scorecardresearch

स्त्री

समकालीन वास्तवावर मिश्कील टीका-टिप्पणी करणारं लेखन मी पुष्कळदा करत असले

‘‘दत्तक घेण्यापूर्वी’ , ‘काय तुझ्या मनात?’ आणि ‘आई तुझ्याच ठायी’ ही तिन्ही पुस्तके लिहिताना मला स्त्रीजीवनाचं नाना रूपांत दर्शन घडलं. कोणी नुसता बायकांबद्दल – कुटुंबाबद्दल – घरांबद्दल लिहितो असं म्हटलं की आपल्याकडे त्याचा उपहास होतो. ‘तेच ते लिहिणारे’ म्हणून टीका होते. त्याबाबत मात्र मला म्हणावंसं वाटतं, प्रत्येक बाईची गोष्ट सूक्ष्मत: वेगळी आहे. ‘हरी अनंत, हरिकथा, अनंत’, म्हणतात असं ‘स्त्रीजीवन अनंत, स्त्रीकथा अनंत, हेच शेवटी खरं आहे.’’

समकालीन वास्तवावर मिश्कील टीका-टिप्पणी करणारं लेखन मी पुष्कळदा करत असले आणि वाचकांना ते बहुधा आवडत असलं तरी मला अभ्यासपूर्ण लेखन करायलाही तितकंच आवडतं. माझे अभ्यासाचे विषय हे स्त्रीजीवन- कुटुंबजीवन- समाजजीवन यांच्याशी निगडित असतात. विनोदी लेखन हे बरेचदा थेट दृष्टीसमोरच्या सृष्टीवर निशाणा ठेवून केलं जातं. पण अभ्यास-वाचन-चिंतन करायला लागलो की रोजच्या घटितांमागचीच गुंतागुंतीची सृष्टी आपल्याला दिसायला लागते. हे दर्शन सुखद नसतं. उलट हादरवणारं, आपली पाटी तपासायला लावणारं आणि काही वेळा आयुष्यावरच विश्वास उडवणारंही असतं. तशाच प्रकारे माझ्या तीन पुस्तकांबाबतचे काही अनुभव आज या सदरात सांगावेसे वाटतात.

‘दत्तक घेण्यापूर्वी’ हे पुस्तक १९८५-८६ या काळात मी लिहिलं आणि पुण्याच्या ‘राजहंस’ प्रकाशनने ते प्रसिद्ध केलं. त्यापूर्वी वर्षभर मी दत्तकाचं काम करणाऱ्या व्यक्तींना भेटत होते, संस्थांमध्ये जात होते. कोरियन वॉरनंतर अमेरिकेमध्ये मोठय़ा प्रमाणावर मुलं दत्तक घेतली गेली होती. त्यामुळे तिथल्या लेखकांनी दत्तक पालकत्वाबद्दल बरंच लिहिलेलं होतं. आपल्याकडे क्वचित् कुठे छोटे लेख वगैरे येत असत. या विषयावर वैद्यकीय-कायदेविषयक-मानसशास्त्रीय-समाजशास्त्रीय अशा सर्व अंगांनी प्रकाश टाकणारं माझं पुस्तक मराठीमधलं पहिलंच होतं. आजच्या मानाने त्या काळात दत्तकाविषयी जाणीव जागृती फारच कमी होती. परस्पर मुलं विकणारे महाभाग होते. नात्यातलं एखादं अनाथ मूल घरी आणून त्याला दणकावून आपलं आडनाव लावणारे, ‘मुलासारखं’ वाढवणारे काही प्रतिष्ठित लोक होते. खूप नियोजनपूर्वक गरोदरपणाचं नाटक करणाऱ्या, पोटावर उशा बांधून; गरोदरपणा भासवून; ऐनवेळी बाळंतपणासाठी परगावी जाऊन ‘आयतं’  मूल घेऊन येणाऱ्या बायका होत्या. पण या सगळ्यातून पुढे कायदेविषयक अडचणी येत होत्या. त्यांना घाबरून परस्पर ‘व्यवहार’ करण्याचं प्रमाण फार होतं.

