विनायक हेगाणा
दुष्काळाचे सावट सर्वदूर भीती निर्माण करू लागले आहे. शेतीचे, पिकाचे प्रश्न हे संकट अधिक गहिरे करत आहेत, त्यावर उपाययोजना करण्याचे प्रयत्नही अर्थात सुरू झाले आहेतच, मात्र दुष्काळाचे सर्वाधिक चटके बसणार्‍या घरातल्या स्त्रियांचा गंभीरपणे विचार होतो का? पाण्यासाठी भर उन्हातली वणवण असो की मुलांना घासभर अन्न भरवण्यासाठी करावी लागणारी तजवीज, शारीरिक-मानसिक दोन्ही स्तरांवर तिची कुचंबणा होत असते. थोडक्यात, प्रत्यक्षात दुष्काळ हा केवळ पाण्याचा किंवा शेतीचा प्रश्न नसतो; तो स्त्रिरयांच्या श्रमांचा, आरोग्याचा, सुरक्षिततेचा, आणि जगण्याच्या हक्काचा प्रश्न असतो. कसा ते सांगणारा लेख… ‘‘दादा, माझ्या भावाने गेल्या वर्षी शेतीच्या नुकसानामुळे आत्महत्या केली. यंदाही तीच स्थिती आहे. आता माझ्या लग्नासाठी वडिलांना पुन्हा कर्ज काढावं लागेल. दुष्काळामुळे ते कर्ज फेडता आलं नाही आणि वडिलांनीही असंच काही केलं तर? त्यापेक्षा मीच…’’ शेतकर्यांबरोबरच्या संवादासाठी सुरू केलेल्या आमच्या ‘शिवार हेल्पलाइन’वर यवतमाळ जिल्ह्यातल्या अवघ्या १५ वर्षांच्या मुलीचा आलेला हा दूरध्वनी अस्वस्थ करणारा होता.

ज्या वयात मुलीने शिक्षणाची, भविष्याची आणि स्वत:च्या आयुष्याची स्वप्नं पाहायला हवीत, त्या वयात ही मुलगी आपल्या वडिलांच्या संभाव्य मृत्यूची चिंता करत होती. मोठ्या भावाला गमावल्याचं दु:ख ताजं असतानाच शेतीचं नुकसान, कर्ज आणि लग्नासाठी लागणारा पैसा या प्रश्नांनी तिच्या मनात जगण्याबद्दलच निराशा निर्माण केली होती. अशीच आणखी एक, भरती प्रक्रियेत निवड झालेली आणि मूळची धाराशिवची, २१ वर्षांची तरुणी पुणे शहरात पुढच्या परीक्षेच्या अभ्यासासाठी आलीय. ती ‘शिवार हेल्पलाइन’वर विनंती करत होती, ‘‘गेल्या वर्षीच्या पुरामुळे मामाच्या कुटुंबाला शेतीचं नुकसान सहन करावं लागलं.

यंदा दुष्काळामुळे पुन्हा शेतीचं मोठं नुकसान झालं. घरातून पैसे येण्याची शक्यता कमी झालीय. तीन दिवसांपासून फक्त भात खातेय. दादा, एक वेळच्या जेवणाची सोय करता येईल का?’’ शिक्षणाच्या आणि नोकरीच्या माध्यमातून स्वत:चं आयुष्य घडवण्याची संधी तिच्यासमोर होती, पण घरच्या बिकट आर्थिक परिस्थितीने तिची कोंडी केलीय. या मुलीसमोर परीक्षा आहे, नोकरीची संधी आहे; पण पोट भरण्याची चिंता तिच्या अभ्यासापेक्षा मोठी झालीय.

दुष्काळग्रस्त कुटुंबातील मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न आपण अनेकदा शाळा सोडण्याच्या आकडेवारीतून पाहतो. पण शिक्षणासाठी गाव सोडून शहरात आलेल्या तरुणांचं काय? त्यांच्या घरची शेती बुडाली, पैसे येणं बंद झालं तर त्यांचं जेवण, घरभाडं, प्रवास आणि परीक्षेची तयारी कशी सुरू राहणार? एका वेळच्या जेवणाची मदत मागणारी ही मुलगी केवळ अन्न देणं नाही, तर शिक्षण सुरू ठेवण्याची संधी मागत होती.

