शुभदा चंद्रचूड
दरवर्षी डिसेंबर महिना उजाडला की, स्थलांतरित पक्ष्यांप्रमाणे स्थलांतरित मुलांचे थवे मायदेशी परतू लागतात आणि त्यांच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहणाऱ्या त्यांच्या पालकांची आपल्या परदेशस्थ मुलांचं ‘माहेरपण’ करण्याची लगबग सुरू होते. अनेक मध्यमवर्गीय मराठी घरांतून हल्ली हे चित्र हमखास बघायला मिळत आहे.
या माहेरपणाची व्याप्ती फार मोठी आहे. पूर्वीसारखं (म्हणजे फार पूर्वीसारखं) लेक माहेरी आली की तिचं कोडकौतुक पुरवणं, तिच्या आवडीचे चार पदार्थ करून तिला खायला घालणं आणि साडीचोळी देऊन तिची पुन्हा सासरी रवानगी करणं इतकंच ते आता मर्यादित राहिलेलं नाही. एक तर आता या माहेरपणात लाडक्या लेक-लेकीसोबतच लाडके जावई आणि सुनाही समाविष्ट आहेत. शिवाय लाडक्यांची लाडकी मुलं अर्थातच लाडकी नातवंडं यांना कसं विसरता येईल? मुलं येतात खरी, पण त्यांची अवस्था ‘रात्र थोडी आणि सोंगं फार’ अशी असते. हातात वेळ असतो खूप कमी आणि त्यात खूप गोष्टी त्यांना बसवायच्या असतात. उदाहरणार्थ ‘सवाई’च्या मैफिलीची एखादी रात्र, मित्राच्या बहिणीचं लग्न, हरिश्चंद्र गडाचा ट्रेक, एखाद्या प्रायोगिक (सहजी न समजणाऱ्या) नाटकाला आवर्जून जाणं, दंतचिकित्सकाला भेट, धावती राजस्थान किंवा तत्सम ट्रिप, एखादा टेलर गाठून मापाचे कपडे शिवून घेणं, स्थानिक मॅरेथॉन शर्यतीत भाग घेणं अशा अनेक चित्रविचित्र मोहिमांचा त्यांना या भेटीत फडशा पाडायचा असतो. (स्थानिक) पालकांच्या मदतीशिवाय हे शक्यच नसतं. पालकही मुलांचं माहेरपण सुखाचं व्हावं याकरता धावपळ करायला मागेपुढे बघत नाहीत. मुळात मुलं अशी घरी येण्याच्या काळात त्यांनी आपले इतर सगळे व्यवसाय, उद्याोग, कामं ‘होल्ड’वर ठेवलेली असतात. नोकरी असेल तर जास्तीत जास्त रजा काढलेल्या असतात. जेणेकरून जास्तीत जास्त वेळ मुलांसोबत काढता यावा.
त्यातच मुलांच्या या भरधाव वेळापत्रकात ‘कित्ती दिवसांत भेटली नाहीत मुलं, यानिमित्ताने नक्कीच भेट होईल,’ हा नातेवाईकांचा गोड हट्ट पूर्ण करण्याकरता एक कौटुंबिक जिव्हाळ्याचा ‘गेट टुगेदर’चा कार्यक्रम आईबाबांना कसाबसा बसवायचा असतो. डिसेंबर महिन्यात तिकडे ख्रिासमसच्या सुट्ट्या असल्याने त्याला लागून रजा घेऊन मायदेशाला भेट द्यायला हा महिना सोयीचा पडतो. शिवाय तिकडच्या ‘विंटर’च्या बर्फाच्छादित हवेतून सुटका करून घेऊन इथल्या हिवाळ्यातल्या आल्हाददायक हवेत आपली सुट्टी मजेत घालवणं हाही एक हेतू असतोच. थोडक्यात, मायदेशी भेट देण्याकरता डिसेंबर-जानेवारी हे आता ‘फेव्हरेट’ महिने बनले आहेत.
