डॉ. अंजली जोशी

नैराश्यग्रस्ताला समजून घेणं सोपं नसतं, विशेषत: जर ते सलग काही वर्ष सुरू असेल तर. अनेकदा मानसोपचार, समुपदेशन यांचा मारा करूनही त्यातून बाहेर येणं त्या व्यक्तीला शक्य होत नाही. अशा वेळी गोड नाही, पण निदान आश्वासक शब्दांची आवश्यकता असते. मात्र अनेकदा आईवडील मुलांच्या कमकुवत मनातल्या वादळाला समजून घेऊच शकत नाहीत. मुलांच्या जिवापेक्षा मोठं होतं ते त्यांचं परीक्षेतलं यश. काही अनर्थ घडण्याआधी पालकांनी वेळीच सावध व्हायला हवं..

chaturang article, mazhi maitrin chaturang
माझी मैत्रीण : जिवाभावाची…
marathi play savita damodar paranjape
‘ती’च्या भोवती..! अगम्य शक्तीमागची कुचंबणा!
readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
The conservation role of women
स्त्रियांची जतनसंवर्धक भूमिका

झोपायच्या खोलीचं दार जोरात वाजलं. मग कर्रऽऽऽ आवाज करत उघडलं. उजेडाची तिरीप एकदम आत आली. माझे डोळे टक्क उघडे होते, तरीही आतल्या मिट्ट काळोखात भसकन आलेला उजेडाचा कवडसा मला नकोसा वाटू लागला. समोर बाबांची आकृती दिसली.
‘‘चिन्मय, दुपारचे १२ वाजले. किती वेळ झोपून राहणार आहेस? ऊठ. बाहेर ये. बोलायचंय तुझ्याशी!’’ माझ्या अंगावरचं पांघरूण खसकन ओढत त्यांनी पंखा बंद केला आणि दिवा लावला. टय़ूबलाइटच्या भगभगीत प्रकाशानं माझे डोळे दिपले. डोकं ठणकायला लागलं. त्यांच्या त्रासिक स्वरावरून त्यांना काय बोलायचंय याचा अंदाज मला आला. पलंगावरून उठण्याचा मी प्रयत्न करू लागलो, पण पाय जडशीळ झाले होते. उठण्याचं त्राण नव्हतं. मी कसाबसा पलंगावर बसून राहिलो.

‘‘अरे, काय दशा करून घेतली आहेस स्वत:ची? आंघोळ नाही, धड खात-पीत नाहीस. उठलाच नाहीस तर उत्साह कसा वाटेल?’’ आई बोलत होती.
‘‘पुष्कळ झालं आता समजावून सांगणं. आतापर्यंत खूप ऐकलं त्याचं, म्हणूनच ही वेळ आलीय. आता मुकाटय़ानं बाहेर ये. आमच्या सहनशक्तीचा आता कडेलोट झालाय.’’ बाबांचे वरच्या पट्टीतले शब्द माझ्या मनात बाणासारखे रुतून बसले. जे विचार मी थांबवण्याचा मी आटोकाट प्रयत्न करत होतो, ते परत उफाळून वर आले. आईबाबांनाही मी नकोसा झालोय. त्यांना मी मनस्ताप देतोय. या अख्ख्या जगात मी कुणालाच आवडत नाही. काय उपयोग आहे असल्या जगण्याचा?..

‘‘ऊठ झटपट. वेळ काढू नकोस.’’ बाबा तिथेच उभे राहून सूचना देत होते. बाहेर सोफ्यापर्यंत येताना एकेक पाऊल म्हणजे मणामणाचं ओझं वाटत होतं. अंग दुखत होतं. मी दिवाणखान्यावरून नजर फिरवली. सुबक मांडलेले सोफे, झुळझुळीत पडदे, जागोजागी मांडलेल्या शोभिवंत वस्तू.. ते सगळं माझ्या अंगावर आलं. हे सगळं आईबाबांनी उभारलेलं आहे. माझा काहीच वाटा नाही यात! मी नुसताच भारभूत होऊन राहिलो आहे. अशा जगण्याला अर्थ तरी काय? सोफ्याचा मऊ उबदार स्पर्शही मला टोचू लागला.आईबाबा समोरच्या सोफ्यावर बसले होते. ‘‘चिन्मय, अरे चाललंय तरी काय तुझं? ही शेवटची टर्म आहे. परीक्षेला बसला नाहीस तर वर्ष जाईल हातातून. आधीच एक वर्षांची गॅप पडली आहे. डिप्रेशन आहे, असं म्हणतोस; पण ते घालवण्यासाठी स्वत:हून प्रयत्न करायला नको का? दिवसच्या दिवस झोपून राहून डिप्रेशन जाईल का आपोआप?’’ आई म्हणाली.

