निरंजन मेढेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘डेटिंग अ‍ॅप’ या संकल्पनेबाबत ‘मुक्त शरीरसंबंधांसाठीची सोय’ या मतापासून जिथे ‘सेटल’ व्हायला वेळच नाही, अशा आयुष्यात प्रेमाचे काही बंधमुक्त क्षण मिळवण्याची संधी, इथपर्यंतची वेगवेगळी मतं ऐकायला मिळतात. या अ‍ॅप्सचे बहुसंख्य वापरकर्ते एक मात्र सांगतात, की लग्न आणि पारंपरिक चौकटीतली दीर्घकालीन रिलेशनशिप याची त्यांना अडचण वाटतेय. विविध प्रकारच्या रिलेशनशिप्ससाठीचं व्यासपीठ असलेलं आणि सोईबरोबर अनेक प्रश्नही उपस्थित करणारं डेटिंग अ‍ॅप्सचं वास्तव आणि मराठी तरुणाई या जगाकडे कसं बघते हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न..

‘ती’ आज एकदम खुशीत होती, कारण आज तिची ‘डेट’ होती! तिनं ‘राइट स्वाइप’ केलेला पोट्टा तिच्या दृष्टीनं अगदी परफेक्ट मॅच होता. त्यामुळे कधी एकदा त्याला भेटतेय असं तिला झालेलं. पहिल्यांदा प्रेमात पडल्यावर वाटते तशी विचित्र हुरहुर लागून राहिलेली तिच्या जिवाला. त्यांनी ठरवलेल्या रेस्टॉरंटच्या बाहेर ती पोहोचली. तो आत बसला असेल, असा विचार करत ती आत गेली. तिचा अंदाज खरा ठरला. त्यांची नजरानजर झाली, तिच्या काळजाचा ठोका चुकला; पण.. काही क्षणांतच काही तरी बिनसलं. त्याच्या नजरेतली ओळख पुसली गेली. ती त्याच्या समोरच्या खुर्चीत बसल्यावर तर तिच्याकडे बघणंही तो टाळायला लागला. शेवटी असह्य होऊन तिनं विचारलंच, ‘‘नेमकं काय बिनसलंय?’’ त्यावर तो थंडपणे एकच वाक्य म्हणाला, ‘‘ ‘टिंडर’वर तू जो फोटो टाकलायस तशी तू नाहीयेस. मला तू बारीक असशील असं वाटलेलं.’’ त्याच्या त्या वाक्यानं तिचा संताप झाला. तिचे डाएट प्लॅन्स, आजच्या डेटसाठी ऑनलाइन मागवलेली स्किन टाइट जीन्स, मेकअपसाठीची धडपड, सगळं काही तिच्या नजरेसमोरून तरळून गेलं. ‘फ’वरून सुरू होणारी शिवी त्याला हासडत ती बाहेर पडली तेव्हा तिच्या डोळय़ांतल्या अश्रूंबरोबर रोमँटिक डेटची तिची स्वप्नंही वाहून चालली होती!

स्टीव्हन जॉन टेट लिखित ‘टिंडर : अ स्टोरी ऑफ शेम अँड हर्ट’ या लघुकथेचं हे  कथानक! ‘टिंडर’वरून ब्लाइंड डेटवर भेटलेल्या जोडप्याची एकमेकांबद्दल झालेली घोर निराशा विशद करणारं; पण कितीही वास्तवदर्शी असली तरी शेवटी ही कथा आहे. त्यामुळेच २०१२ मध्ये ‘टिंडर’ या मोबाइल अ‍ॅपचा जन्म झाल्यावर गेल्या अकरा वर्षांत काहीच्या काहीच विस्तारलेलं डेटिंग अ‍ॅप्सचं अतरंगी विश्व नेमकं कसं आहे आणि मराठी तरुणाई या जगाकडे कसं बघते हे जाणून घेण्याचा हा प्रयत्न.