भविष्यातील किती तरी महत्त्वाच्या गोष्टींची आखणी मुलांना या महिन्यात करता येते. आईवडिलांनी विवाहसंस्थांमध्ये नोंदणी करून किंवा तत्सम अॅप्सवर हेरलेल्या संभाव्य अनुरूप जोडीदाराला भेटण्याची ही नामी संधी असते. ती हातची घालवून कसं चालेल, हे जाणून दोन्हीकडचे पालक तत्परतेने स्वत: ‘फोनाफोनी’ करून किंवा चॅट करून किंवा मुलांना करायला लावून या भेटीगाठीचं नियोजन पक्कं करतात. त्यामुळे इथे येण्यापूर्वीच अनेक मुलामुलींच्या ‘अजेंड्या’वर ही प्रत्यक्ष भेट निश्चित केलेली असते. यातून काही जमलंच तर त्वरेने झटपट साखरपुडाही उरकला जातो. त्याचं नियोजन अर्थातच ‘माहेरपणा’त समाविष्ट असतं. हल्ली ठरलेल्या लग्नांचे मुहूर्तही मुलामुलींच्या सोयीकरता वैशाखाऐवजी डिसेंबर-जानेवारीतले धरले जातात. दस्तुरखुद्द स्वत:च्याच मुलाचं किंवा मुलीचं लग्न असलं तर मग पालकांची धावपळ विचारायलाच नको. वर्ष वर्ष अगोदर मंगल कार्यालयाचं बुकिंग करण्याकरता पालक शर्यत लावतात. मुलगा किंवा मुलगी देशात अवतरल्याबरोबर त्यांची मापं काढून त्यांना हवा तसा म्हणजे मुलाला झब्बा, शेरवानी, फेटा असा खानदानी पोशाख किंवा धोतर, बाराबंदी, मावळी पगडी असा पारंपरिक पोशाख, तर मुलीला ‘नाडी बांधली की साडी तयार’ धर्तीची नऊवारी साडी किंवा भपकेदार, लहरेदार लेहंगा-कुर्ता असे तऱ्हेतऱ्हेचे कपडे विकत किंवा शिवून घेणं, दागिन्यांची पसंती ठरवणं, याच्या जोडीलाच निमंत्रितांच्या याद्या बनवणं, व्हॉटस्अॅपवर पत्रिकेचा फोटो किंवा आता ‘रील’ करून पाठवून अगत्याने बोलावणी करणं, जेवणाचा, बुफेचा मेन्यू ठरवणं अशा सगळ्या आघाड्या सांभाळताना पालकांच्या अक्षरश: नाकी नऊ येतात. कारण मुलं लग्नाच्या जेमतेम एक आठवडा आधी आणि चार-पाच दिवस नंतर इतक्याच सुट्ट्या घेऊन आलेली असतात. त्यामुळे अशी ‘मॅरेथॉन’ लग्नं उकरताना पालकांची दमछाक झाली नाही तरच नवल! हे कार्य स्वत:च्या शहरात ठरलं तर त्यातल्या त्यात नियोजन करणं सोपं पडतं, पण ‘डेस्टिनेशन वेडिंग’ ठरलं तर होणारा व्याप विचारायलाच नको.
‘माहेरपणा’तला हा मोठ्ठा इव्हेंट सोडला तरी इतरही मुद्दे असतातच. बहुतेक वेळा मुलं मुक्कामात काही ‘कामाचे’ दिवस घेऊन येतात. म्हणजे ते ज्या देशात काम करतात तिथल्या वेळेनुसार त्यांचं इथून काम चालतं. मग ती आपल्याकडची संध्याकाळ, मध्यरात्र, उत्तररात्र, पहाट अशी कुठलीही वेळ असू शकते. त्या त्या वेळेनुसार त्यांचं खाणंपिणं, झोपणं यांच्या वेळा बदलत राहतात आणि त्या पाळण्याकरता त्यांची आई नाचत राहते.
