅडमसारखी तयार होऊन ऑफिसला जा.’’ मीही ठरवते की, उद्या तरी नक्की त्यांच्यासारखं तयार होऊन ऑफिसला जायचंच. आदल्या दिवशी छानसा ‘ड्रेस’ काढून ठेवते. आणि स्वप्न बघत झोपी जाते.

हेही वाचा

सकाळी उठल्यावर आधी घरातली सर्व कामं आवरायची आणि मग तनुजा मॅडमची मनात एन्ट्री द्यायची होती… आळस झटकून कचरा काढला. इकडच्या दुधाला मुंबईच्या उष्णतेची कळ जराही सोसत नाही, म्हणून त्याला उतू जाऊ न देता शांत केलं आणि भुकेच्या शांतीसाठी पीठ मळून घेतलं. दु:खाचं आलं, लसूण ठेचून, कांद्याच्या दु:खात सहभागी होत त्याला या मानवी मायावी दुनियेतून मुक्ती दिली. कोबीचं ‘फेशियल’ आजच करणं भाग होतं, नाही तर तो खूपच काळवंडला असता. त्याची कुरबुर बंद करून मी त्याला टोमॅटो स्क्रब आणि डाळीचा फेसपॅक लावून माझ्या काही पूर्ण न होणार्‍या इच्छा हिरव्या मिरचीच्या रूपात तेलात तडतडवल्या आणि कोबी स्वच्छ धुऊन वाफ घेण्यासाठी कढईत टाकला. तोपर्यंत कुकरचा माझ्याकडे डोळा होता. एकदाचा घेतला त्याला आणि त्याच्या आवडीचे मित्र म्हणजे डाळ आणि तांदूळ डब्यात टाकून त्यांना गॅसवर दमेपर्यंत खेळायला सोडले.

आता गॅसच्या तिसर्‍या मैत्रिणीला म्हटलं, ‘‘जरा चहा करून देतेस का गं?’’ तिनं मस्तपैकी चहा करून दिला. चहाने ऊर्जा आली आणि कोबी भाऊला खाली उतरून मी उत्तम सुगरणीसारख्या गोल गोल पोळ्या करून घेतल्या. माझं इतरांच्या दृष्टीनं क्षुल्लक किमतीचं पण समाधान देणारं ‘टास्क’ पूर्ण झालंच होतं; तोपर्यंत कुकरनं झाकणातून जीव सोडला आणि मला डाळीचा अवतार नीट करावा लागला. पीठ, मीठ, काड्या, तेलकट डाग आणि बरंच काही असं सांभाळणारा गॅस अगदीच केविलवाणा दिसायला लागला, त्याच्याशी हितगुज करणं अपरिहार्य होतं. त्यांचं सांत्वन करून माझी दमछाक झाली खरी, पण मी हे आत्ता केलं नसतं, तर संध्याकाळी मला मुंग्यांचा पराक्रम पाहावा लागला असता.

तोपर्यंत नवर्‍यानं स्वत:ची आणि लेकीची तयारी केली होती. स्त्री-पुरुष समानता नको का पाळायला? घड्याळाचे काटे नेहमीप्रमाणे लवकर सरले आणि मी काल काढलेला ड्रेस पुन्हा कपाटात सरकवला आणि मला सूट होणारे कपडे घातले. हे पाहून लेक आणि नवरा हसलेच; कारण हे त्यांना नवीन नव्हतंच. मग आम्ही तिघे आमच्या चाळीस लाख रुपयांच्या घराला कुलूप लावून बाहेर पडलो, कारण महिनाभर काम नाही केलं तर बँकवाले महिन्याने आम्हाला घराबाहेर काढतीलच!

ऑफिसमधली कालची सगळी कामं मी कालच पूर्ण केली होती. त्यामुळे तनुजा मॅडमचा राग माझ्यावर निघणार नव्हताच. त्यामुळे मी निश्चिंत होते. तसंही त्या मला कधी जास्त रागवतच नाही म्हणा, पण एकच शल्य आहे की, मी कधी त्यांच्यासारखं रुबाबदारपणे ऑफिसला जाईन? आणि हो, मुख्य म्हणजे, माझ्या मनातून तनुजा मॅडमचा विषय कधी जाईल काय माहीत? विनय तर म्हणत असतो, काय ते तनुजापुराण लावत असतेस नुसतं. आमच्याही ऑफिसमध्ये आहेत अशा खूप तनुजा मॅडम. तूच काकूबाईसारखी ऑफिसला जातेस. पण त्याला कसं सांगू की, मला मी कशी आहे हे माहीत आहे. आणि कामातही सौंदर्य असतंच की आणि ते दिसतंही! तशा आमच्या तनुजा मॅडम कामात आणि दिसण्यातही एकदम रूपसुंदर बरं का…