 पदरात दीड वर्षाचं बाळ असलेली सोलापूर जिल्ह्यातली २४ वर्षांची विधवा ‘हेल्पलाइन’वर विचारत होती, ‘‘दादा, मला पुढे काय करायचं कळत नाहीये. कसं करू?’’ शेतीशी संबंधित संकटांचा ताण सहन न होऊन तिच्या पतीने आत्महत्या केली होती. तिच्या प्रश्नात केवळ पती गमावल्याचं दु:ख नव्हतं. उद्याच्या जगण्याची भीती होती. बाळाला कसं वाढवायचं, घरखर्च कसा भागवायचा, स्वत:च्या आयुष्याचं काय करायचं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नव्हती. ज्या काळात तिने स्वत:च्या भविष्याचा विचार करायला हवा होता, त्या काळात ती एका लहान मुलाच्या संपूर्ण आयुष्याची जबाबदारी पेलण्याचा प्रयत्न करत होती.

दुष्काळ म्हणजे नेमकं काय? हे समजून घ्यायचं असेल तर पावसाची आकडेवारी किंवा शेतात पडलेल्या भेगा पाहण्यापेक्षा ‘हेल्पलाइन’ दूरध्वनीच्या दुसर्या बाजूला असलेली माणसं समजून घ्यावी लागतील. कारण दुष्काळ शेतात केवळ उभं राहणारं पीक जाळत नाही; तो घरातल्या स्त्रीची सुरक्षितता, मुलींची स्वप्नं आणि कुटुंबाच्या भविष्याविषयीची आशाही हिरावून नेतो. आमच्या ‘शिवार हेल्पलाइन’वर मदतीसाठी येणारे दूरध्वनी केवळ शेतीच्या नुकसानाची व्यथा सांगत नाहीत. ते कहाणी सांगतात, मुलींच्या उद्ध्वस्त होऊ पाहणार्या शिक्षणाच्या स्वप्नांची, पती गमावलेल्या तरुण पत्नीची आणि त्याचबरोबरीने तिच्यातल्या आईच्या असहायतेची आणि घरात अन्न कसं पुरवायचं? या विवंचनेत दिवस काढणार्या अनेक शेतकरी कुटुंबांतल्या स्त्रियांचीही.

शेतकरी आत्महत्येची चर्चा करताना आपण मृत शेतकर्याची कहाणी सांगतो. कुटुंबाला मदत जाहीर होते. नुकसानभरपाईचा प्रश्न उपस्थित होतो. मात्र त्यानंतर त्या घरातल्या स्त्रीचं काय होतं? हा प्रश्न कायमच जिवंत राहातो. पतीच्या मृत्यूनंतर तिला आर्थिक आधार मिळतो का? शेती आणि कर्जाशी संबंधित निर्णयांत तिचा सहभाग असतो का? बाळाच्या संगोपनासाठी, स्वत:च्या उदरनिर्वाहासाठी आणि मानसिक आधारासाठी तिला कोण मदत करतं? आत्महत्येनंतर दु:ख संपत नाही. अनेकदा घरात- कधी नवर्याच्या, कधी वडिलांच्या, कधी भावाच्या पश्चात राहिलेल्या मुलींच्या, तरुणींच्या आयुष्यात संघर्षाचा नवा अध्याय सुरू होतो.

दुष्काळाचा परिणाम केवळ शेताच्या बांधापर्यंत मर्यादित राहत नाही; तो घरातल्या स्वयंपाकघरापर्यंत पोहोचतो. शेतात पीक आलं नाही तर घरात पैसा येत नाही. पैसा नसेल तर किराणा माल उधारीवर घ्यावा लागतो. दूध, डाळी, भाज्या आणि फळं यांसारख्या वस्तूंचा वापर कमी होतो. काही घरांत दोन वेळच्या जेवणाचं नियोजन करणंही कठीण होतं. या सगळ्यात सुरू होते ती स्त्रीची तडजोड. घरातल्या मुलांना पोटभर मिळावं म्हणून ती स्वत: कमी खाते. भाजी कमी असेल तर मुलांच्या ताटात जास्त वाढते. घरात धान्य किती शिल्लक आहे, किराणा दुकानदाराची उधारी किती झाली आहे, पुढच्या आठवड्यात स्वयंपाक कशाचा करायचा, याचा हिशेब या शेतकरी बाईच्या मनात सुरू असतो.