काही वेळा इथे आल्यावर आपल्या मुक्कामातले बरेचसे दिवस ‘तू तुझ्या माहेरी आणि मी माझ्या माहेरी’ अशी नवरा -बायकोत सोयीस्कर वाटणी करून आपापल्या आईवडिलांसोबत तो आणि ती आपली सुट्टी मजेत घालवतात. मुलांच्या काही छोट्या-मोठ्या मागण्याही या मुक्कामात त्यांच्या आईबाबांना पुऱ्या करायच्या असतात. उच्च शिक्षणाकरता परदेशी गेलेली एखादी नेहा इथे घरी परतते तेव्हा ‘आज इथे तर उद्या तिथे’ अशा भरगच्च कार्यक्रमांनी तिचा मुक्काम ठासून भरलेला असतो. त्यातल्या अनेक गोष्टींचं नियोजन उदाहरणार्थ फ्लाइटचं बुकिंग, चेक-इन, हॉटेल रिझर्वेशन्स करताना ती तिच्या आईबाबांची मदत गृहीत धरते आणि तिचा मुक्काम सुखद व्हावा म्हणून तेही एका पायावर तयार असतात.
एखाद्या साहिलला परदेशात काही वर्षं राहिल्याने इथे आल्यावर ‘पंचकर्म चिकित्सा’ करून शरीर-मन-शुद्धीकरण करून घ्यावंसं वाटतं. मग त्याची आई सतरा ठिकाणी चौकशी करून एखाद्या ओळखीतून एखादा भरवशाचा वैद्या शोधून काढते. इथे आल्यावर मुलांच्या वैद्याकीय तपासणीच्या आगाऊ तारखा घेऊन ठेवणं हेही पालकांचं एक नेहमीचं काम असतं.
एखादी परदेशस्थ ज्योती कामानिमित्त एका परदेशातून दुसऱ्या परदेशात स्थलांतरित होताना मध्ये एक इथला, घरचा स्टॉप घेऊन दुसऱ्या देशात स्थिरस्थावर होईपर्यंत तिचं लाडकं मांजर आईकडे सोपवून जाते. ती गेल्यावर घरची ‘सय’ येऊन ते कावरंबावरं होतं, व्यवस्थित खाई-पिईनासं होतं. शेवटी तिच्या आईला त्याला पाळीव प्राण्यांच्या डॉक्टरकडे घेऊन जावं लागतं आणि तिथे कळतं की ते मांजर ‘डिप्रेशन’मध्ये गेलं आहे. कपाटावर, पलंगाखाली, स्वयंपाकघरातल्या माळ्यावर अशा कुठल्याही अवघड जागी जाऊन रुसून बसलेल्या मांजराला (अजिबात न रागावता) प्रेमाने चुचकारून कसंबसं जवळ घेऊन त्यावरचे औषधोपचार त्याच्या गळी दुधातून उतरवायचा व्याप तिला करावा लागतो.
आपल्या परदेशी नोकरी करणाऱ्या मुलांसोबत इथल्या काही माहितीच्या ‘चांगल्या’ गुंतवणूक सल्लागारांची भेट घडवून आणून त्यांना त्यांच्या गुंतवणुकीबाबत योग्य ते मार्गदर्शन, सल्ला पुरवणं, मुलांच्या किंवा त्यांच्या वतीने आपल्या नावावर त्यांना सोयीची, फायद्याची पडेल अशी गुंतवणूक करून ती कायम फायदेशीरच राहील याकरता सतत मागोवा घेत राहणं इत्यादी महत्त्वाची कामंही या ‘माहेरपणा’त उरकली जातात.
सुरुवातीलाच म्हटलं त्याप्रमाणे या माहेरपणाची व्याप्ती मोठी आहे. मुलं परदेशात असताना आणि आपण इथे असताना इथूनही हे माहेरपण मोठ्या उत्साहाने केलं जातं. विश्वास बसत नसेल तर दिवाळीच्या सुमारास किंवा इतर कोणत्याही मोठ्या सणसमारंभाच्या वेळेला एखाद्या आंतरराष्ट्रीय कुरिअर सेवेच्या कार्यालयाबाहेरचं दृश्य बघाच. हातात फराळाचं गोड आणि जड ओझं पिशव्यांत भरून पालक रांगा लावून उभे राहिलेले दिसतील.
