आपल्या मनातली, अविवेकाची, षड्रिपूंची, निराशेची काजळी, संतांचे विचार ऐकल्याने दूर होते. संतांची शिकवण म्हणजे जणू, जीवनाची वाटचाल दाखवणारा दिवा. आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद टिकण्यासाठी, संतांची शिकवण कायम लक्षात ठेवायला हवी.

लखलख चंदेरी तेजाचा अनुभव देणारी दिवाळी, पाहता पाहता कोटय़वधी ज्योतींना आपल्या सोबत घेऊन आली, आकाश कंदील, पणत्या, विद्युत रोषणाई, यांनी घरं सजली नटली,  जणू नक्षत्रांचा सडा पडावा, तसा आसमंत उजळून निघाला, लुकलुकणाऱ्या चांदण्या, तसे हे लुकलुकणारे दिवे, अशाच तेज:पुंज चांदण्यांनी कवी कुसुमाग्रजांना कोडय़ात टाकलं होतं. आपल्या ‘पाऊलचिन्हे’ या कवितेत, त्यांनी या चांदण्यांना प्रश्न विचारला, देव खरंच असतो का? मी त्याला पाहिलं नाही, पण तुम्ही संपूर्ण विश्वात फिरता, तुम्ही तरी त्याला पाहिलं आहे? त्यावर, चांदण्या कवीला काय उत्तर देतात पाहा,

children holidays, holidays, Parents worry,
सांदीत सापडलेले : सुट्टी!
printed receipts toxic body experts stop you must not touch those printed receipts heres why
खरेदीनंतर मिळणाऱ्या पावतीला स्पर्श करणे आरोग्यासाठी ठरतेय घातक? डॉक्टर काय सांगतात? वाचा
T M Krishna loksatta editorial Controversy over Karnataka singer t m krishnan awarded by Sangeet kalanidhi puraskar
अग्रलेख: अभिजाताची जात
supriya sule, ajit pawar, sunetra pawar
“दुसऱ्यांच्या घरात मी कशाला डोकावू?”, असं का म्हणाल्या सुप्रिया सुळे

स्मित करून म्हणाल्या मला चांदण्या काही, तो मुक्त प्रवासी फिरत सदोदित राही,

उठतात तमावर, त्याची पाऊलचिन्हे, त्यांनाच पुसशी तू, तो आहे किंवा नाही?

अरे वेडय़ा, त्या ईश्वराच्या पावलांचे आम्ही ठसे आहोत, त्यापेक्षा त्याच्या अस्तित्वाचा दुसरा पुरावा कोणता हवा? दीपावलीच्या दिवसांत, हे लखलखणारे दिवे, म्हणजे ईश्वराच्या अस्तित्वाचा पुरावाच नाही का? घराघरात आनंद देणारी, आपसातलं प्रेम वाढवणारी, मनामनात आशेचा दीप लावणारी, उदासीनतेचा अंधार घालवणारी, समृद्धी आणणारी दीपावली प्रत्येकाला हवी हवीशी वाटते. आपल्या जीवनात कायम दीपावलीचा आनंद येण्यासाठी, संतांच्या संगतीचा खूप फायदा होतो, हे सांगताना तुकाराम महाराज म्हणतात,

दसरा दिवाळी तोची आम्हा सण,

सखे संत जन भेटतील

अमुप जोडल्या सुखाच्या राशी,

पार त्या सुखाशी नाही लेखा

पंढरपूरला रोजच दिवाळी असते, यावर भाष्य करताना, संत निवृत्तीदास म्हणतात,

नित्यता दिवाळी, नाही तेथे द्वैत

पंढरपूरला नित्य कीर्तन प्रवचन यांच्या माध्यमातून, ज्ञानाचे दीप लावलेले असतात, विठ्ठलभक्तीच्या एका धाग्याने सर्व जातीधर्माचे लोक बांधलेले असतात, येथे द्वैत नाही. खरोखर, आपण पाहतो, वारकरी ज्या वेळी आषाढी कार्तिकीलाला विठूरायाकडे जातात त्या वेळी किती आनंदात असतात. चंद्रभागेच्या वाळवंटात, कुठलीही सुविधा नसताना, विठोबाच्या नामात दंग होऊन नाचत असतात. नामदेव ज्या वेळी कीर्तन करीत त्या वेळी ते म्हणत,

बोलू ऐसे बोल, जेणे बोले विठ्ठल डोले,

नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी

आपल्या मनातली, अविवेकाची, षड्रिपूंची, निराशेची काजळी, संतांचे विचार ऐकल्याने दूर होते. संतांची शिकवण म्हणजे जणू, जीवनाची वाटचाल दाखवणारा दिवा, विठोबाची आळवणी करणारी आरती नामदेवांनी लिहिली, त्यात ते म्हणतात,

विठोबाचे राज्य आम्हा नित्य दिवाळी

विष्णुदास नामा जीवे भावे ओवाळी

विठोबाच्या राज्यात कायम सत्संग असतो, म्हणून तिथे कायम दिवाळी असते, आपोआप ईश्वराचे नाव मुखात येते, तो खरा दिवाळीचा दिवस, देवावर त्यांनी जिवापाड प्रेम केलं म्हणून ते म्हणतात, विठुराया, तुझ्यावरून मी माझा जीव ओवाळून टाकला

