निरंजन मेढेकर

सेक्स, पोर्नोग्राफी या पूर्वीपासून माहीत असलेल्या शब्दांपासून सेक्सटॉर्शन, हनीट्रॅप’, स्लो लव, सेक्स रेसेशन हे शब्दही आता कानावर पडायला लागले आहेत. खरं तर आपल्याकडे कामजीवनाविषयी आजही अळीमिळी गुपचिळीचंच धोरण आहे, पण त्यामुळे त्यातले गुंतेही वाढताहेत. लग्न होऊनही पाच-दहा वर्ष शरीरसंबंध न आलेली जोडपी आहेतच, पण त्याचबरोबर स्त्रियांनाही हस्तमैथुनाचा आनंद घेता येऊ शकतो याची कल्पना नसलेल्या अनेक स्त्रियाही आपल्या अवतीभोवती आहेत. म्हणूनच हे सदर, सर्व वयातल्या स्त्री-पुरुषांच्या आयुष्यातल्या आवश्यक अशा लैंगिकतेविषयी, त्यातील पॉर्नच्या व्यसनापासून ते शरीरसंबंधांचा अभाव असलेल्या सेक्सलेस मॅरेजपर्यंत आणि ‘लिव्ह-इन’ नातेसंबंधांपासून ते ज्येष्ठांच्या सहजीवनापर्यंत सारं काही, लैंगिकतेच्या क्षेत्रात काम करणाऱ्या नामवंत डॉक्टर, तज्ज्ञांचा अनुभव स्पष्ट शब्दांत थेटपणे मांडणारं सदर दर पंधरवडय़ाने.

conceit of painter whose exhibition made critics take the term Ambedkari art seriously
हे विचार, हे जगणं दृश्यात आणलं पाहिजे…
Mentally healthy Psychotherapy Mental health problems
ताणाची उलगड: मानसिकदृष्ट्या निरोगी आहोत का?
old generation, new generation
सांधा बदलताना : नव्यातले जुने…
Extraordinary women who make everyday life easier for common people
सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन सुकर करणाऱ्या ‘असामान्य स्त्रिया’

निरंजन मेढेकर हे लेखक, मुक्त पत्रकार, पॉडकास्टर आणि अनुवादक असून, गेल्या १५ वर्षांपासून ते माध्यम क्षेत्रात कार्यरत आहेत. पॉडकास्ट आणि ऑडिओबुक निर्मिती क्षेत्रात नवनवीन प्रयोग तसेच सेवा पुरवण्याच्या उद्देशाने ‘साऊंड्सग्रेट एनएम ऑडिओ सोल्यूशन्स’ हे स्टार्टअप त्यांनी नुकतेच  सुरू केले आहे. वेगवेगळय़ा मराठी-इंग्रजी दैनिकांसाठी त्यांनी बातमीदारी केली आहे. ऑक्टोबर २०१८ मध्ये सुरू केलेल्या ‘सेक्सवर बोल बिनधास्त’ या पॉडकास्टमध्ये ते वेगवेगळय़ा वैद्यकीय शाखांतील तज्ज्ञांसोबत लैंगिकतेशी संबंधित विविध विषयांवर संवाद साधतात. ‘सीरियल किलर’ ही त्यांची पहिली कादंबरी प्रसिद्ध झाली असून ‘विनाशकाले’ हा त्यांचा गुन्हेकथांचा संग्रहही प्रसिद्ध झाला आहे. पुण्यातील जोशी-अभ्यंकर प्रकरणावर प्रेरित ‘सायको किलर’ ही दुसरी कादंबरीही ऑडिओबुक रूपात उपलब्ध आहे.

दोनेक महिन्यांपूर्वीची गोष्ट. एके दिवशी  रोजच्या संपर्कात नसलेल्या मित्राचा, अनिशचा फोन आला. त्याच्या आवाजात काळजी, अधीरता जाणवत होती. त्याचा आठ वर्षांचा मुलगा यश सोसायटीतल्या मोठय़ा मुलांसोबत खेळत असताना त्याला कुणी तरी शरीरसंबंधांबद्दल सविस्तर माहिती पुरवली होती. या मित्राचा आपल्या मुलाशी चांगला संवाद असल्यानं आणि घरात मोकळं वातावरण असल्यानं यशनं घरी आल्या आल्या  मनातला गोंधळ, कुतूहल बाबाला बोलून दाखवत आपल्या बालसुलभ प्रश्नांनी भंडावून सोडलं होतं. अनिशची लैंगिक शिक्षणाला कुठलीही हरकत नसली तरी आठ वर्षांच्या यशशी या विषयावर त्याच्या वयानुरूप नेमकं कसं बोलावं हे त्याला उमजत नव्हतं.    