दत्तक देणाऱ्या संस्थांमध्ये माहिती घेण्यासाठी मी गेले तरी मला पहिल्यांदा हेच विचारलं जाई. ‘‘तुम्हाला मूल नाहीये का? मुलगा नाहीये का? तुम्हालाच दत्तक मूल हवं असणार. एरवी तुम्ही इथे कशाला याल?’’ वगैरे वगैरे. माझ्या व्यक्तिगत जीवनात किंवा नजीकच्या वर्तुळातही अशी काही समस्या नव्हती. पण संस्थाचालक कायम संशयाने बघत. असा उगाच अभ्यासासाठी अभ्यास कोण करेल? तोही, उघड उघड संसारी दिसणारी माझ्यासारखी बाई? त्यांचा विश्वास संपादन करून जी माहिती मिळे ती विदारक असे. बहुतेक दत्तकेच्छुक पालकांना आपण घेणार ते मूल कोणाचं आहे, कोणत्या जात-धर्म-पंथाचं आहे, ते कोणाच्या पापाचं फळ नाहीये ना हे समजून घेण्याची अत्यंत गरज वाटे. मूल हे मूल असतं, आईबापाचं तथाकथित पाप त्याला काही चिकटत नाही, सगळी नवजात मुलं सारखीच दिसतात, जन्मत: कोणावरही धर्मपंथाचा शिक्का-ठसा नसतो हे गळी उतरवणं फार कठीण पडे. त्यात हिंदी सिनेमांनी नसती विदारक चित्रं रंगवून बुद्धिभेद करण्याचा विडा उचललेला! आपण आपल्या आईबापांचं रक्ताचं मूल नाही, दत्तकात घेतलेले आहोत, असं एखाद्या हिरोला कळतं आणि धक्का बसून तो जीव द्यायला जातो. मग तो उंच टेकडीवर चढतो आहे, मागे त्याचे आईबाप ‘मेरे बच्चे’, ‘हमारे लाल’ वगैरे टाहो फोडत चालले आहेत अशी दृश्यं तेव्हा सर्रास दाखवत. ती अतिरंजित आहेत, दत्तक मुलाशी चांगला भावबंध जोडला असेल तर तो एवढा काही विद्ध होत नाही हेही सांगावं लागे. मला जमलं तेवढं मी ते काम केलं. सुमारे वर्षभराच्या वाचन, चर्चा, भेटीनंतर ‘दत्तक घेण्यापूर्वी’ हे मराठी पुस्तक प्रसिद्ध झालं. पुढे काही काळाने ‘थिंकिंग ऑफ अ‍ॅडॉप्शन’ हा त्याचा इंग्रजी अनुवाद ‘युनिसेफ इंडिया डिव्हिजन’ने प्रसिद्ध केला आणि दत्तकेच्छुक पालकांना सल्ला-मार्गदर्शन देण्याचं वेगळंच काम माझ्याकडे येऊ लागलं.

