देवाच्या नावावर माणसांनी स्वत:साठी तयार केलेली देवदासी-मुरळी ही अनिष्ट प्रथा समाजातून नष्ट व्हावी, यासाठी २००५ मध्ये ‘देवदासी प्रतिबंधक कायदा’ केला गेला, मात्र घरातलं दारिद्र्य आणि त्याहीपेक्षा गाढ अंधश्रद्धा, विवेकाचा अभाव यामुळे या प्रथा आणि त्यात मुलींचं बळी जाणं आजही समाजात चालूच आहे. सीमा ही अवघ्या १२ वर्षांची मुलगी या प्रथेला बळी पडली आणि त्यामुळे तिचं मूलही. आता तिची आधारगृहात सोय झालीय आणि संबंधितांना शिक्षाही, म्हणूनच फक्त प्रतिबंधक कायदा करून उपयोग नाही, तर त्याची कठोर अंमलबजावणी होणं आणि समाज प्रबोधन तळागाळांत पोहोचणं गरजेचं आहे.
पुरुषसत्ताक समाजात स्त्रियांचे, विशेषत: दुय्यमत्वातून निर्माण झालेले प्रश्न कालही होते आणि आजही आहेत. महात्मा जोतिबा फुले, गोपाळ गणेश आगरकर, राजा राममोहन रॉय,डॉ.बाबासाहेब आंबेडकर, सावित्रीबाई फुले, डॉ. रखमाबाई, पंडिता रमाबाई अशा अनेक सुधारकांनी स्त्री प्रश्न सोडविण्यासाठी विधायक काम केलेलं आहे. तरीही आज मुरळी, देवदासी, जोगतीण म्हणून देवाच्या नावाने स्त्रिया सोडल्या जातात. हे वास्तव नाकारता येणार नाही. नाव देवाचे, पण स्वार्थ माणसांचा.
देवदासी म्हणजे देवाची दासी. देवता, मूर्ती, पूजावास्तू, मंदिर किंवा धार्मिक संस्थेला समर्पित असलेली स्त्री. या स्त्रिया किंवा मुली जोगतीण, देवदासी, मुरळी किंवा अन्य कोणत्याही नावाने ओळखल्या जातात. त्यांचं देवाशी लग्न लावणं, त्या स्त्रियांना देवाच्या नावाने सोडून देणं या अनिष्ट प्रथांना शेकडो वर्षांचा इतिहास आहे. यामागे धार्मिक रूढी, देवतेला प्रसन्न करणं, संकटापासून मुक्ती मिळवणं, पुत्रप्राप्ती, व्रतपूर्ती, नवस अशी अंधश्रद्धामूलक कारणे सांगितली जातात.
मात्र या प्रथेतून मुली व स्त्रियांचे लैंगिक शोषण, त्यांना सामाजिक बहिष्कार, शारीरिक व मानसिक अनारोग्य, शिक्षणाचा अभाव, आर्थिक शोषण अशा सगळ्याच संकटांना सामोरं जावं लागतं. समाजातील या अनिष्ट प्रथेच्या विरोधात महात्मा जोतिबा फुले, विठ्ठल रामजी शिंदे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर या समाजसुधारकांनी मोलाचं काम केलंय. या प्रथेमुळे होणारे स्त्रियांचे शोषण थांबण्याच्या दृष्टिकोनातून तरतुदी कराव्यात यासाठी त्यांनी तत्कालीन सरकारचा पाठपुरावा केला. १९२० मध्ये राजर्षी शाहू महाराजांनी देवदासी-मुरळी संबंधाने कायदा केला. महाराष्ट्र शासनाने २००५ मध्ये ‘देवदासी प्रतिबंधक कायदा’ शिक्षेसह अधिक व्यापक केला. देवदासी-मुरळी प्रथा बंद करण्यासाठी, त्यांना सन्मानाने जगण्यास सक्षम करण्यासाठी, देवदासी-मुरळी प्रथेस जबाबदार असलेल्या किंवा त्यात सहभागी व्यक्तींना शिक्षा करण्यासाठी हा कायदा करण्यात आला आहे.
