नीरजा

संस्कृती ही शिल्प, संगीत, चित्र अशा विविध कला, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, लोककला, विज्ञान, तत्त्वज्ञान इत्यादीतून व्यक्त होत असते. तुम्ही करत असलेलं वाचनही या संस्कृतीचाच एक भाग असतो. आज याच कला, हीच पुस्तकं एखाद्या बॉम्बपेक्षाही स्फोटक ठरायला लागली तर उद्या सर्वच विद्यार्थ्यांनी वाचावी अशी सॉक्रेटिसपासून ते कार्ल मार्क्‍स, एंजेल, नित्शेच नाही तर महात्मा फुले, बाबासाहेब आंबेडकर आदी लेखकांची पुस्तकंदेखील विद्यापीठांच्या ग्रंथालयांतून गायब होण्याची शक्यता आहे. ज्या काळात आपण काय वाचावं, काय लिहावं हे शासनव्यवस्था किंवा न्यायव्यवस्था ठरवायला लागते त्या काळात एका लोकशाही देशाचे नागरिक म्हणून आपण जागरूक होऊन आपल्याला काय वाटतं याविषयी बोलायला हवं.

मी जेव्हा इंग्रजी हा विषय घेऊन पदवी मिळवायची, असं ठरवलं तेव्हा पहिलं पुस्तक बाबांनी (म. सु.पाटील) हातात दिलं ते चार्ल्स डिकन्सचं ‘टेल ऑफ टु सिटीज’. फ्रेंच राज्यक्रांतीवर आधारलेल्या या कादंबरीच्या सुरुवातीलाच डिकन्स म्हणतो, ‘इट वॉज द बेस्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द वर्स्ट ऑफ टाइम्स, इट वॉज द एज ऑफ विसडम, इट वॉज द एज ऑफ फुलिशनेस.. इट वॉज द सीझन ऑफ लाइट, इट वॉज द सीझन ऑफ डार्कनेस, इट वॉज द स्प्रिंग ऑफ होप, इट वॉज द विंटर ऑफ डिस्पेयर, वी हॅड एवरीथिंग बिफोर अस, वी हॅड नथिंग बिफोर अस, इन शॉर्ट, द पिरियड वॉज सो फार लाइक प्रेझेंट पिरियड’ अठराव्या शतकातला असा हा काळ पुढे प्रत्येक शतकात येत राहणार आहे याची जाणीव करून देणारी ही कादंबरी आपल्या ग्रंथालयात असणं ही अभिमानाची गोष्ट समजली जायची तेव्हा.

या कादंबरीबरोबरच हातात पडली ती मॅक्झिम गॉर्कीची ‘मदर’ कादंबरी. कार्ल मार्क्‍सच्या ‘दास कॅपिटल’ या पुस्तकानं रशियात क्रांती घडवली होती आणि कामगारांची पिळवणूक करणारी व्यवस्था उलटवली होती. अशा पुस्तकांचं भय भांडवलदार आणि हुकूमशहा यांची राज्यव्यवस्था असलेल्या कोणत्याही देशात स्फोटकांपेक्षाही जास्त वाटत असतं. रशियन राज्यक्रांती होण्याच्या काळाची पाश्र्वभूमी असलेल्या या कादंबरीतला नायक पावेल आणि त्याच्याबरोबर काम करणारे लोकही याच विचारांनी प्रभावित झालेले होते. पावेलची आई निलोवना ही कारखान्यात काम करणारी साधी, श्रमिक स्त्री असली तरी मुलाच्या कामात त्याला मदत करत होती. आपला मुलगा वेगळा विचार करतो आहे, वर्गव्यवस्थेनं केलेल्या शोषणाविरोधात आणि शोषित वर्गाच्या भल्यासाठी लढतो आहे याचा सार्थ अभिमान वाटणारी ही आई त्यानं तयार केलेली जनजागृतीसाठीची पत्रकं शासनाच्या नजरेत न येता सामान्य माणसांपर्यंत पोचवण्याचा प्रयत्न करताना दिसतेच पण त्याला शिक्षा झाल्यावरही त्यानं न्यायालयात व्यक्त केलेले विचार छापून आणून लोकांपर्यंत पोचवावेत यासाठी जिवाचं रान करते. कारण पावेल आणि त्याच्यासोबत असलेले सारेच या लढय़ामार्फत गरिबांच्या आयुष्यात प्रकाश आणण्याच्या दिशेनं पाऊल टाकताहेत याचं भान या आईला होतं. अशा अनेक आई स्वातंत्र्यलढय़ाच्या काळात आपल्याकडेही होत्या.

