पुरुष हृदय ‘बाई’ : पुरुषपण ओलांडताना..

पूर्वी जनगणनेत पुरुष व स्त्री असे दोनच प्रवर्ग होते. आता त्यात ‘अन्य’ हे गुंतागुंतीचे प्रवर्गीकरण आले आहे.

(संग्रहित छायाचित्र)

रवींद्र रुक्मिणी पंढरीनाथ

ravindrarp@gmail.com

स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचारात बघ्याची भूमिका घेणारे तरुण जसे या समाजात आहेत, तसेच मत्रिणींची छेड काढणाऱ्या गुंडांना जाब विचारणारे व त्यासाठी आपल्या आयुष्याचा बळी देणारे डोंबिवलीचा संतोष विचीवारा व अंधेरीचे किनन आणि रुबेन हे युवकही याच समाजाचा भाग  आहेत. निर्भयाला अखेपर्यंत साथ देणारा तिचा मित्रही याच पिढीचा. समाजात आज मोठय़ा प्रमाणावर स्त्रीविरोधी हिंसा सुप्त व उघड – दोन्ही रूपांत आढळते. त्यासाठी केवळ पुरुषांना दोष न देता पुरुष असे अमानुष का होतात, अत्याचारी पुरुषांना जाब विचारणारे ‘नवे पुरुष’ समाजात पुरेशा संख्येने का निर्माण होत नाहीत, निर्माण होतात ते आपल्यासमोर का आणले जात नाहीत, हे प्रश्नही आपण आता विचारले पाहिजेत.

मीएक पुरुष, व्यक्ती, माणूस, स्त्री-पुरुष समतेसाठी काम करणारा कार्यकर्ता, आणि एक लेखकही. जगण्याच्या या विविध पातळ्यांवर मला माझे व माझ्यासोबतच्या इतरांचे पुरुष असणे कसे जाणवले, पुरुषपणाचे विविध अन्वयार्थ कसे उलगडत गेले, माझ्यातील व इतरांतील नरभान, पुरुषभान व मानुषभान या सांस्कृतिक उत्क्रांती/उन्नयनाचे मला जाणवलेले नाते काय आहे, या सर्वाचा शोध मी या लेखाच्या निमित्ताने घेणार आहे.

अस्तित्वाच्या निव्वळ जीवशास्त्रीय पातळीवर माझे मानव असणे स्वयंसिद्ध असले, तरी कृती व जाणीव या पातळ्यांवर  मी अजून कमअस्सल आहे. मी कधी निव्वळ पुरुष, कधी तर नुसता नर असतो. माझी समाजातील ओळखही विविध विशेषणे लागलेला पुरुष अशी आहे. मला त्यापलीकडे जाऊन सर्वार्थाने केवळ माणूस बनायचे आहे. हा प्रवास सोपा नाही.

निसर्गनिर्मित व मानवनिर्मित

सुरुवात निसर्गविज्ञानातील लिंगभेद (सेक्स) व सामाजिक विज्ञानातील लिंगभाव (जेन्डर) या संज्ञांनी करू. स्त्री, पुरुष व अन्यिलगी यांच्यातील नैसर्गिक व म्हणूनच अपरिवर्तनीय फरक म्हणजे लिंगभेद. त्यांच्यातील सामाजिक व सांस्कृतिक फरक म्हणजे लिंगभाव. आपण विशिष्ट लिंगाचे आहोत, म्हणून आपण कसे वागले पाहिजे याचे समाजाने बनविलेले ठोकताळे किंवा त्याचे आपल्याला आलेले भान या साऱ्या बाबी लिंगभावात  येतात. मी पुरुष आहे म्हणजे मला विशिष्ट लैंगिक अवयव आहेत व मी स्त्रीप्रमाणे नऊ महिने अपत्याला आपल्या शरीरात वाढवू शकत नाही हा झाला लिंगभेदाचा भाग; आणि पुरुष आहे म्हणजे मी शूर, खंबीर, बुद्धिमान वगैरे असणार हा झाला लिंगभाव. नैसर्गिक भेद अपरिवर्तनीय असतात व मानव/समाजनिर्मित भेद आपल्याला बदलता येतात. माझ्या आयुष्यात आलेल्या स्त्रिया – आई, बायको, मुलगी, मत्रिणी आणि स्त्री-चळवळीसोबतचा माझा प्रवास या गोष्टींनी मला शिकविले की पुरुष किंवा स्त्री असणे म्हणजे काय याविषयीच्या माझ्या व बहुसंख्यांच्या धारणा या समाजनिर्मित म्हणजेच परिवर्तनीय आहेत. इतकेच नव्हे तर ज्या विज्ञानाच्या मदतीने मी नैसर्गिक भेद समजून घेतो, तेही परिवर्तनीय आहे.