‘शिवार हेल्पलाइन’वर मदतीसाठी दूरध्वनी करणार्या प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते. कुणाला आर्थिक मदतीची आवश्यकता असते, कुणाला सरकारी योजनांपर्यंत पोहोचण्यासाठी मार्गदर्शन हवं असतं, कुणाला शिक्षण सुरू ठेवण्यासाठी आधार हवा असतो, तर कुणाला मनातलं दु:ख सांगण्यासाठी विश्वासाची जागा हवी असते. या दूरध्वनीकडे केवळ मदतीची विनंती म्हणून पाहून चालणार नाही. ते भविष्यात उद्भवणार्या संकटाचे लवकर मिळालेले संकेत असू शकतात. विशेषत: एखादी मुलगी जगण्याची इच्छा कमी झाल्याचं सांगत असेल, तर तिचं म्हणणं गांभीर्याने ऐकणं, तिच्या सुरक्षिततेची काळजी घेणं आणि तिला योग्य मानसिक आरोग्य सेवेशी जोडणं अत्यावश्यक असतं.

यवतमाळच्या १५ वर्षांच्या मुलीच्या मनात स्वत:च्या भविष्यापेक्षा वडिलांच्या संभाव्य मृत्यूची भीती मोठी झाली होती. धाराशिवच्या तरुणीला शिक्षण सुरू ठेवताना एका वेळच्या जेवणाची चिंता होती. सोलापूरच्या तरुण विधवेला आपल्या बाळासह पुढे कसं जगायचं, याचं उत्तर सापडत नव्हतं. या तीन वेगवेगळ्या कहाण्या; पण शेतीच्या संकटाचा भार घरातील स्त्रियाच्या मनावर आणि आयुष्यावर पडतोय याची दाहकता मांडणार्या.

दुष्काळ निवारण करताना पाणी, चारा, पीकविमा, नुकसानभरपाई आणि रोजगार यावर लक्ष देणं आवश्यक आहेच. त्याचबरोबर गरजू कुटुंबांना अन्नसुरक्षा, मुलींना शिक्षणासाठी मदत, विधवांना आर्थिक पुनर्वसन आणि संकटग्रस्त व्यक्तींना मानसिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

‘शिवार हेल्पलाइन’वर येणार्या दूरध्वनींमुळे आणखी एक महत्त्वाची गोष्ट प्रकर्षाने समोर येते. शेतीचं नुकसान झाल्यानंतर कुटुंबातील तणाव वाढू शकतो. उत्पन्न नसताना खर्च कसा भागवायचा, कर्जदारांना काय उत्तर द्यायचं, मुलांच्या गरजा कशा पूर्ण करायच्या, या प्रश्नांवरून घरात वाद होऊ शकतात. या परिस्थितीत स्त्रीला मोकळेपणाने आपल्या चिंता मांडायला आश्वासक जागा मिळेलच असं नाही. घरातील इतर सदस्यांच्या अडचणी सांभाळताना तिचं दु:ख  मागे पडतं. अनेकदा तर ती कोणत्या मानसिक दोल-आंदोलनातून जातेय याची जाणीवही कुटुंबाला नसते. कारण ती शरीराने नेहमीसारखीच कुटुंबासाठी राबते. बाहेरून सगळं नेहमीसारखं दिसतं. मात्र सततची चिंता, झोपेचा अभाव आणि भविष्याबद्दलची भीती यांचा परिणाम तिच्या आरोग्यावर होऊ शकतो. थोडक्यात, मानसिक स्थितीकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज फार आहे.

घरची आर्थिक परिस्थिती बिघडलेली असताना, वडील कर्जाच्या चिंतेत असताना, स्वत:च्या शिक्षणासाठी पैसे मागणंही अनेक मुलांना अपराधीपणाचं वाटू शकतं. अशा वेळी प्रामुख्याने मुली स्वत:च्या गरजा कमी करतात. काही शिक्षण किंवा नोकरीच्या संधी सोडण्याचा विचार करतात. पण त्यांच्या मनात नेमके कोणते विचार सुरू आहेत, हे जाणून घेण्याचं भानही कुटुंबीयांना नसतं. कारण अर्थात तेही अशाच विचाराने ग्रस्त असतात.

यामुळेच त्यांचा ‘हेल्पलाइन’ वरील संवाद महत्त्वाचा ठरतो. मात्र दूरध्वनीवरून परिस्थिती ऐकून घेणं ही सुरुवात आहे. ती मदतीची अंतिम पायरी नाही. अन्नाची गरज असेल तर स्थानिक पातळीवर मदतीची व्यवस्था, शिक्षणाचा प्रश्न असेल तर संबंधित संस्था किंवा प्रशासनाशी समन्वय आणि मानसिक आरोग्याचा धोका असेल तर प्रशिक्षित तज्ज्ञांची मदत उपलब्ध करून देणं आवश्यक ठरतंय. आत्महत्येचे विचार व्यक्त करणार्या व्यक्तीला एकटं सोडू नये आणि तिच्या सुरक्षिततेसाठी तातडीने विश्वासू व्यक्ती व व्यावसायिक मदत जोडून देणं अशी कृती महत्त्वाची ठरतेय.

