scorecardresearch

Premium

दशकथा : खडतर, पण आशादायी!

हरियाणातील बलाली हे एक छोटंसं गाव. घरात कुस्तीची, पैलवानकीची परंपरा.

दशकथा : खडतर, पण आशादायी!

|| डॉ. नीता ताटके

२०१०-२०२० : क्रीडा

Akkalkot-BJP
अक्कलकोटमध्ये घालीन लोटांगण, करीन वंदन..!
hadpakya ganpati nagpur, maskarya ganpati nagpur, 236 yealr old history of hadpakya ganesh
उद्या हाडपक्या (मस्कऱ्या) गणपतीची प्रतिष्ठापना, काय आहे इतिहास?
south east asian ganesh ganpati
History and culture of Ganesh festival: भारताआधीच आग्नेय आशियातील देशांमध्ये गणपती लोकप्रिय का झाला? तिथे गणपती कसा पोहोचला?
ganesh dhup kandi
भक्तांनी गणेशाला अर्पण केलेल्या हार फुलांचा सुगंध घरांमध्ये दरवळणार! टेकडी गणेश मंदिर प्रशासनाची अनोखी युक्ती

१६-१७ फेब्रुवारी २०१९- दादरच्या शिवतीर्थावर उभारलेला भव्य वातानुकूलित शामियाना. त्यात रंगलेली मल्लखांबाची पहिली विश्व अजिंक्यपद स्पर्धा, देशी-विदेशी मल्लखांबपटूंची आणि त्यात सहभागी होत्या विविध १५ देशांतील स्त्रिया. आश्चर्य वाटलं ना? जगात सर्वाधिक वेगानं पसरणाऱ्या पारंपरिक खेळांमध्ये मल्लखांबाचं नाव आज अग्रक्रमानं घेतलं जातं. परंपरेनं ‘दोरीच्या मल्लखांबावर मुली’ आणि ‘पुरलेल्या मल्लखांबावर मुलगे’ असं रूढ समीकरण आहे; पण आता जगभरात मोठ्या प्रमाणात मुली-स्त्रिया पुरलेला मल्लखांब खेळू  लागल्या आहेत.

   या स्पर्धेत भरगच्च भरलेल्या प्रेक्षागृहानं परदेशी स्त्री खेळाडूंची अचंबित करणारी कामगिरी बघितली. पुरलेल्या मल्लखांबात सुवर्णपदक जिंकलं ते जपानच्या केईको टाकेमोटो हिनं, तर दुसऱ्या क्रमांकावर होती इटलीची डेलिया सिरुटी. अत्यंत कठीण, पण तेवढीच नजाकत, ताकद आणि लवचीकता यांचा अप्रतिम समन्वय असलेल्या या स्पर्धेतील तिसरं स्थान भारताला मिळालं. भारताची हिमानी परब तिसरी आली. या स्पर्धेतला पहिला संच दोरी मल्लखांबावर इराणच्या फॉयजे जलालीनं त्यांच्या देशाच्या रूढीनुसार, संपूर्ण अंग झाकलेले कपडे, डोक्यावरती स्कार्फ या वेशात सादर केला. दणकट शरीरयष्टी आणि मेहनतीच्या जोरावर पुरलेल्या मल्लखांबावर झापा व कठीण प्रकार सहज करणाऱ्या फॉयजेनं, शॉट्र्स घालून स्पर्धा खेळता येणार नसल्यानं पुरलेल्या मल्लखांबामध्ये भाग घेतला नव्हता, नाही तर या स्पर्धेतलं तिसरं पारितोषिक नक्की तिच्याकडे गेलं असतं. आजही आखाती देशातील बऱ्याच स्त्रिया जिथे वेशभूषेची बंधनं पाळणं शक्य आहे, अशाच खेळांना प्राधान्य देतात. ज्या स्त्रिया ही बंधनं पाळत नाहीत, त्यांच्यावर टीका होते, त्यांची कामगिरी दूरचित्रवाणीवरून दाखवली जात नाही. स्त्रियांना क्रीडा प्रकारांमधील सहभागात येणारी आव्हानं कशा प्रकारची असू शकतात, याची ही एक छोटीशी झलक.