‘टिंडर’ या अ‍ॅपची सेवा जगभरात १९० देशांमध्ये उपलब्ध असून, आजवर ५३ कोटी वेळा ते ‘डाऊनलोड’ करण्यात आलं आहे. वापरकर्त्यांपैकी अर्ध्याहून अधिक सदस्य हे १८ ते २५ या वयोगटातले आहेत. ‘टिंडर’च्या ‘इयर इन स्वाइप २०२२’च्या अहवालानुसार ‘सिच्युएशनशिप’ या प्रकाराला तरुणाईकडून सध्या वाढती पसंती मिळत आहे. शय्यासोबतीपुरतं भेटण्यापेक्षा (अर्थात hook up) जास्त, पण म्हणून दीर्घकाळ सोबतीचा वायदा नसलेलं असं हे अनोखं ‘नातं’ असतं.

सिच्युएशनशिपविषयी बोलताना ‘बंबल’ या डेटिंग अ‍ॅपवर सक्रिय असलेली तिशीची पूजा सांगत होती, ‘‘समजा, तुम्ही नोकरीसाठी एखाद्या शहरात आलाय. दोनेक वर्ष तुम्ही वास्तव्यास असणार आहात. नोकरीमुळे फारसा    वेळ नाहीये, पण तरी सोबतीची, प्रेमाची गरज वाटतेय. घरचे कर्मठ असल्यानं तुम्ही निवडलेल्या मुलाला ते पसंती देणार नाहीत हेदेखील तुम्हाला माहितीय. अशा वेळी मग तुम्ही दोन वर्षांसाठी ‘सिच्युएशनशिप’मध्ये पडण्याचा विचार करू शकता. म्हटलं तर काहीच पाश नाहीत आणि दुसरीकडे या इतक्या काळासाठी आयुष्य मनसोक्त जगून घ्यायचं!’’ अर्थात ही आहे आजच्या तरुण पिढीची जगण्याबद्दलची व्याख्या.

लग्न ठरवताना मुलाचं शिक्षण, त्याचा पगार, घरचे कसे आहेत, स्थावर-जंगम मालमत्ता आहे का, हे पाहिलं जातं; पण आयुष्यभराचा जोडीदार म्हणून तो कसा आहे, त्याचा स्वभाव, त्याच्या आयुष्य जगण्याच्या चालीरीती हे तपासायला वाव नसतो. तो पैस डेटिंग अ‍ॅपवर मिळतो, असं सांगत पूजा म्हणते, ‘‘विवाह नोंदणी कार्यालयांपेक्षा जास्त पारदर्शकता मला डेटिंग अ‍ॅपवर पाहायला मिळते. पोटात एक आणि ओठावर दुसरं असं इथलं वागणं नसतं. तुम्हाला तात्पुरतं अफेअर करायला कुणी हवंय, की दीर्घकाळ नात्याच्या शोधात तुम्ही आहात, याबद्दल इथे लोकं अगदी ‘क्लिअर’ असतात. मला विचारांची ही स्पष्टता भावते.’’

डेटिंग अ‍ॅप्सच्या झपाटय़ानं वाढत्या बाजारपेठेत बहुराष्ट्रीय कंपन्यांची अ‍ॅप्स आहेत, तशीच अनेक भारतीय अ‍ॅप्सही आज आघाडीवर आहेत. अडीच कोटी युझर्स असलेल्या ‘क्वॅक क्वॅक’ या भारतीय डेटिंग अ‍ॅपच्या पाहणीनुसार १८ ते २२ वयोगटातली तरुणाई मैत्रीच्या शोधात अ‍ॅपवर येते. २३ ते ३० वयोगटातल्या लोकांना तात्पुरती किंवा दीर्घकाळ सोबत हवी असते, तर तिशीच्या पुढच्या सदस्यांना आयुष्यभराचा जोडीदार हवा असतो. कोणताही पूर्वग्रह न ठेवता ‘हुक अप्स’पासून आणि समलैंगिक नातेसंबंधांपासून ते लग्नाच्या जोडीदारापर्यंत असे सर्व प्रकारचे पर्याय अ‍ॅपवर सदस्यांना मिळतात, असा त्यांचा दावा आहे.

