निरंजन मेढेकर

लग्न झालं की लैंगिक संबंध प्रस्थापित करणं आपोआप जमेलच, असा एक सार्वत्रिक समज असतो. परंतु अनेक जोडपी लैंगिक संबंध होऊ न शकल्यामुळे अनेक वर्ष ‘सेक्सलेस’ नात्यात राहतात. हे अविश्वसनीय वाटू शकतं, मात्र ही समस्या अगदी जगभरात आहे. त्यावर योग्य उपचार मिळाल्यास मात्र कोणत्याही वयात ही समस्या सोडवण्यात यश मिळू शकतं. काय आहेत यामागची कारणं, यावर तज्ज्ञ डॉक्टरांनी टाकलेला दृष्टिक्षेप.
अनघा आणि कौशिक कॉलेजपासूनच एकमेकांच्या प्रेमात अगदी आकंठ बुडालेले. नंतर योगायोगानं दोघं एकाच कंपनीत कामाला लागले. त्यांनी एकमेकांशी लग्न करणं ही फक्त औपचारिकता उरली होती. लग्नानंतर तर त्यांच्या आनंदाला पारावारच उरला नाही. काही वर्षांनी त्यांनी स्वत:चा व्यवसायही सुरू केला. कुटुंब आणि व्यवसाय या सगळय़ात संसाराची २०-२२ वर्ष निघून गेली. आता चाळिशीत ते लग्नाच्या पहिल्या रात्रीपासून टाळलेला विषय घेऊन गायनॅकॉलॉजिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉ. नीलिमा देशपांडे यांच्याकडे आले होते. त्यांच्या दृष्ट लागाव्या अशा वैवाहिक आयुष्यात एकच उणीव होती, त्यांच्यात अजून एकदाही शरीरसंबंध आला नव्हता!

arguments with the team
ताणाची उलगड : वादाला महत्त्व किती?
March 2024 Monthly Horoscope in Marathi
March 2024 Monthly Horoscope : मार्च महिन्यात या तीन राशींचे बदलणार नशीब? वैवाहिक जीवन, करिअर अन् आर्थिक लाभ; ज्योतिषशास्त्र काय सांगते…
Women Health
स्त्री आरोग्य : लग्नानंतर लगेच मूल होत नाहीए?
good touch bad touch
मुलेही ‘गुडटच-बॅडटच’चे शिकार! सामाजिक कार्यकर्त्या दिशा पिंकी शेख म्हणतात, घराचा वंश पुढे चालवू शकत नसल्याने…

अनघा आणि कौशिकसारख्या जोडप्यांचं प्रमाण भारतात आणि आशियाई देशांमध्ये लक्षणीय आहे. अशा जोडप्यांमधल्या असफल लैंगिक संबंधांना ‘विवाहाची अपूर्तता’ किंवा इंग्रजीत ‘अनकॉन्स्युमेटेड मॅरेज’ असं म्हटलं जातं. माणूस पाण्यात पडल्यावर पोहायला शिकतो तसंच लग्न झाल्यावर ‘आपसूक’ शरीरसंबंध जमायला लागतात अशी आपली धारणा असते. पण सेक्सॉलॉजिस्ट, गायनॅकॉलॉजिस्ट, सायकियाट्रिस्ट यांच्याकडे लैंगिक समस्या घेऊन येणाऱ्या जोडप्यांपैकी३० ते ४० टक्के जोडप्यांना वैवाहिक अपूर्ततेची समस्या असते, असं डॉ. नीलिमा सांगतात. समस्या असूनही केवळ संकोचापायी डॉक्टरांकडे न जाणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण गृहीत धरता ते यापेक्षाही जास्त असू शकतं. एकूण समाजाचा विचार करता लग्नानंतर कित्येक वर्ष शरीरसंबंध न जमणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण हे ८ ते १७ टक्के आहे, असं एक संशोधन सांगतं. त्यामुळेच वैवाहिक अपूर्तता म्हणजे नेमकं काय, त्यामागची कारणं आणि उपायांचा मागोवा घ्यायला हवा.

ज्येष्ठ वैद्यकीय तज्ज्ञ आणि लैंगिक विषय अभ्यासक डॉ. विठ्ठल प्रभू यांच्या ‘निरामय कामजीवन’ या प्रसिद्ध पुस्तकाच्या २००० मध्ये प्रकाशित झालेल्या सोळाव्या आवृत्तीत ‘विवाहाची अपूर्तता’ हे प्रकरण आहे. त्यानुसार ‘विवाहाची अपूर्तता म्हणजे शरीरसंबंधा-दरम्यान लिंगाचा योनीत प्रवेश होऊन वीर्यस्खलन होण्यापर्यंतची क्रिया न घडणं, म्हणजेच पतीपत्नीचा संभोग अयशस्वी होणं. यामुळे विवाहाला पूर्णत्व येत नाही आणि याचा परिणाम म्हणजे पालकत्व लाभत नाही.’

