निरंजन मेढेकर

‘गर्भारपणातलं कामजीवन’ हा जसा अत्यंत दुर्लक्षित विषय आहे, तसंच बाळाचा जन्म झाल्यानंतर किंवा बाळ मोठं होतानाचं कामजीवन हाही बोलला न जाणाराच विषय! स्त्रीची शारीरिक-मानसिक अवस्था, हॉर्मोन्समधले चढउतार, बाळाच्या संगोपनातल्या व्यग्रतेमुळे येणारा शरीरमनाचा थकवा, न मिळणारा एकांत, या सगळय़ाचा जोडप्यांच्या कामजीवनावर परिणाम होतो; परंतु थोडा संयम बाळगल्यास आणि सुरुवातीला प्रणयाला अधिक महत्त्व दिल्यास प्रसूतीनंतरही जोडप्यांचं कामजीवन पूर्ववत होऊ शकतं.

Loksatta editorial about 33 loss making firm donated electoral bonds to various parties
अग्रलेख: दे दान; कोणते ‘गिऱ्हाण’?
accused in child sexual abuse case arrest after three years
बाललैंगिक अत्याचारप्रकरणी तीन वर्षांनंतर आरोपीस अटक
Afgan Women
‘व्याभिचार केल्यास महिलांना खुलेआम दगडाने ठेचून मारले जाणार’ तालिबानची घोषणा
A minor girl commits suicide due to not being able to bear the pain of menstruation Mumbai
मुंबई: मासिक पाळीचा त्रास सहन न झाल्याने अल्पवयीन मुलीची आत्महत्या

गेल्या महिन्यातली सगळय़ात मोठी अर्थात ‘ब्रेकिंग न्यूज’ म्हणजे चीनला मागे टाकत भारत हा जगातला सर्वाधिक लोकसंख्येचा देश ठरला. आपल्या देशाची लोकसंख्या आता १४२.८६ कोटी इतकी असून, ‘युनिसेफ’च्या आकडेवारीनुसार भारतात दररोज ६७ हजार ३८५ अर्भकं जन्मतात. थोडक्यात, इतक्या जोडप्यांच्या खांद्यांवर आपल्या पोटी जन्मलेल्या बाळाच्या प्रत्येक श्वासाची जबाबदारी पडते. गर्भारपण नियोजित असेल, तसंच घरच्यांचं सहकार्य असेल, तर प्रसूतीनंतरचा अवघड काळही सुसह्य होऊ शकतो. याउलट घरी नवरा-बायको दोघंच असतील, तर बाळाचं संगोपन आव्हानात्मक ठरू शकतं. परिस्थिती अनुकूल असो की प्रतिकूल, प्रसूतीनंतरचं कामजीवन हा बहुतेकदा दुर्लक्षित विषयच ठरतो. त्यामुळेच मागील लेखात (२९ एप्रिल) ‘गर्भारपणातील कामसुख’ या विषयाचा आढावा घेतल्यावर आता प्रसूतीनंतरच्या कामजीवनाविषयी..

सोय, तडजोड की परंपरेचा भाग म्हणून आजही अनेक कुटुंबांत प्रसूती स्त्रीच्या माहेरी होते आणि प्रसूतीनंतर तीन ते सहा महिने इतका काळ ती बाळासह माहेरी वास्तव्यास असते. दुसरीकडे पहिल्या दिवसापासून बाळाच्या संगोपनाची जबाबदारी घेणाऱ्या बाबांचं प्रमाणही वाढत असल्याचं स्वागतार्ह चित्र आहे. तरीही जोडप्यांनी आपलं कामजीवन प्रसूतीनंतर नेमकं केव्हा पूर्ववत करावं, यासाठी काय करायला हवं, याबाबत अनभिज्ञता दिसून येते. चेरी शुगर उबी-इगो लिखित ‘Sex after a baby’ या पुस्तिकेत या विषयाचा ऊहापोह करताना नमूद केलं आहे- ‘प्रसूतीनंतर स्त्रीनं लैंगिकदृष्टय़ा केव्हा सक्रिय व्हावं, याचा खरं तर निश्चित कालावधी किंवा ‘वेटिंग पीरियड’ नसतो. तरीही अनेक डॉक्टर्स चार ते सहा आठवडे थांबण्याचा सल्ला देतात. पण हा कालावधी ठरवताना प्रसूती नैसर्गिक आहे की शस्त्रक्रियेद्वारे झाली आहे, तसंच स्त्रीची शारीरिक-मानसिक अवस्था कशी आहे, यावरून ते ठरवणं अपेक्षित असतं.’ थोडक्यात, प्रसूतीनंतर सहा आठवडे जोडप्यानं जवळीक करू नये असं निसर्ग बजावत नाही. काही स्त्रियांची प्रसूती ही अगदी विनासायास झालेली असते. त्यामुळेच नात्यात मोकळेपणा असेल, तर अशा जोडप्यांनी बाळाच्या संगोपनाची जबाबदारी वाटून घेतानाच प्रणयसुखाचाही आस्वाद घेण्यात अडथळे येत नाहीत.