‘क्वॅक क्वॅक’ अ‍ॅपचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी रवी मित्तल म्हणतात, ‘‘देशभरातल्या वेगवेगळय़ा वयोगटांतल्या लोकांना एका प्लॅटफॉर्मवर आणण्यात डेटिंग अ‍ॅप्स यशस्वी ठरली आहेत. अद्ययावत तंत्रज्ञानाच्या मदतीमुळे सुरक्षिततेसंबंधीचे धोके कमी झाले आहेत. अ‍ॅपवरील सदस्य त्यांच्या मर्जीनुसार जोडीदार निवडीचे निकष ठरवून त्यानुसार शोध घेऊ शकतात. निवडीचं स्वातंत्र्य असल्यानं आणि तसे सर्च देता येत असल्यानं नकार मिळण्याचे किंवा विसंवाद होण्याचे प्रसंग कमी होत आहेत.’’

‘डेटिंग’ ही संकल्पना पाश्चात्त्य देशांत पुरती रुळलेली असली, तरी आपल्याकडे हा विषय अजूनही काहीसा अनाकलनीय आहे. अगदी खासगी गप्पांतही ‘डेटिंग अ‍ॅप्स म्हणजे स्वैर शरीरसंबंधांसाठी झालेली सोय’ म्हणूनच त्यांचा उल्लेख केला जातो; पण खरंच असं असतं का?.. याविषयी बोलताना पंचविशीची झेलम सांगते, ‘‘प्रत्येक डेटची परिणती काही शरीरसंबंधांत होत नाही. तसं खरं तर अपेक्षितही नसतं.’’ अर्थात मुक्त लैंगिकता हे वरवर पाहता डेटिंग अ‍ॅप्समुळे मिळालेलं वरदान वाटत असलं, तरी त्याबरोबर नको असलेली गर्भधारणा किंवा लैंगिक आजारांचा धोकाही येतोच. ‘हिंज’ या डेटिंग अ‍ॅपच्या माध्यमातून आत्तापर्यंत वीसेक मुलांना डेट केलेली झेलम यासंबंधी सांगते, ‘‘माझे आईवडील दोघंही डॉक्टर आहेत. बाबा तर स्त्रीरोगतज्ज्ञ आहेत. त्यामुळे शरीरसंबंधांद्वारे संसर्ग होऊ शकणाऱ्या आजारांबाबत मला आधीपासून माहिती होतीच आणि त्याविषयी मी विशेष जागरूक असते. असुरक्षित शरीरसंबंध ठेवायचे नाहीत, हा नियम मी कटाक्षानं पाळते. तसंच वर्षांतून एकदा वेगवेगळय़ा बारा ते पंधरा लैंगिक आजारांची छाननी करणारी रक्त तपासणी मी आवर्जून करतेच.’’

घटस्फोटित-विधवा व्यक्तींना सेकंड इिनग सुरू करता यावी, यासाठी ‘रीकिंडल’ हे अ‍ॅप आहे, तर समलैंगिक व्यक्तींसाठी म्हणून २०२० मध्ये सुरू झालेल्या ‘अ‍ॅज यू आर’ या भारतीय डेटिंग अ‍ॅपलाही उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या अ‍ॅपला अडीच लाख डॉलर्सचं फंडिंगही मिळालं आहे. ‘अ‍ॅज यू आर’च्या संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी सोनाली अगरवाल म्हणतात, ‘‘समलैंगिक व्यक्तींसाठी या स्वरूपाचं डेटिंग अ‍ॅप सुरू करणं सोपं नव्हतं, कारण मुळात याविषयीची जनजागृतीच कमी आहे. ‘टिंडर’ किंवा बाकी अ‍ॅप्सवर फास्ट डेटिंगचा ट्रेंड असला, तरी आमचा उद्देश हा ‘मॅचमेकिंग’चा- म्हणजेच उत्तम जोडीदार मिळवून द्यायचा आहे. डेटिंग अ‍ॅप्स आपल्याकडे अजूनही नवीन असल्यानं अजूनही अनेकांच्या मनात शंका आहेत. त्यामुळे आम्ही ऑफलाइन सुविधाही पुरवतो.’’

