निरंजन मेढेकर

‘जागतिक आरोग्य संघटने’ नं काम-व्यसनाधीनता- अर्थात सेक्स अ‍ॅडिक्शनला ‘मानसिक आरोग्य विकृती’ म्हणून घोषित केलं आहे. सतत मनात येत राहणारे लैंगिक विचार किंवा प्रेरणा आणि ती लैंगिक वर्तनात बदलणं, ही काम-व्यसनाधीनता. सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ ही समस्या असेल, तर त्या व्यक्तीला काम-व्यसनांध म्हणता येतं. याचं जागतिक प्रमाण पाच पुरुषांमागे एक स्त्री असं आहे. जोडीदारांचं आयुष्य नरक करणाऱ्या या व्यसनाधीनतेला वेळीच ओळखून त्यावर ठोस उपचार करायला हवेत.   

Loksatta vyaktivedh John Barth The Floating Opera Novel Novel writing
व्यक्तिवेध: जॉन बार्थ
kanyadan, valid marriage,
वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !
it is bothering because social media is ahead of the times and we are behind
फरफट होतेय कारण समाज माध्यमे काळाच्या पुढे आहेत आणि आपण मागे…
woman works ten time then men
‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

प्रकरण एक

एका पासष्टीच्या बाईंनी त्यांच्या पतीचं निधन झाल्यावर अक्षरश: सुटकेचा नि:श्वास सोडला होता. लग्न झाल्यापासून दररोज त्यांच्या पतीची त्यांच्याकडून शरीरसुखाची मागणी असायची. काहीही झालं तरी ते ती पूर्ण करून घ्यायचे. वास्तविक पूर्वी त्यांचं घर लहान होतं; पण बाजूला मुलं झोपलीयत किंवा पत्नीची मासिक पाळी सुरू आहे, या कशाचाही विचार न करता ते महाशय कधी गोडीगुलाबीनं, तर बहुतेकदा जोरजबरदस्तीनं आपल्या वासना शमावायचे. ४५ वर्षांच्या संसारात या बाईंची तीन बाळंतपणं झाली. त्या प्रसूतीच्या काळातच काय ती त्यांना नवऱ्यापासून सुटका मिळायची.

प्रकरण दुसरे

आपल्या प्रोफेसर पत्नीचं कुणाबरोबर तरी ‘अफेअर’ आहे हे एका मित्राकडून कळल्यावर तिच्या पतीला अजिबात धक्का बसला नाही, कारण गेल्या सहा वर्षांत तिचं सहा वेगवेगळय़ा उच्चपदस्थ पुरुषांशी ‘अफेअर’ करून झालं होतं हे त्या पतीला माहिती होतं.

प्रकरण तिसरे

पेशानं डॉक्टर असलेल्या एका मुलीचं पंचविशीत लग्न झालं; पण लग्नाच्या पहिल्याच रात्रीत पतीनं इतका त्रास दिला, की तिला दुसऱ्या दिवशी उभंही राहता येईना. तरीही मनाची समजूत घालत ती मधुचंद्राला गेली. तिथे तर नवऱ्यानं कहरच केला. त्याला सेक्सशिवाय दुसरं काहीच सुचत नव्हतं. दोन दिवसांत परिस्थिती इतकी बिकट झाली, की एके रात्री नवरा झोपल्यावर तिनं त्या हॉटेलमधून थेट आपल्या घरी पोबारा केला.

कुटुंब न्यायालयात काम करत असताना समुपदेशक अ‍ॅड. शर्मिला पुराणिक यांच्याकडे  घटस्फोटांसाठी आलेल्या जोडप्यांची गेल्या काही वर्षांतली ही तीन प्रातिनिधिक प्रकरणं आहेत. या सगळय़ांतला एक समान धागा म्हणजे जोडप्यांपैकी एकाला शरीरसंबंधांची असलेली आत्यंतिक आसक्ती. इंग्रजीत याला Compulsive Sexual Behaviour, Hypersexuality किंवा Sex Addiction म्हणजेच काम-व्यसनाधीनता म्हणून संबोधलं जातं. मागील लेखात आपण इतर वेगवेगळय़ा व्यसनांचा कामेच्छेवर आणि कामजीवनावर कसा परिणाम होतो, याचा आढावा घेतला होता. आता प्रत्यक्ष सेक्सच्या व्यसनाची व्याप्ती कशी असते त्याविषयी.

