हवेतील धुरक्यामुळे विमानाच्या धावपट्टीवरील दृश्यमानता कमी झाली तर कसलेल्या वैमानिकांसाठीही विमानाचे उड्डाण किंवा त्याचे उतरवणे आव्हानात्मक ठरते. यावर कायमचा तोडगा काढला तो दृश्यमानता मोजणार्या ‘दृष्टी’ या भारतातील पहिल्या संपूर्ण स्वदेशी यंत्रणेने. त्याच्या सर्वेसर्वा आहेत यंदाच्या ‘पद्मश्री’ सन्मानाच्या मानकरी डॉ. शुभा अयंगार… आजच्या (२८ फेब्रुवारी) ‘राष्ट्रीय विज्ञान दिना’निमित्ताने डॉ. शुभा यांच्या कार्याविषयी…

अनेक बंधनं, अडचणी आणि आव्हानं पेलत विज्ञानाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी करणार्या स्त्रियांची भारतामध्ये मोठी परंपरा आहे. विसाव्या शतकाच्या पूर्वार्धामध्ये ‘भारतीय उसाची गोडी वाढवणारी वैज्ञानिका’ म्हणून ओळखल्या गेलेल्या वनस्पतीशास्त्रज्ञ जानकी अम्मल असोत, जैवरसायनशास्त्र क्षेत्रातील संशोधनाचा उपयोग आदिवासी आणि ग्रामीण स्त्रियांच्या पोषणासाठी काम करणार्या कमला सोहोनी असोत, पर्यायी ऊर्जा क्षेत्रातील भारताच्या प्रगतीचा पाया घालणार्या आणि त्यासाठी वेगवेगळी उपकरणं बनवणार्या हवामानशास्त्रज्ञ अन्ना मणी असोत. किंवा भारतातील कर्करोग संशोधनाचा पाया घालणार्या आणि विज्ञानप्रसाराच्या कामात समाजातील सगळ्या घटकांना सामावून घेणार्या कमल रणदिवे असोत, अशा अनेक स्त्री-वैज्ञानिकांनी जवळपास शतकभरापूर्वीपासून आपल्या वैज्ञानिक बुद्धिमत्तेचा उपयोग समाजासाठी, देशाच्या प्रगतीसाठी केला आहे. भारतीय भूमीत गेली शंभर वर्षं अखंड वाहत राहिलेला हा वारसा पुढे नेणार्या ज्या आजच्या स्त्री- वैज्ञानिक आहेत, त्यातलं एक महत्त्वाचं आणि तरीही प्रसिद्धीपासून दूर असलेलं नाव म्हणजे डॉ. शुभा अयंगार. हवाई वाहतूक क्षेत्राच्या सुरक्षिततेसाठी त्यांनी दिलेल्या योगदानासाठी त्यांना यंदाचा ‘पद्मश्री’ सन्मान जाहीर झाला आहे.

अनेक दशकं अतिशय निष्ठापूर्वक आणि शांतपणे दिलेल्या योगदानाकरता त्यांना या महत्त्वपूर्ण पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. या वर्षी विज्ञान आणि अभियांत्रिकी विभागात हा सन्मान मिळवणार्या त्या एकमेव महिला आहेत. सार्वजनिकदृष्ट्या उपयुक्त अशा वैज्ञानिक संशोधनाच्या क्षेत्रात काम करणार्या डॉ. शुभा या कीर्तीच्या वलयापेक्षा आधुनिक भारताची उभारणी हेच ध्येय मानून, अतिशय एकाग्रतेने आणि शांतपणे वाटचाल करत आल्या आहेत.

विमानतळाच्या धावपट्टीवरची दृश्यमानता मोजणारी ‘दृष्टी’ ही भारतातली पहिली संपूर्ण स्वदेशी यंत्रणा विकसित झाली, ती शुभा अयंगार यांच्या नेतृत्वाखाली. एका अभिनव वैज्ञानिक संकल्पनेचे रूपांतर त्यांनी देशभरातील विमानतळांच्या कामकाजात महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार्या यंत्रणेत केले. वैज्ञानिक आणि ‘औद्योगिक संशोधन परिषदे’च्या (CSIR), नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये (NAL) डॉ. शुभा यांच्या मार्गदर्शनाखाली, संशोधकांच्या चमूने केलेल्या कामातून ही नावीन्यपूर्ण यंत्रणा तयार झाली. ‘दृष्टी’मुळे मिळालेली सुरक्षितता केवळ विमान कंपन्या आणि त्यांच्या कर्मचारी वर्गाला, किंवा विमानतळाच्या संपूर्ण परिसंस्थेला सामावणारी नाही, ती विमानप्रवास करणार्या प्रत्येकाला आश्वस्त करणारी आहे, हे लक्षात घेतलं तर डॉ. शुभा यांच्या कामाचे महत्त्व आणखी विशेषत्वाने लक्षात येऊ शकते.

