नाटक कलाकारांच्या आयुष्यात रस्त्याचं स्थान अढळ आहे, मग ते पारंपरिक ग्रामीण नाटकवाले असोत किंवा समकालीन शहरी नाट्यगट. अनेकांनी प्रयोग सादर करण्यासाठी एका ठिकाणाहून दुसरीकडे प्रवास केला आहे; नवीन शहरात काम करण्याची अनेक आव्हाने असतात; स्थानिक आयोजकांवर अवलंबून राहणं, सर्व प्रकारच्या नाट्यगृहांशी जुळवून घेणं, अपुऱ्या सुविधा, गलिच्छ शौचालयं वापरायला लागणं आणि सर्व प्रकारच्या लोकांबरोबर एकत्र राहण्यास शिकणं. पण, निरनिराळ्या प्रेक्षकांना आणि त्यांच्या भिन्न-भिन्न प्रतिसादांना सामोरं जाणं हे देखील आपल्या अनुभवांत भरच टाकत जातं. दौऱ्यावरचा किंवा टूरवरचा कोणताही क्षण कंटाळवाणा नसतो!
माझी आई आमच्यासाठी जी अंगाईगीते गायची ती तिने काम केलेल्या नाटकांमधलीच असायची. आम्हाला झोपवताना गोष्टी सांगायची त्या ‘इंडियन पीपल्स थिएटर असोसिएशन’ आणि ‘सेंट्रल बॅले ट्रुप’च्या असायच्या. गत शतकाच्या चाळिसाव्या दशकाच्या सुरुवातीला ते नाटक घेऊन भारतभर फिरले. बंगालच्या दुष्काळासाठी निधी उभारला, शेतकरी व कामगारांच्या समर्थनार्थ बंद व हरताळ आयोजित करण्यात मदतदेखील केली. ते रेल्वेच्या अनारक्षित डब्यांतून प्रवास करायचे, स्टेशनवर झोपायचे, त्यांना जिथे जमेल तिथे – शाळांच्या आवारात व गावाच्या चौकांमध्ये, ट्रकवर (ट्रकच्या बाजूच्या फळ्या खाली पाडून त्याचे रूपांतर व्यासपीठात केलं जायचं), लोकांच्या घरी, कारखान्यांबाहेर – त्यांना जिथे प्रेक्षक सापडतील तिथे ते कार्यक्रम सादर करायचे. ज्यांना मदतीची गरज आहे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि शेतकरी व कामगारांच्या अवस्थेबद्दल इतरांना शिक्षित करण्यासाठी प्रवासातही ते कार्यक्रम अधिकाधिक कसा चांगला होईल यासाठी प्रयत्नशील असायचे.
या साऱ्या काळात आईने जे नातेसंबंध जोडले ते आयुष्यभर तर टिकलेच, शिवाय त्यातूनच तिची अभिनय वृद्धिंगत करणारी कौशल्ये आणि निर्भीडपणाही वाढला. यामुळेच पुढे आयुष्यात तिच्या वाट्याला जे काही आलं त्या प्रत्येक गोष्टीसाठी ती सज्ज झाली होती!
फेलिसिटी केंडल यांचे ‘व्हाइट कार्गो’ हे पुस्तक नाटक कंपनीबरोबर रस्त्यावर अनुभवलेल्या आयुष्याचे, मी वाचलेल्या सर्वांत अद्भुतरम्य वर्णनांपैकी एक आहे. त्यामध्ये त्यांनी त्यांच्या आई लॉरा लिडेल आणि वडील जेफ्री केंडल यांच्या ‘शेक्सपिअराना’ या कंपनीबरोबर भारतात प्रवास केलेल्या काळाबद्दल लिहिलं आहे. ते दोघेही अभिनेते होते, ते ज्या इंग्लंडमध्ये वाढले तिथे त्यांना भरपूर पैसे मिळवून देणारी कारकीर्द घडवता आली असती. पण केंडल दाम्पत्य स्वत:ला नाटकाचे प्रसारक म्हणवून घेत आणि भारतात मुख्यत: शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये प्रयोग सादर करत, त्यातून ते शेक्सपिअरमध्ये