गद्धेपंचविशी :  बेदरकार वयाचं देणं

‘सोंगाड्या’च्या निर्मितीमुळे चित्रपटांच्या कोणत्या विभागात किती खर्च येतो, निर्मिती कशी चालते, याचं ज्ञान मिळालं

डॉ. श्रीराम लागू यांना ‘पद्माश्री’ पुरस्कार जाहीर झाला तेव्हा ‘सामना’ चित्रपटाचं चित्रीकरण सुरू होतं. तेव्हा भालजी पेंढारकर आणि लता मंगेशकर यांच्या हस्ते डॉ. लागू यांचा सत्कार करण्यात आला.

|| रामदास फुटाणे
‘‘विशीच्या सुरुवातीला रूढ चौकटीतल्या मार्गावर चालण्यास मी सुरुवात के ली खरी, पण ही वाट लवकरच बदलली आणि अनेक मोठे निर्णय ऐन ‘गद्धेपंचविशी’त घेऊन ते मी तडीस नेऊ शकलो हे तेव्हाचं, बेदरकार वयाचं देणं होतं.  दादा कोंडके , विजय तेंडुलकर अशा काही महत्त्वाच्या व्यक्तींमुळे मराठी चित्रपटसृष्टीतील समांतर चित्रपटांच्या  नव्या प्रवाहाची सुरुवात होण्यास मी निमित्त ठरलो. चित्रकला, कविता आणि चित्रपट या तिन्ही कलांच्या संगमातून माझी अनुभवसमृद्ध  ‘गद्धेपंचविशी’ घडत गेली.’’

मी विशीला आलो तेव्हा चित्रकला शिक्षक होतो आणि तिशीत पदार्पण करताना गाजलेल्या मराठी चित्रपटांचा निर्माता झालो होतो. या दरम्यानच कवी म्हणूनही माझी ओळख बळकट होत होती. खरंतर ही तिन्ही क्षेत्रं किती वेगळी. पण एक क्षेत्र मागे सोडून दुसऱ्या क्षेत्रात मी सहज प्रवेश करू शकलो. याला काही कारणं होती. एकतर मी मोठी स्वप्नं पाहिली आणि त्याला बळ देणारी माणसं मला अगदी योग्य वेळी भेटत गेली. थोडा बेदरकारपणा आणि तरीही भविष्याचं नियोजन या अजब जोडीमुळेही अनेक गोष्टी घडू शकल्या. हे मात्र माझ्या ‘गद्धेपंचविशी’च्या वयाचंच देणं म्हणावं लागेल.

