डॉ. निधी पटवर्धन
अगदी परवाचीच गोष्ट.. ‘‘मॅडम डोशाचं काही पीठ शिल्लक आहे का? येऊ का खायला? ‘रंगवैखरी नाटय़ स्पर्धे’च्या सरावाच्या वेळी तुम्ही आम्हाला वेगवेगळे पदार्थ करून खायला आणायचात त्याची आठवण आली!’’ द्वितीय वर्ष, कला शाखेतला तुषार यादव विचारत होता. त्यानं माझ्या व्हॉट्सअ‍ॅप स्टेटसवर नाश्त्याला डोसा केल्याचं मी लिहिलेलं वाचलं होतं. रोजचं आयुष्य ‘ऑफलाइन’ आणि ‘ऑनलाइन’ माध्यमांत हळूहळू बदललं, पण विद्यार्थ्यांचं हक्कानं काही तरी मागणारं कोवळं मन अजून तसंच असल्याचं जाणवलं आणि क्षणभर सुखावले मी!

मन मागे मागे गेलं.. मराठी भाषा दिनाच्या दिवशी मुलींना नऊवारी साडय़ा नेसवणं, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी वाङ्मय मंडळाच्या समूहगीताची तयारी करून घेणं, परीक्षांच्या दिवसांत विभागातलं वाचनालय अव्याहत सुरू ठेवणं, कुणाला थांबायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांसाठी डबा नेणं, थांबलेली मुलं वाढली तर त्यांच्यासाठी वडा-पाव मागवणं, सणासुदीला मुलांनी आणलेला शीरखुर्मा, पुरणपोळी खाणं, शहरात ग्रंथप्रदर्शन भरलं तर मुलांना घेऊन जाणं, ‘लँग्वेज लॅब’मध्ये काही तरी भाषिक प्रयोग करणं, एकत्रित चित्रपट पाहणं, ते अगदी माजी विद्यार्थ्यांच्या लग्नांना जाणं.. हे सर्व होत होतं. अचानक गेल्या दीड वर्षांत हे सगळं थांबलं! पण जगणं थांबलं नाही, शिकणं थांबलं नाही, शिकवणं थांबलं नाही. फक्त त्याचं माध्यम बदललं.

mumbai ban on slum demolition marathi news, slums mumbai marathi news
झोपडपट्टी पुनर्विकासात परवानगीविना अतिरिक्त झोपड्या तोडण्यावर बंदी, नव्या परिपत्रकामुळे झोपडीवासीयांना दिलासा
success story of ias saumya sharma
परीक्षेच्या दिवशीच बिघडली तब्येत, तरीही मानली नाही हार, वाचा IAS सौम्या शर्माचा प्रेरणादायी प्रवास
Cancer Treatment
कर्करोगावर उपचार १०० रुपयांत, या गोळीचे फायदे काय? टाटा इनस्टिट्युटच्या डॉक्टरांचा दावा काय?
share market akola
सावधान! शेयर मार्केटमधून नफ्याचे आमिष; वृद्ध डॉक्टरची ६४.५० लाखांनी फसवणूक

अनिवार्य भाषांचे मोठे वर्ग, पत्रकारिता विषयासाठी असणारा मध्यम वर्ग, विभागातला आणखी एक छोटासा वर्ग, महाविद्यालयाचं मोठं पटांगण, ऑफिस आणि माझी बसायची ठरलेली खुर्ची.. या साऱ्यांची आठवण येऊ लागली. महाविद्यालयात जाऊन खुर्ची, टेबल आणि संगणक मी मध्येमध्ये पुसून येत होते. प्रिंटर खराब होऊ नये म्हणून मध्येच प्रिंटही काढत होते. विभागातल्या पुस्तकांवरची धूळ पुसून ठेवत होते. जी लागतील ती घरी घेऊन जात होते. एका करोनानं सारं बदललं होतं. विभागाच्या  विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअ‍ॅप समूहावरील सर्वात शेवटचा मेसेज आम्ही भिलारला- म्हणजे पुस्तकांच्या गावाला सहल काढल्याचा होता. त्याचे फोटो होते. अचानक या महासाथीनं सगळे रस्ते बंद केले. मुलांचं फिरणं बंद केलं, वाचनालयात जाणं बंद केलं, कट्टय़ावरच्या एकमेकांशी गप्पा, हशा, समोरासमोर स्पर्धाची चुरस बंद झाली. विद्यार्थ्यांचं एकत्रित शिक्षण घेणं काही काळासाठी बंद झालं. शिक्षण ऑनलाइन झालं..

