डॉ. राजम यांचे व्हायोलिनवादन त्याने ऐकले होते. ते ऐकून डॉ. राजम यांच्याकडेच हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकणार, असा विचार करून तो २००५ मध्ये मुंबईत आला. डॉ. राजम यांनी काही वर्षांपूर्वी ठाण्यात वाद्यवादनाची स्पर्धा घेतली होती, त्यात तो जिंकला. ‘‘डॉ. राजम यांचा सूर अतिशय सच्चा आहे, अनुशासित आहे. मानस सरोवरातील तीर्थ जितकं शुद्ध आहे, तितका स्वच्छ, शुद्ध, निखळ असा स्वर राजम यांच्या वादनात दिसत राहतो सतत…’’ असं तो आवर्जून सांगतो.
डॉ. एन. राजम यांना नुकताच यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार जाहीर झाला. यापूर्वीही हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतात व्हायोलिनवादनासाठी त्यांना ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्कार तसेच ‘संगीत नाटक अकादमी’ पुरस्कार मिळालेले आहेत. डॉ. राजम यांच्या घरात संगीताचा वारसा पिढीजात चालत आलेला आहे. त्या स्वत: कुटुंबातल्या संगीतसाधनेच्या सातव्या पिढीच्या प्रतिनिधी आहेत.
तेव्हा घरातल्या लहान मुलांना वयाच्या तिसर्या वर्षापासूनच व्हायोलिन हातात देण्याची परंपरा चेन्नईस्थित कुटुंबात होती. त्यामुळेच त्यांच्याही घरात भाऊ टी. एन. कृष्णन यांना व्हायोलिन वाद्यासाठी कर्नाटक शास्त्रीय संगीतातील ‘पद्मश्री’ आणि ‘पद्मभूषण’ पुरस्कार मिळणे; आणि बहिणीलादेखील त्याच वाद्यासाठी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीतातील तीनही ‘पद्म’ पुरस्कार मिळणे, असा अनोखा योग डॉ. राजम आणि टी. एन. कृष्णन यांच्या संदर्भात जुळून आला. एका दक्षिण भारतीय व्यक्तीला उत्तर भारतीय शास्त्रीय संगीतासाठी व्हायोलिन या परदेशी समजल्या जाणार्या वाद्यासाठी पुरस्कार मिळणे, हेही पुरेसे बोलके आहे. यातच भारताची विविधता आणि परंपरा जपलेली दिसते. डॉ. राजम दीड-दोन वर्षांच्या असताना त्या व्हायोलिनवर सराव करणार्या घरातल्या मंडळींना पाहून स्वयंपाकघरातले चमचे, पळ्या, शेवग्याच्या शेंगा घेऊन व्हायोलिनवादनाची नक्कल करीत असत. वडील नारायण अय्यर हे गायन, वीणा आणि व्हायोलिनवादन करत.
व्हायोलिन हे पाश्चिमात्य वाद्य आहे. ‘रावणहत्था’ हे व्हायोलिनसदृश वाद्य भारतात, राजस्थानात होते. परंतु व्हायोलिनची खरी ओळख भारतात साधारण तीनशे वर्षांपूर्वी दक्षिण भारतातूनच होत गेली. कालांतराने दक्षिण भारतीय संगीत साधकांनी व्हायोलिन हे वाद्य दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीतात रुळवले. सुरुवातीच्या काळात राजम यांना वडील नारायण अय्यर तसेच कर्नाटक संगीतज्ञ सुब्रमण्यम् अय्यर यांचे अनमोल मार्गदर्शन लाभले. वयाच्या नवव्या वर्षी त्यांनी पहिला जाहीर कार्यक्रम केला होता. त्यानंतर काही काळ त्या एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्यासोबत साथसंगत करण्यासाठी जात असत. दरम्यान, त्यांच्या वडिलांची मुंबईला बदली झाली. तिथे त्यांना विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या ‘हिंदुस्तानी शास्त्रीय संगीता’ची ओढ लागली. आपल्या एका तरी अपत्याने हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत शिकावे, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. दरम्यान, डॉ. राजमदेखील मुंबईत आल्या होत्या आणि चक्क स्टेनोग्राफी, टायपिंग वगैरे शिकून नोकरीच्या शोधात होत्या. कुटुंबाची आर्थिक स्थिती हलाखीची होती. याच काळात त्यांनी व्हायोलिनवादनाचे वर्ग घेऊन कुटुंबाला हातभार लावला होता.