आमचं गाव नगर जिल्ह्यातलं जामखेड. हा नगरमधील सर्वाधिक दुष्काळी भाग. वीज नव्हती, पाण्याचा नळही कित्येक वर्षं नव्हता. दर पाच वर्षांत चार वर्षं दुष्काळाची. फेब्रुवारी-मार्चपासूनच टँकर सुरू होत असे. हे टँकर नेहमी रात्री-अपरात्री येत. अशा भागात शाळेच्या खोल्याही नीट नव्हत्या. एका गोडाऊनमध्ये आमची शाळा भरत असे. घरचा व्यवसाय कापड दुकानाचा. दुकानात आचार्य अत्र्यांचा ‘नवयुग’ येत असे. त्यामुळे आचार्य अत्रे आणि विनोदी साहित्यिक दत्तू बांदेकर यांचं लेखन मला खूप आवडू लागलं. पाचवी-सहावीत गेल्यावर ‘नवयुग’मुळेच हळूहळू वाचनालयात जाण्याचीही गोडी लागली. अनेक मासिकं, साप्ताहिकं, नियतकालिकं ‘… येथे छापून… येथे प्रसिद्ध केले’ या ओळीपर्यंत मी वाचू लागलो. सुरुवातीला ‘चांदोबा’नं लावलेली वाचनाची गोडी व्यंकटेश माडगूळकर, द.मा. मिरासदार, वसंत सबनीस यांच्या लेखनापर्यंत पोहोचली. लहानपणापासूनच मला चित्रकलेची खूप आवड. भिंतीवर चित्रं काढून ती रंगवणं हा तर माझा छंदच होता. दीनानाथ दलाल यांचा ‘दीपावली’ आणि रघुवीर मुळगांवकर यांचा ‘रत्नदीप’ हे दिवाळी अंक मला खूप आवडायचे. त्यातल्या ऑफसेट चित्रांवर स्केल टाकून, एनलार्ज करून मी त्यात रंग भरत असे. अशी बरीच चित्रं मी भिंतीवर ऑइल कलरमध्ये रंगवली होती. अर्थातच भविष्यात चित्रकार होण्याची स्वप्नं रंगवत होतो, पण गावी ते शक्य नव्हतं. कारण सातवी इयत्तेच्या परीक्षेसाठी कर्जतला आणि ‘अकरावी एसएससी’साठी नगरला जावं लागलं होतं. चित्रकलेचं रीतसर शिक्षण घ्यायचं, तर मुंबई-पुण्यात जाणं गरजेचं होतं आणि आर्थिक स्थैर्य साधायचं, तर नोकरी करावीच लागणार होती. मग मी वयाच्या सतराव्या वर्षी पुण्याच्या अभिनव कला विद्यालयात चित्रकला शिक्षकाचा एक वर्षाचा डिप्लोमा घेतला आणि अठराव्या वर्षी अहमदनगरमध्येच खेड्यात रयत शिक्षण संस्थेच्या शाळेत नोकरीस लागलो. ( तेव्हा मला ११५ रुपये मासिक पगार मिळत असे!) पण मनात मुंबईची ओढ होती. तिथे जाऊन शिकण्याचं जबरदस्त आकर्षण होतं. १९६२ मध्ये मुंबईत आलो आणि गिरगावातील मारवाडी विद्यालयमध्ये मला चित्रकला शिक्षकाची नोकरी मिळाली. जे.जे. कला महाविद्यालयातून ‘जी. डी. आर्ट’ करायचं हे माझं स्वप्न. तिथे मला प्रवेशही मिळत होता, पण नोकरीची वेळ सकाळी ७.३० ते दुपारी १२.४० अशी होती आणि जे.जे.मध्ये रोज उशिरा येण्याची परवानगी नव्हती. त्यामुळे ते काही शक्य होणार नाही हे लक्षात आलं. मग मी दादरच्या ‘मॉडेल आर्ट इन्स्टिट्यूट’मध्ये प्रवेश घेतला आणि दोन वर्षं पेंटिंग शिकलो. त्याच दरम्यान मराठी आणि ड्रॉइंगच्या शिकवण्याही घेऊ लागलो. पण चित्रकार होण्याची माझी स्वप्नं दूर गेली ती एका व्यक्तीच्या भेटीनंतर. ती व्यक्ती म्हणजे दादा कोंडके !

दादा कोंडके  यांच्याशी १९६५ च्या सुमारास माझी मैत्री झाली. पण त्याकडे येण्यापूर्वी मला कवितेविषयी थोडं सांगावं लागेल. मी वयाच्या अठराव्या वर्षापासून कविता करू लागलो. त्याचाही एक किस्साच आहे. शिक्षक म्हणून मी रुजू झालो होतो ती शाळा हिंदी माध्यमाची होती. जवळपास सर्व विद्यार्थी मारवाडी समाजाचे आणि हिंदीच बोलणारे. एकदा एक विद्यार्थी मला ‘बिर्ला मातोश्री सभागृहा’त भरलेल्या हिंदी कविसंमेलनात घेऊन गेला. ते संमेलन ऐकल्यावर अशा कविता आपणही लिहू शकतो याची मला जाणीव झाली. लहानपणापासून अत्रे आणि बांदेकर यांचं व्यंग वाचलं होतंच, पण शाळेत असताना नववी ते अकरावीदरम्यान आठवडे बाजारातील तमाशाही पाहिला होता. तमाशातील सोंगाड्यानं लक्ष वेधून घेतलं होतं. मराठीतील अत्रे, पु.लं.पासून द.मा. आणि वसंत सबनीसांपर्यंतच्या कित्येक  विनोदी लेखकांची प्रेरणा तर समोर होतीच. हे सर्व मला खुणावू लागलं आणि मराठी व हिंदीतही मी कविता लिहू लागलो. माझ्या सुरुवातीच्या कविता रूढ चौकटीत बसणाऱ्या कवितांच्याच अंगानं जाणाऱ्या होत्या. पहिली कविता छापून आली ती १९६४ ला वयाच्या एकविसाव्या वर्षी ‘स्वराज्य’मध्ये. त्याच्या मानधनाचे ५ रुपयेही मनीऑर्डरनं मिळाले. पुढे मी असं ठरवलं, की पानाफुलांच्या, प्रेमाच्या कविता लिहिण्यापेक्षा अवतीभोवती घडणारं राजकारण आणि समाजकारण यातील विसंगती शोधत भाष्यकविता लिहाव्यात. या कवितांवर ‘वात्रटिका’ हा शिक्का बसला.  जसं व्यंगचित्र घडलेल्या घटनेवर बोलतं, तसं घडलेल्या घटनेवर बोलणाऱ्या या भाष्यकविताच होत्या.

