सांस्कृतिक ठेवाही ‘आवरायला’ हवा!

प्रत्येक घरातल्या पूजाअर्चा, कर्मकांडं, व्रतवैकल्यं हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग. मात्र घरं लहान, माणसं कमी, असलेल्या माणसांना वेळ नाही, त्यांची श्रद्धा-भक्तीची स्थानं, कल्पना बदलत्या असल्यानं वर्षांनुवर्ष परंपरेनं चालत आलेले रीतिरिवाज पूर्वीप्रमाणे सांभाळणं अनेकांना शक्य होत नाही.

मंगला गोडबोले mangalagodbole@gmail.com

प्रत्येक घरातल्या पूजाअर्चा, कर्मकांडं, व्रतवैकल्यं हा वैयक्तिक श्रद्धेचा भाग. मात्र घरं लहान, माणसं कमी, असलेल्या माणसांना वेळ नाही, त्यांची श्रद्धा-भक्तीची स्थानं, कल्पना बदलत्या असल्यानं वर्षांनुवर्ष परंपरेनं चालत आलेले रीतिरिवाज पूर्वीप्रमाणे सांभाळणं अनेकांना शक्य होत नाही. त्यामुळे घरी असलेल्या धार्मिक साहित्याचं काय करायचं, हा प्रश्न अनेकांना पडतो. म्हणूनच पुण्यात ‘स्वच्छ’ संस्थेनं पुणे महानगरपालिके च्या मदतीनं के लेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून ४ तासांमध्ये ८ टन साहित्य गोळा झालं. त्यात भंगलेल्या मूर्ती, जीर्ण झालेल्या पोथ्या, देवांचे वस्त्रालंकार, पूजा उपकरणं, पार्थिव मूर्ती, धातूंच्या प्रतिमा होत्या. एकटय़ा पुण्यात जमलेले हे ८ टन आणि आधीचं २ टन साहित्य काही सांगू पाहात आहे.. ऐकणार का?     

‘‘यंदा नेमकं गौराईच्या दिवसांतच आमच्या डिपार्टमेंटचं अ‍ॅप्रायजल आलंय. सासूबाईंनी इतकी वर्ष सांभाळलेल्या, तीन पिढय़ांपासूनच्या उभ्याच्या गौरी आहेत घरात. कपडे- दागिनेही आहेत त्यांचे; पण ते बाहेर काढणं, साफसूफ, मांडामांड, मागची आवराआवर, काहीच होणार नाहीए माझ्या हातून. तेवढा वेळच नाहीए. यंदापासून बंदच करू का? गौराई घेईल समजून.’’ स्वातीचं आईला प्रश्नवजा माहिती पुरवणं.

‘‘नेमके चातुर्मासातच यू.एस.ला. मुलाकडे जातोय. देव्हारा एवढा थोरला आहे आमचा. एखादीच देवाची मूर्ती सोबत ठेवून बाकी सगळं कुठे विसर्जित करता येईल का? नाही तरी यापुढे किती वर्ष होणार आहे त्यांची सेवा माझ्याच्यानं? आणि इथे कोण आहे माझ्यानंतर करणारं?’’ एक आजोबा रोजच्या कट्टय़ावर दबक्या आवाजात कुजबुजतात.

‘‘घर रीडेव्हलपमेंटला जातंय. बाकी बरंचसं आवरूआम्ही त्यातलं सामान. बरंचसं देऊनही टाकलंय, पण प्रत्येक भिंतीवरच्या त्या भल्यामोठय़ा तसबिरींचं काय करायचं? नव्या घरात त्यांना पेलणाऱ्या भिंतीसुद्धा नसतील.’’ प्रौढ महेशरावांचा त्रस्त प्रश्न.

