गणेशोत्सव फक्त भारतातल्या विविध राज्यांतच नाही तर आशियातल्या अनेक देशांत साजरा केला जातो. साहजिकच तिथल्या नैवेद्याला तिथल्या मातीचा दरवळ असला तरी तो बहुतांशी तांदूळ, खोबरं आणि गुळाचाच असतो. थायलंडमधल्या गणपतीला मोदकासारखाच ‘खानोम टॉम’, नेपाळमध्ये तांदूळ, सुके खोबरे-गुळाचे ‘कसार’ लाडू, तर मॉरिशसमध्ये ‘पुरण पुरी’ आणि सुकामेव्याचे लाडू नैवेद्य म्हणून दाखवले जातात. श्रीलंकेमधल्या या ‘पिळ्ळयार चतुर्थी’ला कोळ्ळुकट्टई हा उकडीचा मोदक प्रसादात असतो. गणपतीच्या नैवेद्यातील हे वैविध्य, कधी मोदकाच्या तर कधी लाडवाच्या रूपात दिसत राहातं.
गणेशोत्सव म्हणजे, गणेश चतुर्थी, ऋषिपंचमी, मंत्रपुष्प, गौरी आगमन, गौरी जेवण आणि त्यांचे विसर्जन, असे सगळे दिवस. त्या प्रत्येक दिवसासाठी खास नैवेद्य असतात. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त अशाच वेगवेगळ्या ठिकाणच्या वेगवेगळ्या प्रकारच्या नैवेद्यातील, प्रसादातील वैविध्य नक्कीच जाणून घ्यायला हवं.गणेश चतुर्थीला आपल्याकडे मोदकांचाच नैवेद्य असतो, पण त्यातही खूप वैविध्य असते. माझ्या रायपूरच्या एका मारवाडी मित्राच्या घरी, एकवीस दिवसांचा गणपती बसवत. त्या दिवसांत त्याची आई रोज वेगवेगळ्या प्रकारचे सारण भरलेले तळणीचे मोदक करीत असे. त्यामध्ये साखर-खोबरे, पुरण, खवा, पिस्त्याचे पुरण, तीळ-गूळ, मोहाची वाळवलेली फुले घातलेले पुरण, चारोळ्यांचे पुरण, बदाम-साखर, बेसनाच्या लाडवाचे सारण, गुलकंद, मुगाच्या आणि रव्याच्या शिर्याचे पुरण, चुरमा अशा प्रकारचे वेगवेगळे सारण घातलेले चविष्ट मोदक असत.
आम्ही मूळ विदर्भातील असल्यामुळे माझ्या लहानपणी, गणेश चतुर्थीच्या दुसर्या दिवशी आमच्या घरी, भरपूर मोहन घातलेल्या कणकेच्या पारीत, साखर, खोबरे आणि रवा असलेले सारण घातलेले तळणीचेच मोदक करत. कारण आमच्या घरी पूर्वी गणेश चतुर्थीला एकादशीसारखा उपास असायचा. त्यामुळे त्या दिवशी, कधी वरी-साबुदाणा तर कधी शिंगाडा-राजगिरा यांच्या पिठात गूळ-खोबर्याचे सारण भरून उकडून तळलेले मोदक करत असत.मला आठवतंय, एकदा रताळ्याचे पुरण घातलेले अप्रतिम स्वादाचे उपवासाचे मोदक खाल्ले होते. हल्ली तर काय काजू, चॉकलेट, मावा, खवा, आंबा, स्ट्रॉबेरी, बदाम, पिस्ते अशा नाना प्रकारचे उपवासाचे मोदक बाजारात उपलब्ध असतात. पण कोकणातल्या तांदळाच्या पिठीच्या, पांढर्या शुभ्र, वर केशर काडी लावून, आत गूळ खोबर्याचे सारण ठासून भरलेल्या आणि तुपाची धार सोडलेल्या उकडीच्या कळीदार मोदकाची सर कशालाच नाही.