आपली ही ‘लाडकी’ मुलं जेव्हा त्यांच्या ‘लाडक्यां’सह माहेरपणाला येतात तेव्हा ही ‘दुधावरची साय’ जपण्याकरता, त्यांचं कोडकौतुक करण्याकरता नवोदित आजोबा-आजींची एकच धांदल उडते. साधारण पाच-सहा महिन्यांची झाल्यानंतरच लांबलांबचे प्रवास करून ही चिमुकली भारतात अवतरतात आणि जिने गुरगुट्या वरण-भात-तुपावर आपली बाळं वाढवली त्या माउलीला एकदम उकडलेली ब्रोकोली, कुस्करलेली रताळी किंवा केळ्यासारख्या बारमाही मिळणाऱ्या फळासोबतच अॅव्होकाडोसारख्या विलायती, अनोळखी फळाचा गर बाळाला कसा भरवावा याचे धडे घ्यावे लागतात. शिवाय बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी बाळाच्या अंघोळीचं पाणी थर्मामीटरने तपासून ते योग्य तापमानाचं कसं घ्यायचं, बाळाच्या अंगाला तेलाऐवजी अंघोळीनंतर कोणतं बेबीलोशन लावायचं, डायपर रॅशकरता कोणतं मलम कसं वापरायचं इत्यादी इत्यादी अनेक गोष्टींचे कित्ते गिरवावे लागतात.
त्यातून या बाळाच्या आई-बाबांनी जर एखाद्या आठवड्याचं काम सोबत आणलं असेल तर विचारायलाच नको. दिवसभर घरातली व्यवस्था सांभाळून बाळाला बघायला येणाऱ्यांचं आदरातिथ्य करून, त्यांच्याशी चार शब्द बोलून झाल्यानंतर रात्री बाळाला सांभाळायची जबाबदारी नवी आजी हौसेने पार पाडते. त्याकरता बाळाच्या आईने स्वत:चं ‘पंप’ करून ठेवलेलं दूध मायक्रोवेव्हमध्ये गरम न करता गॅसवर मोठ्या पातेल्यात पाणी तापवून त्यात दुधाची बाटली ठेवून योग्य तापमानाचं कोमट कसं करायचं किंवा दुधाचा ‘फॉर्म्युला’ कसा तयार करायचा ही नवी कौशल्यं ती आवडीने शिकून घेते आणि तिच्या मदतीने मग एखाद्या सुनेचा किंवा मुलीचा रात्रीच्या कामाचा आठवडा बिनबोभाट पार पडतो.
याशिवाय बाळाचं बारसं इथं झालं नसल्याने नातेवाईक, मित्र, स्नेही, शेजारीपाजारी यांना बाळाला ‘दाखवण्या’चा कार्यक्रम उत्साहाने साजरा केला जातो. मुलं थोडी मोठी झाल्यावर इथे येतात तेव्हा मुंजीसारखे विधी दणक्यात पार पाडले जातात ते आजोबा-आजी यांच्या पुढाकाराने आणि सक्रिय मदतीनेच. परदेशस्थ मुलांच्या ‘माहेरपणा’चे असे अनेकविध पैलू आहेत. थोडक्यात वस्तुस्थिती अशी आहे, की मुलं जरी परदेशात असली तरी त्यांची आपल्या घराशी, आपल्या माणसांशी असलेली नाळ घट्ट बांधलेली राहते. त्यापायीच त्यांचा एक पाय इकडे आणि दुसरा पाय तिकडे असे ते जगत असतात. आणि गंमत अशी, की समाज माध्यमाच्या माध्यमातून मनात आणलं तर आज आपण जरी अगदी दिवसाचे चोवीस तासही एकमेकांच्या संपर्कात राहू शकत असलो आणि ‘फेस टाईम’ किंवा ‘व्हिडीओ कॉल’द्वारे एकमेकांना हवं तेव्हा बघू, बोलू शकलो तरी प्रत्यक्ष सहवासाला तो पर्याय ठरू शकत नाही याची पुरेपूर जाणीव त्यांना आहे. ही गोष्ट अंतर्यामी जाणून व्याप झाला, दमणूक झाली तरी आजचे पालक आतड्याच्या मायेने, त्याच उत्साहाने दरवर्षी हे माहेरपण मोठ्या खुशीने, हौसेने आणि आनंदाने निभावताना दिसतात!
●smcmrc@gmail.com