एकूण काय, तर वर्षांनुवर्ष परंपरेनं चालत आलेला मोठा ऐवज, देवाधर्माचं, पूजा-भक्तीचं, वारसा-इतिहास सांगणारं अनेकांचं संचित काळाच्या ओघात त्यांच्यासाठी अडचणीचं व्हायला लागलंय. घरं लहान, घरात माणसं कमी, असलेल्या माणसांना वेळ नाही, त्यांची श्रद्धा-भक्तीची स्थानं, कल्पना बदलल्या आहेत. अशा स्थितीत ‘यांचं काय करायचं?’ असा गंभीर प्रश्न पडतोय. दुर्लक्ष केल्यास काहींना ‘पाप लागेल, कोप होईल’ अशी भीती वाटत्येय. काहींना ती नसली, तरी मुद्दाम अनास्था-अनादर करायचा हेतू नाहीये; पण व्यावहारिकदृष्टय़ा या संचिताचा भार वाहणं अशक्य होतंय. काहींना तर वेळेअभावी रोजच्या रोज देव्हाऱ्यात मांडलेल्या देवांची साग्रसंगीत पूजा करणं शक्य होत नाहीए. या कोंडीतून सजग नागरिकांना सोडवण्याचा प्रयत्न चालू वर्षी ६ जून आणि २४ ऑक्टोबर रोजी पुण्यात एका प्रकल्पाद्वारे झाला. पुण्यामध्ये रहअउऌ- ‘स्वच्छ’ ही एक सेवाभावी संघटना पुणे महानगरपालिके च्या सहयोगानं गेली काही वर्ष जुन्या सामानाचं संकलन करीत आहे. त्याचा पुनर्वापर, पुनर्रचना करण्याच्या दृष्टीनं V COLLECT (व्ही कलेक्ट) हा उपक्रम राबवते आहे. घराघरांतलं जुनं, टाकाऊ झालेलं किंवा वापरात नसलेलं फर्निचर, भांडीकुंडी, घरगुती उपकरणं, कपडे, खेळणी, शिक्षण साहित्य, ई-कचरा, पुस्तकं वगैरे आणून देण्याचं आवाहन नागरिकांना करते आहे. त्यातून जे जे गोळा होतं त्यांपैकी वापरण्यायोग्य वस्तू गरजूंना देणं आणि बाकीच्यांचं गरजेनुसार रिसायकलिंग किंवा विघटन करणं अशा प्रक्रिया सुरू आहेत. अशा काही संकलन मोहिमांच्या वेळेस खूपदा लोक विचारायचे, ‘तुम्ही आमच्या घरातलं धार्मिक साहित्य, ग्रंथ, पूजेची उपकरणं, देव्हारे, जपमाळा, मूर्ती-टाक-छाप वगैरे घ्याल का? त्यांचं काय करायचं, हा मोठा प्रश्न पडलाय आम्हाला.’

यातूनच यंदा माधुरी सहस्रबुद्धे यांनी या प्रकारचं परंपरागत धार्मिक, सांस्कृतिक संचित गोळा करण्याचा विचार केला. विषय जरा जास्तच ‘संवेदनशील’ होता. अडगळ, कचरा असे शब्द मनातही यायला नको होते. कोणाच्याही भावना न दुखावता व्यावहारिक सोय बघण्याचं आव्हान होतं. म्हणून एप्रिल आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या प्रारंभी त्यांनी फक्त समाजमाध्यमं वापरून ही योजना लोकांपर्यंत पोहोचवली. नागरिकांनी विशिष्ट दिवशी आपल्या घरांमधल्या देवदेवतांसंबंधीच्या जुन्या, नको असलेल्या वस्तू ‘भारतीनिवास’ सोसायटीच्या सभागृहात आणून द्याव्यात, त्यांची व्यवस्था नीट लावली जाईल, अशा अर्थाचं आवाहन केलं. अशा श्रद्धेय वस्तूंचा आस्थेनं पुनर्वापर, पुनर्चक्रीकरण केलं जाईल, असा शब्द दिला. या कामासाठी खर्च तर येणारच होता. तरी नागरिकांनी स्वेच्छेनं, जमेल तेवढय़ा देणग्या द्याव्यात हेही सुचवलं. मात्र कोणावरही कोणतंही आर्थिक शुल्क लादलं नाही.