त्या प्रसिद्ध होऊ लागल्या. 

माझ्या वडिलांच्या मामांचं फणसवाडीत भागीदारीत घाऊक साड्यांचं दुकान होतं. दादा कोंडके  यांच्याशी माझी भेट तिथेच झाली. दादा त्या वेळी मुंबई मध्यवर्ती कामगार सोसायटीत (आपला बाजार) नोकरीला होते. त्यासाठीच्या साड्या खरेदीसाठी ते फणसवाडीला येत. याच दरम्यान ‘मराठा’ दैनिकात माझ्या एक-दोन कविता छापून आल्या होत्या. त्या कवितांमुळे दादांशी मैत्री झाली. दादांच्या ‘विच्छा माझी पुरी करा’ या वगनाट्याच्या कार्यक्रमात मी त्यांना नेहमी भेटत असे. अनेकदा आम्ही भोईवाडा (नायगाव) येथे भेटायचो. ही सगळी कामगार वस्ती. आम्ही बराच वेळ गप्पा मारत बसायचो. यातूनच दादांच्या ‘सोंगाड्या’ चित्रपटाच्या निर्मितीची व्यवस्था पाहण्याची जबाबदारी माझ्यावर आली आणि चित्रकार होण्याचे आधीचे विचार दूर होत जाऊन हळूहळू चित्रपटांची ओढ वाढू लागली. ‘सोंगाड्या’च्या निर्मितीचं काम पाहायला मी कोल्हापूरला गेलो तेव्हा कोल्हापुरातील प्रसिद्ध ‘जयप्रभा स्टुडिओ’मध्ये दिग्दर्शक भालजी पेंढारकरांशी ओळख झाली. त्यांच्याकडून या क्षेत्रातील अनेक गोष्टी समजल्या आणि शिकायला मिळाल्या. अशा रीतीनं ऐन पंचविशीत मी आधी धरलेला मुख्य मार्ग सोडून या वेगळ्याच  वळणावर आलो.

‘सोंगाड्या’च्या निर्मितीमुळे चित्रपटांच्या कोणत्या विभागात किती खर्च येतो, निर्मिती कशी चालते, याचं ज्ञान मिळालं. इथून माझ्या डोक्यात चित्रपट निर्मितीचं नवं स्वप्न सुरू झालं. चित्रपटासारख्या सर्व कलांचा संगम असलेल्या क्षेत्रात आपणही काही तरी करू शकू, असं वाटू लागलं. ‘सोंगाड्या’ आणि दादा कोंडके  यांच्याच ‘एकटा जीव सदाशिव’ या चित्रपटांची निर्मिती पाहताना मी नोकरी सोडलेली नव्हती. प्रत्येक महिन्याचे दहा दिवस मी चित्रपट निर्मितीसाठी ठेवायचो. (अर्थात त्या सर्व बिनपगारी रजा व्हायच्या.) दादा ज्या प्रकारचे चित्रपट काढत होते त्यापेक्षा वेगळं काही करावं असं मी ठरवलं. त्या वेळी मराठी चित्रपट कृष्णधवलच असत आणि साधारणत: १ लाख रुपयांत चित्रपट करता येत असे. माझ्या मित्रांची संख्या विविध क्षेत्रांत इतकी होती की, आपण लाखभर रुपये कसेही उभे करू शकू याची मला खात्री होती. भागीदार घेऊन चित्रपट करू शकू एवढा विश्वास होता. त्यामुळे वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी मी अनेकांकडे पैसे मागण्यास सुरुवात केली. किती पैसे जमवू शकतो याचा अंदाज घेतला. माझा मित्रपरिवार इतका वाढण्याचं एक कारण म्हणजे दादा कोंडके  आणि दुसरं म्हणजे हिंदी कवितासंमेलनं.