मी प्रशिक्षित समुपदेशक नव्हते. त्याची मला फार हौसही नव्हती. पण मूल होत नाही म्हणून अगतिक झालेले कोणी पालक भेटायला आले की गप्प राहावत नसे. एका करिअरिस्ट जोडप्याला मूल हवं होतं. तर घरच्या ज्येष्ठांनी सांगितलं, ‘‘तुमचं तुम्हाला मूल झालं असतं तर आम्ही वर्षभर येऊन राहून ते खूप सांभाळलं असतं. उपऱ्या-दत्तक मुलाबाबत आम्ही काही मदतबिदत करणार नाही. तुम्ही करताय ते तुम्हीच निस्तरा!’’ एवढं भरघोस ‘सहकार्य’ दिसल्यावर ते काय बापडे दत्तक घेणार? एक धट्टाकट्टा दिसणारा तरुण वेळीअवेळी माझ्याकडे यायचा. त्याचं म्हणणं एवढंच होतं की त्याच्या बायकोचा दत्तकाकडे कल नव्हता. मी वडीलकीने तिला सांगून राजी करावं. त्याबद्दल तो मला पैसे द्यायलाही तयार होता. आई आणि बाप या दोघांनाही उत्कट इच्छा असेल तरच दत्तक घ्यावं, तरच ते यशस्वी होतं हे मी हरप्रकारे सांगून पाहिलं. तो मानेना. पुढे त्याची मजल मला धमकावण्यापर्यंत गेली. अवेळी येऊन दमदाटी करायचा. फोनवर धमकावायचा. शेवटी एकदा तिन्हीसांजची एक नाजूक तरुण मुलगी अशीच न कळवता माझ्या घरी आली. दरवाजातच रडायला लागली. ती त्या सधन तरुणाची बायको होती हे नंतर कळलं. जरा बसवून, शांत करून बोलू दिल्यावर तिची गोष्ट पुढे आली. ती मूल होण्यास पूर्ण समर्थ होती. तिच्या पतीतच एका अपघातामुळे न्यून आलेलं होतं. त्याला आणि त्याच्या घरच्यांना ते माहीत होतं. म्हणूनच ही गरिबाची देखणी मुलगी त्यांनी घरी आणली होती. आणि आता ‘तिला’ मूल होत नाही म्हणून दत्तक घ्यायची तयारी ‘ते’ जगासमोर दाखवत होते. ते मोठय़ा मानाने तिच्या उणिवेचा स्वीकार करायला निघाल्याचं कुटुंबासमोर दाखवत होते. ‘‘बाई, एकदा दोन्ही घरच्या मोठय़ा माणसांसमोर माझ्या नवऱ्याने स्वत:च्या तोंडाने खरी परिस्थिती सांगू दे. मग त्याच्यासाठी मी एक काय, चार पोरंही दत्तक घेऊन वाढवायला तयार आहे. माझं त्याच्यावर खूप प्रेम आहे. फक्त या बाबतीतला ठपका त्याने माझ्यावर ठेवला नसता तर..’’ हे तिचं बोलणं आणि असहाय रडणं मला आजही विसरता येत नाही.

याच्या अगदी विरुद्ध गोष्टही समोर आली. वयाच्या चाळिशीतलं ते जोडपं भेटायला आलं तेव्हा बाईंचे सहा-सात गर्भपात झालेले. तब्येतीचं मातेरं झालेलं. तरीही ‘स्वत:चं’ मूल हवं हा हट्ट सोडायची तयारी नव्हती. नवऱ्याला तिची स्थिती बघवत नव्हती. त्यानं माझ्या मदतीने तिचं मन वळवलं. मूल दत्तक घेतलं, थाटात बारसं केलं. ते तिघं खूप सुखात असताना हृदयविकाराने नवरा वारला. बातमी ऐकली आणि मी मनोमन ओशाळले. हादरले. काय करायला गेलो आणि काय होऊन बसलं हे? आता नवऱ्याशिवाय त्या बाईने ते एकटीने लहान मूल कसं वाढवावं? मला तिच्यासमोर जाणं नकोसं वाटू लागलं. पुढे एकदा रस्त्यात ती मला भेटली. मी नजर टाळणार तो स्वत:च पुढे होऊन म्हणाली, ‘‘तुम्ही का वाईट वाटून घेताय? त्यांचं आयुष्य तेवढंच असणार. पण मला पुढे जगायला एक निमित्त दिलंत ना तुम्ही? याला वाढवायचं काम म्हणा, स्वप्न म्हणा. पुढे नसतं तर कशासाठी जगले असते मी?’’ ऐकलं अन् मी अवाक्  झाले. एकाच घटनेकडे किती वेगवेगळ्या दृष्टीने बघता येतं, स्त्रीत्व-पुरुषत्व आयुष्याचं पूर्णत्व याच्या कोणत्या कल्पना आपल्या समाजात आहेत, कुळ-वंश-घराणं याचे किती वृथा अभिमान आहेत आणि शेवटी निखळ माणुसकीचं दर्शन यापेक्षा किती अंगुळं वर आहे याचं विश्वरूपदर्शन मला माझ्या या पुस्तकाने घडवलं.

