‘‘लग्न म्हणजे खरंच अवघड गोष्ट. मला अनेक प्रश्न पडलेत. केवळ माझं शिक्षण झालं आणि जॉब लागून स्थिरावले की झालं लग्नाचं वय? लग्नाचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे? कसा हवाय मला नवरा? लग्न म्हणजे खरंच जुगार आहे?.. ’’ .. एका तरुणीच्या डायरीतील ही पानं. तिच्या द्विधा मन:स्थितीची जाणीव करून देणारी. लग्नानंतर त्याचं, तिचं लाइफ सुरू होतं, पण ते समाधानी, आनंदी असावं, यासाठी त्याने आणि तिने लग्नाआधी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे, हे सांगणारं हे सदर दर पंधरवडय़ाने. त्यानिमित्ताने पालकांनाही आपण काही चुकतोय का किंवा काळानुसार कसं बदलायला हवं, यासाठी अंतर्मुख होऊन विचार करायला लावणारं.कितीही ठरवलं लवकर निघायचं तरी नाहीच लवकर निघणं होत. सध्या कामाची इतकी गडबड आहे की, रोजच रात्री घरी यायला उशीर होतोय. मग झोपायलाही उशीर. पण स्वत:चे पसे मिळवण्याची मजा काही औरच आहे आणि ‘कॅम्पस’मध्ये निवड झाल्यामुळे तर मी अगदी खूशच आहे. जाम भारी वाटतंय. जॉब लागून सहा महिने झालेसुद्धा.उद्या मस्त शनिवार आहे. उद्या आणि परवा रविवारी मला खरंतर गाण्याचा रियाझ करायचाय, पण आई करू देईल की नाही कुणास ठाऊक. सध्या ती मला गृहकृत्यदक्षतेचे धडे देत असते, कारण आता म्हणे माझं लग्नाचं वय झालंय! मी २५ वर्षांची झाले म्हणजे आता लग्न मस्टच, असं तिचं मत. कुणी ठरवलं हे लग्नाचं वय? केवळ माझं शिक्षण झालं आणि जॉब लागून मी त्यात स्थिरावले की झालं लग्नाचं वय? मला लग्न करावंसं वाटतंय का, याचा विचार कुणाच्याच मनात का नसतो?मला एका गोष्टीची खूप गम्मत वाटते.. इतकी र्वष आई आणि मी अगदी बेस्ट फ्रेण्ड होतो. पण आजकाल आईच्यातला आणि माझ्यातला संवादच हरवलाय. आमच्यातल्या कुठल्याही संवादाचा शेवट माझ्या रडण्यातच होतो. सगळ्याचा विलक्षण त्रास होतोय. आई आणि मी पूर्वी किती गप्पा मारायचो! पण आता मात्र.तसंही मुळातच मला त्या कुठल्यातरी विवाह मंडळात नाव घालायचं आणि त्या याद्या पाहायच्या (आता इंटरनेटवर) ही प्रोसेसच आवडत नाही. किती इरिटेटिंग आहे हे सगळं! बरं विवाह मंडळात नाव घालायचा विषय निघाल्याबरोबर तो फोटो साडीतलाच पाहिजे याबद्दल इतकी आग्रही होती आई! मला समजतच नाही, आई अशी का वागते ते! काय होतं तिला अचानक? इतके दिवस किती मस्त वातावरण होतं घरात. पण आता सगळं ढवळूूनच निघालंय! आणि ते माझ्या लग्नाच्या विषयामुळे, हे कळल्यावर तर जास्तच वैताग येतोय मला! पुण्यातील ‘अनुरूप’ विवाह संस्थेच्या संचालक असणाऱ्या गौरी कानिटकर यांना गेली १२ हून अधिक वर्षे वधू-वरांचे पालक व असंख्य जोडपी यांच्या समुपदेशनाचा दांडगा अनुभव आहे. त्या स्वत प्रशिक्षित समुपदेशक असून आतापर्यंत अनेक साप्ताहिकांतून व दैनिकांमधून त्यांनी सहज सोप्या शैलीत लेखन केले आहे. ‘लग्नाआधी’ हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. तसेच एका दूरचित्रवाणी वाहिनीवरील कार्यक्रमात पती-पत्नींमधील नातेसंबंध या विषयवरील तज्ज्ञ म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे. आई म्हणाली, ‘‘प्रियांका शोधला आहेस का कुणी एखादा? असेल तर सांगून टाक. लगेच करूया लग्न.’’ खरंतर मलाही आवडलं असतं लव्ह मॅरेज करायला. पण मित्र अनेक असले ना तरी ‘नवरा मटेरिअल’ नाही सापडलं कोणात. प्रत्येक मित्रातलं काही ना काहीतरी नाहीच आवडलं. कोणी खोटारडा वाटला, तर कोणाला भावना समजतच नाहीत, असं वाटलं. कोणी फार दिखाऊ वाटला, तर कुणाचं आणखी काही आणि मजा म्हणजे मत्रेयीच्या घरीही सेम परिस्थिती. मत्रेयीची आणि माझी मत्री शाळेपासूनची! परवाच आम्ही दोघी गप्पा मारत होतो. लग्न करण्यासाठीची मानसिक तयारीच झाली नाहीये आमच्या दोघींची. आईला सांगितलं तर म्हणाली, ‘‘कधी होणार तुमची मानसिक तयारी? एव्हाना आमची दुसऱ्या डिलीवरीची तयारी सुरू झाली होती. आमच्या वेळी कोणी असे आमचे फालतू लाड नाही करायचे!’’मला ना तर हे ‘आमच्या वेळी’ .. असे शब्द ऐकले की आपोआप कान आतून बंदच होतात. सारखं काय पालुपद? दिवस बदललेत ना! किती मस्त चाललंय आत्ताचं आयुष्य? सकाळी आई छान डबा करून देते. आरामात उठायचं. फक्त स्वत:चं आवरायचं आणि जायचं ऑफिसला. लग्नानंतर इतका आराम तर नाहीच मिळणार. आणि सगळ्यांच्या मज्र्या सांभाळायच्या. शी! हे काय आयुष्य आहे का? रविवारी संध्याकाळी आम्ही सगळे, आमचा ग्रुप कॉलेजमधला, जमलो होतो. अर्थातच लग्नाचा विषय निघाला. सगळ्यांच्याच घरातून प्रेशर होतं. विराज म्हणाला, ‘‘मुली काय आगाऊ असतात गं!’’स्तिमित म्हणाला, ‘‘अरे परवाच एका मुलीला भेटायला गेलो होतो तर म्हणाली, ‘मला रोज सकाळी अंजारूनगोंजारून उठवणारा नवरा हवाय.’ आता हिला रोज असं उठवायचं म्हणजे..’’ श्रीया म्हणाली, ‘‘अरे मग उठवायचं, त्यात काय एव्हढं?’’स्वप्ना म्हणाली, ‘‘मी करत असलेलं काम त्याला आवडले पाहिजे. तसंच तो फॅमिलीला महत्त्व देणारा हवा आणि त्याच्या लग्नाआधीच्या मत्रिणी मला नाही चालणार लग्नानंतर.’’ ‘‘परवा एका मुलीला भेटलो, तिला विचारलं की तुला काय आवडतं, तर म्हणाली ‘फिरायला, भटकायला खूप आवडतं.’ हे काय उत्तर आहे का?’’ वैभव खरंखुरा वैतागला होता.निखिल म्हणाला, ‘‘अहो बाई स्वयंपाकाचे काय? आम्हाला जेवायला लागतं रोज!’’‘‘हो का? मग आम्ही काही उपाशी नाही राहत. तुम्ही पण शिकून घ्या जेवण बनवायला. आम्ही पण करतो ना नोकऱ्या,’’ आर्या जवळ जवळ ओरडलीच.‘‘आधीच्या ब्रेक-अपबद्दल सांगायलाच हवं त्याने. हल्ली प्रत्येकाचा एखादा तरी ब्रेक-अप असतोच. आणि आधीचं काहीही असो, लग्नानंतर एकनिष्ठ असायला हवं त्यानं,’’ इति वंदना. या मुद्दय़ाला मात्र सगळ्यांनी माना डोलावल्या. आम्ही सगळेच जण तावातावाने बोलत होतो. पण कुठेतरी अंतर्मुखही झालो होतो..सगळ्यांचंच तसं मुलगा-मुलगी ‘बघणं’ सुरू होतं. रसिका सांगत होती, ‘‘भेटले ना मी ७/८ मुलांना. पण नाही कोणी क्लिक झालं!’’ (आईला समजतच नाही ‘क्लिक होणं’ म्हणजे काय ते! ती मला विचारात होती त्याचा अर्थ. पण असं कसं सांगणार? तो अनुभवच घ्यायला हवं. ‘मैं हूं ना’मध्ये नाही का शाहरुख खान म्हणतो, किसी लडकी को देखते ही अपने पिछे व्हायोलीन बजनी चाहिए.)‘‘परवा तर एका मुलाला भेटायला गेले तर तो सारखं त्याच्या मोबाइलशीच खेळत होता. आणि स्वत:बद्दलच बोलत होता. त्याचं माझ्याकडे लक्षच नव्हतं. अशा मुलाला मी ‘हो’ म्हणायचं का? आई म्हणते काय हरकत आहे? त्याला म्हणायचं की आता माझ्याबद्दल बोलूया का? पण हे त्याला कळायला नको का? शिकलेला मुलगा आहे ना तो ! आईला तर सगळीच मुलं चांगली वाटतात. प्रत्येकच मुलाबद्दल म्हणते, याच्यात काय वाईट आहे? परवा तर एका मुलाच्या डोक्यावरच्या केसांनी बाय बाय केलं होतं. म्हणजे डोक्यावर केस कमी होते. आईला म्हटलं की अंकल वाटतोय तो माझा. गेल्या आठवडय़ात एका मुलाच्या घरी गेलो होतो तर माझे आईबाबा आणि त्याचे आईबाबा नुसती एकमेकांच्या ओळखीच्या लोकांबद्दलच बोलत बसले. तो मुलगा आणि मी बसलो होतो सगळ्यांच्या तोंडाकडे बघत. किती चमत्कारिक व्हायला होतं अशा वेळी.’’ रसिका थांबायलाच तयार नव्हती. म्हणाली, ‘‘शिवाय तिला सांगितलंय मी की तू शोध माझ्यासाठी मुलगा. मला नाही जमणार ते. तिला ते खूप जास्त आवडलं. सगळ्यांना सांगते की, ‘अहो आमचीच जबाबदारी नाही का तिला चांगला नवरा मिळवून द्यायची.’ तिला मी आज्ञाधारक वगरे वाटते.’’माझ्या मनात विचारांचं काहूर माजलंय. मला चालेल का त्याचा एखादा ब्रेक-अप असेल तर? मी तर तशीही खूप पझेसिव्ह आहे. नवरा-बायको नात्यात पारदर्शकता मला महत्त्वाची वाटते. शिवाय तो समजूतदार हवा. चांगला शिकलेला हवा. आíथक परिस्थिती चांगली हवी. यापलीकडे माझ्या विचारांची मजल जात नाही.त्या दिवशी आई म्हणाली, ‘‘लिहून काढ बघू तुला कसा नवरा हवा ते! आणि तुला तू स्वत:ला कशी वाटतेस तेही लिही. (हे काय आता भलतंच).. आणि हेही लक्षात ठेव की लग्नात तडजोड ही करावीच लागते. सगळं काही मनासारखं नाही मिळणार तुला.’’हे वाक्य पण मी इतक्या वेळेला ऐकलंय, पण कोणीच मला अर्थ नाही सांगत त्याचा. लग्नाचा अर्थ तरी समजलाय का मला?खरंच किती अवघड गोष्ट आहे लग्न म्हणजे! परवा आईने विचारले तेव्हा हसण्यावारी नेले मी. पण खरंच कसा हवाय मला नवरा? आम्ही सगळेजण म्हटलं तर किती फुटकळ बोलत होतो. पण असं वाटलं की हे प्रश्न पण महत्त्वाचे नाहीयेत का? शिवाय खरंच काय आहे लग्न म्हणजे? लग्नाचं माझ्या आयुष्यात काय स्थान आहे?माझ्या कितीतरी मत्रिणींची लग्नं झाली आहेत. पण एकदोघी सोडल्या तर बाकीच्या समाधानी नाहीत लग्नाबाबत. मला या सगळ्याची भीती वाटते. माझं घर सोडून दुसऱ्या घरी कायमचं राहायला जायचं हे किती विचित्र आहे? संभ्रमात आहे मी. कोणाशी बोलू ?परवा मावशी आली होती. ती म्हणाली, ‘‘अगं लग्न म्हणजे जुगार गं बाई. दान मनासारखं पडलं तर ठीक. नाहीतर..’’अशी घाबरवणारी माणसंही कमी नाहीत. नक्कीच कुठल्यातरी तज्ज्ञ माणसाकडे जायला पाहिजे. आईने तर हातच वरती केले आहेत. आता मलाच काहीतरी हालचाल करायला हवी..!