‘सेकंड इनिंग तिच्यासाठी’

‘‘आयुष्याची पहिली इनिंग म्हणजे माझं क्रिकेट करिअर. अनेक क्रिकेट सामने, दौरे यामुळे मी ना मनालीला पुरेसा वेळ देऊ शकलो, ना मुलांना मोठं होताना पाहू शकलो.

‘‘आयुष्याची पहिली इनिंग म्हणजे माझं क्रिकेट करिअर. अनेक क्रिकेट सामने, दौरे यामुळे मी ना मनालीला पुरेसा वेळ देऊ शकलो, ना मुलांना मोठं होताना पाहू शकलो. मनालीनेच सगळा संसार सांभाळला. आमचा संसार दोन क्रिकेट दौऱ्यांच्या ब्रेकमध्ये सुरूअसायचा, पण क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतरची माझ्या आयुष्याची दुसरी इनिंग आता फक्त कुटुंबासाठी, अर्थात खूपशी मनालीसाठी..’’ सांगताहेत प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर आपली  पत्नी मनालीबरोबरच्या ३४ वर्षांच्या सहजीवनाविषयी..
सहजीवन, सहवास, सहचारिणी यांबद्दल किती बोलावं, असा प्रश्न नेहमीच पडतो, कारण हे नातंच असं अलवार पद्धतीने उलगडत जातं, की त्यामध्ये आपण स्वत:चे असे कधी राहतच नाही. एक वेगळीच धुंदी या नात्यामध्ये असली तरी पावलं मात्र योग्य पडायला हवीत आणि तुम्ही जेव्हा एकमेकांना समजून घेता ना, तेव्हा ही पावलं नक्कीच योग्य त्या दिशेने आणि योग्य त्या ठिकाणी पडतात. हे नातंच असं असतं की, जिथे सारं काही न बोलताही समोरच्या व्यक्तीला समजतं. शब्द नसले तरी भावना मात्र पोहोचतात. त्यामुळे या नात्यामध्ये प्रत्येक गोष्ट सांगतोच असं नाही, ती लपवायची नसते किंवा राहून गेलेली असते, पण ती आपल्या जोडीदाराला न सांगता समजणं, यामध्येच सहजीवनाचा खरा अर्थ आहे, असं मला वाटतं. त्यामुळेच या नात्याबद्दल काय बोलायचं, किती आणि कसं, हे समजत नाही.
मी आणि मनाली दोघेही मुंबईचे, पण आमची भेट मुंबईत कधीच झाली नाही. १९७९ मध्ये आमची ऑस्ट्रेलियाबरोबर मालिका सुरू होती आणि ती खेळण्यासाठी आम्ही कोलकात्याला जात होतो. त्या विमानात मी, सुनील आणि करसन होतो. तेव्हा ती आणि तिची आई त्याच विमानामध्ये होत्या. तिची त्या वेळी जुजबी ओळख झाली. तिच्या आईचा त्या वेळी व्यवसाय होता ‘लेदर फर्निचर’चा. कोलकात्यामध्ये ‘ग्रॅण्ड ओबेरॉय’ हॉटेल आहे, तिथे आमचा संघ थांबला होता आणि तीदेखील. त्यामुळे विमानातली ओळख हॉटेलमध्ये अधिक वाढली. तिथेच आम्ही पहिल्यांदा भेटलो, बोललो. त्या वेळी असं काही जाणूनबुजून कुणी केलं नाही, ते आपसूकच होतं गेलं. ती मराठी आहे, हे कळलं. आजच्यासारखं प्रपोज वगैरे काहीच झालं नाही. आपण म्हणतो ना कधी कधी पहिल्या भेटीतच प्रेम होतं, तसंच काहीसं झालं. आम्ही एकमेकांना पसंत केलं, त्यानंतर घरी सांगितलं. आपल्या मराठमोळ्या पद्धतीने नंतरच्या साऱ्या गोष्टी घडल्या आणि १९८२ साली आम्ही विवाहबद्ध झालो, त्या वेळी मी २३ वर्षांचा होतो. माझी कारकीर्द फुलायला लागली होती, तिचाही ‘लेदर गारमेंट्स’चा व्यवसाय होता. माहीममध्ये तिची फॅक्टरी होती. लग्नानंतरही माझे दौरे सुरूच होते आणि या काळामध्ये तिने जो समंजसपणा दाखवला, तो वाखाणण्यासारखा आहे, कारण नवीनच लग्न झालं होतं आणि मी घरी नसायचो. इंग्लंड, ऑस्ट्रेलियाला वगैरे ठिकाणी गेलो की आठवडय़ातून फक्त एकदा किंवा दोनदा घरी फोन करायला आणि बोलायला मिळायचा, पण तिने कधीच कुरबुर किंवा तक्रार केली नाही, कारण मी कोण आहे आणि माझं काम कसं आहे, हे तिने छान समजून घेतलं होतं.