‘‘डिप्रेशन वगैरे नुसती थेरं आहेत झालं! हे नुसतं ‘अटेन्शन सीकिंग बिहेव्हिअर’ आहे. दिवसभर लोळत पडायचं, म्हणजे परीक्षेतून सुटका! घरी आहेतच आईवडील आयतं द्यायला. बारावीपासून चाललंय हे. नेमकं परीक्षेच्या वेळीच कसं येतं डिप्रेशन?’’ बाबांच्या तोंडातून फूत्कारांसारखे शब्द बाहेर पडत होते आणि माझ्या मनावरची काळोखी अधिकच गडद व्हायला लागली..

‘‘चिन्मय, परीक्षा तर द्यायला हवी ना? डिप्रेशनमुळे परीक्षा देणं टाळता कसं येईल? पुढे तर जायला पाहिजे ना?’’ आई दुजोरा देत म्हणाली.
मी परीक्षा टाळण्यासाठी नैराश्याचा वापर करतोय, असं म्हणायचंय यांना. मलाही नाही आवडत असं झोपून राहणं. अशा अवस्थेबद्दल मी स्वत:चा कितीदा तरी धिक्कार करतो. मलाही नीट कळत नाही असं का होतं ते! परीक्षेचा नुसता विचार आला तरी वाटत राहतं की, काही तरी भयंकर घडणार आहे.. सहन न होणारं. तुम्ही कधी अनुभवलं नाहीये ना? मग नाही कळणार ते तुम्हाला! सख्खे आईवडील असूनही हे पोहोचत नाही यांच्यापर्यंत. माझे शब्द मनात भिरभिरत राहिले.

‘‘आतापर्यंत सायकिअॅट्रिस्ट झाले, समुपदेशक झाले. थोडीफार सुधारणा होतेय असं वाटलं, की परत येरे माझ्या मागल्या! नेटाने प्रयत्न करायला नकोत.’’ बाबांच्या शब्दांचा प्रत्येक घाव मला जखमी करत होता.जखम इतकी भळभळ वाहू लागली, की त्यांचं पुढचं बोलणं मला ऐकू येईनासं झालं. मनात विचारांचं थैमान चालू झालं. मी प्रयत्न केले नाहीत? तुम्हाला माहीत नाही, पण खूप आधीपासूनच व्हायचं मला असं. तेव्हा जाणवलं नव्हतं, पण आता संगती लागतेय. लहानपणापासून तुम्ही सांगायचात, ‘‘तू हुशार आहेस. टॉपमध्ये यायला पाहिजेस.’’ परीक्षेला बसताना, स्विमिंगच्या, नाही तर बुद्धिबळाच्या स्पर्धामध्ये भाग घेताना तुमचे शब्द मला आठवत राहायचे. आपला परफॉर्मन्स कसा होईल याचं दडपण यायचं. कधी कधी या दडपणानं फायदाही व्हायचा. बक्षिसं मिळायची, वरचा नंबर यायचा; पण जेव्हा तसं व्हायचं नाही, तेव्हा मी मिटून जायचो, कोशात जायचो. स्वत:बद्दल प्रचंड घृणा यायची. त्यात कुणी बोललं, ओरडलं, तर तो कोश अधिकच घट्ट विणला जायचा. मग मित्र-मैत्रिणीही नको व्हायचे. आधी फारसे नव्हतेच; पण जे होते, त्यांच्या तुलनेत स्वत:चं खुजेपण अधिकच खुपायचं. नकारात्मक विचारांच्या लाटा एकामागून एक अंगावर यायच्या. आटोकाट प्रयत्न करून त्या थोपवायचो. असे विचार करायचे नाहीत, असं बजावत राहायचो स्वत:ला.