फारसा रस नसलेल्या, कधी कधी अनुत्सुक असलेल्या भारतीय शालेय विद्यार्थ्यांपर्यंत शेक्सपिअर पोहोचवत असत. त्यांच्या कामाचा खोलवर परिणाम झालेल्यांमध्ये नसीर (नसीरुद्दीन शाह) हाही आहे, त्याने स्वत:ला काही प्रमाणात केंडल यांच्याप्रमाणं घडवलं आहे. खुद्द फेलिसिटी लहानपणीच या कंपनीत सहभागी झाली आणि एका अनोळखी, चांगलंच उकडणाऱ्या देशात एका शाळेतून दुसऱ्या शाळेत जाताना, पुढच्या आठवड्यात जगण्यासाठी पुरेसे पैसे असतील की नाहीत याची कधीच खात्री नसतानाही भटके जीवन जगण्याला जो अर्थ होता हे तिने भावनाविवश न होता लिहिलं आहे. तेदेखील कधी रेल्वेच्या दुसऱ्या दर्जाच्या डब्यांमधून प्रवास करत असत, स्टेशनवर झोपत असत आणि एका रात्री हिमालयातील बोर्डिंग स्कूलमध्ये, दुसऱ्या रात्री राजस्थानच्या राजाच्या राजवाड्यात, तिसऱ्या रात्री उत्तर प्रदेशातल्या लहानशा गावातील तात्पुरत्या सिनेमाघरात नाटक सादर करत. हे पुस्तक वाचल्यावर आणि ‘शेक्सपिअरवाला’ चित्रपट पाहिल्यावर, केंडल यांची प्रवासी कंपनी ही बरीचशी भारतात मोठ्या संख्येने असलेल्या भटक्या कलाकारांच्या नौटंकी, भवाई किंवा तमाशा कंपनीसारखी वाटते.
हेही वाचा
मी दौऱ्यांबद्दल पहिल्यांदा ८०च्या दशकाच्या सुरुवातीला ऐकलं, त्यावेळी माझी टॅलेन्टेड मैत्रीण नीना कुलकर्णी ‘हमीदाबाईची कोठी’ या यशस्वी मराठी नाटकाबरोबर दौरे करत होती. त्यात सर्व कलाकार आणि इतर सहकाऱ्यांबरोबर एकत्र बसने प्रवास करणं, बसवरच सेट चढवणं आणि त्यावेळच्या अरुंद राज्य महामार्गांवरून महाराष्ट्रभर प्रवास करणं, कमीत कमी सोयी सुविधा असलेल्या, वाईट दर्जाच्या आणि चांगली ध्वनी व्यवस्थाही नसलेल्या नाट्यगृहांमध्ये काम करणं, नाटक संपल्यानंतर घाईघाईने सेट आणि लाइट्स काढून बांधणं, नाट्यगृहातच रात्रीचं जेवण उरकणं आणि त्यानंतर पुन्हा बसमधून नवीन शहराकडे प्रवास करणं… असा दौरा असायचा. ती याबद्दल वर्णन करत असताना मी अवाक होऊन ऐकत होते. मराठी व्यावसायिक नाटकांच्या भरभराटीच्या काळात अशा पद्धतीने डझनभर कंपन्या महाराष्ट्राचा उभा-आडवा दौरा करत असत. एका महिन्यात ४०-५० प्रयोग करणं, याप्रमाणे रस्त्यावर राहणं, तेही महिनोन्महिने, हा विचार मी गुजराती नाटकाच्या बाबतीत कधीही ऐकला नव्हता. ‘इंडियन नॅशनल थिएटर’(आयएनटी) हिवाळ्यात तीन महिने गुजरातची टूर करत असे आणि एके वर्षी मी गुजराती नाटकामध्ये काम करत असताना त्यांच्याबरोबर गेले होते – नीनाने जे वर्णन केलं होतं तितकं काही हे कष्टाचं नव्हतं. उलट, त्या टूरमधील माझ्या आठवणी मुख्यत्वे ‘दारूबंदी’ असलेल्या राज्यात दारू मिळवणं किती सोपं होतं आणि टूरचे महाराज (स्वयंपाकी) किती छान छान पदार्थ खायला घालत यासंबंधीच होत्या – मी भरपूर किलो कमावूनच परत आले होते!