संत सेना महाराजदेखील संतभेटीसाठी वाट पाहताना म्हणतात,

अवघा निरसला शीण, देखता संत चरण

आजी दिवाळी दसरा, सेना म्हणे आले घरा

तुकाराम महाराज म्हणतात,

तुका म्हणे संतांच्या घरची उष्टावळी

मज ते दिवाळी दसरा सण

संतांनी जे विचार दिले ते अनुभवायला मिळणे, ही खरी दिवाळी. जीवनात खरी दिवाळी अनुभवता यावी म्हणून, प्रथम आपल्या मनाला सकारात्मक केले पाहिजे हे संत शिकवतात. ज्ञानेश्वर महाराज आपले मन शांत असावे यासाठी आग्रह धरतात. एका ओवीत ते सांगतात,

माळीये जेउते नेले तेउते निवांतची गेले,

पाणिया ऐसे केले हो आवे गा

हे जग जणू काही एक उद्यान आहे, इथे एक व्यवस्था आहे. ईश्वर या उद्यानाचा माळी आहे. माळी जिथे नेईल, तिथे पाणी विनातक्रार जाते. त्या प्रमाणे आपले जीवन विनातक्रार असावे, मन निवांत म्हणजे अगदी शांत असावे. आपले सर्व जीवन ईश्वराच्या स्वाधीन आहे. आपल्यातील शुद्ध जाणीव हेच ईश्वराचे रूप आहे. याचा साक्षात्कार, सगुणोपासनेतून, निर्गुणाकडे गेल्यावर संतांना झाला. संतांनी, सर्वसामान्य माणसांना यासाठी गुरूचे महत्त्व विषद केले. उपनिषदात गुरूचा अर्थ, अंधकार घालवणारा असा सांगितला आहे. अज्ञानाचा अंधार घालवणारा, ज्ञानाचा दिवा लावणारा तो गुरू.

ज्ञानेश्वर महाराजांनी निवृत्तीनाथांना गुरू केले होते. आपल्यातील चैतन्य अथवा शुद्ध जाणिवेचा त्यांना साक्षात्कार झाला. त्या वेळी त्यांनी अभंग लिहिला,

आजी सोनियाचा दिनू वर्षे अमृताचा घनू,

हरी पाहिला रे, हरी पाहिला रे

तुकारामांनी विठ्ठलाच्या सगुण रूपाचे वर्णन अनेक अभंगांत केले.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, इत्यादी, साधनेत प्रगती झाल्यावर, आपल्यातील चैतन्याचा त्यांना साक्षात्कार झाला त्या वेळी ते म्हणतात,

देह देवाचे मंदिर आत आत्मा परमेश्वर

हे समजल्यावर पुढे ते म्हणतात,

आनंदाचे डोही, आनंद तरंग,

आनंदची अंग, आनंदाचे

सूक्ष्मात, सर्व प्राणिमात्रात, सर्व दृश्य जगात एकच परब्रह्म आहे, हे ज्ञान आहे असे ते म्हणतात. याच ज्ञानासाठी चोखामेळ्याची पत्नी सोयराबाई म्हणते,

अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग

हे ज्ञान होण्यासाठी नाम जपसाधनेचे फार महत्त्व आहे, असे संत सांगतात. नाम जप साधना करताना, आपले मन शुद्ध असायला हवे. एकनाथ महाराज म्हणतात,

भव भयाचे कारण,

मन कल्पना मुख्य जाण

रामदास स्वामी म्हणतात,

अंतरी अनुतापे तापले,

तेणे अंतर शुद्ध झाले

मनाला पश्चत्ताप झाला की मन शुद्ध होते.

तुकाराम महाराज म्हणतात,

चित्त शुद्धी नाही तेथे बोध करील काई

मन शुद्ध नसेल तर कितीही चांगली शिकवण दिली, तरी त्याचा उपयोग नाही. या मनाला शुद्ध करण्यासाठी रामदासांनी मनाचे श्लोक लिहिले. कारण ईश्वरदर्शनाचा मार्ग मनातून आहे. हरिपाठात ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,

संताचे संगती मनोमार्ग गती,

आकळावा श्रीपति येणे पंथे

संतांच्या संगतीने ईश्वर दर्शन होते म्हणजे नक्की काय? यावर, मालाडचे सत्पुरुष

के. वी. बेलसरे म्हणाले, अखंड आनंदाची अवस्था म्हणजे ईश्वर दर्शन किंवा आत्मज्ञान किंवा ज्ञानदीप, आपला आनंद बाह्य़ गोष्टींवर अवलंबून असतो. त्यामुळे मनासारखे झाले नाही, तर तो खंडित होतो. आपल्या आतला आनंद आपल्याला शोधायचा असतो. त्यासाठी तुकारामांचा अभंग पाहा,

असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे

संतांचे विचार, दैनंदिन उपासना या माध्यमातून सर्वाच्या जीवनात रोज दीपावली साजरी होवो.

दुरितांचे तिमिर जावो,

विश्व स्वधर्म सूर्ये पावो,

जो जे वांछिल तो ते लाहो, प्राणिजात

madhvi.kavishwar1@gmail.com