शरीरसंबंधांविषयीची भीती, लाज, चिंता, घृणा किंवा गर्भार राहण्याची भीती अशा वेगवेगळय़ा मानसिक कारणांची परिणती वैवाहिक अपूर्ततेत होऊ शकते. लग्नानंतर किंवा रिलेशनमध्ये असताना पहिल्या काही प्रयत्नांत शरीरसंबंध न जमण्याचं प्रमाण जागतिक स्तरावरही मोठं असून, त्याला ‘हनीमून इम्पोटन्स’ किंवा ‘वेिडग नाइट इम्पोटन्स’ असं संबोधलं जातं.

स्त्रियांचा विचार करता योनीआकर्ष (vaginusmus) किंवा वेदनामय संभोग (dyspareunia, sexual pain disorder) ही मुख्य कारणं असतात.
याविषयी माहिती देताना सायकियाट्रिस्ट आणि सेक्सॉलॉजिस्ट डॉ. निकेत कासार ेसांगतात, ‘‘साधारणत: ५ ते १५ टक्के स्त्रियांमध्ये योनीआकर्ष किंवा वेदनामय शरीरसंबंधांची कमीजास्त लक्षणं असू शकतात. योनीआकर्ष म्हणजे संबंधांसाठी जेव्हा पुरुष स्त्रीच्या जवळ येतो तेव्हा त्या स्त्रीच्याही नकळत तिच्या योनीतले स्नायू आकुंचित पावतात. तर वेदनामय संबंधांमध्ये स्त्रीला समागमादरम्यान प्रचंड वेदना होतात. यादोन्ही शारीरिक समस्या असल्या तरी त्यांची मुळं शरीरसंबंधांविषयीच्या अनाठायी भीतीमध्ये दडलेली असतात.’’शहरी भागांमध्ये लैंगिक समस्यांविषयी जनजागृती असते असं वाटत असलं, तरी प्रत्यक्षात शहरी भागात अशा घटनांचं प्रमाण खूप मोठं आहे. ग्रामीण भागात बहुतेक वेळा सरसकट मुलीवर दोषारोप करत तिला माहेरी पाठवून मुलाचं दुसरं लग्न लावून दिलं जातं. डॉक्टरांकडे जाण्याचा विचारही कुणाच्या मनात शिवत नाही. कारण बहुतेकांना या प्रश्नाची जाणीव नसते. असं काही असतं, याची कल्पनाही नसते.

आपल्याकडे येणाऱ्या प्रकरणांपैकी दर चौथी केस ही ‘अनकॉन्स्युमेटेड मॅरेज’ची असते, असं डॉ. नीलिमा देशपांडे सांगतात. ‘‘तुमच्या लग्नाला एक महिना झालेला असो, एक वर्ष झालेलं असो, की दहा वर्ष. तुम्ही जेव्हा सजगपणे डॉक्टरांकडे जायचा निर्णय घेता ती वेळ योग्य आहे, हे प्रत्येक जोडप्यानं सगळय़ात आधी समजून घ्यायला हवं. कारण योग्य उपचारांमुळे अवघ्या काही महिन्यात ‘अनकॉन्स्युमेटेड मॅरेज’ची समस्या कायमची संपुष्टात येऊन त्या जोडप्याला निरामय कामजीवनाचा आनंद घेता येऊ शकतो. माझ्याकडे लग्नाला तीन वर्ष होऊनही समागम जमत नसल्याची तक्रार घेऊन अलीकडेच एक जोडपं आलं होतं. अवघ्या काही महिन्यांच्या उपचारांनंतर त्यांची समस्या सुटली.’’आणखी एका प्रकरणाविषयी माहिती देताना त्या म्हणाल्या, ‘‘तरुण-तरुणी दोघंही एकमेकांना सहा वर्ष ओळखत होते. घरच्यांच्या संमतीने त्यांनी लग्न केलं. पण लग्नानंतर शरीरसंबंध जमत नाहीयेत हे कळलं, तेव्हा तोवर प्रेमानं वागणारा तो तरूण अचानक हिंसक झाला, बायकोवर जबरदस्ती करायला लागला. साहजिकच तिच्या मनात या संबंधांबद्दल भीती बसली. इतक्या वर्षांच्या नात्याची परिणती त्यामुळे लग्न तुटण्यात झाली. त्या दोघांनी वेळीच या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जाऊन उपचार, सेक्स थेरपी घेतली असती, तर हे टळू शकलं असतं.’’