पुढच्या टप्प्यावर कोल्हापूरला घाटावर आलो की, त्या मोदकाची उकड गव्हाची होते, पण सारण मात्र साधारण तेच असते. कुणाच्या घरी पंचखाद्य म्हणजे, खारीक, खडीसाखर, किसमिस, खसखस आणि भाजलेले खोबरे यांचेही मोदक करतात. कधी त्यात खवाही घालतात. मराठवाड्यात ज्वारीच्या किंवा बाजरीच्या उकडीचे मोदक करतात. त्यात सुके खोबरे, रवा आणि साखरेचे सारण भरलेले असते. उकड तांदळाची असो की ज्वारी, बाजरीची, त्यासाठी पीठ ताजेच असावे लागते. ज्वारी आणि बाजरीच्या उकडीसाठी थोडे दूध घातले तर मोदकाची पारी मऊ होते. आमच्या कोल्हापुरातच काही लोकांच्या घरी मोदकांबरोबर किंवा मोदकांच्या ऐवजी गव्हाची खीर करण्याचीही पद्धत आहे.
एकदा एका प्रकल्पाच्या निमित्ताने कोयनानगरच्या भागात फिरत असताना, तिथल्या पूर्ण वाडीचा एकच दिवसाचा, मातीचा गणपती त्यांच्या आदिवासी मुखीयाकडे बसवलेला दिसला. त्यांच्याकडे नैवेद्यासाठी पळसाच्या पानाला तांदळाचे दाटसर भिजवलेले पीठ लावून, त्यात काकडी, गूळ-खोबर्याचे सारण घातलेले, फुफाट्यावर भाजलेले पातोळे केले होते. पुण्यात अनेक घरांत मोदक आणि करंज्याबरोबर सिद्धलाडू किंवा गाठोडे करतात. त्यासाठी वेगळी उकड काढतात. सिद्धलाडू म्हणजे गणपतीची सिद्धासन मांडी मानली जाते, हा लाडू खालून सपाट आणि वरून किंचित गोलसर किंवा, शंकूच्या आकाराचा किंवा लंबगोलाकार, थोडक्यात आसनाच्या आकारासारखा असतो. नैवेद्याच्या थाळीत मध्यभागी किंवा सर्वात आधी हा सिद्धलाडू ठेवला जातो, त्याच्या बाजूंनी मोदक मांडले जातात. हा लाडू गव्हाच्या किंवा तांदळाच्या खिरीबरोबर खातात. काही जणांकडे हा सारणाशिवाय फक्त उकडीचा असतो आणि काही जणांकडे त्यात मोदकाचे सारणही भरलेले असते.
आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात स्थलांतरित झालेल्या कोमटी लोकांच्या घरात मोदकांच्या ऐवजी खुसखुशीत ‘लड्डलू’ करतात. त्यासाठी कणकेत किंचित मीठ आणि भरपूर तेल घालून कोरडेच मिसळतात. मग त्यात थोडे थोडे पाणी घालून घट्ट कणीक मळून नंतर त्याचे लांबट गोळे करून पोळपाटावर वळून त्याची जाडसर आणि लांब शेवई तयार करतात. त्या शेवईला दोन उभे वेढे आणि दोन तिरके वेढे देऊन त्याचे लाडू बनवून पेपरवर वाळत ठेवतात. त्यानंतर ते लाडू तेलात मध्यम आंचेवर लालसर तळून नंतर साखरेच्या कडक पाकात बुडवतात. त्यावर वेलची पूड, गुलाब पाकळ्या आणि जायफळ पूड घालून सजवतात.
हे साधारण पिळाच्या खाज्यासारखे दिसणारे ‘लड्डलू’ फारच छान लागतात. ज्या लोकांच्या घरी गणपतीची कर्मठ उपासना असते त्यांच्याकडे गणपतीच्या नैवेद्याच्या पदार्थात पाणी वापरणे निषिद्ध असते. त्यांच्याकडे पाण्याच्या जागी दूध वापरतात. त्यांच्याकडे प्रसादासाठी दुधात बेसन भिजवून केलेले बुंदीचे लाडू, दुधाने भिजवलेल्या कणकेत केळी, रवा आणि ओल्या खोबर्याचे सारण भरून मोदक करतात. तसेच तेल आणि साखर मिसळून, दुधाने भिजवलेल्या कणकेचे दोन-तीन वेढ्यांचे कडबोळे तळतात, त्याला शीरलाडू म्हणतात. याशिवाय तुपात तळलेले आणि साखर पेरलेले रसबाळे केळेही विशेषत: कारवारी लोकांच्या गणेशाच्या नैवेद्यासाठी ठेवतात.