हरियाणातील बलाली हे एक छोटंसं गाव. घरात कुस्तीची, पैलवानकीची परंपरा. महावीर सिंग फोगट यांना एकापाठोपाठ एक अशा चार मुलीच, भावालाही दोन मुलीच. फोगट यांनी या मुलींनाच कु स्तीचे धडे दिले. स्त्री भ्रूणहत्या, बालविवाह, स्त्री-पुरुषांमधील सामाजिक असमानता या पार्श्वभूमीवर गीता, बबिता,  संगीता, रितिका, विनेश आणि प्रियांका या सहा फोगट भगिनींचा बलाली ते आंतरराष्ट्रीय यश हा प्रवास सर्वांसाठीच आदर्श ठरावा. याच वाटेवर चालत साक्षी मलिकनं भारताला ऑलिंपिक पदक जिंकून दिलं आणि आता मात्र मुली मोठ्या प्रमाणात या खेळाकडे वळत आहेत.

Mangte Chungneijang Mary Kom असं भारदस्त नाव असलेली आपली बॉक्सर मेरी कोम.  मणिपूरच्या कांगाथई गावात गरीब शेतकऱ्यांच्या कुटुंबात जन्मलेली मेरी वडिलांच्या प्रोत्साहनानं बॉक्सिंगकडे वळली. तिचा विवाह झाला, बाळ झालं, तरीसुद्धा मेरीची घोडदौड थांबली नाही. ऑलिंपिक पदकविजेती मेरी ही सलग पहिल्या सात जागतिक अजिंक्यपद स्पर्धांमधील पदकविजेती खेळाडू आहे आणि एकूण आठ जागतिक स्पर्धा जिंकण्याचा तिचा विक्रम पुरुष व स्त्रियांमध्येही आज अबाधित आहे. पद्मविभूषण पुरस्कारविजेत्या या खेळाडूला राज्यसभेचंही सदस्यत्व राष्ट्रपतींकडून बहाल करण्यात आलं.

२०१८ मध्ये ‘फोर्बज्’नी पहिल्या १०० श्रीमंत खेळाडूंची जी यादी प्रसिद्ध केली, त्यातील सर्व खेळाडू पुरुषच होते. २०१७ मध्ये या यादीत

५६ व्या स्थानावर असलेली एकमेव स्त्री खेळाडू सेरेना विल्यम्स २०१८ मध्ये या यादीच्या बाहेर फेकली गेली होती. गेल्या दहा वर्षांत व्यावसायिक खेळांमध्ये मिळणारं मानधन, रोख पारितोषिकं यांमध्ये पुरुष आणि स्त्रिया यांच्यामधली तफावत कमी झालेली आढळून आली असली, तरी आजही विविध उद्योग/ कंपन्या ‘ब्रँडिंग’साठी पुरुष खेळाडूंनाच प्राधान्य देतात. त्यांच्या मानधनाची रक्कमही घसघशीत असते. विविध माध्यमं पुरुष खेळाडूंना जास्त प्रसिद्धी देतात. अर्थात यामागचं कारणही सामाजिक-आर्थिक आहे. अगदी टेनिस, क्रिकेट असो वा बास्केटबॉल, जलतरण असो वा अ‍ॅथलेटिक्सच्या स्पर्धा असोत, प्रेक्षकांची पसंती मिळते ती पुरुष खेळाडूंनाच. यामुळेच त्यांच्या स्पर्धांना जास्त प्रायोजक मिळतात आणि खेळाडूंचं विक्रीमूल्य वाढतं. हे दुष्टचक्र भेदणं अजून तरी स्त्रियांना शक्य झालेलं नाही. अर्थात यालाही काही सन्माननीय अपवाद आहेत. यातला एक अपवाद आपल्या भारतीयांची मान उंचावणारा आहे आणि ते नाव आहे धावपटू

हिमा दास हिचं. आसाममधल्या ढिंग गावात भाताची शेती करणाऱ्या कुटुंबात जन्म घेतलेली हिमा शेताच्या बाजूला असलेल्या मोकळ्या जागेत बेभानपणे फुटबॉल खेळत असे. तिचं कौशल्य ओळखलं निपोन दास या क्रीडा प्रशिक्षकांनी. त्यांनी तिला गुवाहाटीला जाण्याचा सल्ला दिला. तिथे तिच्या कौशल्याला आणि इच्छाशक्तीला, योग्य आहार व प्रशिक्षणाची जोड मिळाली आणि हेमाची ‘ढिंग एक्स्प्रेस’ सुसाट धावू लागली. जागतिक अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी पहिली भारतीय  खेळाडू हिमा सुरुवातीला अनवाणी धावत असे. या अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूला ‘आदिदास’नं आपली ‘ब्रँड अ‍ॅम्बॅसडर’ के लं आणि तिच्यासाठी खास बूट बनवून त्यावर ‘हिमा दास’ ही अक्षरं लिहिली. आसाम सरकारनं तिला ‘डेप्युटी सुप्रिन्टेंडंट ऑफ पोलीस’ ही नोकरीही दिली.

