आनंद, निरोपाची संधी न मिळालेल्या तुझ्यासारख्या सर्वाच्या ‘जाण्याची’ भरभक्कम किंमत मोजून मी हा धडा शिकले. कालच्या रात्रीनंतरचा आजचा दिवस मी पाहात असताना आनंद, तू या जगात नाहीस, पण तू असताना तुझ्या शांत समजुतीनं, तू अनेक अगम्य गोष्टी समाजावल्या आहेस. तुझ्या जाण्याभोवतालचं माझं आकांडतांडव शांत करायला तू शिकवलेला शांत समजूतदारपणाच सोबत करेल.
डेली सोपचं काम कधीच थांबू शकणार नाही. दररोज एक नवीन भाग तयार असावाच लागतो. मी करत असलेला ‘अवघाचि संसार’ हा डेली सोप सुमारे साडेचार र्वष चालू होता. त्या काळात माझ्या बहिणीची भूमिका करणाऱ्या अभिनेत्री तीन वेळा बदलल्या. वेगवेगळय़ा कारणांनी. कधीकधी हव्या त्या कलाकारांच्या तारखा नसायच्या. तेव्हा मालिकेची कथा नदीसारखी ‘कलाकार नसल्याचा’ दगड ओलांडून वेगळय़ाच दिशेला जायची. आपल्याला जे वाटत होतं त्याहून वेगळय़ाच दिशेला.. आयुष्यही असंच असतं. कधी कुणासाठी थांबत नाही. शिवाय आपल्याला हवं त्या वाटेनं जातंच असं नाही.
एकदा ‘अवघाचि’च्या चित्रीकरणासाठी मी नेहमीसारखी सेटवर पोहोचले. मेकअपला बसले. तोच एक फोन आला. ‘विहंगचं कळलं ना तुला?’ विहंग नायक. या मालिकेत माझ्या वडिलांचं काम करायचे. विहंगजींची नुकतीच हृदयाची शस्त्रक्रिया झाली होती. एकदम भीती वाटली. काही वाईट बातमी तर नसेल ना? मी म्हटलं, ‘म्हणजे?’ ‘आज पहाटे विहंगला एक्स्प्रेस-वेवर अपघात झाला. तो गेला.’ मी आक्रस्ताळं ओरडत मेकअप रूमबाहेर धावत सुटले. आमच्या  दिग्दर्शकाला- मंदारला चिरकत्या तारस्वरात सगळं सांगितलं. सगळे वावटळ आल्यासारखे एक्स्प्रेस-वेच्या दिशेनं मिळेल त्या गाडय़ा घेऊन धावत सुटले. जणू आपण लवकर पोहोचतो तर गेलेला जीव परत येईलही इतक्या सैरावैरा..
विहंगजी गेल्यावर त्यांची भूमिका करण्यासाठी आनंद अभ्यंकरला विचारलं गेलं. त्याचा सेटवरचा पहिला दिवस मी कधीच विसरणार नाही. तो विहंगजींसारखे कपडे घालून सेटवर आला. मी स्वत:ला आतून घट्टमुट्ट करून त्याच्यासमोर उभी राहिले. मालिकेत माझ्या भूमिकेचं नाव ‘आसावरी’. विहंगजी मला एका विशिष्ट पद्धतीनं हाक मारायचे त्या मालिकेत.. ‘सावरेऽऽ’ अशी. अतिशय गोड आणि प्रेमळ हाक. आनंद हातात संवादांचे कागद घेऊन समोर आला आणि त्याने पहिला शब्द उच्चारला, ‘सावरेऽऽ’. मी पायातलं बळ गेल्यासारखी खालीच बसले. आनंदने माझ्या डोक्यावर हात ठेवला. म्हणाला, ‘अ‍ॅमी, तालीम करायची ना?’ मी म्हटलं, ‘येस अँडीबॉय, करायची तालीम!’
त्या दिवशी आनंदच्या ‘सावरे’नं मला पुढे जायला शिकवलं. त्यानं डोक्यावर ठेवलेला हात आणि ‘तालीम करायची ना?’ हा प्रश्न हेच शिकवत होता, ‘जाणाऱ्याचं दु:ख आहेच, पण पुढे चल..’ आनंद खूप अगम्य गोष्टी शांतपणे समजावून सांगायचा. ‘हा असं का वागला, तो तसं का करतो,’ या माझ्या रुसलेल्या प्रश्नांना तो शांत समजुतीनं उत्तरं द्यायचा. त्याची उत्तरं, त्या उत्तरांत कधीही समोरच्याला खाली दाखवणं नव्हतं. समजूत होती. त्यानं सेटवर कधीही कुणाचीही ‘खेचली’ नाही. पण म्हणून तो भोळा नव्हता. सगळं कळून समजुतीनं शांत आयुष्य जगणारा होता तो. त्याचा फक्त हसराच चेहरा डोळय़ांसमोर येतो.