‘सिद्धलाडू किंवा गाठोडे’आंध्र आणि तेलंगणात नैवेद्यासाठी तांदळाच्या उकडीत तीळ आणि गुळाचे सारण भरलेल्या जराशा ओबडधोबड अशा ‘चिल्लड करंज्या’ करतात. त्या उकडून परत तळतात. तेलंगणात मात्र नैवेद्यासाठी तांदळाची खीर आणि उंडराळू हे फारच चविष्ट लाडू करतात. त्या लाडूसाठी तांदूळ आणि मुगाची डाळ धुऊन त्याचा रवा काढतात. उकळत्या पाण्यात तेल आणि मीठ टाकून तो रवा बोटचेपा शिजवतात. मग त्यात मिरच्या, कोथिंबीर आणि आल्याचे वाटण टाकून त्याचे लाडू वळून ते वाफवतात. वाफवलेले गरम गरम लाडू, तूप आणि चिंच-आल्याची चटणी असा गणपतीसाठी खास नैवेद्य असतो.
अनेक आशियाई देशातही गणेशोत्सव साजरा करतात. थायलंडमध्ये गणपतीला ‘फ्रा फिकानेत’ म्हणतात. तिथे बाप्पाला स्थानिक फळे (जसे की ड्रॅगन फ्रूट, आंबा, केळी) आणि थाई मिठाई (जसे की मोदकासारखे दिसणारे ‘खानोम टॉम’ – जे तांदूळ आणि खोबर्यापासून बनते) अर्पण करतात. नेपाळमध्ये नैवेद्यासाठी तांदळाच्या रव्याचे, सुके खोबरे आणि गूळ घातलेले ‘कसार लाडू’ आणि पेढे असतात. इंडोनेशियातील बाली बेटावरील हिंदू बांधव बाप्पाला ‘कॅनांग सारी’ (Canang Sari) टोपलीत रंगीबेरंगी फुले, तांदूळ आणि केळी ठेवून नैवेद्य दाखवतात. मॉरिशसमध्ये मोठ्या प्रमाणावर गणेशोत्सव साजरा होतो. तिथे बाप्पाला ‘तवेवरची पुरण पुरी’ आणि सुकामेव्याचे लाडू अर्पण करण्याची प्रथा आहे. श्रीलंकेमध्ये प्रामुख्याने तमिळ हिंदू संस्कृतीनुसार गणेशोत्सव साजरा केला जातो, ज्याला तिथे ‘पिळ्ळयार चतुर्थी’ ( Pillayar Chaturthi) म्हटले जाते. तिथे बाप्पाला, कोळ्ळुकट्टई ( Kozhukattai) हा आपल्या महाराष्ट्रातील उकडीच्या मोदकासारखाच प्रकार आहे. तांदळाच्या पिठाच्या पारीमध्ये नारळ (खोबरे) आणि गूळ यांचे गोड सारण (पुरण) भरून हे वाफेवर उकडले जातात. यात गोड कोळ्ळुकट्टईसोबतच ‘उप्पू कोळ्ळुकट्टई’ (तिखट-मिठाचे मोदक) देखील बनवले जातात. तसेच तांदळाचे पीठ, नारळाचे दूध आणि गूळ एकत्र करून बनवलेले गोड अप्पम (Neyyappam) देखील बाप्पाच्या चरणी ठेवले जातात. तसेच नारळाच्या दुधातला भात म्हणजे किरीभात आणि तिथे मिळणारी स्थानिक फळे जसे की तांबडी केळी, राजा नारळ ( King Coconut) आणि दुरियान फणस बाप्पाला अर्पण केले जातात. जपानमध्ये गणपतीला ‘कांगितेन’ (Kangiten) किंवा ‘शोत्तेन’ (Shoten) या नावाने ओळखले जाते, जपानमध्ये बाप्पाला प्रामुख्याने ‘कांगिदान’ अर्पण करतात. हा पदार्थ हुबेहूब आपल्या मोदकाचे जपानी रूप आहे. ‘कांगिदान’ म्हणजे आनंदाचे लाडू किंवा बन्स. हे तांदूळ आणि गव्हाच्या पिठापासून बनवले जातात आणि त्यात ‘अंको’ (Ank‘ः – गोड लाल घेवड्याच्या शेंगांचं वाटण), मध, आले भरून ते तेलात कडक तळले जातात. तसेच जपानमध्ये बाप्पाला पांढरा मुळा (Daikon) अर्पण करण्याची अनोखी प्रथा आहे. त्याचप्रमाणे साके ( Sake / Rice Wine) आणि स्थानिक फळेही नैवेद्य म्हणून अर्पण करतात.