कायदा अस्तित्वात आहे, परंतु जनमानस अद्याप पूर्णपणे बदललं नाही. एखाद्या स्त्रीच्या केसांत जट तयार झाल्यास ‘देवतेची जट’ आहे असं सांगून अनेकदा तिला जोगतीण, मुरळीच्या वाटेवर नेलं जातं. महाराष्ट्रात अंधश्रद्धेपोटी नवसासाठी, देवतेला प्रसन्न करण्यासाठी किंवा पुत्रप्राप्तीसाठी एखाद्या मुलींचं खंडोबाशी लग्न लावलं जातं. या मुलीला देवाच्या नावाने सोडलं जातं. अशा मुलींना ‘मुरळी’ म्हणून संबोधलं जातं. आणि मग या मुली कौटुंबिक फायद्यापासूनही वंचित राहतात.
अशाच एका आठ वर्षं केसात जट घेऊन फिरणाऱ्या स्त्रीची जट काढण्यासाठी मी आमच्या शेजारच्या जिल्ह्यात गेले होते. बट निर्मूलनानंतर त्याच गावात एक प्रबोधनपर व्याख्यानाचा कार्यक्रम ठेवण्यात आला. त्या कार्यक्रमाच्या समारोपानंतर साधारणत: पंचाहत्तरीचे, रघु जाधव हे सद्गृृहस्थ माझ्याशी बोलण्यासाठी आले. त्यांनी सांगितलेलं वास्तव खूप भयानक व गंभीर होतं. ते म्हणाले, ‘‘आमच्या घरी ताराबाई भांडी घासण्यासाठी येत होत्या. आमच्या जायच्या-यायच्या रस्त्यावरच कॉलनीच्या पलीकडे काही अंतरावर एका झोपडीवजा घरात त्या राहात होत्या. त्यांना तीन मुली व एक मुलगा अशी चार अपत्ये. मोठी मुलगी सीमा कधी कधी आईसोबत आमच्या घरी यायची. या सर्व मुली मला शाळेत जातानाही दिसायच्या. मधल्या काळात सीमा दिसेनाशी झाली. मी ताराबाईंकडे चौकशी केली. तर त्या म्हणाल्या, ‘सीमा आत्याच्या गावाला गेली आहे.’आणि अचानक गेल्या चार महिन्यांपासून ताराबाईंचं आमच्याकडे कामाला येणं थांबलं. त्यांनी निरोपही दिला नाही. माझ्या पत्नीने चौकशी केली, परंतु त्यांनी खोली बदलल्याचं समजलं. एक दिवस मी आणि पत्नी किराणा मालाच्या दुकानात गेलो असता ताराबाई समोरून जाताना दिसल्या. आम्ही त्यांना आवाज देऊन थांबवलं. त्यांची चौकशी केली असता त्या म्हणाल्या, ‘इथं माझं भागत नव्हतं. मी माझ्या माहेरच्या गावात राहायला गेलेय.’ मला व माझ्या पत्नीला त्याचं वागणं-बोलणं काहीसं खटकलं. त्यांच्या माहेरगावाच्या काही ओळखीच्या लोकांकडे त्यांच्या कुटुंबाविषयी चौकशी केली, तेव्हा असं समजलं की, त्यांची १२ वर्षांची सीमा बाळंत होऊन तिला मुलगा झाला आहे. सीमाला त्यांनी देवाला सोडलं असल्याची गावात चर्चा आहे.