कधी कधी आयुष्य डेली सोप पण फिका वाटेल अशा घटना प्रत्यक्षात घडवतं. ज्या एक्स्प्रेस-वेवर विहंगजी गेले त्यावरच आनंदने जाणं हा भयंकर योगायोग. एरवी कुठल्या मालिकेत दाखवला तर खोटा वाटेल असा. विहंगजींसारखीच आनंदने पण पूर्ण काळजी घेऊनच प्रवास सुरू केला होता. तरीही त्याचा आणि त्याच्याबरोबर गाडीत असलेला आमचा मित्र अक्षयचा जीव जातो, अक्षयच्या चिमुकल्या पिल्लासह.
येणारा प्रत्येकजण जाणार असतो. मान्य. पण अशा जाण्याला कसं सामोरं जायचं. बालिश वाटला तरी थयथयाट करावासा वाटतो आहे. कोण आहे ती अदृश्य शक्ती, कुणी कधी ‘जायचं’ ते ठरवणारी? ‘चूक, चूक, चूक आहे तुझं.’ असा आकांडतांडव करावासा वाटतो आहे. काळजी घ्यायची म्हणजे तरी काय करायचं असतं? सगळं सांभाळायचं मनात असताना क्षणात सगळं फिस्कटतं. किती योजना आखतो सारख्या आपण. ‘असं करू, तसं करू.’ कर्ज काढतो, म्हातारपणीच्या तरतुदी करतो. त्यासाठी आतापासून मन, शरीर शिणवतो. पै न् पै काटकसरीनं वाचवत राहतो. हे सगळं असं एका क्षणात नेस्तनाबूत होऊ शकतं.  ‘दरड कोसळू शकते, वाहनं सावकाश हाका.’ म्हणजे काय? वाहनं सावकाश हाकली तर आपण दरडीतनं सुखरूप सुटू?
लहानपणी वाटायचं, कितीही मोठं संकट आलं तरी बाबा वाचवतील त्यातून. सगळं काही बाबांच्या अखत्यारीत आहे. आपण चिंता करायचं कारणच नाही वाटायचं. एकदा मी, आई, बाबा आणि माझा भाऊ जय पहाटेच्या वेळी रिक्षानं स्टेशनवर जायला निघालो होतो.  वाईला, आत्याकडे जाणार होतो आम्ही. पहाटेच्या बसचं रिझव्‍‌र्हेशन होतं. आत्याकडून पुढे महाबळेश्वरला जाणार होतो. ‘कित्ती मज्जा!’ असं वाटत असतानाच घरानंतरच्या पहिल्याच वळणावर रस्त्यावर वाळू होती. त्यावरून आमची रिक्षा उलटीपालटी घसरली. एक क्षण काही कळलंच नाही. मी आणि बाबा एका कडेला होतो. त्याच्या विरुद्ध बाजूला रिक्षा कलंडली होती. त्यामुळं आम्ही दोघं रिक्षाबाहेर होतो. रिक्षा आई आणि जयच्या बाजूला कलंडली होती. त्यांच्या अंगावर. रिक्षाखाली ते काय अवस्थेत आहेत ते दिसत नव्हतं. त्या वेळचा बाबांचा चेहरा मी विसरू शकत नाही. त्यांनी एकटय़ानं जीवघेणा जोर लावून ती रिक्षा उचलली. आई आणि जयला थोडंच लागलं. वाचलो.
तेव्हा वाटलं, बास! आता कधीही, कुठेही, काहीही कलंडलं, फिस्कटलं तरी बाबा सुपर मॅनसारखे येणार. वाचवणार. मोठं होताना कळत गेलं. बाबा पण माणूस आहेत. आणि तेही गेल्यावर कळलं की आणखीनच कुणीतरी आहे, त्यांच्याहून मोठं, सगळय़ात मोठं, जे सांभाळत आहे हा सगळा पसारा.. किंवा कुणीच नाही आहे. आपापल्या वाटेनं, आपापल्या पद्धतीनं गोष्टी घडत जातात. ‘कुणीतरी शक्ती आहे,’ ही पण आपण आपली घातलेली समजूत.