पुण्यातील मानसोपचारतज्ज्ञ डॉ. निश्चल रावळ काम-व्यसनाधीनतेविषयी माहिती देताना सांगतात, ‘‘सिगारेट-दारू अशा इतर व्यसनांसारखंच ‘हायपर सेक्शुअ‍ॅलिटी’ हेदेखील एक व्यसन आहे. अशा व्यक्तीच्या डोक्यात सतत सेक्सचा, समागमाचा विचार सुरू असतो. त्यामुळे इतर महत्त्वाच्या गोष्टींमध्ये, छंदांमध्ये त्यांचं लक्ष लागत नाही. हस्तमैथुन, प्रत्यक्ष समागम, पॉर्न साइट्स पाहात राहाणं अशा कुठल्याही माध्यमातून ते आपल्या कामवासना शमवत राहतात. कामपूर्तता नाही झाली, तर या व्यक्तींची चिडचिड व्हायला लागते. थोडक्यात, इतर कुठल्याही व्यसनात जशी व्यसनी माणसाला तल्लफ येते, तसंच इथेही क्रेव्हिंग वा तीव्र हाव असते आणि कामपूर्तता झाली नाही, तर ‘विथड्रॉवल सिम्प्टम्स’ही दिसतात.’’

  सेक्स अ‍ॅडिक्शनमागे वेगवेगळी कारणं असू शकतात, हे विशद करताना डॉ. निश्चल म्हणतात, ‘‘मेंदूमध्ये संदेशवहनासाठी सेरोटोनिन हे न्यूरोट्रान्समीटर केमिकल गरजेचं असतं. हे न्यूरोट्रान्समीटर कमी झाल्यानं ही समस्या उद्भवू शकते. याशिवाय करपलेलं बालपण किंवा लहानपणी वाटेला आलेले भीतीदायक अनुभव, शोषण हीदेखील कारणं या व्यसनाधीनतेसाठी पूरक ठरतात. याशिवाय काही रुग्णांमध्ये ती टाळता न येणारी सवय (compulsive habit) बनून जाते. उदा. कुठल्याही गोष्टीचा ताण आला की हस्तमैथुन करणं.’’

काम-व्यसनाधीनता हा गंभीर विषय असला तरी जागतिक पातळीवरही त्याची दखल अगदी अलीकडे घेण्यात आली. गेल्या काही वर्षांपासून यावर संशोधन सुरू आहे. जून २०१८ मध्ये जागतिक आरोग्य संघटनेनं (‘डब्लूएचओ’) काम-व्यसनाधीनतेला मानसिक आरोग्य विकृती (mental health disorder) म्हणून घोषित केलं आहे. ‘सततचे, वारंवार उद्भवणारे लैंगिक विचार किंवा प्रेरणा, ज्यांची परिणती लैंगिक वर्तनात होणं, म्हणजे काम-व्यसनाधीनता’ अशा शब्दांत ‘डब्लूएचओ’नं काम-व्यसनाधीनतेची व्याख्या केली आहे.

एखाद्या व्यक्तीला किती लैंगिक जोडीदार आहेत किंवा तिचं प्रत्यक्ष सेक्सचं प्रमाण किती आहे, यापेक्षाही लैंगिक वर्तन हा त्या व्यक्तीच्या आयुष्यातला मध्यवर्ती भाग झाल्यानं त्याचा थेट विपरीत परिणाम रोजच्या जीवनातल्या इतर महत्त्वाच्या गोष्टींवर होतोय का, यावरून या विकृतीचं स्वरूप ठरतं. थोडक्यात, काम-व्यसनाधीनतेमुळे कुणाला नोकरी करणं अवघड होऊ शकतं, तर कुणाला महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करणं दुरापास्त वाटू शकतं. यामुळे नातेसंबंध तुटू शकतात, घटस्फोट होतात, विवाहबाह्य संबंध घडू शकतात. ही विकृती असलेल्या मनुष्यानं कितीही प्रयत्न केला, तरी त्याच्या मनात सतत येणारे कामविषयक विचार त्याला टाळता येत नाहीत. ‘डब्लूएचओ’च्या व्याख्येनुसार सहा महिने किंवा त्यापेक्षा अधिक काळ ही समस्या असेल, तर त्या व्यक्तीला काम-व्यसनाधीनता आहे असं म्हणता येतं. या विकृतीनं नेमके किती लोक प्रभावित आहेत, याविषयी सखोल अभ्यास-सर्वेक्षण झालेलं नसलं, तरी ‘सीएनएन’ वृत्तवाहिनीच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध एका बातमीनुसार अमेरिकेच्या एकूण लोकसंख्येपैकी पाच टक्के नागरिकांना ही व्याधी असू शकते. ही विकृती स्त्रियांपेक्षा पुरुषांना अधिक ग्रासते. एकूण काम-व्यसनाधीन रुग्णांचा विचार करता, दर पाच पुरुषांमागे एक स्त्री असं प्रमाण आढळतं.