त्यानंतर आपल्या समाजातल्या स्त्रीविश्वाचा धांडोळा घेऊन ‘काय तुझ्या मनात?’ हे पुस्तक मी २००४ साली तयार केलं. स्त्रीरोगतज्ज्ञ, मानसशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ यांनी पूर्वी केलेल्या कामाची मदत घेऊन, शक्य त्यांना भेटून- बोलून सुमारे सव्वा वर्षांत काम हातावेगळं केलं. बायकांचं वागणं ब्रह्मदेवालासुद्धा समजत नाही, बायका लहरी- मुडी – बेभंरवशाच्या असतात, अस्थिर असतात, अति हळवेपणापासून तर्क कठोरतेपर्यंत मोठय़ा आंदोलनाचं दर्शन घडवतात वगैरे नेहमीच बोललं जातं. पण या गोष्टी बायका हौसेने करतात की त्यांच्या शरीरातली हॉर्मोन्सची आंदोलनं त्यांना तसं करायला भाग पाडतात हे मला समजून घ्यावंसं वाटलं. बाईच्या भावविश्वामधले सनातन हेलकावे आणि आज बदलत्या परिस्थितीने निर्माण होणारे वेगळे ताण असे दोन पदर या अभ्यासाला होते. मी शक्यतेवढी खटपट केली.

लग्न ठरलेली मुलगी, रातोरात मुलीची ‘बाई’ होणारी संसारी बाई, गरोदरपणाची चाहूल लागलेली स्त्री, अपत्यजन्माने गोंधळलेली स्त्री, तथाकथित भरल्या गोकुळात एकटं वाटणारी स्त्री, देहाच्या उतरणीवरची स्त्री, बाईपणा संपवलेली स्त्री अशा अनेक टप्प्यांवरच्या बायकांना ‘काय तुझ्या मनात?’ असं विचारून पुस्तक तयार केलं. एप्रिल २००४ मध्ये पुस्तक प्रसिद्ध झाल्यावर जेमतेम आठवडाभरात एका ज्येष्ठ न्यायमूर्तीच्या पत्नींचा फोन आला. मला म्हणाल्या, ‘‘तुमचं पुस्तक एका बैठकीत वाचून काढलं. नंतर ह्यंना वाचायला दिलं. ह्यंनीही वाचलं. आता आम्हाला वाटतंय, आमच्या तरुणपणी म्हणजे २५-३० वर्षांपूर्वी असं पुस्तक आमच्या वाचनात आलं असतं तर आमच्या संसारातले कित्येक ताण कमी झाले असते. यापुढे कोणतंही विसंवादग्रस्त जोडपं भेटलं की आम्ही त्याला हे पुस्तक भेट देणार आहोत. टीका करणं, नावं ठेवणं संपायला आणि समजदारी वाढायला याचा फार उपयोग होईल!’’ विशेष म्हणजे पुढे त्या न्यायमूर्तीनीही संवादात भाग घेऊन मला दाद दिली. प्रश्न नुसता दाद-वाखाणणीचा नव्हता. नाही. फक्त आपलीच बायको चमत्कारिक आहे, आपल्याच वाटय़ाला कहीतरी वेगळं आलंय असं मानण्याचा आहे. एका तरुण जोडप्याने कायदेशीर विभक्ततेची प्रक्रिया सुरू केलेली होती. हे पुस्तक वाचल्यावर त्यांनी ती थांबवली. हे मला पत्राने कळवताना त्या तरुणाने लिहिलं, ‘‘डय़ुअल करिअर मॅरेजमध्ये कोणत्या तडजोडी कराव्या लागतील याचा आम्ही विचारच केला नव्हता. तुम्ही त्यांची जाणीव करून दिलीत. ‘याला’ किंवा ‘हिला’ माझं मन समजतच नाहीये या गंडातून आम्ही बाहेर आलो. आता आम्ही पुनश्च समजुतीने, सामोपचाराने जगण्याचा प्रयत्न करणार आहोत.’’

आजच्या प्रौढ-शिकलेल्या-कमावत्या मुलीला/ स्त्रीला लग्नानंतर एका अपरिचित कुटुंबात जाऊन जमवून घेणं, स्वत:साठी जागा निर्माण करणं हा मोठा ताण वाटतो. पूर्वीच्या अल्पशिक्षित कोवळ्या मुलींना कदाचित तो तितकासा जाणवला नसेल. आज दीर्घायुष्य वाढल्यामुळे ऋ तुनिवृत्तीनंतरही ३०-३५ र्वष जगणं अनेक बायकांच्या वाटय़ाला येतं. ज्यांनी स्वत:मधल्या बाईपणालाच अंतिम महत्त्व दिलं असेल अशा बायकांना हे पुढचं ‘बिगरबायकी’ जीवन कंटाळवाणं वाटू शकतं. असे आधुनिक काळाचे प्रश्न मी या पुस्तकात मांडले. त्यावर अनेक महिला मंडळांमध्ये चर्चा झाल्या. विचारांची देवघेव झाली.