पूर्वी जनगणनेत पुरुष व स्त्री असे दोनच प्रवर्ग होते. आता त्यात ‘अन्य’ हे गुंतागुंतीचे प्रवर्गीकरण आले आहे. आजचे मेंदूविज्ञान व संप्रेरकशास्त्र मला सांगतात की आपल्यापैकी कोणीही निव्वळ स्त्री किंवा पुरुष नाही; आपल्यात स्त्री आणि पुरुष या दोघांचा अंश आहे. दोन्ही प्रकारची संप्रेरके आपल्या शरीरात स्रवत असतात. मेंदू हे आपल्या अस्तित्वाचे मूळ मानले तर त्यातील पुरुषी व बायकी असे फरक अस्तित्वातच नाहीत, असे नवे संशोधन आपल्याला सांगते. त्यामुळे पुरुषी व बायकी स्वभावाचा प्रश्नही आता निकालात निघाला आहे. थोडक्यात म्हणजे पट्टीच्या एका टोकाला पुरुषत्व व दुसऱ्या टोकाला स्त्रीत्व असे काही नाहीच. Gender is a spectrum, rather a mosaic ! आपण सर्व त्याच्या अधेमधे आहोत व तेथील आपली जागाही सतत बदलत असते. एका सुप्रसिद्ध मेंदूसंशोधकांच्या शब्दात सांगायचे तर ‘‘आपण आता द्वंद्वात्मक पद्धतीने विचार करणे सोडून दिले पाहिजे आणि आपल्या अनेक अर्थानी स्त्री, पुरुष, माणूस असण्याचा उत्सव साजरा केला  पाहिजे.’’