काम-व्यसनाधीनता ही केवळ कुठली पाश्चात्त्य संकल्पना नाहीये, हे लेखात सुरुवातीला दिलेल्या उदाहरणांतून स्पष्ट होतं. सांगलीच्या ‘व्यक्तित्व विकास प्रबोधिनी’ या संस्थेचे अध्यक्ष आणि मानसतज्ज्ञ पवन गायकवाड याला दुजोरा देताना सांगतात, ‘‘समुपदेशनासाठी आमच्याकडे येणाऱ्या केसेसमध्ये नवरा सतत शरीरसुखाची मागणी करतो, अशी अनेक स्त्रियांची तक्रार असते. अनैसर्गिक लैंगिक मागण्या करणं, पत्नीला पॉर्न क्लिप्स दाखवत त्यानुसार वेगवेगळय़ा प्रकारे संभोग करण्यास सांगणं, मुलांसमोर पत्नीकडे सेक्सची मागणी करणं, पत्नीनं नकार दिल्यास बळजबरी करणं, अशा समस्यांचं प्रमाण ग्रामीण भागातही वाढत आहे. टाळेबंदीपासून गेल्या तीन वर्षांत स्त्रियांकडून येणाऱ्या तक्रारींत मोठय़ा प्रमाणात वाढ दिसून आलेली आहे.’’

वैवाहिक समुपदेशनासाठी आलेल्या एका तरुणीचं उदाहरण अ‍ॅड. शर्मिला यांनी दिलं. ‘‘सत्तावीस वर्षांची ही तरुणी उच्चशिक्षित आहे. तिच्या लग्नाला जेमतेम तीन-चार महिने झालेत, पण ती नवऱ्याच्या सततच्या सेक्सच्या मागणीमुळे हताश झाली आहे. तिचं ‘वर्क फ्रॉम होम’ आहे, तर नवऱ्याचा व्यवसाय आहे. तो दिवसभरात कधीही घरी येतो आणि आल्याक्षणी समागमाची मागणी करतो. ‘मी मागणी केल्याक्षणी मला मिळालं पाहिजे’ हे त्यानं तिला बजावून ठेवलंय. इतकंच नाही, तर तिच्या सासरचेही नवऱ्याचीच पाठराखण करतात. त्यावर बोललेलं त्यांना चालत नाही. म्हणूनच काम-व्यसनाधीनता ही विकृती आहे, हे समजून घेण्याची आणि त्यासाठी जनजागृती होणं अत्यंत आवश्यक आहे.’’

पॅट्रिक कार्न्‍स यांनी १९८३ मध्ये प्रकाशित Out of the Shadows: Understanding Sexual Addiction या आपल्या पुस्तकातून काम-व्यसनाधीनता ही संकल्पना ठळकपणे मांडली. कार्न्‍स यांच्या मते काम-व्यसनाधीनता ही बऱ्याचदा आत्मसन्मानाची कमतरता असलेल्या, स्वत:ला हानी पोहोचवण्याची प्रवृत्ती असलेल्या किंवा मंत्रचळासारख्या (ऑब्सेसिव्ह कम्पल्सिव्ह ) व्याधीनं ग्रस्त असलेल्या व्यक्तींमध्ये दिसून येते. याशिवाय संप्रेरकांचा असमतोल आणि दारूची व्यसनाधीनता यांचाही थेट परिणाम व्यक्तीच्या लैंगिक वर्तनावर होऊ शकतो.