इचलकरंजी येथील स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. मंदार देशपांडे म्हणतात, ‘‘प्रसूती शस्त्रक्रियेद्वारे- म्हणजे ‘सिझेरियन’ झाली असेल किंवा प्रसूतीदरम्यान काही गुंतागुंत उद्भवली असेल, तर गर्भाशयाचा आकार, तसंच योनीमार्ग पूर्ववत होण्यास दीड महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे अशा प्रकरणांत प्रसूतीपश्चात शरीरसंबंध प्रस्थापित करण्यासाठी सहा आठवडे थांबण्याचा सल्ला दिला जातो. तसंच प्रसूतीनंतरची कामेच्छा ही अनेक घटकांवर अवलंबून असते. प्रसूतीदरम्यान स्त्रीमध्ये मोठय़ा प्रमाणावर हॉर्मोनल बदल होत असतात. याशिवाय तिचा प्रत्यक्ष प्रसूतीचा अनुभव कसा होता, याचाही परिणाम होतो. काही वेळा प्रसूतीचा अनुभव भीतीदायक किंवा यातनामय असू शकतो. त्यामुळे प्रसूतीपश्चात पुन्हा शरीरसंबंध प्रस्थापित करणं ही अशा वेळी अग्रक्रमाची बाब ठरू शकत नाही, हे जोडप्यांनी- विशेषत: पुरुषांनी समजून घ्यायला हवं.’’

 निद्रा आणि काम या मनुष्याच्या दोन मूलभूत गरजा बाळाच्या आगमनानंतर शब्दश: पणाला लागतात. सलग काही तास झोप मिळणंदेखील स्त्रियांसाठी चैनीची बाब ठरते. उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून विचार करताही बाळंत स्त्रीची झोप खूप सावध असते. अगदी अश्मयुगीन काळातसुद्धा गुहेत राहताना बाळाचं श्वापदांपासून रक्षण करणं ही आईची जबाबदारी असायची. दुसरीकडे त्या काळीही माणूस टोळय़ांमध्ये राहात असल्यानं बाळाच्या संगोपनाची जबाबदारी समूहातल्या स्त्रियांमध्ये विभागली जात असावी. आज एकविसाव्या शतकात मात्र विभक्त कुटुंबांमध्ये बाळाची जबाबदारी ही जोडप्यांवर आणि बहुतेकदा स्त्रीवर एकटीवरच पडते.

 या संदर्भात डॉ. मंदार सांगतात, ‘‘प्रसूतीनंतर लगेच शरीरसंबंधांची अपेक्षा करण्यापेक्षा पुरुषांनी बाळाच्या संगोपनात सक्रिय सहभाग नोंदवायला हवा. बाळामुळे जागरण होत असेल, तर ती केवळ पत्नीची जबाबदारी नसून, आपलीही जबाबदारी आहे, याचं भान पुरुषांनी ठेवायला हवं. यामुळे त्यांचं पत्नीबरोबरचं नातं अधिक दृढ होईल. तसंच प्रसूतीनंतर कामजीवन पूर्वपदावर आणताना सुरुवातीच्या काळात समागमाचा आग्रह धरण्यापेक्षा प्रणयाद्वारे (फोरप्ले) समाधान मिळवण्याचा प्रयत्न करावा. पत्नी मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा सक्षम झाल्यावरच संबंध ठेवण्याचा विचार करावा.’’