    लग्नानंतर काही वर्षांतच नकुल झाला, त्या वेळी तिने ठरवलं असतं तर तिला तिचा व्यवसाय करता आला असता. माझे आई-बाबा होतेच त्याला सांभाळायला, पण तिने तसं केलं नाही. तिला आपली मुलं स्वत: वाढवायची होती, कारण तिला तिच्यासारखं बालपण तिच्या मुलाला द्यायचं नव्हतं. ती लहान असताना तिचे आई-बाबा सतत दौऱ्यावर असायचे, त्यामुळे त्यांच्याकडून तिला अपेक्षित वेळ, सहवास मिळाला नव्हता, ती आजीकडेच वाढली आणि आपल्या मुलाला  तिला तसं घडवायचं नव्हतं. त्यामुळे तिने स्वत:चा व्यवसाय थांबवला आणि पूर्ण वेळ नकुलला दिला. नकुलला काय हवं नकोपासून ते त्याला कोणत्या शाळेत पाठवायचं, त्याचा अभ्यास या सगळ्या गोष्टी तिने पाहिल्या. मला याचा ना कधी विचार करावा लागला ना प्रत्यक्ष काही करावं लागलं.
  मनालीने सगळा संसार सांभाळला असला तरी एक खंत नेहमीच मनात राहते आणि ती म्हणजे मी कधीच माझ्या मुलांना मोठं होताना पाहू शकलो नाही. क्रिकेट सामन्यांमुळे मी सतत घराबाहेरच असायचो, त्यामुळे त्यांच्याकडे पाहायला, त्यांचं बालपण अनुभवायला मला मिळालंच नाही. पल्लवी झाली तेव्हाही मी घरी नव्हतो, तेव्हा श्रीलंकेविरुद्ध कानपूरला सामना होता आणि मी तिथे होतो. मुलं मोठी होईपर्यंत असंच घडत गेलं. मुलांच्या भवितव्याबाबतही तिनेच निर्णय घेतले. आपल्या इथे स्पोर्टिग कल्चर नसल्याने नकुलला तिने कोडाईकनालला अमेरिकन शाळेमध्ये पाठवलं, त्यानंतर तो रचना संसदमधून आर्किटेक्ट झाला. इटलीमधील मिलानमध्ये जाऊन त्याने इंटीरिअर डिझाइनमध्ये मास्टर्स केलं. पल्लवी झेव्हियर्समधून बी.ए. झाली, त्यानंतर तिने डरहॅम विद्यापीठातून ‘मास्टर इन बिझनेस मॅनेजमेंट’ केलं. आज आमची दोन्ही मुलं त्यांच्या त्यांच्या व्यवसायात मग्न आहेत. हे सारं घडू शकलं ते मनालीमुळे, कारण मी क्रिकेटमुळे बाहेर असताना, त्यांचं शिक्षण, संस्कार, मार्गदर्शन सारं काही ती करत होती. आईबरोबर वडिलांचीही भूमिका तीच करत होती. सारे श्रेय मनालीचं आहे, कारण तिने जर व्यवसाय सोडून मुलांकडे लक्ष दिलं नसतं, तर आज कदाचित हे सुखद चित्र दिसलं नसतं.
गेल्या दहा वर्षांपासून तिने पुन्हा तिचा व्यवसाय सुरू केला, आता ती ज्वेलरी डिझाइन करते. माझा नेहमीच तिला याबाबतीत पाठिंबा होता, कारण पाठिंबा नसला तर या गोष्टी करता येत नाहीत. तसा तिचाही मला पाठिंबा होताच ना, मी क्रिकेट खेळत असताना! माझी क्रिकेट करिअर ऐन भरात असताना माझं आयुष्य म्हणजे फक्त आणि फक्त क्रिकेटच होतं. आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्पर्धा नसतील तर क्लब्जच्या स्पर्धा तरी असायच्याच, त्यामुळे अनेकदा अगदी रविवारीही मी घरी नसायचो. त्या वेळी तिने मला सगळं समजून उमजून पाठिंबा दिला होता आणि आता मी तिला देतोय, एवढंच. त्या वेळी कधीही तिनं असं म्हटलेलं आठवत नाही की, एकच रविवार मिळतो, आपण फिरायला, सिनेमाला, शॉपिंगला किंवा बाहेर कुठे तरी जाऊ या. त्या वेळचं आमचं सहजीवन म्हणजे एकमेकांची अनुपस्थिती आम्ही समजून घेतली.