तुम्हाला कळलं, ते बारावीच्या स्पर्धात्मक परीक्षेत मला कमी गुण पडले तेव्हा! सगळं रिकामं वाटू लागलं होतं. भविष्यात अंधार दिसू लागला. आयुष्यात आपण काहीच भव्यदिव्य करू शकणार नाही, याची खात्री पटली. एक अत्यंत सामान्य प्रतीचं आयुष्य आता कंठावं लागणार, या जाणिवेनं मेंदूचा भुगा व्हायची पाळी आली. मग पुन्हा यायला लागल्या नकारात्मक विचारांच्या लाटा. त्या वेळेला त्या थोपवता येत नव्हत्या. मी त्यात गटांगळय़ा खाऊ लागलो. खोलीच्या बाहेर पडण्याची इच्छा होईना, आत्महत्येचे विचार डोकावू लागले.. तेव्हाही तुम्ही हेच सांगत होतात की, ‘स्वत:वर काम कर.’ पण माझी शक्ती दिवसेंदिवस ढासळत होती. मग नाइलाजानं सायकिॲट्रिस्टकडे नेलंत. औषधं चालू झाली. ती पचनी पडेपर्यंत डोळे उघडताच येणार नाही अशी १२-१२ तास झोप लागायची. सगळं रुटीन डिस्टर्ब झालं. औषधांचा तिटकारा येऊ लागला आणि त्यात धरसोड होऊ लागली. नंतर समुपदेशन सुरू झालं. नकारात्मक विचारांचं चक्र कसं थांबवायचं याची तंत्रं कळत गेली, गाडी हळूहळू रुळावर येत गेली. नकारात्मक विचार हळूहळू पिछाडीला जाऊ लागले. मग ‘आता तूच स्वत:ला बाहेर काढलं पाहिजेस,’ असं सांगून मग तुम्ही सर्व ट्रीटमेंट थांबवलीत.

पण तुम्हाला माहीत आहे का, की मला त्याचंही दडपण येतं. एकटय़ानं निभावून नेण्यात मी कमी पडेन, अशी शंका मन कुरतडत राहते. नकारात्मक विचार खोल कुठे तरी दबा धरून बसलेले असतात. कुठल्या तरी दुबळय़ा क्षणी ते उसळी मारून वर येतात. त्यांच्याशी झगडण्याचा मी प्रयत्न करत राहतो; पण ते सहजासहजी पिच्छा सोडत नाहीत. आधीच्या टर्मपर्यंत कसाबसा सावरून अभ्यास करत होतो. या टर्ममध्येही अभ्यास केलाय; पण ही टर्म निर्वाणीची! यावर माझं भविष्य ठरणार. परीक्षेचं वेळापत्रक जाहीर लागलं आणि खटका दाबला गेला. प्रयत्नपूर्वक जमवलेली उमेद क्षणार्धात खच्ची झाली. आधीच ढासळलेला आत्मविश्वास अधिकच लोळागोळा होऊन खाली पडताना दिसतोय. भावना इतक्या काठोकाठ भरल्या जातात, की कुठल्याही क्षणी त्या उतू जातील, असं वाटत राहतं. आवेग भरून येतो, रडावंसं वाटतं. ‘शून्य’पणाची जाणीव घेरून टाकते. पुढे चाललेली पावलं परत मागे जायला लागतात. हे सगळं मी एंजॉय नाही करत!