शाळा-कॉलेजच्या दिवसात मीही इतर सर्व पुरुषांसारखा ‘पुरुषी’ पद्धतीने विचार करणारा होतो. म्हणजे मी स्वत:ला कितीही संवेदनशील व समतावादी मानत असलो तरी पुरुष श्रेष्ठत्वाचे संस्कार माझ्या अंतर्मनात अतिशय खोलवर रुजले होते. नंतर स्त्रीमुक्तीच्या विचाराशी व स्त्रीवादी चळवळीशी माझा जवळून संबंध आला. तेव्हा ही चळवळ ऐन भरात होती. त्यामुळे माझ्या मनावरील शेंदूर खरवडला गेला आणि आतले पितळ उघडे पडले. त्यातून पहिल्यांदा मनात जागी झाली अपराधभावना. शेकडो वर्षे स्त्रिया पुरुषी शोषणव्यवस्थेच्या बळी ठरल्या आहेत. आपणही पुरुष म्हणून या व्यवस्थेचे लाभ घेतले आहेत. म्हणून त्याच्या परिमार्जनासाठी आपण काहीतरी केले पाहिजे, या विचाराने माझ्यासारखे काही पुरुष स्त्रीचळवळीचे पाठीराखे    वा अनुयायी म्हणून काम करू लागलो. बलात्कार, हुंडाबळी अशा विषयांवरील मोच्र्यात सहभागी होणे, गर्भिलगपरीक्षेच्या प्रश्नावर अभ्यास, आंदोलन लॉबिंग करणे अशी कामे आम्ही केली. त्यातूनच ‘मेन अगेन्स्ट व्हायलन्स अँड अ‍ॅब्युज’ (मावा), ‘पुरुष उवाच’ असे समूह महाराष्ट्रात उभे राहिले. नंतरच्या टप्प्यात आम्ही ‘आपण पुरुष म्हणून कसे घडलो’ याचा अभ्यास सुरू केला. त्यातूनच पुढे पुरुष स्त्रियांवर हिंसा करण्यास का उद्युक्त होतात, याचाही शोध सुरू झाला. सारे पुरुष बलात्कारीच असतात, प्रश्न फक्त संधी मिळण्या- न मिळण्याचा (किंवा घेण्या/ न घेण्याचा) असतो ही काही स्त्रीवाद्यांची मांडणी आम्हाला स्वानुभवामुळे अमान्य होती. त्यामुळे पुरुषांच्या मनातल्या हिंसेचा उगम कशातून होतो, त्याला खतपाणी घालणाऱ्या गोष्टी कोणत्या, यांचा अभ्यास सुरू झाला. ग्रामीण/शहरी, झोपडपट्टी/ मध्यमवर्गीय वस्त्या, दलित/ बहुजन/ उच्चजातीय, किशोरवयीन/ तरुण/ वृद्ध अशा विविध समाज गटांतील पुरुषांशी संवाद साधणारे, त्यातून पुरुषांमधील नरभान, पुरुषभान, पुरुषीपणाच्या विविध छटा यांचा अभ्यास करणारे अनेक समूह आता महाराष्ट्रात, देशात उभे राहिले आहेत. त्यांच्यात केवळ पुरुषच नाहीत, तर स्त्रियाही कार्यरत आहेत.  ‘व्हाइट रिबन मूव्हमेंट’, ‘मेन अगेन्स्ट सेक्सिझम’ यासारख्या पुरुषसंघटना तर अनेक देशांत कार्यरत आहेत. या सर्वाच्या कामातून व अभ्यासातून विकसित होणाऱ्या थिअरीतून आता हे सिद्ध झाले आहे की पुरुषीपणा किंवा मर्दानगी यासारखी एकसंध, चिरेबंद गोष्ट अस्तित्वात नसते. मुलगा म्हणून जन्मलेल्या व्यक्तीला पुरुष असल्याची जाणीव व स्व-ओळख देण्याचे कार्य पितृसत्ताक समाजरचना करीत असते. वैश्विक ते स्थानिक पातळीवरील अनेक घटकांच्या (उदा. आंतरराष्ट्रीय बाजार, जात, धर्म-संस्कृती, वंश, माध्यमे) मदतीने  सामाजिकीकारणाच्या प्रक्रियेतून जे संस्कार पुरुषांवर केले जातात, त्यातून पुरुषीपणाच्या विविध संकल्पना किशोरवयीन मुलग्यांच्या मनात रुजविल्या जातात. अधिकार, सत्ता, हिंसा, जबरदस्तीची भाषा करणारा, थोडक्यात म्हणजे ‘मॅचो’ पुरुषाची प्रतिमा ठळक करणारा ‘वर्चस्ववादी पुरुषीपणा’ हा पुरुषीपणाच्या अनेक साच्यांपैकी एक (पण एकमेव नव्हे) आहे.

मर्दानगीचा काटेरी मुकुट

पुरुषसत्ता स्त्रियांप्रमाणे पुरुषांनाही साचेबद्ध करून त्यांचा विकास खुरटविते. स्त्रियांवर पुरुषसत्तेचे होणारे परिणाम अतिशय उघड असतात. मात्र मर्दानगीचा मुकुट ल्यालेल्या पुरुषांना वरकरणी त्यामुळे आपण कोणीतरी थोर, अधिकारप्राप्त नरपुंगव आहोत असा भास होत असतो. मुळात हा मुकुट काटेरी आहे, त्यामुळे आपण रक्तबंबाळ होत आहोत, तो काढून ठेवण्यातच आपले हित आहे, ही जाणीव वृथा अहंकारामुळे त्यांना होत नाही. म्हणून बहुसंख्य पुरुष मर्दानगीच्या वृथा कल्पनांपायी स्वतचे व इतरांचे आयुष्य क्लेशकारक करीत राहतात. मुळात या साच्यांत अडकल्यामुळे पुरुषांचे अपरिमित नुकसान होत असते. त्यांना ना धड प्रेम व्यक्त करता येते, ना राग. आपल्या भावनांचा आविष्कार व व्यवस्थापन करणे त्यांना आयुष्यात शिकता येत नाही. त्यांचा भावनिक निर्देशांक खुरटलेला राहतो. स्पर्धा, अधिकार, सत्ता यांच्या मोहात अडकल्यामुळे सामिलकी, सामूहिकता, प्रेम, जपणूक यांचे मोल त्यांना समजत नाही. मुलांना वाढविणे, वृद्धांचा आधार बनणे, निखळ आनंदासाठी कला जोपासणे, आवडत्या व्यक्तीसाठी रांधणे-वाढणे, खस्ता खाणे, इतरांची सेवा करणे  यांतील आनंदाला ते पारखे होतात. थोडक्यात, आपल्या व्यक्तित्वातील स्त्रीत्वाशी त्यांना दोस्ती करता येत नाही. जाणिवेच्या व वास्तवाच्या पातळीवर उंबरठा ओलांडून माजघरात/ स्वयंपाकघरात येणे त्यांना शक्य होत नाही. मर्दानगीचे हे जुने साचे मोडकळीत काढून नवे पुरुषभान जागविणे ही गोष्ट कठीण असली तरी अशक्य नाही, उलट अतिशय आनंदप्रद आहे, हा धडाही पुरुषांसोबत काम करताना आम्हाला मिळाला. आमच्याप्रमाणे अनेक पुरुष बदललेले आम्ही पाहिले. पुरुष स्वभावत: अत्याचारी नसतात, ते वेळ आल्यावर अत्याचाराच्या विरोधात उभे राहतात हेही आम्ही अनुभविले आहे.