गणपतीच्या आगमनाबरोबरच इतर दिवसही नंतर येतात, ऋषिपंचमीच्या दिवशी काही ठिकाणी उंदीर पंचमीही साजरी करतात. त्या वेळी आणि विसर्जनाच्या दिवशीही कोकणातल्या काही घरात ‘आरिधी’ करतात. त्यासाठी तांदळाचे पीठ उकळत्या पाण्यात टाकून त्याची उकड काढून त्याच्या जाड शेवया करतात. एका बाजूला दुधाला उकळी आली की त्यात साखर घालून मग त्यात त्या शेवया सोडतात. त्या लगेच शिजतात मग त्यात वेलची आणि केशर घालतात. मंत्रपुष्पाच्या दिवशी दही पोहे/ नारळाच्या दुधातले पोहे आणि भरपूर ओले खोबरे आणि कोथिंबीर घातलेली जराशी कच्ची मटकीची उसळ करतात.
गौरी येण्याचा दिवस हा खास दिवस असतो, त्या दिवशी काही जणांच्यात मका, तांदूळ आणि ज्वारी समप्रमाणात घेऊन त्याची ताकात उकड काढून भाकरी आणि भोपळा, चवळी आणि शेपू यांची मिश्र पालेभाजी किंवा लाल माठाची भाजी करतात. गौरी जेवणाच्या दिवशी तर सुगरणी आपले सगळे कौशल्य पणाला लावून पुरणपोळ्या, बेसनपोळ्या, सोळा भाज्या, कोशिंबिरी, चटण्या. पंचामृत, चटका, काकडीचे नाकार्डे, मसालेभात असा सांग्रसंगीत स्वयंपाक करतात. कोकणात गौरीसाठी घावन घाटले आणि पातोळयाचा नैवेद्य करतात. पण यातही सगळ्यात भारी म्हणजे ज्वारीची आंबील आणि लाल भोपळयात कणीक आणि उडदाच्या डाळीचे पीठ घालून केलेले वडे अफलातून चवीचे असतात. काही जणांकडे या दिवशी जाड्या रव्याचा शिरा घालून किंवा भाजलेला रवा आणि साखर/गूळ घालून केलेले लाडू भरून जाडसर पुर्या करून तळतात. त्याला सांजोर्या म्हणतात. चान्द्रसेनीय कायस्थ प्रभू (सीकेपी) आणि दैवज्ञ सोनार यांच्याकडे या दिवशी मटणाचा नैवेद्य असतो.
गणपती विसर्जनाच्या दिवशीचे नैवेद्यही खास आहेत. बटाट्याच्या काचर्या घातलेली वाटली डाळ, तळणीचे मोदक, कणकेत जरा अधिक मोहन घालून जाड शेव तळतात. मग ती शेव गुळाच्या किंवा साखरेच्या पाकात घालून शेवखंड करतात. कर्नाटकाच्या सागरी प्रदेशात या दिवशी हरभरा आणि उडदाच्या डाळीत भरपूर कोथिंबीर घालून ‘अम्बोडे’ हे लहान वडे तळतात. उत्तर कर्नाटकात फुटण्याच्या डाळीचे गुळाच्या पाकातले लाडू करतात. बाकी सर्वसाधारण लोकांच्यात चुरमुरे, भाजलेले शेंगदाणे, ओले खोबरे आणि गरमागरम फुटाणे यांचाच नैवेद्य दाखवून गणरायाला निरोप देतात.
गणपती बाप्पा हा खवय्या आणि रसिक देव आहे, त्याच्यासाठी जेवढ्या प्रकारचे नैवेद्य करावेत तेवढे थोडे, असे सर्वांनाच वाटते. त्यामुळे त्यात वैविध्य तर असतेच, पण त्याचबरोबर रसिक खवय्यांसाठीही ती खाद्यपर्वणी ठरते.
udmanjusha65 @gmail.comX