माधुरी सहस्रबुद्धे पुणे महानगरपालिकेत दोन वेळा भरपूर मताधिक्यानं निवडून आलेल्या नगरसेविका आहेत. मनपाच्या महिला बाल कल्याण समितीच्या माजी अध्यक्षा आणि ‘बालरंजन’ केंद्राच्या संस्थापक आहेत. अशा कामगिरीमुळे त्यांचा जनसंपर्क दांडगा आहे. त्याचा फायदा २४ ऑक्टोबरच्या संकलन मोहिमेला ठोसपणे मिळाला. ६०३ नागरिकांनी संकलनात आपला सहभाग नोंदवला. ४ तासांमध्ये ८ टन एवढं साहित्य गोळा झालं. त्यात भंगलेल्या मूर्ती होत्या, जीर्ण झालेल्या पोथ्या होत्या, देवांचे वस्त्रालंकार- पूजा उपकरणं होती, पार्थिव मूर्ती होत्या, धातूंच्या प्रतिमा होत्या, अत्यल्प प्रमाणात छोटे चांदीचे देवही होते.

या वस्तू देताना अनेक लोक कातर होत होते. ‘एवढी वर्ष जपलं जिवापाड, आता आमच्यानं होत नाही,’ असं म्हणणारे ज्येष्ठ नागरिक होते, तसंच,  ‘आईनं हे गाठोडं दिलंय. बघा काय करायचं ते,’ असं म्हणून ‘माल आणून टाकणारे’ तरुणही होते. देताना आपापल्या ‘चीजवस्तूं’वर गहिवरून शेवटचा हात फिरवणारे होते, तसंच ‘ही रक्कम ठेवून घ्या, पण नीट व्यवस्था करा,’ असं म्हणून वस्तूंबरोबर बंद लिफाफे देणारेही होते. नेमके २४ ऑक्टोबरला आपण पुण्यात नसू, म्हणून कुरिअरनं अगोदरच देवांना रवाना करणारे होते, तसंच नीट आपापले  देवादिक बांधून त्या पॅकवर आपलं पूर्ण नाव, पत्ता आणि गोत्र लिहून देणारेही होते. काही घरांमध्ये काय द्यायचं, काय ठेवायचं, माहेरचं कुठलं, सासरचं कुठलं यावरून वाद झाले होते, तर काहींनी देवांसकट प्रसाद, नैवेद्यही आणला होता. नेमकी २४ ऑक्टोबरला चतुर्थी असल्यानं घरातले गणपती बाहेर काढणं अनेकांच्या जिवावर आलं होतं. त्यातल्या एका बाईंनी निघताना घरी गणपतीची आरती करून, पेढे ठेवून, त्यातले काही पेढे संस्थेलाही दिले. असे नाना प्रकार!

हा सगळा व्यक्तिगत श्रद्धेचा प्रश्न होता, आहे; पण याला व्यावहारिक मर्यादाही आहेत. एरवी अशा वस्तूंचं काय होतं? तर पावसाळ्यात नद्या जोरानं वाहात असताना त्यांना जलसमाधी दिली जाते किंवा देवळांच्या पायऱ्यांवर, मोकळ्या रानात, वडाच्या पारावर वगैरे ठिकाणी या वस्तू सोडून दिल्या जातात. नद्यांचं प्रदूषण होतं, अनेक ठिकाणी साचत राहातं. काळाच्या ओघात एकेक वस्तू नष्ट होतात. दूरान्वयानं या सगळ्यानं पर्यावरणाचा ऱ्हास होतो. त्यापेक्षा त्यांची नीट बोळवण करणं, व्यवस्था लावणं हाच श्रेयस्कर मार्ग आहे.