दर वर्षी थंडीच्या मोसमात उत्तर भारतातील बराच भाग दीर्घकाळ धुक्यात लपेटलेला असतो. विशेषत: देशाची राजधानी असलेल्या दिल्लीतील वाहतुकीवर धुक्याचा फार प्रतिकूल परिणाम होतो. याशिवाय गेल्या दोन-अडीच दशकांपासून दिल्ली-हरियाणामध्ये वाढलेल्या हवेच्या प्रदूषणामुळे, ‘धूर’ आणि ‘धुकं’ एकत्र येऊन ‘धुरकं’ (smog) तयार होते. या धुरक्यामुळे दृश्यमानता इतकी कमी होते की रस्त्यावर चालणेही अवघड व्हावं. या वेळीही डिसेंबर-जानेवारीमध्ये दिल्लीच्या रस्त्यांवर धुकं आणि धुरक्यामुळे सकाळी झालेल्या वाहतूक कोंडीची छायाचित्रे आणि बातम्या आपण वाचल्या-पाहिल्या आहेत. अशा प्रतिकूल हवेचा सर्वात मोठा फटका बसतो तो विमान वाहतुकीला.

थंडीच्या दिवसांत दिल्लीसह उत्तर भारतातील काही विमानतळांवरून उड्डाण करणार्या आणि तिथे उतरणार्या विमानांचे वेळापत्रक संपूर्ण कोलमडून जाणे ही नियमित बाब होऊन गेली होती. शिवाय अपघातांचा धोका तर सततचा. खराब हवेमध्ये धावपट्टी नीट न दिसल्यामुळे विमानांचे उड्डाण आणि अवतरण या दोन्ही बाबी कसलेल्या वैमानिकांसाठीही आव्हानात्मक होत्या. हे लक्षात घेता, विमानांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने भारताला अतिशय खर्चीक परदेशी उपकरणांवर अवलंबून राहावे लागत होते. मुख्यत: फिनलंड आणि ऑस्ट्रेलियामधून ही उपकरणे आयात व्हायची. त्यांची दुरुस्ती आणि देखभाल अवघड होती, आणि वेळ पडेल तेव्हा सगळे सुटे भागही बाहेरूनच मागवावे लागायचे. ‘NAL’ने डॉ. शुभा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि ‘भारतीय हवामान विभागा’च्या सहयोगाने ‘दृष्टी’ची निर्मिती करून हे अवलंबित्व कायमस्वरूपी मिटवले.

‘दृष्टी’ची सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे हवाई वाहतुकीच्या सुरक्षिततेत वाढ करताना, देशाच्या खर्चात झालेली बचत. आयात होणार्या उपकरणांपेक्षा जवळपास एकतृतीयांश खर्चात ‘दृष्टी’ची निर्मिती झाली आहे. याशिवाय स्वदेशी बनावट असल्यामुळे देखभाल अर्थातच सोपी आणि वेगवान झाली आहे. ज्या दुरुस्तीसाठी पूर्वी काही आठवडे वाट बघावी लागायची, ती आता काही तासांत होऊ शकते. ज्या क्षेत्रात खात्रीशीर देशी उपाय अनेक वर्षं दुर्मीळ होते, त्या क्षेत्रातील भारताची तंत्रज्ञानात्मक स्वयंपूर्णता ‘दृष्टी’मुळे सिद्ध झाली आहे. वैमानिक किती दूर अंतरावरचे पाहू शकतो, हे मोजण्यासाठी ‘दृष्टी’ ही यंत्रणा विकसित झाली आहे. मुख्य म्हणजे दाट धुकं, मुसळधार पाऊस आणि धुळीच्या वादळांसह सगळ्या प्रकारच्या प्रतिकूल हवेत ‘दृष्टी’ काम करू शकते. आंतरराष्ट्रीय मानकांना अनुसरत ‘दृष्टी’ अगदी ४ मीटर अंतरापासून १० किलोमीटर अंतरावरची दृश्यमानताही मोजू शकते आणि हवा खराब असली तरी वैमानिकांना दृश्यमानतेबाबत पूर्वसूचना देते. यामुळे अर्थातच अपघाताची शक्यता कमीत कमी राहते.

