‘‘काय म्हणाले डॉक्टर रिपोर्ट बघून? मधुमेह झालाय? चला, आता साखर पूर्ण बंद… आणि हो, भातसुद्धा बंद करावा लागेल. आणि गोड खाणं तर विसराच आता!’’ असे संवाद तुम्ही ऐकले असतील ना? मधुमेहाचं निदान झालं की, संपूर्ण जग जणू ‘काय खायचं नाही’ याविषयीचे नियम सांगणारे ‘स्वयंघोषित पोलीस’च होतात. आणि मधुमेहाचं निदान झालेल्यांनी आहारातील ‘साखर बंद करणं’ हे आयुष्याचं ध्येयंच ठेवावं, अशी त्यांची अपेक्षा असते. कारण मधुमेह हा फक्त साखर खाण्याचाच परिणाम आहे, आणि साखर बंद केली केली तर मधुमेह कायमचा संपेल हा समज इतका खोलवर रुजलेला आहे की, मधुमेह म्हणजे साखर बंदी, भीती आणि सततची काळजी असंच चित्र अनेकांच्या मनात तयार होतं.

खरं तर, मधुमेह हा एक ‘कॉम्प्लेक्स मेटाबॉलिक’ आजार आहे. तो फक्त आहारातला भात वगळून आणि शक्यतो गोड पदार्थ टाळून सहजासहजी जात नसतो. मधुमेह होण्यामागचं कारण आणि त्याला नियंत्रित करण्याचे उपाय हे दोन्हीही आपल्या शरीरात ग्लुकोज साखरेचं व्यवस्थापन कसं होतं, त्यावर अवलंबून असतं. ‘साखरेचं व्यवस्थापन’ म्हणजे आहारातून मिळणार्‍या साखरेला आपलं शरीर कसं हाताळतं, किती वेळ ती साखर रक्तात राहते, आणि ती पेशींमध्ये पोचते की नाही, यावरून आपल्याला मधुमेह आहे की नाही हे ठरतं. त्यामुळे केवळ साखर बंद करून किंवा भात टाळून मधुमेह नियंत्रणात येतो, हा विचार दिशाभूल करणारा आहे.

आपला देश आर्थिक प्रगती करत असला तरी ‘आधुनिक आजारां’च्या बाबतीत आपली खूप अधोगती होतेय. भारताला ‘मधुमेहाची राजधानी’ असं म्हटलं जातं. भारतात ४५ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या सुमारे ५ कोटी चार लाख लोकांना मधुमेह असल्याचं सांगितलं जातं. म्हणूनच मधुमेह फक्त एखाद्या व्यक्तीचा आजार राहिलेला नाही, तर तो एक ‘सार्वजनिक आरोग्या’चा प्रश्न बनलाय. अनेक लोक औषधं घेतात, आहारात भात/ गोड पदार्थ बंद करतात, तरीही साखर नियंत्रणात येत नाही. आणि असं होण्यामागचं कारण असं की, मधुमेहाकडे पाहण्याची आपली दृष्टी खूप मर्यादित आहे. यासाठी मधुमेह या आजाराला मुळापासून समजून घ्यायला हवं.

आपल्या सगळ्यांच्या शरीरात ‘इन्सुलिन’ नावाचा एक संप्रेरक (हार्मोन) असतो. इन्सुलिन एका किल्लीसारखं काम करतं. आपल्या रक्तातील साखर वाढली की आपल्या पेशींचे दार उघडून, वाढीव साखरेला शरीराच्या पेशींमध्ये पोचवतो- जिथे ती ऊर्जेसाठी वापरली जाते. जेव्हा ही यंत्रणा नीट चालते तेव्हा साखर योग्य प्रमाणात पेशींमध्ये जाते आणि रक्तात जास्त काळ राहत नाही; पण जेव्हा इन्सुलिन कमी प्रमाणात तयार होतं, किंवा तयार होत असूनही पेशी त्याला नीट प्रतिसाद देत नसतील (इन्सुलिन पेशींचं दार उघडण्यास अपयशी होतं), तेव्हा साखर पेशींमध्ये न जाता रक्तातच साठत राहते. रक्तातल्या या अति साखरेमुळे या आजाराला ‘मधुमेह’ असे म्हणतात.

वैद्यकीयदृष्ट्या पाहिलं तर मधुमेह होण्यामागे दोन प्रमुख कारणं दिसतात. पहिला प्रकार म्हणजे ‘टाइप १ मधुमेह’. – यात शरीर इन्सुलिन तयार करू शकत नाही किंवा कमी प्रमाणात तयार करतं. शरीराला इन्सुलिनची उणीव भासू लागते, त्यामुळे लहान वयातच साखर वाढायला लागते आणि या मुलांना कृत्रिम इन्सुलिन द्यावं लागतं. हा मधुमेहाचा प्रकार तुलनेने कमी लोकांमध्ये दिसतो, पण त्याचं व्यवस्थापन आयुष्यभर करावं लागतं.