आहे हे असं आहे. प्रत्येक गोष्ट कारणमीमांसेच्या दोऱ्यात ओवायला पाहायची. नाही ओवता येत कित्येक गोष्टी. सुटय़ाच राहतात. कुठल्याच माळेचा भाग न बनता नुसत्या एकटय़ाच आपल्याकडे पाहात राहतात. ‘असं म्हणून तसं’, ‘तसं म्हणून असं’नी सगळय़ालाच नाही बांधता येत. या माळेबाहेरच्या सुटय़ा गोष्टी बेसावध पकडून, घाला घालून मोठं करतात. ठीकच आहे. असं तर असं. ‘तुला सगळय़ा गोष्टी सावध करून सांगेन,’ असं कुठलंच वचन आयुष्यानं कधीच कुणाला दिल्याचं ऐकिवात नाही. मग भांडण आणि तक्रार तरी का बरं? तसं तर तसं.
मला माझ्यापुरता आधारस्तंभ हवासा वाटतो. मानावंसं वाटतं, कुणीतरी शक्ती पाहते आहे, कुणीतरी शक्ती हे करते आहे. अज्ञात असलं, दिसत नसलं तरी कुणीसं असेल असं वाटणं विश्वास देतं.
आणि आसपासची काही माणसंही विश्वास देतात. आत्ता, या घडीला एक कार्यक्रम आठवतो आहे, ज्याची सुरुवात पण एका भयंकर अगंम्यातून झाली. डॉ.  श्रीराम लागू आणि दीपा लागू यांचा मुलगा तन्वीर. डेक्कन क्वीननं मुंबईहून पुण्याला येत असताना खिडकीत बसला होता. तेव्हा गंमत म्हणून कुणीसा त्या ट्रेनवर दगड भिरकावला. तो नेमका त्या भरधाव गाडीतली नेमकी तन्वीरची खिडकी शोधून त्याच्या डोक्याला लागला. अवघ्या सोळा-सतरा वर्षांचा तन्वीर गेला. दीपा लागू आणि डॉ. श्रीराम लागू दरवर्षी तन्वीरच्या स्मृतिप्रीत्यर्थ ‘तन्वीर सन्मान’ प्रदान करतात. नाटय़क्षेत्रात धडपडून काही मनासारखं करू पाहणाऱ्या प्रामाणिक माणसाला आणि खूप काही करून ठेवलेल्या एका उत्तुंग व्यक्तिमत्त्वाला असे दोन पुरस्कार दिले जातात. या वर्षी हा पुरस्कार प्रदीप वैद्य आणि गिरीश कर्नाड यांना मिळाला. त्या वेळच्या भाषणात प्रदीप एक फार सुंदर वाक्य बोलला, ‘दीपा लागू आणि डॉक्टर लागूंनी आपल्या खोल दु:खाची सुगंधी फुलं केली आहेत आणि दरवर्षी या पुरस्कारांनी ती ओंजळभर फुलंच जणू ते वाटत आहेत.’ या ‘सुगंधी फुलां’मध्ये त्या वेडय़ावाकडय़ा खोल दु:खाला गोळा करणं आहे. आकार देणं आहे. वावटळीत वाहून न जाता आपणच आपल्याला सांभाळणं आहे. ते मला शिकायचं आहे. शिकायचंच आहे. त्यासाठी माझ्याकडे किती वेळ आहे मला माहीत नाही. माझ्या आयुष्याच्या वाटेवर पुढे काय आहे, माहीत नाही.