बाळ झाल्यावर एकांत न मिळणं ही अनेक जोडप्यांची (विशेषत: एकत्र कुटुंबातल्या) समस्या असते. कामजीवन, शरीरसंबंध, या विषयांवर कोणतंच भाष्य न करण्याचा अनेक कुटुंबांचा जणू अलिखित नियम असतो. दुसरीकडे घरातल्या वडीलधाऱ्यांशी आपल्या खासगी आयुष्याबद्दल कसं बोलायचं असा संकोचही बऱ्याचदा असतो. त्यामुळे मग या विषयाला हात न घालता बाळ खोलीत असतानाच ते झोपल्यावर बहुतेक जोडपी प्रणय करतात. ‘The Big Book of Parenting Solutions’ या पुस्तकाच्या लेखिका डॉ. मिशेल बॉर्बा आपल्या पुस्तकात नमूद करतात, ‘बाळ सहा महिन्यांपेक्षा लहान असेल तर जोडप्यांनी काळजी करण्याचं कारण नाही. पण बाळ त्यापेक्षा मोठं असेल, तर या दृश्यांची त्याच्या मनात भीती बसू शकते. ‘बाबा आईला त्रास देतायत’ असा त्याचा समज होऊ शकतो. त्यामुळे मुलांसमोर शरीरसंबंध न ठेवण्याचं पथ्य जोडप्यांनी पाळायला हवं.’

प्रसूती हा स्त्रीसाठी मोठा उलथापालथीचा काळ असतो, हे उलगडताना स्त्रीरोगतज्ज्ञ आणि सेक्स काउन्सिलर डॉ. मदन कांबळे सांगतात, ‘‘एकत्र कुटुंब असो की विभक्त, बाळाची पहिली जबाबदारी आईचीच मानली जाते. त्यामुळे दिवसभर बाळाची काळजी घेऊन ती थकून गेलेली असते. याशिवाय प्रसूतीच्या थकवणाऱ्या अनुभवातून बाहेर पडत असताना कोणत्याही स्त्रीला चुकूनही परत लगेच गर्भधारणा होऊ नये, असं मनोमन वाटत असतं. त्यामुळेही संबंध टाळण्याकडे तिचा कल असू शकतो.’’

प्रसूतीपश्चात कुटुंब नियोजन कसं करावं, याविषयीही अनेकांच्या मनात प्रश्न असतात. बाळाला स्तन्यपान सुरू असेल, तर ते स्त्रीसाठी नैसर्गिक गर्भनिरोधकाची भूमिका बजावतं का, असाही प्रश्न असतो. या संदर्भात डॉ. मंदार सांगतात, ‘‘बाळ जर पूर्णपणे आईच्या दुधावर अवलंबून असेल आणि बाळाला स्तन्यपान दिवसरात्र नियमित सुरू असेल, तर साधारण पहिल्या तीन महिन्यांपर्यंत संबंध ठेवल्यास गर्भधारणा संभवत नाही. पण प्रसूतीनंतर स्त्रीला जेव्हा मासिक पाळी सुरू होते, तेव्हा हे ‘नॅचरल काँट्रासेप्शन’ संपतं. प्रसूतीनंतर संबंध ठेवताना जोडप्यांना गर्भनिरोधक वापरणं किंवा प्रोजेस्टेरॉनच्या गोळय़ा किंवा इंजेक्शन घेणं असे पर्याय असतात. बाळाला स्तन्यपान सुरू असताना आईला एरवीच्या गर्भनिरोधक गोळय़ा घेता येत नाहीत.’’