जगण्याचा आधार हवा

दुष्काळात धान्यांची मदत मिळणं महत्त्वाचं आहे; पण पुढच्या महिन्यातही घरात अन्न असेल का, हा प्रश्न कायम राहतो. एक वेळचं जेवण मिळालं, तरी विद्यार्थिनीला पुढील परीक्षा देण्यासाठी प्रवास आणि राहण्याचा खर्च लागतो. विधवेला तातडीची मदत मिळाली, तरी तिच्या बाळाच्या संगोपनासाठी नियमित उत्पन्नाची गरज असते. म्हणून मदतीची व्यवस्था तातडीच्या गरजांपासून दीर्घकालीन पुनर्वसनापर्यंत पोहोचली पाहिजे.

गावपातळीवर दुष्काळग्रस्त कुटुंबांतील स्त्रियांची आणि विद्यार्थिनींची परिस्थिती जाणून घेण्यासाठी प्रशासन, ग्रामपंचायत, अंगणवाडी, शाळा, बचत गट आणि स्वयंसेवी संस्थांनी एकत्र काम करणं आवश्यक आहे. कोणाच्या घरात अन्नाची कमतरता आहे, कोणत्या मुलीचं शिक्षण थांबण्याच्या मार्गावर आहे, कोणत्या विधवेला उपजीविकेचा आधार हवा आहे आणि कोणाला मानसिक आरोग्य सेवेची गरज आहे हे वेळेत ओळखता आलं पाहिजे. दुष्काळाचं संकट एका दिवसात निर्माण होत नाही आणि एका मदतीने संपतही नाही. म्हणूनच मदतीचा उद्देश केवळ आजचं दु:ख कमी करणं नसून उद्याचं संकट पेलण्याची क्षमता तिच्यात निर्माण करणं हा असायला हवा.

दुष्काळ केवळ शेतात पडत नाही. तो आईच्या ताटात, मुलीच्या स्वप्नांवर आणि विधवेच्या सुरक्षित भविष्यात पडतो. एका स्त्रीला सावरणं म्हणजे तिच्या मुलांचं शिक्षण, कुटुंबाचं आरोग्य आणि पुढच्या पिढीचं भविष्य यांनाही आधार देणं आहे. शेती वाचवण्याच्या प्रयत्नात शेतकर्याच्या घरातली स्त्रीचं स्थान कुठे आहे? तिच्या ताटात अन्न आहे का? तिच्या मुलीचं शिक्षण सुरू आहे का? तिच्या मनावर असह्य ताण आहे का? आणि पती गमावल्यानंतर तिला जगण्यासाठी आधार मिळतोय का? या प्रश्नांची उत्तरं शोधायला हवीत.

दुष्काळ संपला की शेतात पुन्हा पीक उभं राहू शकतं, पण संकटाच्या काळात मनात घर केलेली भीती, गमावलेल्या माणसांचं दु:ख आणि मोडलेली स्वप्नं सावरण्यासाठी दीर्घकाळ आधाराची गरज असते. शेतात पीक उगवण्यासाठी पाऊस हवा; पण घरात आशा टिकवण्यासाठी माणसांचा आधारही हवा. तो आधार आपण समाज या नात्याने देऊ शकतो का, हा सहअनुभूतीचा (एम्पथी) विचार व्हायला हवा.

शेतीविषयक मार्गदर्शनासाठी तर आहेच, परंतु शेतकर्‍यांना आपले प्रश्न मांडता यावेत, आपले दु:ख व्यक्त करता यावे, चिंतेतून मुक्त होण्यासाठी मोकळेपणाने बोलता यायला हवे, इतकेच नव्हे तर अगदी आत्महत्येचा विचार जरी मनात आला तरी तो बोलून दाखवता यावा यासाठीची ही –  ‘शिवार हेल्पलाइन’ – ८९५५७७१११५ 

u ceo.shivar@gmail.com

लेखक शिवार हेल्पलाइनचे संस्थापक तसेच राज्य शेतकरी आत्महत्या प्रतिबंध टास्क फोर्सचे सदस्य आहेत.