एका बाईने मला चाट पाडलं. ‘गोपनीय’ असा शेरा मारलेल्या पत्रातून कळवलं. ‘‘वयाच्या पंचेचाळिशीत बाईपणा संपला आता ७५-७८ पर्यंत जगावं लागणार. विरळ केस, कोरडी त्वचा, ओघळलेलं शरीर हे काहीही मला आवडत नाहीये. तर निदान साठीपर्यंत बाईपणाची नियमित मासिक चक्रं टिकवण्याचं काही औषध असेल तर कळवा.’’ मी काय कळवणार होते कपाळ? एक मात्र वाटलं. या बाईच्या शरीरापेक्षा मनाला औषधोपचाराची गरज आहे. असे अनेक साक्षात्कार मला या पुस्तकाने घडवले. अगदी विसंगत वाटणाऱ्या वर्तणुकीमागची संगती दाखवून दिली. उलट काही भ्रमही तपासून पाहायला लावले.
भ्रमावरून आठवलं. मला पहिलं मूल झाल्यापासून ‘आईपणा’बाबत मी अनेकदा विचार करायचे. बाई ‘आई’ होते तेव्हा काय कमावते, काय गमावते, बाई जितक्या नैसर्गिकपणे ‘आई’ होते तितक्या सहज पुरुष ‘बाप’ का होऊ शकत नाही? भल्या भल्या बायकांचीही आई झाल्यावर गोची कशी होते, तर्कबुद्धी आपल्याबाबत कुठे कशी गहाळ होते वगैरे अनेक मुद्दे मनात येत. त्यामागे स्वानुभव असे आणि निरीक्षणंही असत. तिकडे इर्मा बॉम्बेक ही अमेरिकन स्फुट लेखिका ‘मदरहूड : द सेकंड ओल्डेस्ट प्रोफेशन’ यासारखं पुस्तक लिहून पाश्चात्त्य खतपाणी घालत होतीच. एकीकडे ‘महन्मंगल मातृत्वा’चा उद्घोष होता, हिरकणीची गोष्ट होती तर दुसरीकडे पाणी डोक्यावरून जायला लागल्यावर पिल्लांच्या खांद्यावर उभी राहून जीवन वाचवणारी कोणा माकडीणीची गोष्टही होती. यातलं खरं काय? अगदी अंतिम नसलं, तरी, टिकाऊ काय?

माझ्यापरीने ह्य प्रश्नाचा वेध मी घेतला तो माझ्या ‘आई तुझ्याच ठायी’ ह्य़ा पुस्तकात. २००८-०९ मध्ये. तोवर मला दोन नातवंडंही झालेली होती आणि पहिल्या आईपणापासून दुसऱ्या आईपणापर्यंतची सर्व स्थित्यंतरं अनुभवून झाली होती. त्या बळावर आणि अनेक अभ्यासकांची, पुस्तकांची मदत घेत मी या पुस्तकाचा प्रपंच मांडला. त्याच वेळेला एका पाहणीचा निष्कर्षही वाचनात आला. त्यात असं म्हटलं होतं की कौटुंबिक नात्यांमध्ये आईबद्दल सर्वात जास्त साहित्य लिहिलं जातं आणि लिहिणाऱ्यांमध्ये, नेहमी, सर्व काळात, सर्व भाषांमध्ये पुरुषांची संख्या स्त्रियांपेक्षा मोठी असते. हे आश्चर्य होतं. कारण मुलगे तरुणपणी पत्नीच्या आहारी जातात, आईला विसरतात अशी ओरड सर्वत्र होती आणि हेच पुरुष आईबाबत गहिवरून लिहीत होते. आईला तिची सगळी मुलं अगदी सारखीच असतात असं नेहमी वाचायला मिळत होतं आणि घराघरातलं एखादं तरी मूल ‘मी आईचा आवडता नव्हतो/नव्हते. आई दुसऱ्या कोणा भावंडाबद्दल पार्शलिटी करत होती.’ असं म्हणत होतं. यातलं गूढ मला उकलत नव्हतं. मानसशास्त्राने- समाजशास्त्राने थोडीफार मदत केली. आईपणाचं खरं, वास्तव दर्शन घेण्याचा आणि घडवण्याचा मी प्रयत्न केला. तोवर आईला देवी मानणारं साहित्यच पुष्कळसं येत होतं. त्यातलं मी दाखवलेलं आईचं बाईपण- माणूसपण काही वाचकांना भिडलं.