त्यानंतर ‘मोटली’ने प्रवास करायला सुरुवात केली… तो किती वेगळा अनुभव होता याने मी थक्क झाले. आम्ही इंग्रजी नाटके करत असू, आमच्याकडे ३ चित्रपट अभिनेते होते – त्यामुळे आम्ही विमानाने प्रवास करत असू, उत्तमोत्तम हॉटेलमध्ये राहत असू (बंगळूरुमध्ये ‘वेस्ट एंड’ आणि नवी दिल्लीत ‘द मौर्या’, यापेक्षा कमी नाहीच!), वातानुकूलित सभागृहांमध्ये नाटक करत असू आणि आम्हाला उत्तम मद्या व जेवण दिलं जाई. पण आम्ही दर काही महिन्यांनी एक किंवा नशीबवान असल्यास दोन प्रयोग करत असू आणि जिथे जाऊ तिथे आम्हाला ‘आमच्यासारखे’ लोक भेटत असत. यामुळे आम्ही आमच्या नाटकांबरोबर प्रवास का करतो – आराम मिळवण्यासाठी की विविध लोकांशी निर्माण होणारं नातं शोधण्यासाठी – याचा विचार करायला आम्हाला भाग पडलं. याचं उत्तर सोपं होतं आणि वर्षानुवर्षं आम्ही आपल्या देशातून फिरलो आहोत, विविध ठिकाणी आणि वेगवेगळ्या प्रकारच्या प्रेक्षकांसमोर नाटक केलं आहे. रंगकर्मींना भेटण्यासाठी व बोलण्यासाठी वेळ काढणं आणि कधी कधी प्रेक्षकांशीही बोलायची संधी मिळणं, यातून या टूरनी माझा देश आणि लोक, नाटक आणि त्यातील माझ्या भूमिकेबद्दलची माझी समज समृद्ध होण्यास मदत झाली आहे.
त्यानंतर काही परदेशी टूर होत्या – अनेकदा भारतीय मोठ्या संख्येने असलेल्या भागांमध्ये गुजराती नाटकांचा दौरा होत असे पूर्व आफ्रिका आणि ब्रिटन (जेव्हा माझी आई त्यांच्याबरोबर काम करत होती) आणि नंतर अमेरिकेत श्रीमंत, ‘नॉस्टॅल्जिक’ अनिवासी भारतीयांची संख्या झपाट्याने वाढल्यानंतर, त्या देशात या टूरना खूप मागणी होती – कलाकारांना परदेशी जाण्याचं खूप आकर्षण असायचं. प्रेक्षकांसाठी ही नाटके मुख्यत: चारचौघांत मिसळण्याची आणि जोड्या जुळवण्यासाठीची, दागदागिने व कार मिरवण्याची ठिकाणं होती, पण याचा कलाकारांना फारसा फरक पडत नव्हता! नाटके महत्त्वाची होतीच, कारण ती त्यांना एका हळव्या कल्पित मातृभूमीशी जोडत होती. मराठी नाटकेही याच कारणांसाठी तोच प्रवास करत असत.
‘मोटली’ने अमेरिकेतली टूर केली तोपर्यंत या सुंदर कल्पनाचित्राच्या आठवणी धूसर झाल्या होत्या – आता या टूरचा अर्थ केवळ दर वीकएंडला वेगवेगळ्या शहरांमध्ये प्रयोग करणं आणि बराचसा आठवडा कंटाळवाणा जाणं, सेल्फी घेणाऱ्या अनिवासी भारतीयांना टाळणं आणि संपूर्ण प्रवासात एकही रोचक संभाषण न घडणं इतकाच होता. बऱ्याच वेळा प्रयोगानंतर (सहसा समोशांचे स्टॉल उशिरापर्यंत सुरू असल्याने उशिरा सुरू होणारे) आम्हाला कोणाच्या तरी घरी नेलं जाई. तिथे आम्ही त्यांच्या विस्तारित कुटुंबांबरोबर फोटो काढणं टाळत असताना आम्हाला थंडगार फ्लॉवर-बटाटा किंवा कढी-खिचडी वाढली जाई. लांबलचक दिवस आणि प्रयोगानंतर रात्री दीड वाजता तो सर्वात निर्दयी प्रकार वाटत असे! अनिवासी भारतीयांच्या जगताची टूर जितक्या सहजपणे रंगभूमीची जादू नाहीशी करते तसे कोणीही करू शकत नाही.