 अशाच वेगळ्या वाटेवर चालत बॅडमिंटनपटू पी. व्ही. सिंधू ऑलिम्पिकमधली रौप्यपदक विजेती आणि यंदा कांस्यविजेती ठरली. जिम्नॅस्ट दीपा कर्माकरचं ऑलिम्पिक पदक थोडक्यात हुकलं, मात्र चतुर्थ स्थानाची तिची कामगिरी भारतीय जिम्नॅस्टिक खेळाडूंसाठी देदीप्यमान ठरली. अशा अनेक खेळाडूंना जी प्रसिद्धी मिळाली त्याइतकं लक्ष वेधून घेणारं यश जरी मिळालं नसलं, तरी खेळाची पारंपरिक मानसिकता मोडून ‘स्क्वॉश’ या खेळामध्ये भारताचा झेंडा फडकवणारी दीपिका पल्लिकल, धनुर्विद्येमध्ये जागतिक क्रमवारीत पहिला क्रमांक पटकावण्याचा विक्रम के लेली रांचीच्या एका रिक्षा ड्रायव्हरची मुलगी                दीपिका कुमारी यांचं यश असंच अफाट आहे. टेनिसमध्ये भारताचं नाव उंचावणारी सानिया मिर्झा, बॅडमिंटनमध्ये जगात भारतातून प्रथमच क्रमांक १ चं स्थान पटकावणारी सायना नेहवाल हे आज जरी अपवाद दिसत असले, तरी पुढील पिढीसाठी त्यांनी एक राजमार्ग उघडण्याचं मोठं काम केलं आहे. अर्थात हे सर्व स्पर्धात्मक खेळाबद्दल आणि त्यातील यशाबद्दल. आज वृत्तपत्र उघडलं, की भारतीय तसंच परदेशी स्त्री खेळाडूंच्या चमकदार कामगिरीविषयी वाचताना त्यांचा खडतर असलेला प्रवासही लक्षात घ्यायला हवा.

मात्र या विविध माध्यमांमध्ये बऱ्याच वेळेला असंही आढळून येतं की, पुरुष खेळाडूंच्या खेळातल्या कामगिरीची, कौशल्यांची चर्चा होते आणि दुर्दैवानं स्त्री खेळाडूंबाबत अधिक चर्चा होते ती त्यांच्या दिसण्याची, फॅशनची. इथेही ती ‘प्रथम स्त्री, मग खेळाडू’ असं अधोरेखित केलं जातं, ती ‘स्त्री’ असण्याची चर्चा जास्त होते. ‘अर्जुन पुरस्कार’, ‘खेलरत्न पुरस्कार’ यांबरोबरच ‘पद्मश्री’ व ‘पद्मभूषण’ या अत्युच्च मानाच्या पुरस्कारांनी गौरव झालेली, अत्यंत स्पृहणीय क्रीडा कामगिरी करणारी सानिया मिर्झा ‘मोस्ट सर्चड् फीमेल स्पोट्र्सपर्सन’ तेव्हा ठरली, जेव्हा ती शोएब मलिक या पाकिस्तानच्या क्रिकेटपटूशी विवाह करणार असल्याची बातमी आली तेव्हा. स्त्री खेळाडूंच्या कौशल्याकडे बघण्याची मानसिकता घडवणं हे एक खूप मोठं आव्हान आपल्यासमोर आहे.

स्पर्धात्मक खेळांमध्ये खेळाडूंबरोबरच खेळाचे जे इतर घटक असतात- पंच, प्रशिक्षक, संघटक, यामध्येही अगदी संस्थापातळीपासून आंतरराष्ट्रीय क्रीडा संघटना, ऑलिंपिक संघटना, यांवर स्त्रियांचं प्रतिनिधित्व कमी आहे. भारताच्या नवीन राष्ट्रीय क्रीडाधोरणानुसार खेळांच्या संघटनांमध्ये स्त्रियांचं प्रतिनिधित्व असणं अनिवार्य आहे. त्यामुळे आता खेळांच्या संघटनांमध्ये थोड्याफार प्रमाणात जरी स्त्रिया दिसत असल्या, तरी बारा-पंधरा सदस्यांमध्ये एखाददुसरी स्त्री फारसा प्रभाव पाडू शकेल, ‘स्त्रीधार्जिणे’ निर्णय घेऊ शकेल, हे अवघड आहे. संघटनांच्या सभा, प्रशिक्षक, पंच, संघटक या स्पर्धात्मक किंवा इतरही जबाबदाऱ्या पार पाडताना, सहजपणे घराबाहेर पडू शकणारा पुरुष आणि त्या तुलनेनं घर-संसार-मुलाबाळांच्या संगोपनाच्या जबाबदारीमुळे विविध ठिकाणी होणाऱ्या या उपक्रमांना स्त्रियांची उपस्थिती हीदेखील अडचणीची बाब ठरू शकते.