दुसर्‍या प्रकारचा मधुमेह म्हणजे ‘टाइप २ मधुमेह’ – या प्रकारचा मधुमेह आता सर्वाधिक प्रमाणात आढळतो. हा प्रकार पूर्वी चाळिशीनंतर आढळणारा म्हणून ‘प्रौढावस्थेतला मधुमेह’ या नावाने ओळखला जायचा. पण आज परिस्थिती पूर्ण बदललीय. कमी हालचाल, जास्त वेळ बसून काम करणं, अति प्रक्रिया केलेलं अन्न, झोपेचा अभाव, सततचा ताण आणि अनियमित दिनचर्या यांमुळे अगदी पंचविशी-तिशीतही ‘टाइप २ मधुमेह’ दिसतो. यातली गंभीर बाब ही की, हल्ली माझ्या क्लिनिकमध्ये किशोरावस्थेतसुद्धा रक्तातली साखर जास्त आहे असं सांगत ‘प्री-डायबिटीज’चे निदान झालेली मुलं आणि त्यांचे आई-वडील येतात. यांनासुद्धा ‘टाइप २ मधुमेह’ असून, त्यांना त्यावर उपाय हवा असतो. या प्रकारच्या मधुमेहात शरीरात इन्सुलिन असतं, पण पेशी त्याला प्रतिसाद देत नाहीत आणि साखर रक्तातच साचून राहते.

मधुमेह ओळखण्यासाठी काही तपासण्या महत्त्वाच्या असतात. सकाळी उपाशीपोटी तपासलेली रक्तातली साखर आणि जेवणानंतर दोन तासांनी तपासलेली साखर या दोन्ही चाचण्या माहिती देतात, पण त्या फक्त तपासणी केलेल्या दिवसाचंच चित्र दाखवतात. म्हणून, मधुमेह कमी करायला ‘एचबीए१सी’ (( HbA1 c)) ही रक्त चाचणी खूप महत्त्वाची ठरते. ही चाचणी मागील तीन महिन्यांतील साखरेची सरासरी दाखवते. ‘हो, तीन महिन्यांआधी खाल्लेले लाडू, पेढे, श्रीखंडपण कळून येतं बरं का!’

काही लोक चाचणीच्या आधी दोन-तीन दिवस फारच जपून खातात. गोड पूर्ण बंद करतात, लवकर जेवतात, चालणं वाढवतात. त्यामुळे त्या दिवशीची साखर नियंत्रणात दिसू शकते. पण ‘एचबीए१सी’मध्ये आधी केलेले ‘खाद्य’ पराक्रम लपवता येत नाहीत. म्हणूनच मधुमेह खरोखर नियंत्रणात आहे की नाही, हे समजण्यासाठी ही चाचणी अत्यंत उपयुक्त ठरते. एचबीए१सी जास्त असण्याचा अर्थ असा की साखर वारंवार वाढते-घटते, इन्सुलिन नीट काम करत नाही आणि आहार व्यवस्थित ताब्यात राहत नाही. यातला अतिशय महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ‘साखर’ म्हटलं की लगेच आपल्या डोळ्यांसमोर चहा, मिठाई, गोड पदार्थ येतात.

पण शरीराच्या दृष्टीने साखर म्हणजे फक्त ‘पांढरी साखर’ नाही. भात, चपाती, भाकरी, फळं, दूध, डाळी आणि गूळसुद्धा… हे सगळे पदार्थ पचनानंतर शरीरात ‘ग्लुकोज’ वाढवतात, म्हणजे आपण गोड काही खाल्लं नसलं, तरीही शरीरात साखर तयार होत असते. बाजरीची भाकरी आवाक्याबाहेर खाल्ल्यानेसुद्धा साखर वाढू शकते! म्हणून मधुमेहात खरा प्रश्न हा नसतो की, ‘मी साखर खाल्ली की नाही?’ तर ‘मी जे खाल्लं त्यामुळे माझ्या रक्तात साखर किती वेगाने वाढली? आणि ती साखर किती वेळ वाढलेली राहिली!’ याचं उत्तर महत्त्वाचं.

गूळ, ताडाची साखर, खजूर पूड किंवा नारळाच्या झाडाच्या रसापासून तयार केली जाणारी साखर यांसारख्या पदार्थांबद्दल एक मोठा गैरसमज आहे. ‘आम्ही साखरेचा नाही, गुळाचा चहा पितो, कारण मला मधुमेह आहे,’ असं अनेक लोक सांगतात. गूळ नैसर्गिक आहे म्हणून तो सुरक्षित आहे असं वाटतं. पण शरीराच्या दृष्टीने साखर आणि गूळ दोन्हीही साखरच आहेत.

मधुमेहाचं व्यवस्थापन म्हणजे आपल्या शरीरात नक्की काय होतंय, ते समजून घेऊन त्या दृष्टीने काम करणं. चहा-कॉफीतली साखर, मिठाई, गोड पेये यांमधली साखर कमी करणं नक्कीच गरजेचं आहे, कारण तिची शरीराला आवश्यकता नसते. परंतु भात किंवा चपाती पूर्णपणे बंद करण्याची फारशी गरज नसते. प्रश्न, आहारातून कर्बोदके ( Carbohydrates) खाल्ली गेली की नाही हा नसून, किती खाल्लं आणि त्याच्यासोबत काय खाल्लं हा असतो. ताटात भाज्या आणि प्रथिनांचं प्रमाण वाढवलं आणि कर्बोदके योग्य प्रमाणात घेतली, तर साखर नियंत्रणात ठेवणं शक्य होतं.