अर्थात एका आवाहनात जमा झालेल्या ८ टन वस्तूंची व्यवस्था लावणं हे काही सोपं काम नाही. पोथ्या-पुस्तकं एकीकडे, फोटोफ्रेम्स एकीकडे, मूर्ती-पुतळे एकीकडे, असं वर्गीकरण करायचं होतं. माधुरीताईंना या कामी प्रज्ञा गोवईकर, तृप्ती कुलकर्णी, रुपाली वैद्य, आशा होनवाड, अलका घळसासी, मुकुंद गोरे, दामोदर पडवळ,

लता दामले, अक्षदा देशपांडे या स्वयंसेवकांनी खूप मदत केली. छापील साहित्य जे जमलं होतं, त्याची पाहणी महाराष्ट्र भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी केली आणि विषयानुसार काही वह्य़ा, पोथ्या पौरोहित्य करणाऱ्यांकडे, तर काही ग्रंथ भांडारकर प्राच्यविद्या संस्थेकडे, पुणे ग्रंथोत्तेजक सभेकडे वगैरे सुपूर्द केले. अगदीच फाटकंतुटकं धार्मिक लेखन नष्ट करावं लागलं. नाइलाज होता. असं नीट वर्गीकरण करण्याचं काम पुढे आठ-दहा दिवस सुरू होतं. प्रत्येकी चार टन माल भरलेले दोन ट्रक आणि गोळा झालेली सर्व रक्कम नाशिकला रवाना केल्यानंतरच कार्यकर्ते ‘हुश्श’ करू शकले.

नाशिकमध्ये २०१९ मध्ये अ‍ॅड. तृप्ती गायकवाड यांनी ‘संपूर्णम्’ ही एक सेवाभावी संस्था स्थापन केली आहे. अशा साहित्याच्या विघटनाची सर्व जबाबदारी ही संस्था घेते. अ‍ॅड. तृप्ती यांनी काही वर्षांपूर्वी गोदावरीचा पूर बघायला गेल्या असताना एका माणसाला मोठमोठय़ा तसबिरी पाण्यात टाकताना पाहिलं. त्याला रोखण्याचा प्रयत्नही केला. त्यावर तो अगतिकतेनं म्हणाला, ‘‘मग यांचं मी काय करू? तुम्हीच सांगा.’’ वास्तविक आता डिजिटल टेक्नॉलॉजी सहज उपलब्ध आहे. फ्रेममधले फोटो त्या तंत्रज्ञानामध्ये गोठवून कायम स्वत:जवळ बाळगणं शक्य होतं. बाकी फ्रेममधला पुठ्ठा, काच, लाकडी चौकट, खिळेमोळे वगैरेंचं विघटन झालंच असतं; पण त्या माणसाला याची जाणीवही नव्हती आणि कुवतही नव्हती. त्यावरून प्रेरणा घेऊन ‘संपूर्णम्’ला प्रत्यक्षात आणलं गेलं. अशा प्रकारचं धार्मिक/श्रद्धामय साहित्य ‘संपूर्णम्’मध्ये आलं की, त्यातल्या देवीदेवतांची रीतसर उत्तरपूजा बांधली जाते. त्यासाठी पुरोहित नेमलेले असतात. पुढे कागद-धातू-प्लॅस्टिक-काच-पी.ओ.पी.- लाकूड वगैरे ज्या गोष्टी असतात त्याचं शास्त्रशुद्ध विघटन करून जरूर त्या उद्योगाला माल पुरवला जातो. पी.ओ.पी.ची पावडर छोटी खेळणी बनवायला उपयोगी येते. वितळलेले धातू काही उद्योगधंद्यांमध्ये वापरले जातात, तर लाकडाचा भुसा, काचेचा चुरा, कागदाचा लगदा यांचाही व्यावसायिक उपयोग होतो. हे सगळे सोपस्कार करायला जागा-वेळ-पैसा-मनुष्यबळ हे सगळंच लागतं. २४ ऑक्टोबर रोजी संकलित केलेल्या साहित्यावर अद्याप काम सुरू आहे. यावरून त्याच्या व्यापाचा अंदाज येऊ शकतो. अ‍ॅड. तृप्ती गायकवाड या सगळ्याचं नियोजन करतात. मात्र मदतनीसांना त्यांच्या श्रमाचं मूल्य दिल्यावर स्वत:साठी काही आर्थिक परताव्याची अपेक्षा बाळगत नाहीत. आपण एक समाजोपयोगी काम करतोय याचं त्यांना मोठं समाधान वाटतंय.