‘गूगल मीट’ डाऊनलोड करा, ‘झूम’ अ‍ॅप घ्या. पोरांना प्रशिक्षण देण्याबरोबर शिक्षकांचं शिक्षणही होऊ लागलं. ‘ऑनलाइन झटपट कसं शिकवावं’ याचे आठ दिवसांचे कोर्स तयार होऊन दोन-दोनशे रुपये देऊन प्रमाणपत्रं मिळू लागली. शहाणे होते ते स्वत: कामाला लागले आणि बहुतेक ‘यूटय़ूब’ला गुरू मानून सगळी सादरीकरणं शिकले. कोणी शिकवणाऱ्यांनी स्वत:चे यूटय़ूब चॅनल काढले. ऑनलाइन सभा, शिबिरं, कार्यशाळांना भरती आली. नव्या नव्या म्हणी सुचू लागल्या. ‘स्क्रीनपेक्षा मेसेज मोठा’, ‘ऑफलाइन वर्गात जा झोपून, ऑनलाइन वर्गात खा बसून’, ‘मुलं करतात चॅनल सर्फ, आई-बाबा करतात होमवर्क’, ‘मनोरंजन नको रिंगटोन आवर’, ‘उचलला मोबाइल लावला कानाला’! म्हणींमध्ये स्वत: अनुभव घेऊन त्या अनुभवांना शब्दबद्ध करण्याची प्रक्रिया असते. आज अनुभवातून शिकण्यापेक्षा तयार ज्ञानाचे साठे उपलब्ध असल्यामुळे या काही नव्या म्हणी जुन्या म्हणींच्या अनुकरणातूनच निर्माण झालेल्या दिसतात.

गावाकडे मुलांना नेटवर्क मिळत नाही म्हणून कुठेतरी डोंगरावर जा, जंगलात रेंज मिळते तिकडे जा, असेही करणारे विद्यार्थी आहेत. मध्येच कधी ‘ऑडिओ’ ऑन करायला लावलं, तर कोंबडय़ांच्या आरवण्याचे, गाईगुरांचे, घंटागाडीच्या गाण्याचे आवाज ऐकू येतात. माहिती तंत्रज्ञान विभागाची एक शिक्षिका सांगत होती, ‘‘मी एका मुलीची ‘व्हायवा’ (तोंडी परीक्षा) घेत होते. ती गावात अंगणात बसली होती. मी प्रश्न विचारला रे विचारला, की तिच्या गोठय़ातल्या म्हशीचं ओरडणं ऐकू यायचं. मुलगी तर उत्तर देतच नव्हती. मी तिला म्हटलं, ‘ज्ञानेश्वरांनंतर मीच! रेडय़ाच्या तोंडून वेद नाही, तर ‘बिझनेस इंटलिजन्स’ची उत्तरं वदवते आहे मी. असं बोलल्यावर मुलीनं हसून जागा बदलली. पण आता प्रश्न विचारल्यावर कोंबडय़ाचं आरवणं ऐकू यायला लागलं. मग मात्र तिची व्हायवा संपवण्याशिवाय पर्याय उरला नाही.’’