१९६५ मध्ये मी ‘कटपीस’ ही कविता लिहिली आणि ती हिंदी कविसंमेलनांमध्ये गाजली. सुरुवातीला लहान संमेलनांमध्ये मला ही कविता वाचण्यासाठी १०० ते २५० रुपये मिळाले होते. नंतर ‘बिर्ला मातोश्री सभागृहा’त झालेल्या मोठ्या संमेलनात मात्र एका कविता वाचनाचे एक हजार रुपये मिळाले. हा १९७० च्या आसपासचा काळ होता. कविता वाचण्याचे एवढे पैसे मिळतात हे मला प्रथमच कळत होतं. या कवितेमुळेच अनेक प्रसिद्ध हिंदी कवींशी परिचय झाला. कवी रामरिख मनहर हे मला मोठ्या कविसंमेलनांत घेऊन जाऊ लागले. काका हाथरसी, निर्भय हाथरसी, शैल चतुर्वेदी, हुल्लड मुरादाबादी या सर्व कवींबरोबर मी कवितावाचनास जात असे. त्यामुळे अनेकांशी ओळखी होत माणसं जोडली गेली. (माझी काही मित्रमंडळी तर इतकी श्रीमंत होती की, एके कदा दुपारी मी १ रुपया ६५ पैशांची राइसप्लेट खायचो आणि रात्री त्यांच्याबरोबर ‘फाइव्हस्टार’मध्ये जेवायचो!)

पूर्वीपासूनच मला राजकारण या विषयात रस वाटत असे. त्यामुळे आपण राजकीय चित्रपट काढावा असं मनात होतं. इथे थोडी पार्श्वभूमी सांगायला हवी. माझे वडील स्वातंत्र्यसैनिक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते होते. त्यामुळे साहजिकच घरात काँग्रेसचं वातावरण होतं. पण रोज ‘मराठा’ वाचल्यामुळे मानसिक  स्थिती काँग्रेसच्या विरोधात होती. त्यामुळे गावात मी काँग्रेसचा आणि मुंबईत मात्र ‘संयुक्त महाराष्ट्र समिती’च्या विचारांचा होतो! १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत जॉर्ज फर्नांडिस यांचा प्रचारही के ला होता. बाळासाहेब ठाकरे यांनी आचार्य अत्रेंवर सतत टीका केल्यामुळे १९६६ मध्ये ‘शिवसेना’ स्थापन झाली तेव्हा मी त्यात प्रवेश के ला नाही. राजकारणाची आवड असूनही त्यात न पडता चित्रपट क्षेत्रात आलो. (तेव्हा  ठरवलं होतं की, आयुष्यात काहीच करता आलं नाही, तरच शेवटी राजकारणात जाऊ. आताच कशाला!)

त्याच सुमारास मी विजय तेंडुलकरांचं ‘अशी पाखरे येती’ हे नाटक पाहिलं आणि मला ते खूप आवडलं. त्यांचं लिखाण लक्षात राहावं असंच होतं. नवीन चित्रपट निर्मिती करण्यापूर्वी प्रथम एका चांगल्या लेखकाची निवड करायला हवी. कथा-पटकथा-संवाद चांगले असतील तरच चांगला चित्रपट होऊ शकेल, हे डोक्यात पक्कं होतं. १९७१ मध्ये- वयाच्या सत्ताविसाव्याच वर्षी मी तेंडुलकरांना भेटलो आणि माझ्यासाठी चित्रपट लिहिण्याची विनंती केली. त्यांच्याशी माझी ओळख कशी झाली यामागची गोष्ट तर ‘गद्धेपंचविशी’चा नमुनाच ठरावा! वयाच्या २६-२७ व्या वर्षी मी आणखी एक उद्योग केला होता, तो म्हणजे ‘ऋतुराज’ नावाने हिंदी त्रैमासिक काढलं होतं. मराठी लेखकांचं निवडक साहित्य हिंदीत भाषांतरित करून तिथे या साहित्यास प्रसिद्धी मिळावी हा माझा उद्देश होता. पण तो अंगलट आला आणि त्यात मला १०-१५ हजारांचं कर्ज झालं. तेंडुलकरांनी ‘माणूस’ साप्ताहिकात आचार्य अत्रेंवर ‘प्रचंड’ शीर्षकाचा लेख लिहिला होता. तो मी हिंदीत भाषांतरित करून छापला होता. असो.