वयाच्या बाराव्या, तेराव्या वर्षी पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्या ‘नीलांबरी’ आणि ‘मालकंस’ या भारतीय शास्त्रीय संगीतातील रागांच्या अत्यंत भावनाप्रधान गायकीच्या ध्वनिफिती त्यांना एका मैत्रिणीकडे ऐकायला मिळाल्या. त्यातील संगीताचा राजम यांच्यावर खूपच प्रभाव पडला. इथूनच त्यांचा हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताचा प्रवास सुरू झाला. मधल्या काळात त्यांना हिंदुस्तानी संगीतज्ञ एल. आर. केळकर यांचेही अमूल्य मार्गदर्शन मिळाले. पुढे वडिलांच्या दूरदृष्टीमुळे आणि भक्कम आधारामुळे लहान वयातच त्या ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तून शिक्षण घेऊ लागल्या. त्याच काळात पं. ओंकारनाथ ठाकूर यांच्याकडे जाऊन त्यांना व्हायोलिन ऐकविण्याची संधी मिळाली. ओंकारनाथ ठाकूर यांना त्यांचे व्हायोलिनवादन आवडले आणि राजम यांनी ठाकूरजींचे शिष्यत्व पत्करले. ते जसे गात, तसेच्या तसे व्हायोलिनवर उतरवण्याचा त्यांचा प्रयत्न असे.
व्हायोलिन हे ‘गाणारे वाद्य’ म्हणून ओळखले जात असले, तरी पूर्वीपासूनच व्हायोलिनवर ‘गतकारी वादन’ जास्त प्रचलित होते. एका परदेशी वाद्याला ख्याल गायकीसाठी रुळविणे, आणि भारतीय शास्त्रीय संगीतातील त्या काळच्या पुरुषप्रधान परंपरेत गायकी ढंगात तेच शास्त्रीय संगीत व्हायोलिनवर जसेच्या तसे उतरविणे, ही एक संगीत क्षेत्रातील महत्त्वाची घटना होती. जागतिक स्तरावरील सुप्रसिद्ध व्हायोलिनवादक येहूदी मेनुहीन यांनीही याची दखल घेत अशा प्रकारच्या व्हायोलिनवादनाचे कौतुक केले होते. थोडक्यात सांगायचे तर, गतकारी शैलीत जी वाद्ये वाजतात- संतूर, सतार, व्हायोलिन, सरोद यात एका मर्यादेपलीकडे सुरांची सलगता मिळू शकत नाही. ‘मिंड’ घेऊन (आवाजाला अलगद जोडणे) स्वर लांबवला तरी तो पुढे खंडित होतो. तोच स्वर व्हायोलिनवर बो फिरवताना थोडे वेगळे तंत्र वापरून सलग खेचता येतो. माणूस जसे गातो, त्याच्या अधिकाधिक जवळ जाता येते. त्यालाच ‘गायकी’ पद्धतीने व्हायोलिनवादन म्हणतात. सुरांची अशी सलगता बासरी या ‘सुषिर’ वाद्यातदेखील मिळते. पं. ओंकारनाथ ठाकूरजींबरोबरची संगीतसाधना, पं. महादेव मिश्रांकडून शिकलेली ठुमरी यामुळे डॉ. राजम यांच्या वादनात उत्तर व दक्षिण भारतीय शास्त्रीय संगीताचा मिलाफ आणि भावनाप्रधान गायकी यांचा सुरेल संगम आढळतो.
वाराणसी येथे असतानाच त्यांनी व्हायोलिनवादनाबरोबरच संस्कृत या विषयात एम.ए. आणि संगीत विषयात पीएच.डी. मिळवली. नाट्यशास्त्र, संगीत खोलात जाऊन समजून घ्यायचे असेल तर संस्कृत यायला हवे, हे लक्षात घेऊन त्या संस्कृत शिकल्या. ‘गांधर्व महाविद्यालया’ची पदवीही घेतली. त्याच दरम्यान ‘बनारस हिंदू विद्यापीठात’ त्या व्याख्याता पदावर रुजू झाल्या. हळूहळू विभागप्रमुख व त्यानंतर अधिष्ठाता म्हणूनही जवळजवळ चार दशके त्या ‘बनारस हिंदू विद्यापीठा’तच कार्यरत होत्या. अनेक नामवंत कलाकारांबरोबर जुगलबंदी पेश करण्याची, संगत करण्याची संधी त्यांना या काळात मिळत गेली. त्यात पं. व्ही. जी. जोग, पं. रामनारायण, टी. एन. कृष्णन, उस्ताद बिस्मिल्ला खॉं, पं. हरिप्रसाद चौरसिया यांचा समावेश होतो.