एका मुलाचा ऑडिओ चुकू न ऑन झाला आणि त्याला ते लक्षात यायला बराच वेळ गेला. तो मुलगा केकच्या दुकानात काम करत असावा. त्याला ‘पिनाटा केक’ची ऑर्डर पोहोचवायला जायचं होतं. त्या संदर्भातलं त्याचं आणि त्याच्या मालकाचं संभाषण पूर्ण वर्गानं ऐकलं. आता त्याला शिक्षक ‘ए पिनाटा, तू उत्तर दे.’ अशीच हाक मारतात. ऑनलाइन शिक्षणात अशा गमतीजमती घडत असतात. गमती फक्त विद्यार्थ्यांच्यात घडतात असं नाही, तर शिक्षकांच्याही घडतात.      ‘अरे इथे बघ, इथे दाखवतोय..’ असं म्हणत विज्ञानाचे शिक्षक त्यांच्या प्रॅक्टिकल ‘पीपीटी’च्या (पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन) स्क्रीनवर बोटानं दाखवतात, ते मुलांना कसं कळणार? ते दाखवताना त्यांनी कोणतं टूल वापरलं पाहिजे, ते त्या वेळेस त्यांच्याही लक्षात येत नाही. शिक्षकांच्या घरातील कुकरच्या शिट्टय़ा किती झाल्या हे मुलांना ठाऊक असतं. बेल वाजली आणि दूधवाला आला, तर त्याला किती दूध हवं ते सांगताना, ‘स्विगी’वरून ऑर्डर आली की त्या माणसाशी बोलताना, घरातल्यांना मोठय़ांदा सांगताना, की ‘माझा तास सुरू आहे, बोलू नका..’ अशा वेळी शिक्षक माईक ‘ऑफ’ करायला विसरल्यामुळे शिकणाऱ्या लेकरांचं घटकाभर रंजन होतं.

हे सगळं एका बाजूला असलं तरी ज्याला शिकायची इच्छा आहे त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी आहे. तो त्यातूनही मार्ग काढत शिकतो. ज्यांना सक्तीनं वर्गात बसा, ऐका म्हणावं लागतंय त्यांच्यासाठी ‘मुक्तता’ आहे. विद्यार्थ्यांचा प्रवासाचा वेळ वाचतो आहे. रेकॉर्ड केलेली लेक्चर पाठवली असल्यामुळे त्यांच्याकडे वेळ भरपूर आहे. मुलं अवांतर पुस्तकं वाचतात, वेब सीरिज पाहतात, नवे नवे ऑनलाइन कोर्स करतात, त्यांची प्रगती कळवतात. ज्यांना काहीच करायचं नाही  त्यांची चिंता आहेच, आणि आत्ता या घडीला काहीच करू शकत नाही याचं दु:खही आहे. ऑनलाइन वर्गात बसणाऱ्या मुलांना ‘अरे माईक अनम्यूट कर.. तुझं लक्ष आहे का?’ असं विचारताना काही वेळा असंही दिसतं, की तो मनानं, शरीरानं, बुद्धीनं तिथे नसतोच. फक्त त्याचा मोबाइल आपलं व्याख्यान ऐकत असतो! ऐकणारे ऐकतात, न ऐकणारे लेक्चर संपलं तरी त्यांना अ‍ॅपवरच्या मीटिंगवरून काढून टाकेपर्यंत तिथेच पडून असतात. काही झोपून ऐकतात, काही खाता खाता, काही आंघोळ करता करतासुद्धा! ‘नेटवर्क मिळत नाही’ सांगणारी मुलं खूपदा ‘व्हॉट्सअ‍ॅप’वर मात्र ‘ऑनलाइन’ दिसतात. पब्जी खेळणारी, ऑनलाइन खरेदी करणारी, ‘ओटीटी’ वाहिन्यांवर ‘वेब सीरिज’ पाहणारी, ‘ब्लू-टूथ’नं ‘ऑडिओ’ घेणारी मुलं परीक्षेला मात्र ‘पीडीएफ’ फाइल करून ड्राइव्हवर ठेवता येत नाही असं सांगतात, तेव्हा हसावं की रडावं कळत नाही.

