गायत्री पाठक-पटवर्धन

दिवाळीच्या दिवसांत अनेक जण बालगृहांना भेट देतात. मात्र केवळ फराळ, कपडे, फटाके देऊन या मुलांचं पोरकेपण कमी न होता ते अधिक गडद होत जातं. सजग देणगीदारांनी संपूर्णत: अनाथ मुलांच्या सान्निध्यात सुट्टी घालवली तर या मुलांचा आनंद गगनात मावणार नाही. नुसतं येऊन फराळ, कपडे देऊन जाण्यापेक्षा त्यांना कुटुंबाचा आनंद द्यायला हवा. त्यामुळे त्यांना आपलेपणा, प्रेम खऱ्या अर्थाने कळेल. दिवाळीच्या सणानिमित्त एक वेगळा विचार मांडणारा हा लेख..

दिवाळीच्या सणाचं कुणाला अप्रूप नसतं? तुमच्या आमच्यासह समाजात असलेल्या सामाजिक संस्थांनाही असतंच की कौतुक या सणाचं! पण एक घटक अपवाद आहे. अलीकडे हा घटक अशा सणांकडे अतिशय गोंधळलेल्या मनोवस्थेने पाहतोच, पण त्याहीपलीकडे जास्त नाराज असतो स्वत:वरच आणि स्वत:बरोबर आपल्या पालक, नातेवाईकांवर. तो घटक म्हणजे बालगृहातील अनाथ, निराश्रित बालकं!

या मुलांसाठी सण म्हणजे संस्थेत देणगीदार येणार, खाऊ, कपडे वाटप करणार, आपल्यासोबत छायाचित्र काढणार आणि आपल्याशी फारसा संवाद न साधता निघून जाणार. या कौतुक सोहळ्यात याच मुलांकडून गाणी, गोष्टी म्हणवून घेणार की झाली देणगीदारांची दिवाळी साजरी! आणि हे सत्र दिवाळीच्या दिवसात अगदी सहा-सात वेळाही चालू राहतं. जबरदस्तीने का होईना पण देणगीदाराने दिलेला खाऊ संपवावा लागतो. त्यांचा तो खाऊवाटप आणि कृत्रिम सहानुभूतीचा सोहळा बघताना वाटतं, नेमका कसला ‘आनंद’ या मुलांमध्ये पेरायला हे देणगीदार येतात? सलग काही दिवस जबरदस्तीने गोडधोडाचं अन्न खात आयुष्यात ‘आनंद’ घेण्याची शिक्षाच जणू या मुलांना सोसावी लागते. बरं, ज्या उद्देशाने देणगीदार संस्थेत येऊन फराळ, खाऊ, कपडे अथवा अन्य गोष्टी वाटत असतो, त्याचा निर्मळ हेतू या उपक्रमातून साध्य होतो का? आपल्या घरीसुद्धा सारखे पाहुणे-रावळे आले की लहान मुलं कंटाळतातच की! त्यांना मात्र मुभा असते बाहेर जाऊन खेळण्याची, मित्रांसोबत, मत्रिणींसोबत भटकंती करण्याची. मात्र इथल्या मुलांना तसा ‘मोकळा श्वास’ घेण्याची परवानगी सुरक्षिततेच्या नावाखाली संस्था नाकारते. ‘संस्था म्हणजे घर नाही’ याची जणू जाणीवच मुलांना संस्थाचालक, कर्मचारीवर्गाबरोबरच देणगीदारही ‘वस्तू, खाऊवाटप’ यांसारख्या उपक्रमांच्या माध्यमातून करवून देतात.

आपण कोणते सण का साजरे करतो, याचं साधं ज्ञान या मुलांना देणं राहिलं दूर, पण सण म्हटलं, की संस्थेत आपल्याकडून करवून घेतली जाणारी इमारतीची स्वच्छता मोहीम, मग नवे किंवा बरे कपडे घालून बालगृहात आलेल्या देणगीदारांच्या कृत्रिम हास्यात साजऱ्या होणाऱ्या उपक्रमाचं नाइलाजाने केलेलं स्वागत, हेच समीकरण या मुलांच्या मनात घट्ट होत राहतं, तेही वर्षांनुवर्ष.. बालगृहातील सर्वच मुलं अनाथ नसतात. काही एकल पालकत्व असलेली, काहींची आर्थिक परिस्थिती बेताची म्हणून, तर काहींना स्वत:च्याच पालक, नातेवाईकांपासून धोका असल्याच्या घटनांमुळे आज बालगृहं भरलेली दिसून येतात. पालकत्व निभावण्याच्या कोणत्याच ‘हमी योजना’ आजही सरकारदरबारी नसल्याने पालक, नातेवाईक असूनही मायेला पोरकी झालेली अनेक बालकं बालगृहात अनाथपण भोगत आहेत. त्यातून अतिशय वाईट बाब ही, की ज्या बालकांना किमान काही नातेवाईक आहेत त्यांना दर दिवाळी किंवा मे महिन्याच्या सुट्टीत, सण साजरा करायला संस्था, बाल कल्याण समिती परवानगी देत असते. किमान काही नाती असलेल्या बालकांना, हक्काच्या मायेच्या सुखापासून वंचित राहू नये, म्हणून त्यांची सुट्टी मान्य केली जाते. पण ज्या बालकांना अगदी कुणीही नाही किंवा संस्थेत ठेवून पुन्हा कधीच भेटायला न येणारे नातेवाईक, पालक असलेल्या मुलांचं दु:ख दिवाळीच्या दिवशी अधिकच गडद होतं. मग देणगीदाराने दिलेला गोड खाऊ, कपडे, फटाके या कशानेही ती अनाथपणाची, पोरकं झाल्याची नाराजी त्यांच्या मनातून पुसली जात नाही.