 साधारण याचदरम्यान मला दोन इ-मेल्सही आल्या. पहिली मेल तिशी उलटूनही लग्न जुळत नसलेल्या नीलेशची होती. ‘जी मुलं-मुली ‘सिंगल’ आहेत त्यांनी आपल्या लैंगिक इच्छा कशा पूर्ण कराव्यात? डेटिंग अ‍ॅप्सवरून कॅज्युअल सेक्सचा पर्याय निवडावा का, तसं करणं सेफ आहे का?’ असा नीलेशचा थेट प्रश्न होता. तर दुसरा मेल लग्न होऊन जेमतेम वर्ष झालेल्या पंचविशीच्या सुकन्याचा होता. ‘माझ्या नवऱ्याला अगदी पहिल्या दिवसापासून लैंगिक ताठरतेचा (इरेक्टाइल डिसफंक्शन) त्रास आहे. त्यामुळे आमच्यात अजून एकदाही संबंध आलेला नाही. दुसरीकडे लग्नाला वर्ष झाल्यानं घरचे आता मुलासाठी मागे लागलेत. माझी पुरती घुसमट होतेय.’ सुकन्याची घुसमट तिच्या मेलमधूनही जाणवत होती.

    निरामय लैंगिकतेवर ‘सेक्सवर बोल बिनधास्त’ हा पॉडकास्ट सुरू केल्यापासून गेल्या चार वर्षांत असे अनेक यश, अनिश, नीलेश आणि सुकन्या संपर्कात आलेत, ज्यांना या ‘अवघड’ विषयांवर नेमकं कसं व्यक्त व्हावं, डॉक्टरांना कसं अ‍ॅप्रोच व्हावं हे कळत नाही. अगदी प्रांजळपणे सांगायचं तर या सगळय़ा प्रश्नांवरची उत्तरं माझ्याकडेही नाहीत. कारण मी काही कुणी वैद्यकीय किंवा मनोविकारतज्ज्ञ नाही. लेखक आणि पत्रकाराच्या भूमिकेतून माझ्या पॉडकास्टमध्ये मी लैंगिकतेसंबंधी विविध विषयांवर वेगवेगळय़ा वैद्यकीय तज्ज्ञांशी अगदी मोकळेपणानं संवाद साधतो. त्यातून लैंगिकता आणि कामजीवनाशी संबंधित अनेक अद्भूत आणि आपल्या समाजात अजूनही अस्पर्श असलेल्या गोष्टींशी माझी ओळख होते आहे. बाकी सगळय़ाच क्षेत्रांप्रमाणे लैंगिकतेचं आदिम विश्वही कसं झपाटय़ानं बदलतंय हे जाणवतंय. त्यामुळेच लैंगिकतेचा विचार करता हे बदल नेमके कोणते आहेत, कामजीवनातले नवे ट्रेंड्स, नव्या-जुन्या व्याधी आणि गुन्हे कोणते आहेत याचा आढावा घेण्याचा प्रयत्न ‘देहभान’ या सदरातून करण्याचा विचार आहे.