आणि म्हणूनच त्या वेळीही जेवढा वेळ मिळेल तेवढा एकमेकांना, कुटुंबाला द्यायचा मी प्रयत्न करायचो. त्या वेळी मी इंग्लंडच्या स्थानिक संघाकडून मे, जून, जुलै, ऑगस्ट हे चार महिने खेळायचो. तेव्हा मनालीला आणि मुलांना घेऊन मी तिकडे जायचो. सामने शनिवार, रविवार असायचे, बाकीचे दिवस उसंत असायची. त्या वेळी आम्ही खूप भटकायचो. ४ महिन्यांमध्ये आम्ही ८-१० हजार मैल फिरायचो, धमाल करायचो. तो काळ पूर्णत: आमचा असायचा. अगदी ठरवून!
 त्या वेळची, नकुल लहान असतानाची एक आठवण आहे. आम्ही असंच तिथल्या ‘हाइड पार्क’मध्ये गेलो होतो. तेव्हा नकुल घसरगुंडी खेळत होता. अचानक तो घसरगुंडीवर पालथा पडला आणि खाली घसरू लागला. आता याचं डोकं जमिनीवर आपटणार आणि चांगलंच लागणार याची त्या क्षणी जाणीव झाली आणि वेगात, कसलीही पर्वा न करता मी धावलो आणि त्याला अलगद झेललं. त्या वेळी ‘हा आयुष्यातला पकडलेला सर्वोत्तम झेल’ अशी शाबासकी मनालीने दिली. ती शाबासकी आणि तो क्षण कायम स्मरणात राहील..
जीवनाप्रमाणे क्रिकेटमध्येही चढ-उतार येतच असतात, तसं ते आलेही. जेव्हा चांगली कामगिरी होत असते तेव्हा चाहते तुम्हाला डोक्यावर घेतात, अगदी कुठे ठेवू, कुठे नको, असं त्यांना होऊन जातं; पण तेच आम्ही, कामगिरी जरा जरी खराब झाली की त्या सगळ्या गर्दीतही एकटे पडतो. कालपर्यंत स्तुतिसुमनं उधळणारे तुमचे चाहते, जहरी टीकेने तुम्हाला     रक्तबंबाळ  करतात. अशा वेळी गरज असते ती आपल्या माणसाची. एक असं माणूस जे आपलं आहे, परिस्थिती चांगली असो वा वाईट सतत आपल्या पाठीशी आहे याची खात्री असणारं. माझ्याबाबतीत मनालीने नेहमी तेच केलं. तिची  सोबत कायम माझ्यासोबत राहिली. याचमुळे मला त्या त्या परिस्थितीतून  सहजपणे बाहेर पडता आलं आणि स्वत:ला सावरणं सोपं गेलं.
  एकदा वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर मी कर्णधार म्हणून गेलो होतो, त्या वेळी त्यांचा संघ दर्जेदार होता, तर आमचा संघ नवखा! कपिल देव, चेतन शर्मा सोडले तर अन्य कुणालाही जास्त अनुभव नव्हता. ती मालिका आम्ही ३-० ने पराभूत झालो, त्यानंतर इंग्लंडमध्येही आम्ही पराभूत झालो. त्या वेळी माझ्या ज्या स्वत:कडून अपेक्षा होत्या, त्यादेखील मी पूर्ण करू शकलो नव्हतो. त्यानंतर पाकिस्तानचा दौरा होता. माझे मनोबल पूर्णपणे खचलेले होते, इतके की मी त्या दौऱ्यावर न जाण्याचे ठरवले. त्या वेळी मनालीने मला धीर दिला. तिच्या खंबीरपणामुळेच मी पुन्हा परतलो आणि जोमाने खेळायला लागलो.