युरोप अधिक कनवाळू होते – प्रेक्षक कमी होते, पण त्यांना आंतरराष्ट्रीय नाटकांमध्ये रस होता; नाट्यउत्सवांनी आमच्या आयुष्यात नवीन प्रेक्षकवर्ग आणला, त्यांच्यापैकी अनेकांना भाषा समजत नव्हती, पण ते सगळीकडून नवनवीन कल्पना स्वीकारण्यास तयार होते. अनेक नाट्यगृहे स्थानिक भाषांमध्ये सबटायटल किंवा लगेचच अनुवाद उपलब्ध करून देत असत – अॅमस्टरडॅममध्ये प्रत्येक आसनावर नाटक सुरू असतानाच त्याचे डच भाषांतर करून देणारे इअरफोन होते; मला आश्चर्य वाटायचे त्यातून त्यांना काय अर्थ कळत असेल! पण लंडन खास होतं – आम्ही एका दूरवरच्या उपनगरामधल्या एका लहान नाट्यगृहात ‘इस्मत आपा के नाम’चे १० प्रयोग केले. पहिले दोन प्रयोग अर्धेच भरले होते आणि आम्ही नाटक करत आहोत हे लोकांना माहीतच नाही की काय याची आम्हाला काळजी वाटत होती. पण त्यानंतर गिरीश कर्नाड नाटक पाहायला आले आणि नाटक पाहून एकदम खूश झाले; त्या रात्री ते घरी गेले आणि त्यांनी आपण काय पाहिलं हे लोकांना सांगणारे शेकडो ईमेल पाठवले. एका रात्रीत आमची तिकिटे खपली आणि प्रेक्षकांच्या प्रतिसादाने आम्ही चकित झालो. एके रात्री आम्ही रंगमंचावरून खाली आलो आणि बॅकस्टेजला जांभळे, गुलाबी केस रंगवलेल्या, चित्रविचित्र केशभूषा केलेल्या काही तरुण मुली आम्हाला भेटल्या, त्यांनी आम्हाला मिठी मारली आणि डोळ्यात पाणी आणून आम्हाला सांगितलं की त्यांना अनेक शब्द कळले नाही, पण तरीही सर्व काही समजलं आणि त्यांना ते फार आवडलं. एका प्रयोगात आम्ही लोटा व सुरई आणि तक्के आणलं तेव्हा खुसफुस ऐकू आली; दुसऱ्या प्रयोगात, ‘आलू-पालक की तरकारी और धुली मूंग की दाल, जिरे और प्याज से बघारी हुई’ असे नसीर म्हणतो तेव्हा मोठमोठे उसासे ऐकू आले.

‘नॉस्टॅल्जिया’ अगदी सहज जाणवत होता आणि प्रयोगानंतर घराबद्दल व कित्येक वर्षांनी ऐकलेल्या भाषेबद्दल बोलण्यासाठी लोक आमची वाट बघत असत. तरुणांना आणि वृद्धांना त्याच्याशी जोडून घेण्याचे मार्ग सापडले होते.
आमच्यासाठी टूर अजूनही आयुष्याचा भाग आहे. अगदी काहीच महिन्यांपूर्वी आम्ही कोकण किनाऱ्यावर कणकवलीमध्ये प्रयोग करत होतो; आम्ही तिथे अनेकदा गेलो आहोत. तिथे नदीच्या काठावर उल्हसित करणारे नाट्यगृह, प्रयोग पाहण्यासाठी आलेला सर्वोत्कृष्ट प्रेक्षकवर्ग, प्रेमळ आदरातिथ्य, चविष्ट जेवण आणि अजूनही कायम असणारी समूहभावना आमचे स्वागत करतात. पण खरा विशेष अनुभव असतो तो नाटकानंतर होणाऱ्या चर्चेचा. अगदी मध्यरात्रीनंतरही प्रेक्षक आम्हाला प्रश्न विचारतात; ते शांतपणे ऐकतात आणि बुद्धिमान टिप्पणी करतात. सुरुवातीला, एका लहानशा गावामध्ये या स्तरावरची आवड गवसणं ही आश्चर्याची बाब होती, पण काळाच्या ओघात माझ्या लक्षात आलं आहे की मोठ्या शहरांमध्ये लक्ष विचलित करणाऱ्या अनेक गोष्टी असताना, विचार करण्यासाठी फारसा संयम नसलेला प्रेक्षकवर्ग तयार होत आहे – त्यांना भरपूर मनोरंजन आणि त्वरित उत्तरं हवी असतात! पण लहान शहरांमधील प्रेक्षक अजूनही कल्पना आणि शब्द यांच्याशी जोडलेले असतात, विशेषत: महाराष्ट्रात, जिथे अनेक दशकांपासून नाटकवाल्यांच्या जागरूकतेमुळे नाट्यसाक्षरता विकसित झाली आहे.
आम्ही आताच पुण्यातला अतिशय समाधानकारक दौरा आटोपला आहे. तिथल्या प्रेक्षकांच्या प्रतिसादाने शक्य तितक्या गावांमध्ये शक्य तितक्या लोकांपर्यंत पोहोचण्याची आमची इच्छा दृढ केली आहे.
आमचा पुढचा दौरा नाशिकला असेल अशी माझी आशा आहे!