बीड जिल्ह्यातल्या ऊसतोड कामगारांच्या पाल्यांची होत असलेली शैक्षणिक हेळसांड प्रा.डॉ. कविता यांना जाणवली आणि त्यांनी उसाच्या फडावरच पालक आणि पाल्यांच्या शिक्षणाचे स्वप्न फुलवले. ऊस कापण्यासाठी उद्या हातात येणारा कोयता काढून त्यांनी मुलांच्या हातात लेखणी दिली आहे. त्यांच्या याच कामासाठी आज ५ सप्टेंबर शिक्षक दिनाच्या दिवशी त्यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात येत आहे. गेली २९ वर्षे मुलांसाठी शालोपयोगी उपक्रम राबवत त्यांना उच्च पदापर्यंत पोहोचवणार्‍या प्रा. डॉ. कविता गित्ते यांच्याविषयी…

बीड जिल्हा हा कायमच महाराष्ट्राच्या राजकारणात आणि अर्थकारणात केंद्रस्थानी राहिलेला आहे. या जिल्ह्यातून दरवर्षी हजारो ऊसतोड कामगार इतर जिल्ह्यात व शेजारच्या राज्यात ऊस तोडायला जातात. म्हणूनच बीड जिल्ह्याला ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून सर्वत्र ओळख आहे. दसरा झाला की, हातात कोयता घेत शेकडो किलोमीटरच्या प्रवासाला निघालेल्या ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण मात्र त्याच गतीने त्यांच्या उद्दिष्टांपासून दूर जात असते. हीच बाब लक्षात घेऊन ऊसतोड कामगारांच्या पाल्यांच्या या अंधारलेल्या शैक्षणिक विश्वात ज्ञानाचा दीप प्रज्वलित करण्याचे काम प्रा. डॉ. कविता गित्ते यांनी केले आहे.बीड जिल्ह्यातील केज तालुका येथे ‘साने गुरुजी निवासी विद्यालया’त प्रा.डॉ. कविता गित्ते या मुख्याध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. २९ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेत गित्ते यांनी ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल घडवून आणला आहे. प्रा. डॉ. गित्ते यांच्या कार्याची दखल घेत त्यांना यावर्षीचा केंद्र सरकारचा ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ दिला जाणार आहेे. ज्याचे वितरण आज शिक्षकदिनी राष्ट्रपतींच्या हस्ते होणार आहे.

मुख्याध्यापिका म्हणून काम पाहणार्‍या प्रा. डॉ. कविता गित्ते यांनी नोकरी करत असतानाच ऊसतोड कामगारांच्या तसेच अनाथ मुलांच्या शिक्षण व भविष्यासाठी काम चालू ठेवले. एम.ए., एम.कॉम., बी.एड., एम.एड., एम.फिल. पीएच.डी. आणि डी.लिट. अशी उच्च शैक्षणिक पात्रता असतानाही डॉ. कविता यांनी वातानुकूलित खोलीत बसून आपले काम न करता थेट उसाच्या फडाला आपले कर्मस्थान मानले आणि तेथील विद्यार्थ्यांसाठी स्वत:च्या ज्ञानाचा वापर केला.

प्रतिवर्षी एप्रिल आणि मे महिन्यात राबवली जाणारी ‘पालक संवाद यात्रा’ हा त्यांच्या उपक्रमाचा मुख्य भाग आहे. वस्ती, तांडे आणि थेट उसाच्या फडात जाऊन पालकांचे समुपदेशन करणे, ऊसतोड कामगारांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देणे आणि शिक्षणापासून कोसो दूर गेलेल्या मुलांना शाळेत दाखल करून घेत त्यांना शिक्षणाचे धडे देण्याचे काम २९ वर्षांपासून अविरत सुरू आहे.

प्रा. डॉ. कविता यांच्या या प्रयत्नांमुळे आतापर्यंत हजारो विद्यार्थ्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले असून अनेक विद्यार्थी आजही शिकत आहेत. ऊसतोड कामगारांची मुले महिनोन् महिने शाळेपासून दूर राहिल्यामुळे त्यांच्या अभ्यासक्रमातील संकल्पना कच्च्या असतात. यावर उपाय म्हणून २००५ पासून ‘पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान’ अंतर्गत शाळा सुटल्यानंतर रोज एक तास मराठी, गणित आणि इंग्रजीच्या विशेष तासिका घेतल्या जातात. परिणामी, अक्षरांचीही ओळख नसलेली मुले आत्मविश्वासाने शिकत आहेत आणि शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होताना दिसत आहेत.

यात मोठी सामाजिक अडचण होती ती मुलींच्या सुरक्षेची. ऊसतोड कामगार आपल्या १२-१३ वर्षांच्या मुलींना एकतर सोबत ऊसतोडीला घेऊन जातात किंवा त्यांचे बालविवाह लावून देतात. मात्र, डॉ. कविता यांनी शाळेत मुलींना सुरक्षित निवासाची हमी दिली. परिणामी, पालक आपल्या मुलींना विश्वासाने शाळेत पाठवू लागले. आज याच शाळेत २५० मुली बारावीपर्यंतचे शिक्षण घेत आहेत. आत्तापर्यंत हजारो मुलींनी आपले शिक्षण पूर्ण केले असून नव्या भविष्याकडे त्यांची वाटचाल सुरू आहे.

डॉ. कविता गित्ते यांनी केवळ मुले साक्षर करण्यावर भर दिलेला नाही, तर ऊसतोड कामगारांच्या मुलांना स्वावलंबी बनवण्यासाठी शासनाच्या शिक्षण योजनेचा फायदा घेत कौशल्याधिष्ठित शिक्षण (वेल्डिंग, प्लंबिंग, शिवणकाम, हस्तकला, पाककला) आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) प्रयोगशाळांच्या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञानाची जोड दिली. याचा सकारात्मक परिणाम म्हणजे कालपर्यंत ऊसाच्या मोळीखाली दबलेल्या या मुलांनी आज राज्य व राष्ट्रीय स्तरावर सॉफ्टबॉल आणि बेसबॉलमध्ये २१० हून अधिक पदके मिळवली आहेत.