जाधव काकांचं बोलणं ऐकून मी हादरले. असाच प्रकार पूर्वी आमच्या शेजारच्या दुसऱ्या गावातही घडला होता. एका १३ वर्षांच्या मुलीला मुलगी झाली होती. तिच्या आजीने तिचं लग्न ती एक वर्षाची असतानाच खंडोबाशी लावलं होतं. त्यानंतर ती मुलगी ७-८ वर्षांची झाल्यानंतर आजी तिला जागरण-गोंधळासाठी पाठवत होती. तिथेच तिच्यावर लैंगिक अत्याचार होऊन ती गर्भवती झाली. सीमाच्या बाबतीतही त्याच प्रकारचं लैंगिक शोषण झालं असण्याची दाट शक्यता वाटत होती. जाधव काकांचा दूरध्वनी क्रमांक घेतला. मी दोन-तीन दिवसांत पुन्हा येते, असं सांगून तिथून बाहेर पडले. मनात तोच विचार घोळत होता. मध्ये तीन दिवस गेले. चौथ्या दिवशी सकाळी सहा वाजताच घरातून बाहेर पडले. जाधव काकांना फोन केला. मी पोहोचेपर्यंत ते बस स्टँडवर येऊन थांबले होते. जाधव काकूही सोबत होत्या. काका-काकू व मी, आम्ही संबंधित पोलीस ठाण्यात गेलो. तिथे पोलीस निरीक्षकांशी चर्चा केली. खरं तर ही एवढी गंभीर घटना पण त्यांच्या गळी उतरवण्यातच खूप वेळ गेला. साधारणत: तीन तासांनंतर त्यांनी एक स्त्री, एक पुरुष हवालदार आणि चारचाकी गाडी आमच्या सोबत दिली. गावात तपास करत ताराबाईंच्या घरापर्यंत पोहोचलो. शेताच्या एका कोपऱ्यात त्यांची छोटी झोपडी होती. झोपडीसमोर एक झाड होतं. बाजूला पालापाचोळ्याचा ढिगारा, असं दृश्य होतं. आम्ही पोहोचलो त्यावेळी झोपडीच्या तोंडाशी ताराबाई भाजी निवडत बसल्या होत्या. आम्हाला पाहून त्या भांबावल्या. मी झोपडीच्या दारात जाऊन उभी राहिले. आत एका जुनाट खाटेवर दुपट्यात गुंडाळलेलं छोटंसं बाळ होतं. आणि फ्रॉक घातलेली छोटी मुलगी म्हणजेच सीमा शेणाने झोपडी सारवत होती. ‘हे छोटं बाळ कोणाचं?’ असं सीमाच्या आईला विचारताच ती गोंधळली, ‘‘बहिणीचा नातू आहे,’’असं तिनं खोटंच सांगितलं. स्त्री हवालदाराने ताराबाईंना नाव-गाव व काही जुजबी प्रश्न विचारले. त्या गोंधळल्या. त्यांनी बराच कांगावा केला. हवालदाराच्या जरबीनं मात्र त्या घाबरून गाडीत बसल्या. ताराबाई, सीमा व बाळ यांना गाडीत बसवून पोलीस ठाण्यात आणलं. दरम्यान मी ‘महिला बाल कल्याण विभाग’, जिल्हाधिकारी आणि संबंधित सर्व यंत्रणांना या घटनेबाबत कळवलं होतं. सीमाला तिच्या बाळासह कुठं ठेवावं याची चर्चा झाली. सीमाला लहान मुलांच्या निवारागृहात ठेवता येत नव्हतं, कारण तिच्या जवळ बाळ होतं. मोठ्यांच्या गृहातही ठेवता येत नव्हतं. शेवटी चर्चेअंती तोडगा निघाला व तिची बाळासह सुरक्षित आधारगृहात सोय झाली. सीमा गाडीत बसली असताना मी तिच्याशी बऱ्याच गप्पा मारल्या. तिनं देवाशी लग्नाची प्रथा ते जागरण-गोंधळ तिथं होणारे लैंगिक अत्याचार याबाबत काही गोष्टी सांगितल्या. अर्थात ती मोकळेपणानं बोलत नव्हतीच, परंतु विचारलेल्या प्रश्नांना तुटक उत्तरं देत होती. ‘‘आईनं माझं लग्न लावलं तेव्हा काही कळत नव्हतं. नंतर माझी शाळाच बंद केली. माझ्या पाठच्या बहिणी शाळेत जायच्या. मलाही शाळेत जावंसं वाटायचं. पण मला आई घरातलं काम करायला सांगायची. जागरण-गोंधळ असेल तेव्हा जागरण-गोंधळाला पाठवायची. मी मुरली काका बरोबर जायची. मुरली काका आमच्याच गावात राहतू. जागरण-गोंधळला जायला मला लई मज्जा वाटायची. चांगलं-चुंगलं खायला मिळायचं. गाणं म्हणायचं, तिथं काम करायला लागत नव्हतं.’’