गंमत म्हणजे एकीकडे या बदलांचा वेग प्रचंड असला तरी भारतीय समाजात सेक्स- विषयी अजूनही अळीमिळी गुपचिळीचंच धोरण आहे. इतकी वर्ष या सगळय़ा भावनांचं दमन करण्याचं रीतसर प्रशिक्षणच दिलं जायचं. अगदी मी स्वत: ज्या मिलेनियल जनरेशनचं प्रतिनिधित्व करतो ती पिढीही याला अपवाद नाही. विशेषत: १९८० ते १९९२ दरम्यान ज्यांचा जन्म आहे आणि जे आज पालकही आहेत त्यांची खऱ्या अर्थानं ‘सँडविच पिढी’ आहे. एकीकडे पारंपरिक-कर्मठ पालकांच्या पंखाखाली वाढताना बहुतेकांना लैंगिकतेसंबंधी ‘ब्र’ ही काढण्याची मुभा नव्हती (अजूनही नाहीये). तर दुसरीकडे जनरेशन झेड आणि अल्फा जनरेशनमधल्या आपल्या मुलांना लैंगिकदृष्टय़ा साक्षर करण्याची जबाबदारी मात्र आमच्यावर आहे. तरुणाईचा विचार करता सोशल मीडियावरील वाढत्या अवलंबित्वामुळे त्यांच्याही नकळत स्क्रीनच्या, पॉर्नच्या विळख्यात ते अडकत आहेत. लैंगिक गुन्हेगारीचा विचार करता सायबर क्राइममध्ये ‘सेक्सटॉर्शन’ आणि ‘हनीट्रॅप’च्या केसेस झपाटय़ानं वाढताहेत. पुण्यात ‘सेक्सटॉर्शन’च्या विळख्यात अडकलेल्या दोन विशीतल्या तरुणांनी बदनामीच्या भीतीनं आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या आहेत. पण लैंगिक गुन्ह्यांच्या तसंच विकृतीच्या चक्रात होरपळणाऱ्या मुलांचं आणि मोठय़ांचं प्रमाणही झपाटय़ानं वाढत असलं, तरी लैंगिकता शिक्षणासाठी अजूनही ठोस म्हणावं असं कुठलंही शैक्षणिक अथवा सामाजिक धोरण नाही, ही समाज म्हणून आपली मोठीच शोकांतिका आहे.

  इंटरनेट, स्मार्टफोन आणि ओटीटीच्या क्रांतीमुळे मानवी वर्तनात आमूलाग्र बदल झालेत, अजूनही होताहेत. यात मनुष्याच्या आदिम भावना आणि गरजांचा विचार करता झोपेवर जसा थेट परिणाम झालाय तसाच तो कामभावनेवरही झालाय. थोडक्यात, काम आणि लैंगिकतेसंदर्भात समाज म्हणून बहुतेक आपण सगळेच जण आज भांबावलेल्या स्थितीत आहोत.

  आपल्या समाजात बालपणी लैंगिक शिक्षणाचा असणारा संपूर्ण अभाव हा कसा मोठेपणी लैंगिक विकृतींना, व्याधींना जन्म देतो ही बाब वेळोवेळी अधोरेखित होते. किशोरावस्थेत हस्तमैथुनाबाबत योग्य शास्त्रीय माहिती न मिळाल्यानं त्याविषयीचा न्यूनगंड तर मुलांच्या मनात वाढतोच. पण त्याचंच पर्यवसान मोठेपणी शीघ्रपतनासारख्या व्याधींमध्ये होऊ शकतं (अर्थात शीघ्रपतन इतर अनेक कारणांनीही होतं). कारण हस्तमैथुन करणं अगदी नैसर्गिक आहे, ते करण्यात पाप नाहीये आणि म्हणूनच ती घाईघाईत उरकण्याची गोष्ट नाहीये याचं मार्गदर्शनच पौगंडावस्थेत मिळत नाही. दुसरीकडे स्त्रियाही हस्तमैथुन करतात याबद्दल तर कमालीचं अज्ञान आणि गैरसमज आहेत. खुद्द स्त्रियांनाही आपल्या जननेंद्रियांविषयी, शिश्निकेसारख्या (clitoris) सुखसंवेदना निर्माण करणाऱ्या अवयवाची ओळख नसते. नकळत्या वयापासूनच शरीराबद्दल माहिती देताना जननेंद्रियांना केवळ संकोचामुळे वगळलं जातं किंवा फार फार तर ते ‘गुड टच बॅड टच’पुरतं सीमित केलं जातं. पण ज्या अवयवांबद्दल, ज्यांच्या कार्याबद्दल स्वत:लाही पुरेशी ओळख नाहीये, तिथे ध्यानीमनी नसताना तिऱ्हाइतानं केलेला स्पर्श हा ‘बॅड टच’ असूनही सुखावह वाटू शकतो, पण तो टाळायला हवा, याची माहिती किती मुलांना- मोठय़ांनाही असते? 