सोशल मीडिया अ‍ॅप्स आणि डेटिंग अ‍ॅप्समधला मुख्य फरक म्हणजे सोशल मीडियावर लोकांनी जास्तीत जास्त वेळ घालवावा हे त्या कंपन्यांचं प्रयोजन असतं, तर डेटिंग अ‍ॅपवर भेटलेल्या जोडप्यांनी केवळ चॅटिंग न करता गोष्टी पुढे नेत प्रत्यक्ष भेटावं, असा त्यांचा प्रयत्न असतो. त्यामुळे कोणतंही डेटिंग अ‍ॅप डाऊनलोड केल्यावर तुम्ही ज्या शहरात आहात, त्या शहरातले किंवा तुमच्या आसपासच्या परिसरांतले संभाव्य जोडीदार तुम्हाला दाखवले जातात. यात कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरेपूर वापर केला जातो.

कामाच्या निमित्तानं मुंबई, पुणे आणि नाशिक अशी भटकंती करत असलेला पंचविशीचा सुमेधकुमार सांगतो, ‘‘मी ‘ओके क्यूपिड’ हे अ‍ॅप वापरायचो. यामध्ये एक चांगली सोय अशी आहे, की तुम्ही पन्नासएक प्रश्नांचा मोठा फॉर्म भरत तुमच्या आवडीनिवडी अगदी स्पष्टपणे मांडू शकता. त्यानुसारच तुम्हाला मॅच सुचवले जातात. बाकी अनेक अ‍ॅप्सवर केवळ तुम्ही कसे दिसता किंवा तुम्ही नेमका तुमचा कुठला फोटो अपलोड केलाय यावरच तुम्हाला कुणी निवडणार की नाही हे ठरत असतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे एखादं प्रोफाइल मॅच झाल्यावरही पहिल्या दोन-तीन चॅटमध्येच गाडी पुढे सरकणार की नाही हे ठरतं. बहुतेक मराठी मुलं इथेच ढेपाळतात. ‘हाऊ आर यू’ला तुम्ही ‘आय एम फाइन’ म्हणालात की विषयच कट होऊन जातो!’’

भाषिक आणि सांस्कृतिक अडचणींवर मात करूनही प्रत्यक्ष डेट्स होतात का, यावर बोलताना सुमेधकुमार म्हणतो, ‘‘डेट्स होतात; पण मोबाइलवर चॅट करताना ‘कूल’ वाटलेली मुलगी प्रत्यक्ष डेटच्या वेळी बोअर वाटू शकते. बऱ्याचदा जे एकटे असतात, ते कुणाची कंपनी मिळेल या आशेनंही डेटिंग अ‍ॅप्सवर आलेले असतात. काही लोकांचं वागणं खटकू शकतं. अशा डेट्समध्ये तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्ही विनाकारण खर्च होऊ शकते. बाकी ९० टक्के मुलगे हे गर्लफ्रेंड मिळेल या आशेनं नाही, तर ‘हुक अप्स’साठी (रिलेशनशिपची कटकट नसलेल्या शरीरसंबंधांसाठी) डेटिंग अ‍ॅप्सवर आलेली असतात. लाँग टर्म रिलेशनशिप, आयुष्यभराचा जोडीदार मिळेल एवढी मोठी स्वप्नंच नसतात कुणाची! आपण राइट स्वाइप केलेल्या मुलीनं आपल्याला राइट स्वाइप करावं आणि काहीही करून तिचा मोबाइल नंबर मिळावा, हाच मुख्य उद्देश असतो!’’

डेटिंग अ‍ॅप्समुळे नैतिकतेला तडे जातील का, तसंच विवाहसंस्था मोडीत निघेल का, असे प्रश्नही उपस्थित केले जातात. हे समज काहीसे खरे ठरतील, असे निष्कर्ष ‘बंबल’ या डेटिंग अ‍ॅपनं अलीकडे केलेल्या सर्वेक्षणातून पुढे आले आहेत. यानुसार भारतामध्ये ‘एथिकल सेक्सप्लोरेशन’ हा नवीन डेटिंग ट्रेंड दिसून आला आहे. या सर्वेक्षणात सहभागी दोन हजार भारतीय अविवाहितांपैकी ६१ टक्के जणांनी ‘एथिकल नॉन-मोनोगामी’ला (अर्थात- मुक्त नातेसंबंध, पॉलीगामी) पसंती दिली, तर ५४ टक्के जणांना लैंगिक गरजा आणि अपेक्षांबद्दल नात्यात मोकळेपणानं चर्चा व्हायला हवी असं वाटत असल्याचं दिसून आलं. जे पूर्ण विचारांती आणि जबाबदारीनं मुक्त नातेसंबंधांचा (अर्थात एकाहून अधिक व्यक्तींशी परस्परसंमतीनं संबंध ठेवणं.) स्वीकार करतात, त्यांना यामध्ये ‘एथिकल नॉन मोनोगामस’ किंवा ‘कन्सेन्शुअली नॉन-मोनोगामस’ असं म्हणण्यात आलं आहे.