 काम पुण्यातलं असो किंवा नाशिकमधलं, याला कोणत्याही गटाकडून विरोध करण्यात आलेला नाही हे मात्र नोंदवायलाच हवं. दक्षतेचे, सावधगिरी बाळगण्याचे इशारे आले; पण टीका-मतभेद यांचा सामना करावा लागला नाही. जून महिन्यातल्या उपक्रमाची पुरेशी प्रसिद्धी झाली नव्हती. तेव्हाही दोन टन साहित्य गोळा झालं होतं; पण कुठेही एकदा दिलेली वस्तू परत मागवली, घरात तिच्यावरून वादंग माजले, असे प्रसंग ओढवले नाहीत. एकूणच बदलत्या जीवनशैलीत धार्मिक-सांस्कृतिक संचिताचा पसारा आवरणं ही काळाची गरज असल्याचं अधोरेखित झालं. अनेकांकडून असा प्रकल्प पुन्हा कधी कराल? आमच्या गावी कधी कराल?, अशी विचारणा सुरू झाली. स्वयंसेवक म्हणून मदत करायलाही अनेक हात वर आले.

धार्मिक-सांस्कृतिक-कौटुंबिक संचिताची व्यवस्था लावण्याचा हा प्रयत्न मला दखलपात्र वाटला म्हणूनच हे लिहिलं. पुढे मात्र मनात आलं, ठीक आहे, आतापर्यंतची आवराआवर करण्याचा संघटित प्रयत्न होतोय; पण यापुढे माणसांकडे, घरांमध्ये असं संचित नव्यानं गोळा होऊ नये यासाठी काय करता येईल? आपण निष्ठेनं पाळलेले, कुळधर्म-कुळाचार पुढच्या पिढय़ांनी तसेच्या तसेच पाळलेच पाहिजेत, हा आग्रह ज्येष्ठांना सोडता येईल? वेगवेगळ्या कार्यक्रमांत पाहुण्यांना, उत्सवमूर्तीना.

‘की-चेन’पासून भव्य फोटोफ्रेमपर्यंत, या ना त्या रूपात देवादिकांच्या प्रतिमा, मूर्ती भेटीदाखल देण्याची प्रथा थांबवता येईल? आपण एखाद्या तीर्थक्षेत्राला भेट देऊन आल्यावर तिथले टाक-प्रसाद-अंगारा-ओटीचे नारळ वगैरे ऐवज कोणी मागितले तरच द्यायचे, एवढा विवेक बाळगता येईल? स्वत:च्या श्रद्धेय वस्तू जो तो आपापल्या इच्छेनं घेतच असतो, आपण आपल्या श्रद्धा त्याच्यावर लादू नयेत, उगाच त्याच्या घराचं वस्तुसंग्रहालय करू नये, ही लक्ष्मणरेषा ओढून घेता येईल?

मला कल्पना आहे, विषय नाजूक आहे, संवेदनशील आहे; पण हेही पटतंय, की संचिताची गाठोडी पुढल्यांवर लादायला नको आहेत. शेवटी एवढय़ा भोवंडून टाकणाऱ्या वेगवान काळात आपण किती काय काय जपू शकू, प्रश्न आहे! उत्तरं शोधायची आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Cultural heritage covered family ysh

ताज्या बातम्या