अनेक स्त्रियांना प्रसूतीनंतर नैराश्य (पोस्टपार्टम डिप्रेशन) येतं. चिंता, काळजी, उदासपणा, टोकाची भावनिक आंदोलनं, अशी याची लक्षणं असतात. प्रसूतीनंतरच्या सक्रिय कामजीवनामुळे यावर मात करता येऊ शकते का, याविषयी बोलताना सायकियाट्रिस्ट आणि सेक्स थेरपिस्ट डॉ. निकेत कासार सांगतात, ‘‘प्रसूतीनंतरचं नैराश्य प्रणय-समागमामुळे कमी होतं, असं दर्शवणारं संशोधन नाहीये. कारण मुळात प्रसूतीपश्चात येणारं नैराश्य स्त्रीमध्ये अचानक झालेल्या हार्मोनल बदलांमुळे होत असतं. दुसरीकडे सेक्स ही केवळ शारीरिक गरज नसून, भावनिक गरजही असते. त्यात आपल्या समाजात गर्भारपणादरम्यान संबंध ठेवले जात नाहीत, त्यामुळे साधारण वर्षभर पती-पत्नी दोघांचीही लैंगिक उपेक्षा झालेली असते. त्यामुळे पती-पत्नीतलं नातं नव्यानं दृढ होण्यासाठी प्रसूतीपश्चात कामजीवन निश्चित मोलाची भूमिका बजावू शकतं. तसंच याचा पालकत्वाची नव्यानं आलेली जबाबदारी स्वीकारण्यातही फायदा होतो.’’ प्रसूतीपश्चात स्त्रियांची असलेली मानसिकता आणि या वेळी संबंध ठेवताना घ्यायची काळजी, याविषयी बोलताना डॉ. निकेत म्हणतात, ‘‘पत्नीचा स्वभाव ‘पझेसिव्ह’ असेल, तर प्रसूतीनंतर पती जवळ न आल्यास त्यांच्यात असुरक्षिततेची भावनाही निर्माण होऊ शकते. आपल्या अनुपस्थितीत त्याचं बाहेर कुठे अफेअर सुरू झालं का? त्याला आता मी आवडत नाही का? असे विचार डोकावू शकतात. त्यामुळे पुरुषांनीही पत्नी बालसंगोपनात गुंतली असल्यानं जवळीक टाळण्याकडे कल ठेवण्यापेक्षा संवाद कसा कायम राहील याकडे लक्ष द्यावं.’’

प्रसूती नैसर्गिक असेल तर नंतर योनीमार्ग सैल होण्याची (Loose vagina) समस्या निर्माण होऊ नये, यासाठी गर्भारपणात हल्ली बालसंगोपनाच्या वर्गात ‘कीगल’ व्यायामप्रकारांविषयी माहिती दिली जाते. योनीमार्गातून प्रसूती होत असताना या ठिकाणचे स्नायू ताणले जातात आणि नंतर नैसर्गिकपणे पूर्ववत होतात. पण प्रसूतीला खूप वेळ लागला किंवा अन्य काही कारणांनी हे स्नायू खूप काळ ताणलेल्या अवस्थेत राहिल्यास ते पूर्ववत होण्यासाठी विशिष्ट व्यायामप्रकारांचा फायदा होतो. काही स्त्रियांच्या बाबतीत हे स्नायू पूर्ववत व्हायला तीनेक महिन्यांचा कालावधी लागू शकतो. याविषयी बोलताना डॉ. मंदार म्हणतात, ‘‘कीगल व्यायामप्रकारांबरोबरच हल्ली लेझर उपचारांद्वारेही योनीमार्ग पूर्ववत करण्याची सोय आहे. पण प्रसूतीनंतर जोडप्यांनी लगेच समागमाचा आग्रह धरण्यापेक्षा प्रणयावर भर दिल्यास योनीमार्ग पूर्ववत होण्यास पुरेसा वेळ मिळू शकतो.’’

नैसर्गिक प्रसूतीमुळे योनीमार्ग काही प्रमाणात सैल होतो हे खरं असलं, तरी त्याकडे पुरुष कसं बघतात हेदेखील महत्त्वाचं ठरतं, हे अधोरेखित करताना डॉ. निकेत सांगतात, ‘‘लैंगिक सुख हे केवळ योनीमार्ग सैल आहे की घट्ट (टाइट) आहे, यावर अवलंबून नसतं, हे पुरुषांनी समजून घ्यायला हवं. तसंच यासाठी ठरावीक व्यायामप्रकार असून, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली ते शिकून घेऊन केल्यास स्त्रियांना त्याचा निश्चित फायदा होतो. त्यामुळे यावरून कोणतीही शेरेबाजी टाळावी आणि गोष्टी पूर्ववत होण्यासाठी वेळ द्यावा.’’ प्रसूतीनंतरचं कामजीवन सुरळीत करण्यात पती-पत्नी दोघांचंही योगदान असणं आवश्यक ठरतं. त्यासाठी आवश्यकता भासल्यास वैद्यकीय मदत घेणंही गरजेचं असतं. प्रसूतीनंतर बाळाची जबाबदारी पेलण्यासाठी सज्ज होतानाच पती-पत्नीचं मूळ नातंही त्यामुळे आणखी दृढ होऊ शकतं.