आम्ही लहान असताना आमचे आईवडील ज्याप्रमाणे साने गुरुजींचं ‘श्यामची आई’ हे पुस्तक आमच्या हातात ठेवायचे तसेच गॉर्कीची ही ‘आई’देखील वाचायला द्यायचे. कारण केवळ आपल्या देशातच नाही तर आजूबाजूच्या सगळ्या देशात नेमकं काय चाललं आहे, कोणत्या परिस्थितीत लोक राहताहेत, वेगवेगळ्या पातळीवर कसं शोषण होत आहे आणि त्याविरोधात तरुण मुलं कशी लढताहेत हे आम्हाला कळावं आणि आम्ही त्यावर विचार करावा असं त्यांना वाटायचं. ज्याप्रमाणे आपल्या देशातील क्रांतिकारकांच्या गोष्टी वाचून ऊर अभिमानानं भरून यायचा त्याचप्रमाणे या गोष्टीही मनात स्फुल्लिंग चेतवायच्या. छत्रपती शिवाजी, भगतसिंग यांच्याप्रमाणेच व्हॉल्टेअर, रुसो, लेनिन यांच्यासारखे लोक आपले आप्त वाटायचे. त्या त्या काळात आणि वेगवेगळ्या परिस्थितीत तयार झालेले हे नायक केवळ प्रतिमापूजनासाठी नसतात तर त्यांचे विचार आपल्या मनात रुजवून त्यानुसार वागण्यासाठी असतात याचा पाठ घरात दिला जायचा.

आज परिस्थिती बदलली आहे. सारेच चरित्रनायक प्रतीकं झाले आहेत आणि प्रत्येक समाजाच्या अस्मिता झाल्या आहेत. मग ते गौतम बुद्ध असोत, छत्रपती शिवाजी महाराज असोत, महात्मा जोतिबा फुले असोत, लोकमान्य टिळक असोत की बाबासाहेब आंबेडकर असोत. त्यांनी नेमकं काय काम केलं आहे, कोणत्या विचारधारा मांडल्या आहेत त्या समजून न घेता स्वत:ला त्यांचे शिलेदार म्हणवून घेणारे लोक रोज नव्यानं तोडफोड करताना, पुस्तकं जाळताना दिसताहेत. कोणाच्या तरी हातातलं बाहुलं बनलेले हे कार्यकत्रे त्यांच्या नेत्यांनी आदेश दिला, की कोणताही विचार न करता आपल्या तलवारी, आपल्या काठय़ा-लाठय़ा घेऊन सुसाट सुटतात आणि विचारी लोकांना ठोकून काढतात. त्यांना या लोकांच्या कामाविषयी काहीच माहीत नसतं. आपण केलेली हिंसक कृती नेमकी का केली आहे याचं उत्तर नसतं त्यांच्याकडे. ज्या देशातील बऱ्याच लोकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन यातला नेमका फरक माहीत नाही त्यांच्याकडून आणखी काय अपेक्षा ठेवणार आपण? पण लोकशाही देशात शासन आणि बुद्धिवंत यापलीकडे विचार करतात असं आपण मानत असतो. त्यामुळेच एखाद्या विद्यापीठाच्या कुलगुरूंकडून किंवा न्यायदानाच्या खुर्चीत बसलेल्या न्यायाधीशांकडून आपल्या काहीएक अपेक्षा असतातच. कारण त्या त्या खुर्चीपर्यंत पोचणारी व्यक्ती विचारी आणि विवेकाची कास धरणारी असणारच, असं आपण गृहीत धरलेलं असतं. पण आजच्या काळात जेव्हा एखाद्या न्यायाधीशालाच एखाद्या माणसाच्या घरात सापडलेली पुस्तकं स्फोटक वाटत असतील तर त्या देशाचा बुद्धय़ांक नेमका काय आहे किंवा तो देश लोकशाहीकडून नेमका कोणत्या प्रवासाला निघाला आहे याचा विचार करावा लागेल.