हेही वाचा

बघा! आत्ता मी ऑफिसच्या दारात उभी आहे आणि मला जादू केल्यासारखी गोरी पान, काळ्याभोर शॉर्ट हेअर कट असणार्‍या तनुजा मॅडमचीच छबी दिसतेय. आहेतच त्या इतक्या सुंदर की कुणीही त्यांच्या प्रेमात पडेलच. म्हणून तर मी त्यांच्यासारखं होण्याचं दिवास्वप्न पाहतेय. पण आज ऑफिसमध्ये कोणीच हसत, खिदळत, आनंदात दिसत नव्हतं. मला उशीर झाल्याची शंकेची पाल चुकचुकली, म्हणून मी घड्याळात पाहिलं तर उलट पाच मिनिटं अगोदरच मी हजर झाले होते. पटकन माझ्या जागेवर बसून मी शेजारीच बसणार्‍या प्रियाला विचारलं, ‘‘काय गं, काय झालंय? असे का बारा वाजलेत सगळ्यांच्या चेहर्‍यावर? तनुजा मॅडमनी रागाचा स्टॉक सकाळीच संपवला की काय?’’

तसं ती डोळे मोठे करून ‘‘हळू बोल’’ म्हणत होती. मी हात आणि डोळ्यांनीच ॲक्शन करून ‘काय झालं?’, विचारलं. तेव्हा प्रियानं सांगितलं की, ‘‘काल रात्री तनुजा मॅडमनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली.’’

‘‘काय ?’’ माझ्या आवाजानं एकदम उसळीच खाल्ली. मी भलतंच काही तरी ऐकल्यासारखं ताडकन उभी राहिले. डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. तोंडातून शब्द फुटेना!

‘‘तनुजा मॅडम… आत्महत्या???’’ मला बोलता येत नव्हतं. श्वास फुलत होता. माझ्या कानांवर माझा विश्वास बसत नव्हता. ज्यांच्या प्रेमात मी अखंड बुडालेली असते त्यांच्या अशा बातमीनं माझ्या काळजाचं पाणी पाणी झालं.

माझी अशी प्रतिक्रिया पाहून सगळे सहकारी आमच्याभोवती गोळा झाले. मी पर्समधून पाण्याची बाटली काढली आणि ढसाढसा पाणी प्यायले. आणि धाडकन माझ्या खुर्चीत बसले. प्रिया बोलू लागली, ‘‘आशु अगं, आम्हालाही हे आत्ताच कळलं, ऑफिसचा ईमेल पाहिल्यावर. त्यांनी मेल ‘स्केड्युल’ करून ठेवला होता. त्यामुळे सगळ्यांना समजलं. खूप वाईट झालं.’’ मी डोळे पुसत विचारलं, ‘‘का केली असेल गं त्यांनी आत्महत्या?’’

प्रिया म्हणाली, ‘‘अगं त्यांच्या नवर्‍याचा आणि त्यांचा घटस्फोट झाला आहे, पण तनुजा मॅडम त्यांच्या सहा वर्षांच्या मुलाची कस्टडी मागत होत्या. त्या कस्टडीची केस हरल्या आणि रात्री त्यांनी झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्या केली आणि त्यांच्या घटस्फोटाची केसही खूप दिवस चालली होती.’’ प्रिया सांगत होती आणि मी ऐकत होते. ‘‘पण प्रिया एवढ्या दिवसांत त्यांच्या दोघांच्याही घरच्यांनी मध्यस्थी केली नसेल?’’ मी विचारलं.

‘‘अगं ते दोघेही उच्चशिक्षित… दोघांनाही स्पेस हवी. घरच्यांशीही तसंच वागायचे दोघेही. घरच्यांना तुम्ही मध्ये बोलू नका. आम्ही आमचं पाहू, असं सांगितलेलं होतं आणि तुला माहीत आहे का? त्या तनुजा मॅडमना आई नाही आणि बाबा दोन महिन्यांपूर्वीच हृदयविकाराचा झटका येऊन गेले. तनुजा मॅडम एकट्याच असायच्या.’’