अशीच तिची साथ मला एमसीएच्या निवडणुकीमध्ये पराभूूत झाल्यावरही मिळाली. मी आठ वर्षे एमसीएचा उपाध्यक्ष होतो, त्यानंतर अध्यक्षपदासाठी उभा राहिलो आणि पराभूत झालो. त्या वेळी मला पराभूत झाल्याचं दु:ख नव्हतं, पण मी अशा एका व्यक्तीकडून पराभूत झालो की, जो क्रिकेटमधला नव्हताच शिवाय ज्याच्याकडे क्रिकेटसाठी वेळही नव्हता. विलासराव देशमुखांकडून स्वीकारावा लागलेला हा पराभव मला फार जिव्हारी लागला होता. माझ्यासाठी एक प्रशासक म्हणून तो सर्वात वाईट दिवस होता. त्या वेळीही मनालीची साथ मला मोलाची ठरली. अशा प्रतिकूल परिस्थितीतच नव्हे तर अनेक महत्त्वाचे निर्णय घेताना मी तिचा सल्ला महत्त्वाचा मानतो, कारण तिच्याकडे एखाद्या घटनेकडे पाहाण्याचे विविध कंगोरे आहेत, वेगळ्या दृष्टिकोनाने ती ते पाहू शकते. अंतिम निर्णय माझाच असतो, पण तिच्या सल्ल्यामुळे त्याचा खोलात जाऊन विचार करता येतो.
सहजीवन, संसार म्हटलं की, डाव्या-उजव्या गोष्टी असतातच. काही गोष्टी चांगल्या तर काही गोष्टी खटकणाऱ्या घडतातही, पण खटकणाऱ्या गोष्टी इतक्या क्षुल्लक असतात की, काळाच्या ओघामध्ये आठवतही नाहीत. अगदी खरं सांगायचं तर तिच्याकडचं असं काहीच नाही, की जे मला आवडत नाही. खरं तर मी जेवढय़ा तिच्याकडून अपेक्षा ठेवतो, त्यापेक्षा बऱ्याच कमी अपेक्षा ती माझ्याकडून ठेवते. उलट तिने मला बरेच सुखद धक्के दिलेत. सर्वात मोठा सुखद धक्का म्हणजे तिने माझ्या ५० व्या वाढदिवसाला दिलेले ‘फँ्रक मुलर’चं किमती घडय़ाळ. तिचा सर्वात चांगला गुण म्हणजे तिला माणसं जोडायला, त्यांच्याशी मैत्री करायला आवडते. म्हणजे आम्ही पाकिस्तानात जायचो तेव्हा जावेद मियाँदादच्या पत्नीशी तिची चांगली मैत्री झाली होती, तसेच काहीसे भारतीय संघातील खेळाडूंच्या पत्नींबाबतही. त्यामुळे दौऱ्यावर असताना मला तिची कधी काळजी वाटली नाही.
खरं तर मनालीला क्रिकेटमध्ये फारसा रस नाही आणि मला तिच्या ज्वेलरी डिझाइनमध्ये, पण असे असले तरी आमचा एकमेकांना पाठिंबा नेहमीच असतो. खरं तर नात्यामध्ये प्रत्येकाने प्रत्येकाला मोकळीक द्यायला हवी. जर मोकळीक असेल तर ते नातं फुलतं आणि बहरतंही. तसंच आमच्या नात्याचं आहे. आम्ही दोघांनीही नात्यामध्ये मोकळीक दिली, मोकळीक देऊ शकलो, कारण आमचा एकमेकांवर दृढ विश्वास होता आणि आहे.
माझं आणि मनालीचं लग्न झालं तेव्हाचं आणि आत्ताचं आमचं जग नक्कीच बदललेलं आहे, कारण लग्नाच्या वेळी ती २० वर्षांची होती आणि मी २३. आत्तापर्यंतचा सहवास पाहिला तर एक गोष्ट प्रामुख्याने दिसते आणि ती म्हणजे मनालीने नेहमीच बरंच काही दिलं आहे. आमच्या संसारात तिची भूमिका देणाऱ्याची राहिलेली आहे. तिने माझ्या आई-वडिलांबरोबरच मुलांना सांभाळलं, मला समजून घेतलं, कधीही कुरबुर केली नाही, त्यामुळे आजचं हे आनंददायी चित्र दिसतं आहे. वयोपरत्वे ती अधिकाधिक परिपक्व होत गेली आणि तिच्याबरोबर आमचं नातंही. जेव्हापासून क्रिकेटमधून निवृत्ती घेतली तेव्हापासून फक्त तिला आणि कुटुंबाला वेळ देत आलो आहे. आतापर्यंत जे काही करू शकलो नाही, ते करण्याचा, तिच्यासोबत अधिकाधिक वेळ व्यतीत करण्याचा माझा प्रयत्न असतो. आयुष्याची ही दुसरी इनिंग तिच्या सहवासात अधिकाधिक जावी, हीच आता इच्छा आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Dilip vengsarkar