आता ‘दृष्टी’ची एक लहान आवृत्ती हवाई वाहतुकीखेरीज इतर ठिकाणीही प्रस्थापित केली जात आहे. उत्तर भारतातले दाट धुकं असणारे महामार्ग, डोंगराळ प्रदेश आणि रेल्वे स्थानकांवर तिचा उपयोग होत आहे. ‘दृष्टी’ या अभिनव यंत्रणेची निर्मिती २०११ मध्येच झाली आहे. जिथे कमी दृश्यमानतेचा धोका मोठा आहे, त्या दिल्लीतील ‘इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळा’वर पुरेशा चाचण्या होऊन दृष्टीच्या प्रभावी कार्यक्षमतेची खात्री पटवण्यात आली आणि २०१४ पासून तिचा नियमित वापर सुरू झाला.

दिल्लीपाठोपाठ लखनौ, कोलकातासह आता देशभरातील सुमारे १०० विमानतळांवर आणि हवाई तळांवरही ही यंत्रणा बसवण्यात आली आहे. विमान कंपन्या आणि वैमानिक यांच्यासाठी ‘दृष्टी’ने त्यांची कार्यान्वितता अधिक खात्रीशीर केली आहे. ‘दृष्टी’ या उपकरणाच्या प्रत्यक्ष निर्मितीखेरीज त्यासाठी लागणारे एकात्मिक दृश्यमानतेचे सॉफ्टवेअर विकसित करण्याचे कामही शुभा अयंगार यांनी केले आहे. धावपट्टीवरच्या वेगवेगळ्या ‘सेन्सर्स’ची माहिती हे ‘सॉफ्टवेअर’ एकत्र करते. दिल्लीसारख्या कमी दृश्यमानता असणार्या विमानतळासाठी हे ‘सॉफ्टवेअर’ अधिक महत्त्वपूर्ण आहे. हवाई वाहतुकीच्या ‘दृष्टी’ने हवेचे संनियंत्रण करणारी यंत्रणा विकसित करण्यासाठीही त्यांचे मोठे योगदान आहे. ही यंत्रणा म्हणजे ‘सेन्सर्स’चे एक परस्परांशी जोडलेले जाळे आहे. विमानतळावरचे तापमान, आर्द्रता, वारा आणि दृश्यमानता यांची तात्कालिक माहिती त्या त्या क्षणीच उपलब्ध करून देण्याचे काम ही यंत्रणा करते. विमान उतरवताना आणि उड्डाण करताना वाहतूक नियंत्रण व्यवस्था (Air Traffic Control) आणि हवामान विभागाच्या चमूला हवेच्या स्थितीबाबतचे सुस्पष्ट चित्र उपलब्ध करून देण्यासाठी ही यंत्रणा तयार केली आहे.

अत्यंत दाट धुकं आणि एकूणच खराब हवा असताना ‘ट्रान्समिसोमीटर’ या उपकरणाची अचूकता वाढवण्यासाठीच्या अभ्यासालाही शुभा अयंगार यांनी मोठा हातभार लावला आहे. ठिकठिकाणच्या क्षेत्रीय उपयोगासाठी सहज वाहून नेण्याजोगे, आर्द्रता आणि तापमान मोजणारे ‘सेन्सर्स’ विकसित करण्याच्या प्रकल्पावर शुभा अयंगार यांनी काम केले आहे. यामुळे विशिष्ट ठिकाणच्या पर्यावरणाच्या त्या त्या वेळच्या स्थितीचे संनियंत्रण करण्याची भारताची क्षमता वाढायला मदत झाली आहे. विशिष्ट उपकरणे आणि यंत्रणा विकसित करण्याखेरीज, शुभा अयंगार यांनी स्वदेशी उपकरणनिर्मितीच्या क्षेत्रातली आधुनिक तंत्रज्ञान उभं करण्यासाठी फार तळमळीने काम केले आहे. वेगवेगळ्या चाचण्या घेण्यासाठीच्या यंत्रणा, सेन्सर्सचे कॅलिब्रेशन (मोजमाप यंत्राची अचूकता तपासण्याची प्रक्रिया) आणि अनेकानेक उत्पादनांच्या डिझाइन्स प्रक्रिया विकसित करताना त्यांनी ‘NAL’ मधील तरुण वैज्ञानिकांना आणि अभियंत्यांना नुसतेच मार्गदर्शन केलेले नाही; तर घडवले आहे. ‘विज्ञान क्षेत्रातील नावीन्याचा उद्देश राष्ट्राची प्रगती, समाजाची सेवा हाच असायला हवा,’ ही शुभा अयंगार यांची दृष्टी नव्या पिढीतील संशोधकांमध्ये रुजणे म्हणजे देशाच्या भविष्यातील ‘तंत्रज्ञानात्मक स्वावलंबना’चीही ग्वाही आहे.