मला आठवतं, पुणे विद्यापीठातून एम.ए. करत असताना अमेरिकन आणि युरोपिअन साहित्यासाठी लावलेली पुस्तकं मिळवण्यासाठी पुण्याच्या ‘इंटरनॅशनल बुक स्टॉल’ आणि ‘पीपल्स बुक हाऊस’मध्ये आमचा डेरा पडलेला असायचा. मी हॉस्टेलमध्ये राहात असताना मिळणाऱ्या पॉकेटमनीमधले पैसे वाचवून अनेक पुस्तकं विकत घेतल्याचं मला आठवतंय. त्यात डी.एच. लॉरेन्सच्या ‘सन्स अँड लव्हर्स’, ‘रेनबो’, ‘लेडी चॅटरलिज लव्हर’, दोस्तोव्हस्कीच्या ‘क्राइम अँड पनिशमेंट’, ‘इडिएट’, ‘ब्रदर कारामॉझॉव’ तर टॉलस्टॉयच्या ‘अ‍ॅना कॅरेनिना’, ‘रिझरेक्शन’, आणि ‘वॉर अँड पीस’ अशा गाजलेल्या कादंबऱ्या होत्या. या सगळ्या कादंबऱ्यांसोबत वर्ग, जात, लिंग यावर आधारित भेदाविरोधात लढा देणाऱ्या लोकांनी लिहिलेल्या कथा, कविता, कादंबऱ्या, वैचारिक पुस्तकं, तसेच मनुस्मृती, वेद, संतसाहित्य, बायबल, कुराण किंवा या साऱ्यांची चिकित्सा करणारे चार्वाक, सॉक्रेटिस, नित्शे यांसारख्या विचारवंतांनी लिहिलेली पुस्तकं, चांगले लेखक आवर्जून वाचत होते, संग्रहीदेखील ठेवत होते.

एकोणिसाव्या तसेच विसाव्या शतकातले आणि आजच्या काळात लिहिणारे अनेक लेखक तर आपण सतत वाचत असतोच. कारण हे सगळे आपल्यासोबत असावेसे आपल्याला वाटतात. गंभीर लेखन करणारा कोणताही लेखक हा तुम्हाला वाढवत असतो, विचारी बनवत असतो. मग तो तुमच्या देशातला असेल की पाश्चात्त्य किंवा पौर्वात्य देशातला असेल. ‘दुसऱ्या देशात झालेल्या युद्धांशी आपला काय संबंध’ असं जर युरोपमधल्या वाचकांनी म्हटलं असतं तर मग रामायण महाभारतात झालेली युद्धं ही भारतातली आहेत, त्याचा अभ्यास करण्याची काय गरज? ती वाचायची तरी काय गरज? असं तिथले कोणी न्यायधीश सहज म्हणू शकले असते. बुद्ध आमच्या देशात नाही जन्मला म्हणून त्याचं तत्त्वज्ञान आम्हाला मान्य नाही, असं म्हणत तालिबानी प्रवृत्तीच्या लोकांनी बुद्धाच्या मूर्त्यां फोडल्याच की! उद्या सिमॉन द बोव्हार किंवा बेटी फ्रीडन यांचा स्त्रीवाद हा पाश्चात्त्य स्त्रीवाद आहे तो भारतात काय कामाचा? असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. कारण आपली तर मनुवादी व्यवस्था आहे. या व्यवस्थेविरोधात जाणारा हा स्त्रीवाद तुम्ही अभ्यासलात तर तुम्ही आपल्या पारंपरिक व्यवस्थेच्या विरोधात जाता आहात असाही आरोप होऊ शकतो.