ऑनलाइन शिकवताना अनेक तऱ्हेनं मुलांना बांधून ठेवावं लागतं. पाकिस्तान या देशाचं प्रवासवर्णन शिकवताना ऑफलाइन जेवढी मजा आली असती त्यापेक्षाही अधिक मजा ऑनलाइन शिकवताना आली. कारण मुलांना स्क्रीनवर तक्षशीला, बौद्ध स्तुप , ‘पेडेवाली लस्सी’ कशी तयार करतात, हे सारं काही दाखवता आलं. भाषाविज्ञान शिकवताना

डॉ.अशोक केळकर यांचा माहितीपट, नाटक शिकवत असताना वामन केंद्रे, विजय केंकरे, मनस्विनी लता रवींद्र यांच्या मुलाखती दाखवता आल्या. काही वेळा साहित्यिकांना बोलावून प्रकट मुलाखतीही घेता आल्या. असं असलं तरी मुलांना काही बोला असं सांगितलं, तर प्रत्यक्ष बोलण्यापेक्षा भावचिन्हांचा, इमोजींचा उपयोग करणं त्यांना सोईचं वाटतं, असा अनुभव जास्त येतो. वस्तुनिष्ठ पद्धतीनं घेण्यात आलेल्या परीक्षांची फळं म्हणून लिहायला विसरलेली मुलं आता ‘लिहिताना हात दुखतो’ असं म्हणतात. आताशा खडू, फळा, पुस्तकं, ही जुनी माध्यमं नव्यानं वापरता येऊ लागली आहेत तरी सतत ऑनलाइन राहण्याची सवय अंगवळणी पडली आहे. ये-जा करण्यात वाचलेला वेळ नवीन लिपी शिकण्यात, शैक्षणिक ‘ओपन सोर्स’ कोणते आहेत यावरील कार्यशाळा करण्यात, अनेक उत्तम कार्यक्रम, मुलाखती, जागतिक चित्रपट पाहण्यात, ‘आयुष’ मंत्रालयाची योगपरीक्षा ऑनलाइन देण्यात, योग शिक्षण ऑनलाइन घेण्यात खर्ची पडू लागला आहे. हे शिकलेली मुलं स्वत:चे वर्गही चालवू लागली आहेत.

मला आठवतं, तुकाराम महाराजांनी देवाला पत्र लिहिलं होतं, त्या धर्तीवर बारा वर्षांपूर्वी मी मुलांना सांगितलं होतं, की तुम्ही उद्या देवाला पत्र लिहून आणायचं आहे. दुसऱ्या दिवशी वर्गात त्या पत्रांचं वाचन करून दाखवणारी आणि ऐकणारीही मुलं भावविभोर होत होती. अष्टभाव दाटून आले होते. ते चेहरे डोळ्यापुढून हलत नाहीत. ऑनलाइन पद्धतीमुळे मुलं आज भावचिन्हांत हसतात, भावचिन्हांत रडतात. ‘या हृदयीचं त्या हृदयी’ घातल्याचं समाधान मिळत नाही. पाठीवरून हात फिरवता येत नाही. अक्षरं पाहून कोणत्या विद्यार्थ्यांनं लिहिलं आहे हे चटकन ओळखता यायचं, ते आता दुर्मीळ झालं आहे.

बारावीचे निकाल नुकतेच लागले. परीक्षा न देताच बारावी झालेली मुलं पास होऊन पेढे घेऊन येत होती. कुणा एका विद्यार्थ्यांनं हातावर पेढा ठेवताच, मी त्याला म्हटलं, ‘‘ ‘पास झालेले विद्यार्थी पेढे घेऊन येतात, पण नापास झालेले विद्यार्थी जोडे घेऊन येत नाहीत, म्हणून शिक्षकांची किंमत राहते.’ असं कु णीसं म्हटलंय.’’ तो हसत हसत म्हणाला, ‘‘माझ्या आजोबांचे एक शिक्षक ‘जळके बी.ए.’ होते. आम्ही ‘कोविड बारावी’ आहोत!’’

‘जळके बी.ए.’ ही बिरुदावली जन्मभर काटय़ासारखी टोचली होती एका पिढीला. या पोरांचा उपहास ‘कोविडवाले पास’ असा होऊ नये, असं खाड्कन वाटलं.. हातात पेढा होता, पण..

nidheepatwardhan@gmail.com