सध्या निर्भयाच्या खुन्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हिंगणघाटच्या प्राध्यापिकेला जाळून मारणाऱ्यालाही त्याच यातना भोगायला लावाव्या अशा मागण्या समाजाच्या अनेक स्तरातून केल्या जात आहेत. मुळात हैदराबादेत डॉक्टर स्त्रीला जाळून मारण्याचा आरोप असणाऱ्यांना गोळी घालून मारण्याची बातमी अजून शिळी झालेली नाही. पण अशा प्रकारे ‘इन्स्टन्ट न्याय’ केल्यावर देशातील बलात्कारी पुरुषांना जरब बसेल ही अपेक्षा किती फोल होती हे त्यापाठोपाठ घडलेल्या अनेक घटनांनी सिद्ध झाले आहे. गेल्या काही वर्षांत बलात्कार करणाऱ्या किंवा त्याचे समर्थन करणाऱ्या व्यक्तींची (यात अनेक वकील, राजकीय व धार्मिक नेतेही आहेत) निवेदने वाचली तर असे लक्षात येते की देशातील कोटय़वधी पुरुषांची (व काही स्त्रियांचीही ) मानसिकता त्याहून वेगळी नाही. जोवर ही मानसिकता बदलत नाही, तोवर स्त्रियांवर अत्याचार करणाऱ्या पुरुषांची संख्या कमी होणार नाही. त्यातील जे दुबळे असतील ते पकडले जाऊन लोकांच्या रागाचे भक्ष्य होतील. राजकीय-आर्थिक-सामाजिकदृष्टय़ा ‘दबंग’ असतील तर त्यांच्या समर्थनासाठी हजारोंचे मोच्रे निघतील, हे आजचे वास्तव आहे.

स्त्रियांवरील अन्याय-अत्याचाराची समस्या ही मुळात स्त्री, पुरुष (व अन्य लिंगी) यांच्या निरामय सहजीवनाची समस्या आहे. म्हणून स्त्रियांसोबत पुरुषांनाही लिंगभावसमतेकडे नेणे हेच स्त्रीमुक्ती + पुरुषमुक्ती = मानवमुक्ती चळवळीचे पुढचे पाऊल असायला हवे.  हा विचार म्हणजे केवळ स्वप्नरंजन नव्हे. जागतिकीकरणानंतर जन्मलेल्या-वाढलेल्या पिढीत स्त्रियांचा नकाराचा अधिकार मानणारा,  त्यांना बरोबरीने वागविणारा, त्यांच्याशी मत्रीचे नाते जोडणारा आधुनिक तरुण ठळकपणे दिसू लागला आहे. स्त्रियांवर होणाऱ्या हिंसाचारात बघ्याची भूमिका घेणारे तरुण जसे या समाजात आहेत, तसेच मत्रिणींची छेड काढणाऱ्या गुंडांना जाब विचारणारे व त्यासाठी आपल्या आयुष्याचा बळी देणारे डोंबिवलीचा संतोष विचीवारा व अंधेरीचे किनन आणि रुबेन हे युवकही याच समाजाचा भाग आहेत. निर्भयाला अखेपर्यंत साथ देणारा तिचा मित्रही याच पिढीचा. समाजात आज मोठय़ा प्रमाणावर स्त्रीविरोधी हिंसा सुप्त व उघड – दोन्ही रूपांत आढळते. त्यासाठी केवळ पुरुषांना दोष न देता पुरुष असे अमानुष का होतात, अत्याचारी पुरुषांना जाब विचारणारे ‘नवे पुरुष’ समाजात पुरेशा संख्येने का निर्माण होत नाहीत, निर्माण होतात ते आपल्यासमोर का आणले जात नाहीत, हे प्रश्नही आपण आता विचारले पाहिजेत.