एकूणच कोणत्याही व्यवस्थेला जाब विचारणारी पुस्तकं या जगात माणूस लिहिता झाला त्या काळापासून लिहिली जात होती आणि ती वाचलीही जात होती. त्यांच्याविरोधात असलेले लोक आणि तिथली शासनव्यवस्था या लेखकांना वेगवेगळ्या प्रकारची शिक्षाही देत होते. आपल्याच देशातील तुकारामांचे अभंग इंद्रायणीत बुडवल्याचं आपण ऐकलं आहेच. अर्जेटिनामध्ये सत्तर ऐंशीच्या दशकात हुकुमशाही राजवट असतानाच्या काळात एका युवकाच्या हातात

‘द रेड अँड ब्लॅक’ या शीर्षकाचं पुस्तक सापडलं म्हणून त्याला कम्युनिस्ट ठरवून शिक्षा करण्यात आल्याचा उल्लेख ‘लीळा पुस्तकांच्या’ या नितिन रिंढे यांच्या पुस्तकात आला आहे. त्या काळात सरकारच्या भयानं अनेक लोकांनी आपल्याकडची कित्येक पुस्तकं शौचालयात जाळून टाकल्याच्या कहाण्या सांगितल्या जातात. ज्या रशियात क्रांती झाली होती त्याच देशात पुढे फॅसिस्ट नेत्यांच्या काळात कित्येक लेखकांना तुरुंगात डांबलं गेल्याच्या कथा आपण वाचल्या आहेत. अशा लेखकांनी लिहिलेली ही पुस्तकं भाषिक चौकटीत कधीच अडकली नाहीत. ती अनुवादाच्या रूपानं जगभरात पोचली. हे असे अनेक लेखक-लेखिका व्यवस्थेला जाब विचारत होते, आपल्या लेखनानं आणि विचारांनी क्रांती घडवून आणत होते. म्हणून तर एक विचारी आणि विवेकी समाज घडत होता. हे असे लेखक आणि त्यांची पुस्तकं याविषयी आपल्या प्राध्यापक, डॉक्टर, वकील, न्यायाधीश अशा बुद्धिमान लोकांनी नक्कीच ऐकलं असेल. अगदी राजकारणात असलेल्या लोकांचंही पूर्वीच्या काळात थोडंफार वाचन असायचं. स्वातंत्र्यपूर्व काळातील आणि नंतरच्या काही वर्षांतील राजकीय नेत्यांना वाचनाची आवड होतीच पण लिहिणाऱ्यांविषयी आत्मीयता, आदरही होता.

पंडित जवाहरलाल नेहरू, यशवंतराव चव्हाण, पी. व्ही. नरसिंह राव यांच्यासारखे अभ्यासू आणि वाचणारे राजकीय नेते आज हाताच्या बोटांवर मोजण्याएवढेही नाहीत हे मात्र खेदानं नमूद करावं लागतंय. काही सन्मानीय अपवाद वगळता आज नोकरशाहीतील उच्चपदी असलेल्या उच्चशिक्षित लोकांचंही वाचन कितपत असेल हासुद्धा अभ्यासाचा विषय आहे. अशा परिस्थितीत अचानक एक दिवस ‘वॉर अँड पीस’ (मग ते टॉलस्टायचं असेल की त्याचसारख्या नावाने आणखी कोणत्या लेखकानं लिहिलेलं असेल) किंवा ‘दास कॅपिटल’ घरात सापडलं म्हणून देशाच्या सुरक्षिततेला धोका निर्माण झाल्याचं सांगितलं जात असेल तर आश्चर्य वाटायला नको.

आपल्याकडे न्यायव्यवस्था ही नेहमी डोळ्यावर पट्टी बांधलेली दाखवली जाते. पण असं असलं तरी आपल्या या न्यायव्यवस्थेनं आजवर अनेक विचारी आणि विवेकाची कास धरणारे निकाल दिले आहे. गेल्या सत्तर वर्षांतील महत्त्वाचे निकाल पाहिले तर ते आपल्या लक्षात येईल. अर्थात, या व्यवस्थेतही माणसंच काम करत असतात. त्यामुळे त्यांची लहानपणापासून झालेली वाढ, विचार करण्याची पद्धत या गोष्टीही कळत-नकळत त्यांच्या सार्वजनिक आणि प्रशासकीय जीवनात काम करत असतात. उदाहरणार्थ, तुमच्या मनात जर धर्म, वर्ग, जात, वर्ण, लिंगव्यवस्थेविषयी काही पूर्वग्रह असतील तर हीच व्यवस्था अनेकदा मजेशीर आर्ग्युमेंट्सही करते. मला आठवतं, काही वर्षांपूर्वी एक घटस्फोटाचे प्रकरण न्यायालयात आले होते. एका स्त्रीच्या नवऱ्याची बदली अंदमानला झाली आणि त्या स्त्रीनं तिचं करिअर सोडून त्याच्याबरोबर अंदमानला यावं असा नवऱ्याचा हट्ट होता. तो न जुमानल्यानं घटस्फोटाची केस दाखल झाली होती. त्या वेळी आमचे भारतीय संस्कृतीत वाढलेले न्यायाधीश म्हणाले होते, ‘राम चौदा वर्षे वनवासाला गेला तेव्हा कसलाही विचार न करता सीता जशी त्याच्या मागे गेली तसं तुम्ही अंदमनाला नवऱ्याबरोबर जायला हवं. कारण हीच आपली संस्कृती आहे.’