माझे मित्रमैत्रिणी माझ्या पुढे जात असताना स्वत:ची अशी दुर्दशा बघणं हे मला आनंददायी असेल असं तुम्हाला वाटतं का? समुपदेशनात शिकलेली तंत्रं मी आठवून पाहतोय. मोटिव्हेशनल व्हिडीओज् पाहतोय; पण या वेळी माझं एकटय़ाचं बळ कमी पडतंय. मला प्रोफेशनल मदत हवीय. तुमची मदत हवीय. आईबाबांना हे ओरडून सांगावंसं वाटत होतं; पण शब्द बाहेर पडत नव्हते. ‘‘आता एकही पैसा खर्च करायचा नाही. सायकिॲट्रिस्ट नको की समुपदेशक! औषधं घेतलीस की नुसत्या झोपा काढतोस. त्यांचा काही फायदा नाही. समुपदेशकानं सांगितलेल्या गोष्टींचा अवलंब नको का करायला? इतका पैसा ओतलाय आतापर्यंत; पण उपयोग शून्य!’’ बाबा बोलतच होते.आत एकदम खटका दाबला गेला, विचारांच्या ठिणग्या पेटत चालल्या. त्यांचा भडका उडून एक धुमसणारी ज्वाला तयार झाली. शब्द वेडेवाकडे होऊन बाहेर पडले.. ‘‘स्वत:च्या मुलासाठीच पैसा खर्च करताय ना? मग सतत ते बोलून का दाखवताय? आणि मी काय उधळतोय तुमचा पैसा पाटर्य़ावर किंवा जुगारावर?’’

बाबांचा तारस्वरातला आवाज, ‘‘बघ बघ.. कसा आगाऊपणे बोलतोय. म्हणे डिप्रेशन आहे. मग समोरच्याला शब्दांत पकडता येणं बरं जमतं? सोयीनुसार डिप्रेशन आणि सोयीनुसार नाही! हे सर्व या इंटरनेटमुळे. डिप्रेशनची लक्षणं दहादा वाचली, की आपल्यालापण ते आहे असं वाटायला लागतं हल्लीच्या मुलांना! या सोशल मीडियानं डिप्रेशनचं नसतं स्तोम माजवलंय. सेलिब्रिटींनी सांगितलं ना, की आम्हालाही डिप्रेशन होतं, मग या मुलांना डिप्रेशनमध्येही ग्लॅमर दिसायला लागतं. बंद करून टाकतो याचं इंटरनेट. मग बघतो किती दिवस घरी बसतोय ते! उद्यापासून बऱ्या बोलानं परीक्षेला बसायचंय.’’
बाबांचे शब्द दगड होऊन दणादण मेंदूवर आदळायला लागले आणि वाटलं, तुम्हाला माझा परफॉर्मन्स महत्त्वाचा आहे, ‘मी’ नव्हे. महत्त्वाचं असण्यासारखं माझ्यात आहे तरी काय? नकारात्मक विचारांचं वादळ परत घोंघावायला लागलंय. मी ते थोपवून धरतोय.. पण ते पुढे पुढे सरकतंय.
बाबा बोलत होते, ‘‘आमच्या तरुणपणी नव्हती असली थेरं! आम्ही असं काही केलं असतं, तर दोन कानफटात बसल्या असत्या आणि डिप्रेशन वगैरे गेलं असतं पळून! इथे आम्ही चोचले पुरवतोय म्हणून डोक्यावर मिऱ्या वाटताहेत. किती तरी अवघड परिस्थितींना तोंड दिलंय आम्ही; पण असं ढासळत नव्हतो कधी.’’ विचारांचं वादळ आत गरागरा फिरायला लागलंय. आईबाबांच्या अपेक्षांचा विचका केलाय मी! लायकीच नाही माझी! कुठलीही गोष्ट न जमणारा, कॉलेजपासून घरापर्यंत सगळीकडे निरुपयोगी. मी आईबाबांसारखा कणखर नाही. त्यांच्या पासंगालाही पुरणार नाही. मी कमकुवत आहे. असाच ढासळत राहणार पदोपदी! उठणारच नाही कधी यातून.. मी ॲबनॉर्मल आहे; पण या विचारांच्या कोलाहलातसुद्धा आशेचा एक लहानसा, चिवट तंतू मी घट्ट पकडून ठेवलाय. आई-बाबा, थोडा अजून संयम ठेवलात आणि प्रोफेशनल मदत मिळाली.. कदाचित परत परतही ती लागेल, पण येईन मी यातून बाहेर! पण आताही बोलायचं सर्व मनातच राहिलं. आणि आता तरी हे ‘ऐकू’ शकाल का तुम्ही?..