एके काळी दारूच्या व्यसनात पूर्ण बुडालेल्या गौरवनं याला दुजोरा दिला. तो सांगतो, ‘‘अल्कोहोलमुळे लैंगिकतेवर निश्चित परिणाम होतो. जवळपास दहा वर्ष दारूचं व्यसन होतं, पण नंतर मी ते कायमसाठी सोडलं. पण त्यानंतर वेगळीच समस्या सुरू झाली. तोपर्यंत दारूमुळे पूर्ण दिवस नशेत असलेल्या मला खूप मोकळा वेळ मिळू लागला आणि या मोकळय़ा वेळेत माझ्या मनात सदान् कदा सेक्सचे विचार थैमान घालू लागले. माझ्या व्यसनामुळे नोकरी कधीच सुटली होती, पण आपल्या बायकोला नोकरी आहे, ते सांभाळून ती मुलाचं-घरच्यांचं बघतेय, या कशाचाही विचार न करता मी तिला सेक्सची मागणी करायचो. शेवटी डॉक्टरांकडून उपचार घेतल्यावर हे नवीन व्यसन आटोक्यात आलं.’’

कार्न्‍स यांच्या मते, बालपणी घरच्यांकडून कशी वागणूक मिळते, यावरून मुलांच्या धारणा (core beliefs) बनतात. ज्या मुलांना घरच्यांकडून प्रेम आणि मायेची वागणूक मिळते, त्यांचं प्रौढत्वही निरोगी असतं. ते आजूबाजूच्यांवर सहज विश्वास टाकतात. याउलट अस्थिर कुटुंबातून येणाऱ्या मुलांमध्ये नकारात्मक धारणा विकसित होतात, ज्यामुळे त्यांच्यात मोठेपणी काम-व्यसनाधीनता येऊ शकते. कार्न्‍स यांनी नमूद केल्यानुसार या नकारात्मक धारणा अशा स्वरूपाच्या असतात- ‘सेक्स ही माझी सगळय़ात महत्त्वाची गरज आहे.’, ‘मी कुणीही नाहीये. माझ्यावर कुणीही प्रेम करत नाही.’, ‘मी एक अत्यंत कामचुकार आणि वाईट माणूस आहे.’

योग्य उपचारांनी काम-व्यसनाधीनता सुटू शकते, असं डॉ. निश्चल सांगतात. ‘‘मुळात आपल्याला काम-व्यसनाधीनता आहे, हे त्या व्यक्तीनं आधी मान्य करायला हवं. बऱ्याचदा त्यांना ही जाणीवच नसते. जोडीदाराकडून तक्रारी यायला लागल्यावर त्यांना हे उमजतं. औषधोपचार आणि थेरपी, असे उपचार घेतल्यास अवघ्या काही महिन्यांत काम-व्यसनाधीनता कमी होऊन संबंधित व्यक्तीचं कामजीवन सुरळीत होऊ शकतं. औषधांद्वारे सेरोटोनिन हे मेंदूतलं न्यूरोट्रान्समीटर वाढवलं जातं. या औषधाचा फायदा म्हणजे झोपेच्या गोळय़ांसारखी त्या औषधाची सवय लागत नाही. याशिवाय ‘कॉग्निटिव्ह बिहेविअरल थेरपी’सारख्या उपचार पद्धतींचाही लाभ होतो. काही महिने औषधोपचार आणि थेरपीच्या आठ-दहा सेशन्समध्ये ही व्याधी आटोक्यात येऊ शकते.’’

तीव्र स्वरूपाची चिंता, नैराश्य, यामुळेही अनेक रुग्णांमध्ये त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणून काम-व्यसनाधीनता जडल्याचं दिसून आलं आहे. आपल्या समाजात लैंगिकतेविषयी मोठय़ा प्रमाणात गैरसमज असल्यानं या विकृतीनं हैराण झालेले लोक डॉक्टरांची पायरी चढत नाहीत. तसंच आपल्या जोडीदाराला याविषयी समजलं तर काय, अशी भीतीही अनेकांच्या मनात असते. मात्र इतर व्यसनांच्या तुलनेत काम-व्यसनाधीनतेची समस्या जोडीदार समजावून घेण्याची शक्यता अधिक असते. कारण जोडीदार स्वत: सेक्स अ‍ॅडिक्ट नसला, तरी लैंगिक जाणिवा त्यांनाही असतात. त्यामुळे जोडीदाराला विश्वासात घेऊन या विषयातल्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जात या अवघड व्याधीवर योग्य उपचार घ्यायला हवेत.