संस्कृतीच्या भ्रामक कल्पना मनात बाळगून असलेल्या लोकांना संस्कृती म्हणजे शोषण नाही तर सर्वार्थानं वाढणं असतं याची कल्पना नसते. संस्कृती ही शिल्प, संगीत, चित्र अशा विविध कला, वेगवेगळ्या प्रकारचं साहित्य, लोककला, विज्ञान, तत्त्वज्ञान इत्यादीतून व्यक्त होत असते. तुम्ही करत असलेलं वाचनही या संस्कृतीचाच एक भाग असतो. आज याच कला, हीच पुस्तकं, एखाद्या बॉम्बपेक्षाही स्फोटक ठरायला लागली तर उद्या सर्वच विद्यार्थ्यांनी वाचावी अशी सॉक्रेटिसपासून ते कार्ल मार्क्‍स, एंजेल, नित्शेच नाही तर फुले, आंबेडकर इत्यादी लेखकांची पुस्तकंदेखील विद्यापीठांच्या ग्रंथालयांतून गायब होण्याची शक्यता आहे.

ज्या काळात आपण काय वाचावं, काय लिहावं हे शासनव्यवस्था किंवा न्यायव्यवस्था ठरवायला लागते त्या काळात एका लोकशाही देशाचे नागरिक म्हणून आपण जागरूक व्हायला हवं. या सगळ्याविषयी आपल्याला काय वाटतं याविषयी बोलायला हवं. अल्बर्ट कामूनं त्याच्या ‘रिबेल’ या पुस्तकात सुरुवातीलाच म्हटलंय, ‘टु कीप क्वायट इज टु अलाव युवरसेल्फ टू बिलीव्ह दॅट यू हॅव नो ओपिनियन्स, दॅट यू वॉन्ट नथिंग, अ‍ॅन्ड इन सर्टन केसेस इट अमाउंट्स टु रियली वॉन्टिंग नथिंग’.

आपल्या खासगी तसंच सामाजिक किंवा राजकीय आयुष्यातही आपल्याला पटत नसलेल्या गोष्टींविरोधात तोंड उघडणं हे कायम महत्त्वाचं असतं. कधी कधी माणसं जपताना आणि कधी कधी आपले हितसंबंध जपताना आपण आपल्याला नेमकं काय वाटतं, काय म्हणायचं आहे हे विसरून जातो आणि एक क्षण असा येतो की आपण केवळ मान डोलावणारा नंदीबैल होत जातो. विचार करायचं थांबतो. एवढंच नाही तर आजूबाजूला चाललेल्या चुकीच्या गोष्टींना अप्रत्यक्षपणे पाठिंबाही द्यायला लागतो. आपल्याला काही मत असू शकतं हे विसरून जातो. ते विसरायचं नसेल तर वाचत राहणं, चर्चा करणं महत्त्वाचं आहे आणि त्यासोबतच आपलं एक ठाम विधान करणंही गरजेचं आहे. वरवर माणुसपणाविषयी बोलणाऱ्या पण आतून जनतेला सतत असुरक्षिततेच्या छायेत ठेवणाऱ्या, त्यांनी काय खावं, काय ल्यावं, काय पाहावं आणि काय वाचावं हे ठरवताना त्यांचं दमन करू पाहणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारणारी पुस्तकं आणि माणसं जर संपून गेली तर आपल्या बाजूनं, आपल्या प्रश्नांच्या बाजूनं उभं राहण्यासाठी पुढील काळात कोणीही शिल्लक राहणार नाही, हे ध्यानात घ्यायला हवं.

neerajan90@yahoo.co.in

chaturang@expressindia.com