तेंडुलकरांना चित्रपट लिहिण्यासाठी विचारल्यावर मात्र त्यांनी नकार दिला. ‘चित्रपटाचं आणि आपलं गणित जमत नाही’ असं ते म्हणाले. पण त्यांच्या नकारानंतरही मी सतत पिच्छा पुरवत राहिलो. या दरम्यान महाराष्ट्रातील ग्रामीण राजकारणाबद्दल त्यांची आणि माझी खूपदा चर्चा झाली. जवळजवळ एक वर्षानंतर- म्हणजे १९७२ मध्ये त्यांनी होकार दिला. प्रथम त्यांनी मला विचारलं की, डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुलेंना घेऊन सिनेमा काढल्यास चालेल का? मी कर्जबाजारी होऊ नये हा त्यांचा प्रामाणिक उद्देश होता. ‘सोंगाड्या’ चित्रपटामुळे माझी निळू फुलेंशी मैत्री झाली होती. त्यामुळे या दोन कलाकारांना समोर ठेवून चित्रपट काढण्याचं निश्चित झालं. एक सत्तेवर असलेला माणूस आणि दुसरा सत्तेपासून दूर फेकला गेलेला माणूस, अशा स्वरूपाची कथा असावी असं ठरलं. मी तेंडुलकरांना सांगितलं होतं की, ग्रामीण प्रेक्षकांना कळेल असा, पण वेगळा चित्रपट आपल्याला करायचा आहे. त्यांनी कथा लिहिली. चित्रपटाचं नाव ठेवलं- ‘सावलीला भिऊ नको.’ पण मी त्यांना म्हणालो की, हे नाटकाचं नाव वाटतंय. शेवटी ‘सामना’ या नावावर शिक्कामोर्तब झालं. त्याच दरम्यान त्यांचं ‘घाशीराम कोतवाल’ नाटक रंगभूमीवर आलं होतं. दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची ‘तू वेडा कुंभार’, ‘अशी पाखरे येती’ आणि ‘घाशीराम’ ही तिन्ही नाटकं मी पाहिली होती. माझ्या चित्रपटासाठी दिग्दर्शक म्हणून तेंडुलकरांनी गोविंद निहलानींचं नाव सुचवलं होतं आणि त्यांचं निहलानींशी बोलणंही झालं होतं. पण जब्बार यांनाच घेतलं तर कसं होईल, अशी कल्पना मी मांडली. त्यांना खूप आश्चर्य वाटलं, कारण जब्बार पटेलांनी तोपर्यंत कोणताही सिनेमा केला नव्हता. पण सर्व  वेगळंच करायचं, हे माझ्या मनानं घेतलेलं होतं.