डॉ. राजम म्हणतात, ‘‘जुगलबंदी म्हणजे माझ्या दृष्टीने दोन कलाकारांना आपापल्या पद्धतीने सुरांची फुलं गुंफण्याची संधीच. त्यातून पुष्परचनेसारखी अत्यंत आकर्षक संगीतरचना घडायला हवी. उगाच दुसर्यावर कुरघोडी करायचा प्रयत्न नसावाच मुळी!’’ त्यांची व्हायोलिनवादन शैली, त्यातील सांगीतिक रचना, रागाचे सादरीकरण हे अतिशय शिस्तबद्ध आणि परंपरागत आहे. त्यातूनच माधुर्य निर्माण करायची हातोटी त्यांच्याकडे आहे. स्वरांचं पावित्र्य त्या जपतात. जे संगीत त्यांच्या मनात आहे, ते केवळ चार तारांचा खेळ असणार्या वाद्यावर त्या उमटवू शकतात. एखाद्या कलाकाराचा उमेदीचा काळ ठरावीक वर्षेच असतो. डॉ. राजम त्याला अपवाद ठरतात. वयाच्या तिसर्या वर्षी हातात व्हायोलिन घेणारी मुलगी ते आज ८५ हून अधिक वर्षांच्या काळात त्याच वाद्यावर ‘संगीत साधना’ करणारी साधक, असा त्यांचा प्रवास आहे. या संगीत साधनेत कसलीही भेसळ नाही. भारतीय पद्धतीने व्हायोलिन वाजवताना खाली जमिनीवर मांडी घालून बसावे लागते. परंतु गेल्या काही वर्षांपासून त्यांनी खुर्चीवर बसून, पायाने दाब देऊन स्थिर राहील, असा एक वेगळा स्टॅण्ड व्हायोलिन टेकवण्यासाठी वापरायला सुरुवात केली. जेणेकरून शारीरिक ताण दूर होईल आणि वादन सहज होईल.
आजच्या डिजिटल आणि कृत्रिम प्रज्ञेच्या युगातही भारतीय शास्त्रीय संगीत, वाद्यसंगीत चिरकाल टिकून राहील, याबाबत राजमजींच्या मनात शंका नाही. पूर्वसूरींनी केलेल्या अथक साधनेतून, संशोधनातून हे संगीत तयार झाले आहे आणि ते अस्तंगत होणार नाही. व्हायोलिन हे वाद्य अवघड नसले, तरी ते सहजसाध्यदेखील नाही. वयाच्या कोणत्या टप्प्यावर संगीत शिक्षण सुरू करावे आणि केवळ व्हायोलिनवादन- तेही व्हायोलिनवर शास्त्रीय संगीत वाजवून करिअर होऊ शकते का, यावर गप्पा मारत असताना काही गोष्टी त्यांनी आवर्जून सांगितल्या. त्या म्हणाल्या, ‘‘जितकं लवकर तुम्ही व्हायोलिनवादन सुरू कराल, तितकं उत्तम. म्हणजे, शालेय वयात दहावी, बारावी या टप्प्यावर येईपर्यंत तुम्ही आधीच सहा, सात वर्षांचे संगीत शिक्षण घेऊन सांगीतिक पाया भक्कम केलेला असतो. मग तुम्ही महाविद्यालय आणि इतर शिक्षणात व्यग्र झालात तरी वादनाचा सराव सुरूच ठेवता येतो. संगीत की व्यावसायिक शिक्षण, असा पेच निर्माण होत नाही. वयाच्या विशीपर्यंत तुम्ही दोन्ही विषयांत चांगले कौशल्य प्राप्त केलेले असते.’’
एकूणच जीवनशैलीबद्दल विचार करतानादेखील डॉ. राजम या एक आदर्श व्यक्ती असल्याचे जाणवते. आज ८५व्या वर्षीही कार्यक्रमांसाठी प्रवास करतात. कमी आहार, भरपूर हालचाल, आवडीच्या विषयात झोकून देणे, पहाटे लवकर उठून रियाझ करणे, निर्व्यसनी आयुष्य जगणे, शांत झोप अशी सगळी सांगड घालता यायला हवी. काही काळ त्यांच्या शेजारीच राहून आणि सोबत प्रवास करून, त्यांच्याकडून व्हायोलिनवादनाचे काही मूलभूत धडे घेताना मला हे प्रकर्षाने जाणवत असे. त्या केवळ संगीत शिक्षिका नाहीत, तर जीवनशिक्षिका आहेत. त्यांच्या मुलीने म्हणजेच डॉ. संगीता शंकर आणि नाती नंदिनी आणि रागिणी शंकर यांनीही कलेचा हा वारसा घेतला असून, त्याही शास्त्रीय संगीत क्षेत्रात कार्यरत आहेत. अलीकडेच त्यांनी तमिळनाडूत ‘स्वर साधना तपोवन’ हे गुरुकुल स्थापन केले आहे. इथे त्या संगीताचे धडे देत आहेत. डॉ. राजम यांचे जगभरात अनेक शिष्य आहेत. त्यांच्याच घराण्यात नावाजलेल्या व्हायोलिनवादक कला रामनाथ आहेत. आई, वडील असो, सासू, सासरे असो किंवा पती…
डॉ. राजम यांना कायमच संगीत आराधनेसाठी भरभरून पाठिंबा मिळाला. यंदाचा ‘पद्मविभूषण’ पुरस्कार त्यांनी त्यांच्या पालकांना आणि गुरूंना अर्पण केला आहे.
भारतीय शास्त्रीय संगीताच्या प्रचार-प्रसारामध्ये पुढाकार घेणार्या राजमजींना सर्व जण प्रेमाने ‘अम्माजी’ असे संबोधतात. आज त्या केवळ संगीतविषयक तज्ज्ञच नाहीत, तर जीवन उत्तम प्रकारे कसे जगावे, या दृष्टीने प्रेरणादायी ‘मातृतुल्य गुरू’ आहेत.
uprachi333 @hotmail.com