‘बंबल इंडिया’च्या रिलेशनशिप एक्सपर्ट शाहझीन शिवदसानी म्हणतात, ‘‘मुक्त नातेसंबंधांकडे कलंक (taboo) म्हणून पाहिलं जात असलं, तरी मिलेनियल्स आणि ‘जनरेशन झी’मध्ये (नव्वदच्या दशकाच्या शेवटी व नंतर जन्मलेले लोक) या स्वरूपाच्या मोकळय़ा नातेसंबंधांना म्हणजेच एथिकल नॉन मोनोगामीला अधिक पसंती मिळत आहे. बाकी नातं कुठलंही असलं, तरी ते टिकवण्यासाठी प्रयत्न हे करावेच लागतात. एकमेकांप्रति असलेला आदर आणि भावनिक जवळीक महत्त्वाची ठरते, हेही समजून घ्यायला हवं.’’

‘आजच्या पिढीला कसली जबाबदारी म्हणून नकोय,’ असा एक सरसकट आरोप केला जातो. या आरोपाशी दोन हात करताना झेलम म्हणते, ‘‘हा प्रश्न फक्त नातेसंबंधांचा किंवा लग्नापुरता नाहीये. आमची पिढी जितकी आर्थिक असुरक्षितता बघतेय तितकी या आधीच्या पिढीच्या वाटय़ाला आलेली नव्हती; पण त्याच वेळी आज सगळेच ‘फ्रीलान्सर’ किंवा ‘काँट्रॅक्ट’वर काम करणारे आहेत. हातातला प्रोजेक्ट संपल्यावर तुम्ही रस्त्यावर येऊ शकता याची रास्त जाणीव प्रत्येकाला आहे. एरवी वयाच्या पन्नाशीतही जे अनुभव गाठीशी आले नसते, ते मी पंचविशी-तिशीत अनुभवतेय. आम्ही जणू अख्खं आयुष्य बॅकपॅकमध्ये घालून फिरतोय! त्यामुळे लग्न करून संसारात सेटलबिटल होणं थोडं अवघड जातंय.’’

लग्नाचा मुद्दा आणखी उलगडताना ती म्हणते, ‘‘आईबाबा म्हणतात, की डेटिंग अ‍ॅप्सवर मुलं बघतेस आणि त्यांना डेटवर भेटतेस, तसंच मॅरेज ब्यूरोमध्ये नाव नोंदवून कर; पण हे तितकं सोपं नाहीये. मला दुसऱ्या अनोळखी माणसाबरोबर असण्याची भीती नाही वाटत, पण चुकीच्या माणसाबरोबर आयुष्यभरासाठी अडकण्याची निश्चित भीती वाटते.’’

डेटिंग अ‍ॅप्सला तरुणाईची वाढती पसंती मिळत असल्याचं वेगवेगळय़ा अ‍ॅप्सची देशव्यापी आकडेवारी सांगत असली, तरी त्यावर नसणाऱ्यांचं प्रमाणसुद्धा अर्थातच मोठं आहे. पंचविशीची ज्ञानेश्वरी सांगते, ‘‘मी आजवर कधीच कुठलं डेटिंग अ‍ॅप वापरलं नाहीये, कारण मी रिलेशनशिपसाठी ओपन आहे, हे कुठल्या अ‍ॅपवर जगजाहीर करावंसं कधी वाटलं नाही. माझ्या बाकी मित्रमैत्रिणींकडे बघितलं की त्यामुळे मला मी ‘ओल्ड स्कूल’वाली वाटते. मी इन्स्टाग्रामवर अ‍ॅक्टिव्ह आहे आणि माझ्या मते तिथेही तुम्हाला खूप चांगले लोक भेटू शकतात. इन्स्टा हे काही डेटिंग अ‍ॅप नसलं, तरी तुम्ही ‘शेअर’ केलेल्या एखाद्या स्टोरीवरून, पोस्टवरून कुणाबरोबर तरी उत्तम संवादाची सुरूवात होऊ शकते. ठरवून कुणाला गाठण्यापेक्षा नकळत कुणी भेटलेलं कधीही चांगलं!’’