अखेर मी ३६५ रुपये महिना पगाराची नोकरी सोडली आणि ‘सामना’साठी पार्टनर व कर्ज शोधत निघालो. चित्रीकरण झालं. लता मंगेशकर यांच्या हस्ते चित्रपटाचा मुहूर्त के ला होता. (अर्थात हे भालजी पेंढारकरांमुळे घडू शकलं.) लतादीदींनी एकही पैसा न घेता ‘सख्या रे घायाळ मी हरिणी’ हे गाणं आमच्या चित्रपटासाठी गायलं. मुंबईत माझं ऑफिस नव्हतं. त्यामुळे ‘सामना’ची निर्मिती पब्लिक टेलिफोनवरूनच के ली होती. (१० पैशांची नाणी टाकू न संपर्क  साधता येत असे.) प्रवास एसटीच्या लाल डब्यातून करत असे. हाताखाली मॅनेजर वगैरे कु णी नव्हता. मी स्वत:च चित्रपटाच्या सामानाची पेटी उचलून टॅक्सीत टाकत असे. बंगला, गाडीची स्वप्नं कधी रंगवली नव्हती, पण चांगला चित्रपट हातून घडावा किं वा साहित्य क्षेत्रात काही वेगळं लिहिलं जावं म्हणून वेगळेपण आणण्याचा प्रयत्न मात्र के ला. यशापयशाचा विचार तेव्हा के ला नव्हता. १९७५ मध्ये ‘सामना’ प्रदर्शित झाला तेव्हा मी ३२ वर्षांचा होतो. त्याला मिळालेली प्रचंड लोकप्रियता आणि घडलेला इतिहास सगळ्यांना माहिती आहे. आता विचार करतो, तेव्हा वाटतं की, के वळ ३६५ रुपये पगार असताना मी दीड लाख रुपयांचा चित्रपट काढण्याची स्वप्न पाहात होतो. (आणि नंतर ‘सामना’च्याच निमित्तानं बर्लिन आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला गेलो.) हा सर्व जुगारच होता. पण ‘गद्धेपंचविशी’तल्या उत्साहानं भारलेल्या काळात कशाचीच भीती वाटत नव्हती. (आता चित्रपट काढायचा म्हटलं तर हिंमत होणार नाही. कारण आता मी कर्जाला भितो.) अगदी चित्रपट ‘फ्लॉप’ झाला, तरी लोकांचं कर्ज फे डू शकेन अशी तेव्हा हातोटी होती. मला चित्रकला चांगली येते, त्यामुळे चित्रपटांचे पडदे, बॅनर, साइनबोर्ड रंगवूनही जगू शकेन हे माहीत होतं. चित्रपट काढायची ऊर्मी आहे तर तो निर्णय तेव्हाच घ्यायला हवा, नंतर शक्य होणार नाही हे कळत होतं. तरुणाईच्या जोशामुळेच ते माझ्या हातून होऊ शकलं. पुढे जेव्हा चित्रपट फ्लॉप झाले, तेव्हा ‘भारत कधी कधी माझा देश’ आहे हा कवितेचा कार्यक्रम मी करू लागलो आणि

४० वर्षं कवितांच्या कार्यक्रमावर जगलो. हेही ‘गद्धेपंचविशी’तच ठरवलं होतं!

आज नोकरी न मिळाल्यानं वैफल्यग्रस्त झालेले पदवीधर पाहतो तेव्हा खूप यातना होतात. खरं तर जगण्याचे तीन-चार पर्याय स्वत:ला उपलब्ध करणं हे पंचविशीतच शक्य असतं. असं असेल तर आयुष्य आपल्याला हव्या त्या वळणावर नेता येतं. प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी मारवाडी, गुजराती, पंजाबी, सिंधी हे कोणतंही आरक्षण नसताना शिकले, नोकऱ्या न करता त्यांनी व्यवसाय शोधले. आज महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सर्वांत सधन व संपन्न समाज म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. पण आपल्या तरुणांची शक्ती मात्र कोणत्या तरी मोर्चा आणि आंदोलनांमध्येच खर्च होते. त्यामुळे मला तरुणांना सांगावंसं वाटतं की, योग्य ते निर्णय विशी ते तिशीतच घ्यायला हवेत.

विशीच्या सुरुवातीला सरधोपट मार्गावर सुरू झालेला माझा प्रवास मोठी वळणं घेत मला शिकवत समृद्ध करत राहिला.  पंचविशीत आपल्या दोन कानांमधील प्रदेश सुपीक ठेवला आणि कोणत्या हवामानात कोणतं पीक घ्यायचं हे निश्चित के लं की, पुढील प्रवास आनंदाचा होतो!

phutaneramdas1@gmail.com

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Dada kondke vijay tendulkar marathi cinema due to individuals parallel films produced the most drought prone parts akp

Next Story
करिअरिस्ट मी : जिम् पोरी जिम्
ताज्या बातम्या