अविनाश जोशी या विचारवंताने स्त्री/पुरुषमुक्तीच्या संदर्भात मांडलेले एक कळीचे वाक्य मला नेहमी खुणावते, ‘मुक्ती स्त्रीत्वापासून नव्हे, तर स्त्रीत्वातच’. स्त्री किंवा पुरुष कोणालाही मुक्त व्हायचे असेल तर तिला/त्याला आपल्यातल्या स्त्रीत्वाकडेच परतावे लागेल, हे मलाही मनोमन पटले आहे.Becoming ऐवजी being चा आग्रह; मदान मारणे, सत्ता, वर्चस्व, व्यक्तिवाद याऐवजी प्रेम, सामिलकी, सामूूहिकता यांना महत्त्व; डाव्या मेंदूपेक्षा उजव्या मेंदूचा अधिक वापर या बाबी एकूणच मानवजातीच्या हिताच्या आहेत, असे मी मानतो. म्हणूनच मी स्त्री-चळवळीने स्त्रियांना उंबरठय़ाबाहेर काढण्यात जेवढा रस दाखवला, तितका पुरुषांना उंबरठय़ाच्या आतल्या जगाशी परिचित करून देण्यात दाखवला नाही म्हणून खंतावतो.

गांधी-फुले-आंबेडकर यांच्यासारख्या समतेचा विचार जगणाऱ्या महापुरुषांच्या आयुष्यातून, दादा धर्माधिकारी ते अविनाश जोशी या विचारवंतांच्या लेखनातून, तसेच स्त्रीचळवळीच्या संस्कारातून मला जे आकळले, ते असे –

अधिक चांगल्या जीवनाचा शोध घेण्यासाठी मला पुरुषीपणाच्या पलीकडे जावे लागेल. स्वत:चा शोध घेण्यासाठी मला माझ्यातील स्त्रीत्वाचा शोध घेऊन त्याच्याशी नाते जोडावे लागेल.लेखक म्हणून मला माझ्यातील स्त्रीत्व आणि पुरुषत्व यांच्या पल्याड जावे लागेल.

आपल्या स्त्रीत्व/पुरुषत्वाच्या सीमारेखा ओलांडून भिन्निलगी व्यक्तीच्या मनात प्रवेश करू शकणे ही चांगल्या लेखकाची निजखूण आहे, असे मी मानतो. या निकषावर बंगालीतील रवींद्रनाथ टागोर, शरदबाबू, सुनील गंगोपाध्याय, हिंदीतले फणीश्वरनाथ रेणू, विनोदकुमार शुक्ल, राजस्थानीतले विजयदान देठा हे लेखक मला अतिशय भावतात. मेघना पेठेंच्या कथांमध्येही हे वैशिष्टय़ मला जाणवते.

माझ्यातील नरभानाचा निचरा करून निरामय व निखळ मानुषभानापर्यंत पोहोचण्याचा माझा प्रवास किती खडतर आहे, या विचारक-लेखक-कर्त्यां पुरुषांच्या तुलनेत आपले निजबळ किती कमी पडते, याची खंत मला नेहमी बोचत असते. ही खंतच मला पुढची वाटही दाखवेल व या वाटेने चालत राहण्याचे बळ माझ्या अंगी येईल, अशी प्रार्थना करून थांबतो.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Crossing manhood chaturang article purush hruday bai abn

Next Story
video : रक्तस्त्राव ‘तिला’ रोखू शकत नाही !
ताज्या बातम्या