डॉ. कविता यांनी त्यांचे काम केवळ शिक्षणापुरते मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांच्या आहाराकडे जाणीवपूर्वक लक्ष दिले. त्यासाठी ‘माझी परसबाग’ उपक्रमातून सांडपाणी फिल्टर करून तयार केलेल्या सेंद्रिय पालेभाज्यांचा वापर थेट विद्यार्थ्यांच्या पोषण आहारासाठी केला जातो. गित्ते यांच्या या उत्कृष्ट कार्याची दखल घेत ‘मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा’ अभियानात सलग दोन वर्षे ‘साने गुरुजी निवासी विद्यालया’ने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला असून ‘ए ’ श्रेणी मिळवली आहे. त्याचबरोबर जळगावच्या ‘गांधी रिसर्च फाउंडेशन’च्या वतीने ‘स्वच्छ शाळा सुंदर शाळा’ हा उपक्रम राबवला जातो. यंदा देखील हा पुरस्कार याच शाळेला सलग तिसर्‍यांदा प्राप्त झाला आहे.

‘‘आताचा काळ हा जेन झी व जेन अल्फा यांचाच आहे. त्यामुळे सध्या शिकवल्या जाणार्‍या पारंपरिक शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणे आता गरजेचे झाले आहे. म्हणूनच आता शिकवण्याची जुनी पद्धत बंद करून वर्गात प्रश्न देऊन विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन अध्ययन, गटचर्चा आणि मित्रांच्या सहाय्याने अध्ययन यांसारखे उपक्रम राबवणे गरजेचे आहे. मुलांना ज्या भाषेत समजते त्याच भाषेत व विद्यार्थ्यांची बुद्धिमत्ता ओळखून त्यांना शिक्षण देणे गरजेचे आहे अशा मुलांना स्वत: शिकू द्या आणि हे मुलं जिथे थांबतील तिथे त्यांना मार्गदर्शक आणि सुलभकाची भूमिका बजावा. प्रत्येक विद्यार्थ्यांची विचार क्षमता वेगळी असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रत्येक उत्तराचा आदर करणे हीच खरी शिकवण्याची पद्धत आता स्वीकारावी लागणार आहे. जेणेकरून मुलं उत्तरासाठी पुस्तकाकडे नाही तर स्वत:च्या कल्पकतेकडेही लक्ष देतील. आता मुलांना केवळ घडवायचे नाही तर मुलं घडत असताना त्यांना साथ देण्याचे काम शिक्षकांनी व पालकांनी केले पाहिजे,’’ अशी भावना एक शिक्षक म्हणून प्रा. डॉ. कविता व्यक्त करतात.

त्या सांगतात, ‘‘ हल्ली आई-वडिलांचा मुलांशी संवाद झपाट्याने कमी होत आहे. हा संवाद कमी होणे मोठी चिंतेची बाब बनली आहे. संवादातून मार्ग निघत असतो आणि मुलांच्या अडचणी जाणून घेतल्याशिवाय त्यातून मार्ग निघू शकत नाही. त्यामुळे आई वडील, आजी आजोबा, यांचा घरातील मुलांबरोबर संवाद अबाधित राहणे अत्यंत गरजेचे आहे. डिजिटल तंत्रज्ञान मुलांसाठीचे भविष्य आहे त्यामुळे मुलं डिजिटल साधनांसोबत खेळत असतील तर त्यांना खेळू द्या फक्त ते काय खेळत आहेत याकडे पालकांचे लक्ष असले पाहिजे.’’

प्रा.डॉ.कविता गित्ते यांच्याबद्दल भावना व्यक्त करताना त्यांचे माजी विद्यार्थी देखील भावनिक होतात. गित्ते यांचा माजी विद्यार्थी व सध्या नाशिक येथे पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले बिबीशन सांगळे सांगतात की, ‘‘गित्ते मॅडम यांनी आम्हाला त्यांच्या मुलाप्रमाणे जपले. मी दोन वर्ष त्यांच्या शाळेत शिक्षण घेतलेले आहे. सुरुवातीचा काळ असल्याने पत्राच्या खोल्यांमध्ये आमची राहण्याची व्यवस्था होती. शेजारीच गित्ते मॅडम यांचे शेत असल्याने त्या शेतातून रोज भाज्या तोडून आणायच्या आणि आम्ही त्या खायच्या हा आमचा नित्यक्रम. माझ्या शैक्षणिक वर्षात मला व माझ्यासारख्या विद्यार्थ्यांना मॅडमनी पोटच्या मुलासारखे सांभाळले. आमच्या आयुष्याचा महत्त्वाचा टप्पा मॅडमच्या दूरदृष्टीमुळे यशस्वी झाला आहे. माझ्यासोबतचे अनेक विद्यार्थी आज एम.बी.बी.एस., भारतीय सैन्य दलात, पोलीस सेवेत कार्यरत आहेत. ‘महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल’ (एसआरपीएफ) मधील जवान अशोक उकंडे म्हणतात की, ‘‘आमचे पालक आम्हाला सहा-सात महिन्यांसाठी शाळेमध्ये सोडून जायचे. त्यामुळे गित्ते ताईंची प्रेमाची सावली आम्हाला जास्त लाभली. दहा वर्षांचा माझा शैक्षणिक पाया याच विद्यालयात मजबूत झाला,’’
uakshaykende73@gmail.com