डेटिंग अ‍ॅप्सला कडकडून विरोध करताना विशीची मित्रा सांगते, ‘‘व्यक्तिश: मला डेटिंग अ‍ॅप्सवर कधीच विश्वास ठेवावासा वाटला नाही. ही सगळी पद्धतच ओढूनताणून आणि आपण रिलेशनशिपमध्ये असायलाच हवं, या दबावातूनही तयार झालेली आहे असं मला वाटतं. माझ्या मित्रवर्तुळातले अनेक जण या अ‍ॅप्सवर सक्रिय असले, तरी तेही त्याकडे फार गांभीर्यानं बघतात असं झालेलं नाही. अ‍ॅपवरून जुळलेलं कोणतंच जोडपं माझ्या तरी माहितीत नाही. आपल्याला कसा जोडीदार हवा, याच्या आदर्श आणि अवास्तव कल्पना असल्यामुळे कोणत्याच एका व्यक्तीबाबत ठाम व्हायला कचरणारे अनेक जण आहेत. काही भांडणं-ब्रेकअप्स ही ‘रिलेशनशिपमध्ये असूनही याच्या/हिच्या फोनवर डेटिंग अ‍ॅप आहे’ या कारणावरून झालेली मी पाहिली आहेत. आणि दुसरीकडे काही जण असेही मी पाहिलेत, की शारीरिक जवळीक झाल्यानं सवय लागली आणि आता फार विचार वगैरे न करता त्यालाच प्रेम मानून एकत्र राहात आहेत.’’

तरुणाईमधल्या वाढत्या इंटरनेट व्यसनाधीनतेत डेटिंग अ‍ॅप्सचाही वाटा आहे का, याविषयी बोलताना ‘मुक्तांगण व्यसमनुक्ती केंद्रा’च्या संचालक मुक्ता पुणतांबेकर सांगतात, ‘‘केवळ डेटिंग अ‍ॅप्सचं व्यसन आहे अशी प्रकरणं अजून येत नसली, तरी एकूण इंटरनेट व्यसनाधीनतेमध्ये त्याचाही समावेश अलीकडे पाहायला मिळतो. पूर्वी प्रेमाचा पाया हा मैत्री असायचा. डेटिंग अ‍ॅप्समुळे हा पायाच गायब झाला आहे, असं मला वाटतं.’’

या विषयाची तयारी करताना श्रेया रॉयचौधरी लिखित ‘टिंडर डायरीज’ हा कथासंग्रह वाचण्यात आला. या पुस्तकाचं वैशिष्टय़ म्हणजे दिल्ली परिसरात घडणाऱ्या यातल्या एकाही गोष्टीला सुखांत नाही. शेवटी डेटिंग अ‍ॅप्सकडे बघण्याचा ज्याचा त्याचा दृष्टिकोन असला, तरी ही एक प्रचंड मोठी आणि झपाटय़ानं विस्तारणारी बाजारपेठ आहे हेदेखील समजून घ्यायला हवं. आकडेवारीत सांगायचं झालं, तर ‘बिझनेस स्टँडर्ड’मध्ये गेल्या महिन्यात प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार २०२२ मध्ये भारतीयांनी १० दशलक्ष डॉलर्स (अंदाजे ८२,६२,७५,००० रुपये) डेटिंग अ‍ॅप्सवर खर्च केले आहेत.

थोडक्यात, डेटिंग अ‍ॅप्स हा एकाच वेळी पैशांचा, भावनांचा आणि नात्यांच्या गुंत्याचाही विषय आहे. मोबाइलमध्ये एक अ‍ॅप घेण्यापुरता तो किरकोळ नक्कीच नाही. हा विषय खूप खूप खोल आहे..!

(लेखातील काही नावे बदलली आहेत.)

मराठीतील सर्व चतुरंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dating apps a platform for relationships youth chaturang article ysh
First published on: 20-05-2023 at 00:08 IST