मात्र इतक्या अडचणी असूनसुद्धा विसाव्या शतकात खेळाडू स्त्रियांनी घेतलेली भरारी अचंबित करणारी आहे. तुरळक संख्येनं का होईना, खेळाच्या इतर क्षेत्रांतही स्त्रिया दिसू लागल्या आहेत. भारतीय ऑलिंपिक संघातील संभाव्य खेळाडूंबरोबर काम करणारी क्रीडामानसतज्ज्ञ मुग्धा बावरे, खेळाडूंबरोबरच प्रशिक्षक, पालक यांच्या मानसिकतेचा अभ्यास करणारी वरदायनी गोºहे, विविध खेळांतील खेळाडूंच्या आहाराच्या गरजांबाबत पालक, प्रशिक्षक, खेळाडू आणि संघटक यांच्यासाठी अभ्यासपूर्ण विवेचन करणारी अपूर्वा सुर्वे अशी विविध नावं आता पुढे येऊ लागली आहेत.

 मात्र स्पर्धात्मक खेळांमध्ये स्त्रियांचा सहभाग वाढवायचा असेल, तर आज खरोखर गरज आहे ती मुलींचा एकूणच व्यायाम, खेळ, क्रीडांगणामधील सहभाग वाढवण्याची. खेळ खेळणाऱ्या, खेळांमध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या मुलींना, त्यांच्या पालकांना समाजातील एका मोठ्या वर्गाला तोंड द्यावं लागतं. त्यात त्यांचे नातेवाईक, मित्रमंडळी असतात आणि हा दबाव जे पालक घेऊ शकतात, त्याच कु टुंबांमधील मुली खेळांमध्ये पुढे जाण्याची शक्यता वाढते. निसर्गामुळे येणारी बंधनं, थोड्या मोठ्या वयात येणाऱ्या जबाबदाऱ्या, विवाह, बाळंतपणं, या सगळ्यात जोडीदार, कुटुंब, दोन्ही घरची माणसं भक्कम साथ देणारी असतील, तरच आधी खेळाडू आणि नंतर पंच, प्रशिक्षक, संघटक या जबाबदाऱ्या घेणं स्त्रियांना शक्य होईल. समाजाच्या मानसिकतेत जेव्हा मोठा बदल घडेल, प्रवास, स्पर्धा, सोयीसुविधा यांमध्ये स्त्रियांचा, त्यांच्या सुरक्षिततेचा, त्यांच्या ‘प्रायव्हसी’चा योग्य विचार केला जाईल, तेव्हा मुलींना, स्त्रियांना खेळाकडे जास्त वळावंसं वाटेल.

नुकतीच रितिका फोगट हिनं खेळातील पराभवामुळे आत्महत्या के ल्याची बातमी आली. खेळ हे माध्यम नकारात्मक भावनांचा निचरा करायला मदत करतं, यशापयश पचवायला शिकवतं, या गृहीतकाला धक्का देणारी ही आत्महत्या! ‘खेळातून फक्त यशच’ ही मानसिकता तयार होते आहे, की खेळाचे सर्वांगीण फायदे लोकांपर्यंत पोहोचत आहेत, याचाही विचार करण्याची वेळ आली आहे. 

आरोग्यासाठी व्यायाम, खेळ, क्रीडा यांचा सहभाग आवश्यक आहे आणि सामाजिक उतरंडीवर दुय्यम स्थान असलेली स्त्री व्यायाम, खेळ, क्रीडा या माध्यमांतून सक्षम बनेल. यातून खेळाचा पाया विस्तृत होईल आणि मोठ्या प्रमाणावर, सहजपणे स्त्रिया स्पर्धात्मक, आरोग्यात्मक खेळांत, प्रात्यक्षिकात्मक शारीरिक शिक्षणामध्ये दिसतील, हा आशावाद!

neeta.tatke@ruparel.edu

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Dashkatha author neeta tatke article tough but hopeful akp

First published on: 02-10-2021 at 00:06 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×