कालच एका कार्यक्रमासाठी रवींद्र नाटय़ मंदिरात गेले. मी त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करीत होते. कार्यक्रमाआधीच पोहोचले होते दोन तास. रंगमंचावर दिव्यांची योजना चालू होती. कार्यक्रमासंदर्भात त्याच्या दिग्दर्शिकेला काहीतरी विचारायला म्हणून मी रंगमंचाला जोडून असलेल्या पायऱ्यांनी प्रेक्षागृहातल्या खुच्र्यावर बसलेल्या तिच्या दिशेनं जात होते,  पायऱ्या उतरून होताच माझ्या मागे ‘दण्’ असा आवाज झाला. डोक्यात भुग्यासारखं काही उडालं. पाहिलं, तर मागे माझ्या काहीच इंच मागे एक सिमेंटचा तुकडा वेडावाकडा पडलेला. वर पाहिलं तर खूप उंच असलेल्या छताला एक वेडंवाकडं भगदाड. समोर पाहिलं तर माझी दिग्दर्शिका मटकन पायांतली शक्ती गेल्यासारखी खाली बसलेली. तिनं भीतीनं डोक्याला हात लावला. ‘वाचलीस!’ ती अस्फुट कसंबसं पुटपुटली. ‘एक पाऊल मागे असतीस तर..’ कुणीच काही बोललं नाही. एक विचित्र सन्नाटा काहीच क्षण राहिला. मग मीच एकदम विनोद करायला लागले. रवींद्रचे कर्मचारी घाबरून धावत आले. सांगायला लागले, ‘तो वरती बल्ब लावायला गेला ना कुणीतरी, तर तो सीलिंगचा तुकडाच निसटला.’ मी हसत म्हटलं, ‘अहो, याला काय अर्थ आहे? एका नटीला रंगमंचावरच..’ मला मध्येच तोडून तो कर्मचारी म्हणाला, ‘नाही, नाही  मॅडम, असं बोलू नका हो!’ मीही थांबले. लक्षात आलं, घाबरले आहे. थांबून त्या सिमेंटच्या वेडय़ावाकडय़ा तुकडय़ाकडे पाहिलं. मनातल्या मनात त्या तुकडय़ाला दंडवत घातला. एक क्षण उशिरा वरून पडल्याबद्दल. इथून पुढच्या प्रत्येक श्वासासाठी मी त्या तुकडय़ाची ऋणी असेन. त्या तुकडय़ाला वंदन करताना मनात कृतज्ञता आहे, जीवदानाची. पण भीतीही आहे पुढे असं जीवदान नाही मिळालं तर? याची. आत्ता वाचले, पुढे काय? पण या ‘पुढे काय’ला घाबरत राहिले तर दीर्घायुष्य जरी मिळालं तरी त्याला काही अर्थ नसेल. आयुष्य मला निरोपाची संधी देणार का नाही, मला माहीत नाही. कुणी अदृश्य शक्ती असेल, नसेल, तिला माझा तो निरोपक्षण माहीत असेल, नसेल.. पण त्यानं काय फरक पडतो. त्या निरोपक्षणाच्या आदल्या क्षणापर्यंतच्या प्रत्येक क्षणावर माझा हक्क आहे. त्या आदल्या क्षणापर्यंतचं पूर्ण देणं मी देईन. त्या प्रत्येक क्षणाचं मोल ठेवीन. तसंही जर माझ्या हातात ‘तेवढंच’ आहे तर त्या ‘तेवढंच’ला जोडून येणारी कटुता, हतबलता आज या निमित्तानं मी सोडते. ‘तेवढंच’ भरभरून आहे असं मानते.
 आनंद, निरोपाची संधी न मिळालेल्या तुझ्यासारख्या सर्वाच्या ‘जाण्याची’ भरभक्कम किंमत मोजून मी हा धडा शिकले. कालच्या रात्रीनंतरचा आजचा दिवस मी पाहात असताना आनंद, तू या जगात नाहीस, पण तू असताना तुझ्या शांत समजुतीनं, तू अनेक अगम्य गोष्टी समजावल्या आहेस. तुझ्या जाण्याभोवतालचं माझं आकांडतांडव शांत करायला तू शिकवलेला शांत समजूतदारपणाच सोबत करेल. करू दे.
 आपण तालीम केली आहे आनंद, मृत्यूपाशी न थिजता पुढे जाण्याची,  तुझ्याबरोबर ती करत असताना त्या तालमीनंतर तुझ्याच मृत्यूचा प्रसंग वाट पहातो आहे हे तेव्हा माहीत नव्हतं, कथेतल्या या भयंकर वळणाला मी तयार नव्हते, पण डेली सोप थांबवता येत नाही. तुझा मृत्यू स्वीकारून पुढे जाण्याचा प्रसंग माझी वाट पहातो आहे तो मला एकटीलाच सादर करायचा आहे, दररोज!

Development Plan, Navi Mumbai, Wetlands, Residential Complexes, Political Silence, flamingo, environment,
नवी मुंबई : पाणथळीच्या जागा निवासी संकुलांसाठी खुल्या करण्याचा निर्णय, पर्यावरणप्रेमींचा विरोध, नेत्यांचे सोईस्कर मौन
baramati mp supriya sule talk regarding anonymous letter on social media
निनावी पत्राबाबत माहिती नाही! सुप्रिया सुळे यांचे स्पष्टीकरण
nagpur university vc subhash chaudhari suspends by governor
लोकजागर : ‘चौधरी’ असण्याचा गुन्हा!
shubhangi galande bold decision of pregnancy happy single mother
मला आई व्हायचंय… म्हणणाऱ्या शुभांगी गलांडेच्या ‘या’ धाडसी निर्णयाचे सोशल मीडियावर कौतुक; पाहा…