बालगृहातील मुलांचा खरा आनंद कशात आहे, हेच संस्थाचालक, कर्मचारी समजू शकले नाही तर देणगीदारांना ते लक्षात येईल हे शक्य नाही. सणात सुट्टीच्या दिवशी प्रत्येक जण आपापल्या नातेवाईक, पालकांसोबत ही सुट्टी साजरी करतात हा पक्का विचार मुलांमध्ये असतो. ज्या वेळेस आपल्यासोबत असणारा आपला मित्र आपल्या नातेवाईक, पालकांकडे गेला आहे, असं त्याला दिसतं तेव्हा त्याच्या मनात अनाथपणाची भावना जास्तच घर करते. सजग देणगीदारांनी अशा संपूर्णत: अनाथ मुलांच्या सान्निध्यात सुट्टी घालवली तर या मुलांचा आनंद गगनात मावणार नाही. नुसतं येऊन फराळ, कपडे देऊन जाण्यापेक्षा काही दिवस त्यांच्याबरोबर राहणं गरजेचं आहे. देणगी देण्यासोबत त्यात हा ‘आपलेपणा, जिव्हाळा’ या निमित्ताने पेरला गेला तर सणासुदीच्या दिवसात आपल्याला नवीन काका, मावशी, आजोबा, दादा, ताई अशी नाती मिळतील, हा आनंद या मुलांना खऱ्या अर्थाने मिळू शकेल. खरं तर, मुलं त्यासाठीच जास्त भुकेली असतात.

आज बालगृहातील मुलांचं संगोपन एक ठरावीक साचेबद्ध शिस्तीने केलं जात असल्याने वयाच्या १८ वर्षांनंतर बालगृहातून बाहेर पडलेल्या मुलामुलींचं साध्या-साध्या गोष्टीत अज्ञान असतं. त्यामुळे नंतर अनेक संघर्षांचे प्रसंग ओढवतात. या मुलांना किराणा दुकान, पोस्ट ऑफिस, बँक यांसारखी कार्यालयं १८व्या वर्षांनंतरच माहीत होतात. तेव्हा त्यांना आपण वेगळ्याच दुनियेत पाय ठेवल्यासारखं वाटतं.

१८ वर्षांच्या मुलीला अथवा मुलाला साध्या बाबतीतही संवादकौशल्य, व्यक्त होणं शिकवलं जात नाही. ‘शाळा ते संस्था’ अशीच झापडं लावून मुलांना सुरक्षेच्या नावाखाली अनाठायी शिस्त लावणाऱ्या संस्था कोंबडय़ांच्या खुराडय़ापेक्षा वेगळ्या नसतात. अशा वेळेस सजग देणगीदारांना खाऊ, वस्तूवाटपासोबत संस्थेच्या परवानगीने या मुलांच्या चार-आठ दिवस आपल्या घरी बोलावून व्यक्तिमत्त्व विकास, कौशल्यविकासाच्या दृष्टीने काही उपक्रम या दिवाळीच्या सुट्टीत राबवले तर? देणगीदार आणि मुलांमध्ये या निमित्ताने घनिष्ठ नातंही तयार होईल. घर म्हणजे काय, कुटुंब म्हणजे काय असतं, वडीलधाऱ्यांशी संवाद कसा करायचा असतो, घरातले शिष्टाचार, नियम, स्वच्छता, स्वावलंबन, आत्मसन्मान यांसारख्या किती तरी गोष्टी ती मुलं या निमित्ताने समजून घेऊ शकतील. अर्थात, यासाठी संस्थेची परवानगी असावी लागते; तरच हे शक्य आहे. केवळ सुट्टीतच नाही इतर दिवसांमध्येही हे करता येईल. भलेही बाहेर जायला संस्थेने परवानगी नाकारली तर बालगृहातच मनोरंजनाचे खेळ, कथावाचन,  यासारखे उपक्रम आयोजित करता येतील.

अनेक संस्था वंचित, निराश्रित, अनाथ मुलांच्या नेमक्या समस्या जाणून न घेता या बालकांच्या प्रश्नांवर मलमपट्टी करत आहेत. दुर्दैवाने महाराष्ट्रातील बालगृहं वाढतच आहेत, हे समाजाला नक्कीच भूषणावह नाही. त्यातून शरीरं पोसण्यापलीकडे कोणताही विकास होणार नाही. महाराष्ट्रातील बहुसंख्य बालगृहं ही कोंबडय़ांची खुराडी असल्यासारखी भासतात. त्यावर अगदी छोटा उपाय म्हणजे समाजातल्या काहींनी पुढे येणं. सणांच्या निमित्ताने या मुलांच्या आयुष्यातील हे पोरकेपण काही दिवस तरी दूर केलं तरी देणगीदारांचाच उत्सवाचा आनंद द्विगुणीत होईल.

(लेखिका अनाथ, निराश्रित, वंचित मुलांच्या प्रश्नांवर काम करणाऱ्या ‘सनाथ वेलफेअर फाऊंडेशन, पुणे’च्या संचालिका आहेत)

gayatripathak1133@gmail.com

chaturang@expressindia.com