 एकीकडे बदलत्या जीवनशैलीमुळे नवीन प्रश्न निर्माण होत असताना तरुण पिढीतली कामेच्छाच कमी होत आहे का, यावरही संशोधन सुरू आहे. वय वर्ष २३ ते ३८ या वयोगटातील क्रियाशील लोकसंख्येचं जागतिक प्रमाण आज ४० टक्के आहे. या मिलेनियल्सचा प्रेम, लग्न, मोनोगॅमी आणि कुटुंबाकडे बघण्याचा दृष्टिकोन आधीच्या पिढीपेक्षा कमालीचा बदलला आहे. ‘किन्से इन्स्टिटय़ूट’मधील जीवशास्त्रीय मानववंशशास्त्राच्या अभ्यासक केलेन फिशर यांच्या संशोधनानुसार मिलेनियल जनरेशन- मधील तरुणाईमध्ये आज डेटिंगचं-शरीरसंबंधांचं प्रमाण कमी होतंय आणि आधीच्या पिढय़ांच्या तुलनेत ते लग्नही खूप उशिरा करण्याला प्राधान्य देताहेत. त्यांनी या प्रवाहाला ‘स्लो लव’ असं नाव दिलं असून हा ट्रेंड जनरेशन झेडमध्येही सुरूच राहील असा त्यांचा अंदाज आहे. 

 तर वरिष्ठ पत्रकार केट ज्युलियन यांनी ‘सेक्स रिसेशन’ या लेखात सामाजिक, सांस्कृतिक आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे तरुणाईतील सेक्स ड्राइव्ह कमी होत असल्याचा दावा केलाय. इंटरनेटवरील पॉर्नोग्राफिक कंटेंटचाही यात मोठा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलंय. आपल्याकडे केंद्र सरकारनं यापूर्वी २०१८ मध्ये ८०० हून अधिक पॉर्न साइट्सवर बंदी घातली होती. तर सप्टेंबर २०२२ मध्ये आणखी ६३ साइट्सवर बंदी घातली आहे. पण सर्वच वयोगटांतील लोकांचं पॉर्नचं व्यसन बघता बंदीपलीकडे विचार करण्याची गरज आहे. पॉर्नमध्ये दाखवण्यात येणारा प्रणय हे वास्तव नसून, ते फिक्शन आहे किती जणांच्या लक्षात येतं़, हा प्रश्नच आहे. ‘इंडियाना’ विद्यापीठातील लैंगिकता विषयातील संशोधक डेबी हर्बेनिक यांच्या संशोधनानुसार ३० टक्के स्त्रियांना जाणवणाऱ्या संभोगादरम्यानच्या त्रासाचं कारण तरुणाईचं पॉर्नवरचं वाढतं अवलंबित्व हे आहे.

‘देहभान’ या सदरात अशा प्रकारे विवाहपूर्व समुपदेशनापासून विवाहबाह्य संबंधांपर्यंत, पॉर्नच्या व्यसनापासून ते शरीरसंबंधांचा अभाव असलेल्या सेक्सलेस मॅरेजपर्यंत आणि लिव्ह-इन, समलैंगिक नातेसंबंधांपासून ते ज्येष्ठांच्या सहजीवनापर्यंत वेगवेगळय़ा विषयांवर चर्चा केली जाणार आहे. यासाठी मी वेगवेगळय़ा वैद्यकीय शाखेतील तज्ज्ञांबरोबरच या विषयात काम करणाऱ्या शिक्षण संस्था, स्वयंसेवी संस्था, महापालिका, समुपदेशक, इतकंच नव्हे तर विद्यार्थी-पालकांशीही संवाद साधणार आहे. त्यामुळेच लैंगिकतेच्या या विस्तृत विषयात तुम्ही काम करत असाल किंवा तुमच्या मनात कुठले प्रश्न-शंका असतील तर मला माझ्या इ-मेलवर नक्की संपर्क साधा. आपला संवाद दु-पदरी राहायला त्यामुळे मदत मिळेल.

  निरामय लैंगिक आनंद हा प्रत्येक सुज्ञ आणि प्रौढ व्यक्तीचा अधिकार आहे. या सदरामुळे अनेकांच्या आयुष्यात तो आनंद येऊ शकतो किंवा थांबलेला प्रवाहित होऊ शकतो, अशी आशा हे सदर सुरू करताना निश्चितच आहे.