पुरुषांचा विचार करता शीघ्रपतन (premature ejaculation) आणि लैंगिक ताठरतेची समस्या (erectile dysfunction) ही कारणं ‘अनकॉन्स्युमेटेड मॅरेज’ला कारणीभूत ठरतात. ‘संभोगाला सुरुवात केल्यावर मिनिटभरात वीर्यस्खलन होणं’ अशी शीघ्रपतनाची व्याख्या ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर सेक्शुअल मेडिसिन’ या संस्थेनं केली आहे. इथे एक मुद्दा समजून घ्यायला हवा, की शीघ्रपतन हा आजार नसून, तीव्र संवेदनशीलतेमुळे वीर्यस्खलनाची प्रतिक्षिप्त क्रिया चटकन घडल्यानं ही समस्या उद्भवते.दुसरीकडे वाढत्या वयाबरोबर लैंगिक ताठरतेची समस्या जाणवू शकते. ‘‘वय वर्ष४० ते ७० दरम्यानच्या पुरुषांना आयुष्याच्या कुठल्या ना कुठल्या टप्प्यावर लैंगिक ताठरतेची समस्या भेडसावण्याची शक्यता असते. चाळिशीतल्या सरासरी ४० टक्के पुरुषांमध्ये ही समस्या असू शकते,’’ असं डॉ. निकेत कासार सांगतात. एखाद्या पुरुषाला ही समस्या असेल तर त्याची मानसिकताशरीरसंबंधांविषयी नकारात्मक बनायला लागते आणि समागम ही काही महत्त्वाची गोष्ट नसून यापुढे आपण छान मित्र-मैत्रिणीसारखं राहू, असं ते पत्नीला समजवतात.‘‘शरीरसंबंधांबद्दल कमालीचं अज्ञान हेदेखील विवाहाच्या अपूर्ततेतलं एक प्रमुख कारण असतं. अनेकांना शरीससंबंध कसे प्रस्थापित करायचे तेच माहीत नसतं. ‘योनीमार्ग कुठे असतो’ असा प्रश्न पुरुष रुग्ण विचारतात, तर स्त्रियांनाही स्वत:च्या योनीविषयी, तिच्या कार्याविषयी माहिती नसते. याचं मूळ लैंगिकता शिक्षणाच्या सार्वत्रिक अभावात आहे,’’ असं डॉ. कासार सांगतात.

‘नेचर’ नियतकालिकात ‘विवाहाच्या अपूर्ततेकडे अजूनही व्हजायनसमसची परिणती म्हणून पाहिलं जातं का?’ (Unconsummated marriage: can it still be considered a consequence of vaginismus?)या शीर्षकाचा संशोधन अहवाल २०१४ मध्ये प्रकाशित झाला. यामध्येही ही लैंगिक समस्या मुख्यत्वे मध्य आशियाई आणि विकसनशील देशांमध्ये प्रकर्षांनं आढळते असं नमूद करण्यात आलं. तरी २००८ ते २०१२ दरम्यान पार पडलेल्या या संशोधनात पाश्चात्त्य देशांतही विवाहाची अपूर्तता भेडसावणाऱ्या जोडप्यांचं प्रमाण मोठं असल्याचं संशोधकांना आढळलं. त्यामुळेच आशियाई-विकसनशील देशांतील आणि पाश्चात्त्य देशांतील या समस्येच्या मुळाशी असलेल्या कारणांचा तौलनिक अभ्यास, असं या संशोधनाचं उद्दिष्ट होतं.
‘विवाहाची अपूर्तता’ ही समस्या केवळ आशियाई देशांतच नसून पाश्चात्त्य देशांतही आहे, असं निरीक्षण इंग्लंडमध्ये अनेक वर्ष प्रॅक्टिस केलेल्या डॉ. नीलिमा ठामपणे नमूद करतात. ‘‘इंग्लंडमध्येही ही समस्या असलेल्या रुग्णांचं प्रमाण मोठं आहे. तब्बल २०-२२ वर्ष वैवाहिक अपूर्ततेची समस्या भेडसावणाऱ्या एका ब्रिटिश जोडप्याला मी उपचार दिले आहेत. त्यामुळेच या समस्येचं स्वरूप वैश्विक आहे,’’ असं त्यांनी स्पष्ट केलं.

या लेखाच्या सुरुवातीला अनघा आणि कौशिक या वीस वर्षांहून अधिक काळ वैवाहिक अपूर्ततेची समस्या सहन केलेल्या जोडप्याचा उल्लेख आहे. ज्या प्रश्नानं हे चाळिशीतलं जोडपं इतकी वर्ष कुढत होतं, त्यांना उपचारांमुळे अवघ्या काही महिन्यांत निरामय कामजीवनाचा आनंद घेता आला. याचं त्यांना मनापासून समाधान असलं तरी ते डॉक्टरांकडे आधीच गेले असते तर आयुष्यातली इतकी मोलाची वर्ष वाया गेली नसती, हेही तितकंच खरं.
niranjan@soundsgreat.in