मधुमेहासाठी वेगळं अन्न नको, तर रोजच्या अन्नाकडे पाहण्याची दृष्टी बदलणं गरजेचं असतं. त्यामुळे, मधुमेह नियंत्रित करायचा असेल तर रोज दोन वाट्या पाले वा फळभाज्या, एक वाटी कडधान्य, पनीर, अंडी हे प्रथिनंयुक्त पदार्थ आणि एक मूठभर एवढाच शिजलेला भात किंवा आपल्या तळहाताएवढी लहान पोळी/ भाकरी एवढंच जेवायला हवं. लक्षात ठेवा, भात वर्ज्य करण्याकडे नाही, तर भाजी आणि प्रथिनं वाढवण्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि हो, व्यायामाची जोड अत्यावश्यकच आहे. मधुमेह असल्यास अतिशय प्रभावी उपाय म्हणजे जेवणानंतर पंधरा ते वीस मिनिटं हळू चालणं. आपल्या आजी-आजोबांची ‘शतपावली’ची सवय आज विज्ञानही मान्य करतं. चालल्याने साखर मांसपेशींमध्ये जाते आणि रक्तात साचत नाही. पचन सुधारतं आणि शरीर अधिक सक्रिय राहतं.

गोड चवीबद्दल बोलायचं झालं तर अनेक लोकांना ती पूर्णपणे सोडणं सहज शक्य होत नाही. बाजारात ‘शून्य साखर’ किंवा ‘साखरमुक्त’ असा शिक्का असलेले पदार्थ पाहून लोक निर्धास्त होतात. प्रत्यक्षात हे नेहमीच खरं नसतं, कारण ‘साखरमुक्त’ म्हणजे त्या पदार्थात पांढरी साखर घातलेली नाही, एवढाच त्याचा अर्थ असतो. पण त्या ऐवजी काय वापरलं आहे, हे पाहणं जास्त महत्त्वाचं असतं.

अनेक वेळा अशा पदार्थांमध्ये गोड चव आणि खमंगपणा टिकवण्यासाठी चरबीचं प्रमाण वाढवलेलं असतं. दुधाची मलई, तूप, लोणी, काजू-बदाम पेस्ट किंवा इतर घटक वापरलेले असतात. म्हणजेच साखर कमी असली, तरी उष्मांक ( Calories)आणि चरबी (Fats) भरपूर असू शकतं. मधुमेहात हा मुद्दा खूप महत्त्वाचा ठरतो, कारण मधुमेह असलेल्या व्यक्तींमध्ये हृदयविकाराचा धोका तुलनेनं जास्त असतो. त्यामुळे फक्त रक्तातली साखर नाही, तर कोलेस्टेरॉल, वजन आणि हृदयाचं आरोग्य यांचाही विचार करावा लागतो.

मधुमेहाचा विचार करताना आपण औषधांवर जास्त भर देतो आणि जीवनशैलीकडे कमी लक्ष देतो. औषधं नक्कीच गरजेची असतात आणि ती डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यायला हवीत. किंवा कमी करायला हवीत. पण औषधं पुरेशी नसतात. आहार, हालचाल, झोप, मानसिक ताण, हे सगळे घटक एकमेकांशी जोडलेले असतात. एखादा घटक दुर्लक्षित केला तर बाकी सगळं असूनही साखर नियंत्रणात येत नाही.

मधुमेहात ‘थोडं चालेल’ हा शब्द खूपदा ऐकायला मिळतो. थोडं गोड, थोडी भाकरी, थोडं तेल हे सगळं चालू शकतं, पण थोडं म्हणजे किती, हे प्रत्येकासाठी वेगळं असतं. म्हणूनच ‘माझ्या मित्रांनी हे ‘डाएट’ करून त्याचा मधुमेह घालवला, म्हणून मी पण तेच डाएट करून बघतो’ असं करणं धोकादायक ठरू शकतं. शरीराचं ऐकणं, स्वत:च्या रक्ततपासणीचा अहवाल पाहणं आणि त्यानुसार निर्णय घेणं आवश्यक असतं.

मधुमेह हा आयुष्यासाठी गंभीर आजार नाही, पण तो दुर्लक्षित केला तर मात्र आयुष्य कठीण होऊ शकतं. तो आपण समजून घेतला तर आयुष्य अधिक शिस्तबद्ध, जागरूक आणि आरोग्यपूर्ण बनवू शकतो. शरीर आपल्याशी सतत संवाद साधत असतं. मधुमेह हा त्या संवादाचा एक भाग आहे. प्रश्न एवढाच आहे, आपण तो ऐकायला तयार आहोत का?

amita@amitagadre.com