शुभा अयंगार यांचा जन्म कर्नाटकातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. नऊ भावंडांमध्ये त्या सर्वात धाकट्या. लहानपणापासूनच त्यांचा विज्ञानाच्या अभ्यासाकडे कल होता. वडिलांच्या प्रोत्साहनामुळे भौतिकशास्त्र घेऊन त्या पहिल्या क्रमांकाने बी.एससी आणि एम.एससी. झाल्या. आणि पुढे त्यांनी पीएच.डी. सुद्धा मिळवली. १९७४मध्ये त्या ‘NAL’ मध्ये रुजू झाल्या आणि पाच वर्षांपूर्वी निवृत्त होईपर्यंत त्यांची सगळी कारकीर्द तिथेच घडली. ज्या काळात तांत्रिक संशोधनाच्या क्षेत्रात मुलींचा फार कमी वावर होता, त्या काळात शुभा अयंगार यांनी सुरू केलेला हवाई वाहतूक क्षेत्रातील संशोधनाचा प्रवास आव्हानात्मक होता. यातून त्यांची विज्ञानातली रुची आणि ध्यास जसा स्पष्ट दिसतो, तसा अनेक देशातील मध्यमवर्गीय कुटुंबांनी प्रवाहापलीकडे जाऊन आपल्या मुलींना दिलेला पाठिंबाही अधोरेखित होतो. ‘पद्म’ सन्मान मिळाल्यावर, ‘‘हा विज्ञान, अभियांत्रिकी आणि देशसेवा यांचा संगम आहे,’’ अशी अगदी साधी प्रतिक्रिया शुभा अयंगार यांनी दिली. विशेष म्हणजे त्यांनी या सन्मानाला आपलं यश म्हणून संबोधलेलं नाही. रामकृष्ण परमहंस यांचे वचन उद्धृत करत, ‘‘यश हे बाह्य घटकांवर अवलंबून असते; समाधान मात्र तुमच्याजवळ, तुमच्या मनातच असते,’’असे त्या म्हणतात, तेव्हा प्रसिद्धीच्या वलयापासून दूर राहून देशात मूलभूत वैज्ञानिक यंत्रणा उभारण्यासाठी आयुष्य खर्च करणार्या स्त्रियांच्या कामामागची ताकद लक्षात येते. सार्वजनिक क्षेत्रातील संस्था, दीर्घकालीन संशोधन आणि स्वदेशी नावीन्य यांच्या आधारे स्वातंत्र्यप्राप्ती-पासून झालेला भारताचा संपूर्ण प्रवास शुभा यांच्या सन्मानातून प्रतिबिंबित झाला आहे.

शुभा अयंगार यांना पद्म सन्मान जाहीर झाला तो २६ जानेवारीच्या सोमवारी. त्यामुळे उद्योगपती आनंद महिंद्र यांनी ‘मंडे मोटीव्हेशन’ म्हणून डॉ. शुभा यांचा गौरवाने उल्लेख केला. वेगवेगळ्या तणावांमुळे ‘मंडे ब्लूज’ सध्या सार्वत्रिक आणि ठळक होत असताना शुभा अयंगार या ‘मंडे मोटिव्हेशन’ ठरत असतील तर त्यांच्या पद्म सन्मानाचा हा आणखी एक विशेष पैलू म्हणायला हवा. अर्थात, एखादी अभिनवनिर्मिती वलयांकित नसली तरी ती शांतपणे यंत्रणा अधिक सशक्त करताना अनेक आयुष्यं सुरक्षित करत जाणारी असते, ही शुभा यांच्या सन्मानाने अधोरेखित झालेली बाब अधिक महत्त्वाची आहे.

varshapune19@gmail.com