तिनं सांगितलेल्या गोष्टींवर माझा विश्वासच बसत नव्हता. सिमेंटच्या घरांना खरंच माणुसकीचा ओलावा नसेल का? तिची आणि त्याचीही घुसमट त्यांच्या तथाकथित ‘स्पेस’पेक्षाही मोठी असेल का? कुणाला म्हणजे कुणालाच त्यांची घुसमट दिसली नसेल का? त्या घुसमटीपायीच त्या आकांडतांडव करून कुणावरही राग काढायच्या का? पण प्रियाला या सगळ्या गोष्टी कशा माहीत? मी तिला विचारलं तर प्रिया म्हणाली, ‘‘माझा चुलत भाऊ तनुजा मॅडमचा वकील आहे. मॅडमकडे बक्कळ पैसा आहे गं, पण माणुसकीचा लवलेशही नाही बघ!’’

‘‘खरंच त्यांना माणुसकी नव्हती की त्यांना धीर द्यायला कुणामध्येही माणुसकी नव्हती?’’ मी दीर्घ श्वास घेतला. तसे सगळे बातमी संपली च्या आविर्भावात आपापल्या डेस्कवर काम करायला निघून गेले. मला मात्र काम करणं शक्य नव्हतंच. मनच थार्‍यावर नव्हतं. माझ्या मनातल्या तनुजा मॅडम डोक्यात पिंगा घालत होत्या.

जगात चकाकतं ते सोनं नसतंच, पण तनुजा मॅडम आतून इतक्या तुटलेल्या असतील असं वाटलंच नाही. आपण आपल्या आयुष्याचे काही तास इथं घालवतो, आणि समोरचा माणूस तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करतोय आणि त्याच्या मन:स्थितीची आपल्याला यत्किंचितही कल्पना येऊ नये? आणि आपल्याला त्याची काहीच मदत करता येऊ नये? हे शल्य जास्त टोचत होतं. मोठा बंगला, एसी कार, भव्य राहाणी असूनही त्यांच्या मनाला जगण्यासाठी लढण्याची ऊर्मी देणारं कुणीच नसावं का?

समाजमाध्यमाच्या अतिवापरामुळे आपण जवळ आलो की खोटं खोटं दिखावा करत जगायला शिकलोय का? त्यांच्या घरातल्या उंची फर्निचरने त्यांना ढसाढसा रडायला उद्युक्त का केलं नसेल? एवढ्या मोठ्या महानगरीत त्यांना रडायला कोणीच खांदा का दिला नसेल? का कोणी त्यांचे अश्रू पुसले नसतील? का कोणी त्यांना स्वत:ची आपबीती सांगून, ‘आप तो नसीब लेके आये है’, अशी जाणीव करून दिली नसेल? काय म्हणावं याला?

अतिशय सुंदर ताजमहलसुद्धा खाली कबर घेऊन बसलाय हे दु:ख सपशेल विसरतोच आपण! आपण हाडामांसाचेच आहोत, सेन्सॉरप्रमाणे काम करणार्‍या उपकरणासारखं आपल्या आयुष्याचं नाही ना? पद, प्रतिष्ठा, पैसा हेच का यांचं उद्दिष्ट? माझ्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं. मी प्रकृती बरी नसल्याचा ईमेल टाकला आणि तडक घरी निघाले. जाता जाता विनयला फोन केला. दोन-चार वाक्यातच त्याला सगळं कळलं. ‘नीट जा’ एवढं बोलून त्यानं फोन ठेवला. मला एक-दीड तास तरी लागला घरी पोहोचायला. तोपर्यंत विनय घरी आलेला होता. त्याला पाहताच अश्रूंचा बांध फुटला आणि जवळची व्यक्ती गेल्यासारखी मी तनुजा मॅडमसाठी ढसाढसा रडले. ती माझी कोणीच नसूनही!

दिवस संपला तसा विषय संपला. रात्री लेक म्हणाली, ‘‘मम्मा तू खूप दमलेली दिसतेय, आज नको गोष्ट सांगू. फक्त थोपट. मी झोपी जाते.’’ आणि पुन्हा माझ्या डोळ्यातून अश्रू निसटले!

‘माणुसकीचा वारसा आपण लेकीला देत आहोत,’ विनयनं मला डोळ्यांनीच सांगितलं.

usonalilanke18@gmail.com