सीमाच्या लैंगिक शोषणाबद्दल तिला विचारलं असता ती एकदम गप्प झाली. मग तिला बाळ, बाळाचं भवितव्य, बाळाचा बाप कोण? हे तर आपल्याला माहीत पाहिजे. असं सोप्या भाषेत समजावलं तेव्हा तिने थोडंसं सांगायला सुरुवात केली. ‘‘मी कार्यक्रमाला गेल्यावर त्या घरातील लोकंही माझ्या अंगाशी झटायचे. पहिल्यांदा लई भीती वाटायची. कार्यक्रमासाठी आलेले वाघेपण (जागरण-गोंधळाचे काम करणारे पुरुष) बळजबरी करायचे. मी घरी आल्यावर आईला सांगायची पण आई काहीच जबाब द्यायची न्हाय. पुढं-पुढं मला बी सवय झाली.’’ सीमाचं हे बोलणं ऐकून अंगावर काटा येत होता. मधून-मधून सीमा बाळाकडे पाहात होती. दुपट्यात गुंडाळलेला छोटासा निरागस जीव एवढ्या गोंधळातही गाडीच्या सीटवर शांत झोपलेला होता.
पोलिसांनी सीमाच्या आई-वडिलांवर कारवाईसाठी कागदपत्र तयार केले. दरम्यान, मी सीमाच्या आईशी चर्चा केली. सीमाची मावशी त्याचवेळी तिथे आली. तिच्याकडून समजले की, सीमाच्या पाठीवर दोनही मुलीच झाल्या. मुलगा होत नव्हता म्हणून सीमाच्या आईने नवस केला, या खेपेला मला मुलगा दे, मी माझी एक मुलगी तुला देईन! तीन मुलींच्या पाठीवर मुलगा झाला. त्यानंतर सीमाच्या आईनं वयाच्या सातव्या वर्षी सीमाचं देवाशी लग्न लावलं. सीमाला आई जागरण-गोंधळाला ‘मुरळी’ म्हणून पाठवू लागली. सीमाची शाळा बंद झाली. जागरण-गोंधळापोटी सीमाला पैसाही मिळू लागला. सीमाच्या पैशांवर घरच्या गरजाही काही प्रमाणात भागत होत्या. मुरळी म्हणजे देवाला सोडलेली. छोट्या सीमावरही कार्यक्रमांमध्ये अत्याचार झाले. खेळण्या-बागडण्याच्या वयात सीमावर मातृत्व लादलं गेलं होतं. एवढ्या लहान वयात तिला गरोदरपणाचा भार, बाळंतपणाच्या वेणा सहन कराव्या लागल्या होत्या. पुढचं संपूर्ण आयुष्य अंधकारमय होतं. बाळाचंही भवितव्य धोक्यात होतं. समाजातल्या लांडग्यांनी तिचे लचके तोडत तिला आई बनणं भाग पाडलं होतं.
मुलगा म्हणजे वंशाचा दिवा, मेल्यावर पाणी पाजायला मुलगाच हवा या गैरसमजुतीची ताराबाई बळी ठरल्या होत्या. घरातलं दारिद्र्य, अंधश्रद्धा, शिक्षणाच्या अभावाने सीमाचा बळी घेत आणखी एक नवीन जीव त्या प्रवाहात ओढला होता.
सीमाला आधारगृहात ठेवलं गेलं. तिची व बाळाची काळजी घेणारी व्यवस्था तिथे लावली. तिच्या पुढील शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. सीमाला या प्रवाहात लोटणाऱ्यांविरोधात कायदेशीर कारवाई झाली. परंतु अशा आणखी ‘सीमा’ या समाजात असतील ज्यांना जाधव काकांसारखे संवेदनशील लोक भेटले नाहीत. त्यांचे प्रश्न प्रश्नच राहिले. यासाठी फक्त कायदे करून चालणार नाही. तर कायद्याचा प्रचार-प्रसार, अंमलबजावणी व समाज प्रबोधन तळागाळांत पोहोचणं गरजेचं आहे.
(सदर लेखातील व्यक्तींची नावे बदललेली आहेत.)
ranjanagawande123@gmail.com