या पुस्तकाच्या निमित्ताने पुष्कळ वाचकांनी मनं मोकळी केली. ‘‘माझी आई गेल्यावर हे पुस्तक हाती आलं हे किती दुर्दैव आहे.’’  ‘‘आईला बाबांच्या पश्चात लग्न करायचं होतं. मी तिची ती गरज समजूनच घेतली नाही.’’ ‘‘माझ्या आईला गायिका व्हायचं होतं. तिला तेव्हा जमलं नाही. पुढे मला गाण्यात नाव- यश मिळालं तेव्हा ती माझा द्वेष करू लागली.’’ अशा प्रतिक्रिया आल्या. एक आई संतापून म्हणाली, ‘‘माझा नवरा गेला आणि मुलग्याच्या डोक्यावर हात ठेवून म्हणजे मुलाला माझ्याविरुद्ध कलुषित करून गेला. आता हा मुलगा गेल्याशिवाय मला सुख लागणार नाही!’’ हे म्हणणारी आई विकृत होती का? मनोरुग्ण होती का? की केवळ परिस्थितीने गांजलेली होती? मी विचारात पडले.
‘मातृत्व हे महन्मंगल असतं’ या वाक्यावर कुत्सित हसून एका मोफत सरकारी रुग्णालयातली नर्स म्हणाली, ‘‘अहो बाई, आमच्याकडे फसलेल्या मुली बाळंतपणाला येतात. जन्मलेलं मूल मुलगा आहे की मुलगी आहे याची चौकशी न करता त्या नेसत्या कपडय़ानिशी रातोरात गायब होतात. त्यांचं आईपण कुठे जातं? खूप पाहिलंय हो आईपणाचं नाटक. आम्हाला नका सांगू.’’ तर दुसऱ्या बाजूला वयाच्या चाळिशीनंतर अपघाताने दिवस गेल्याने अतोनात संकोचलेली, ओशाळलेली एक परिचित बाईपण भेटली. अशा अनेक घटनांनी माझं आईपणाचं परिप्रेक्ष्य खूपच व्यापक झालं. आवडणाऱ्या पुरुषापासून, योग्य वेळी, हव्या त्या लिंगाचं मूल होणं हे बाईसाठी खरं आनंददायक आहे, एरवीच्या अनेक मातृत्वांबद्दल आई नावाची बाई वेगवेगळ्या प्रकारे रिअ‍ॅक्ट होते, होऊ शकते हे कठोर सत्य मी स्वीकारलं आणि अनेक वाचकांनीही ते कमी अधिक प्रमाणात मान्य केलं.

या सगळ्यातला ‘मी’ महत्त्वाचा नाही. हे मी लिहिलं नसतं तर आणखी कोणी लिहिलं असतं. कदाचित जास्त चांगलंही लिहिलं असतं. प्रश्न आहे तो आपलं कुटुंबजीवन, आपले नातेसंबंध आपल्या आदिम प्रेरणा आणि त्यांची काळाबरोबर बदलती रूपं समजून घेण्याचा. झापडं सोडून वास्तवाला डोळा भिडवण्याचा. या पद्धतीच्या माझ्या लेखनाने मला ती संधी दिली. वाचकांचा जो लाभ झाला असेल तो त्यांच्यापुरता. मला मात्र स्त्रीजीवनाचं नाना रूपात दर्शन घडवलं. कोणी नुसता बायकांबद्दल – कुटुंबाबद्दल – घरांबद्दल लिहितो असं म्हटलं की आपल्याकडे त्याचा उपहास होतो. ‘तेच ते लिहिणारे’ म्हणून टीका होते. त्याबाबत मात्र मला म्हणावंसं वाटतं, प्रत्येक बाईची गोष्ट सूक्ष्मत: वेगळी आहे. ‘हरी अनंत, हरिकथा अनंत’, म्हणतात असं ‘स्त्रीजीवन अनंत, स्त्रीकथा अनंत, असंच शेवटी खरं आहे. यापुढेही संधी मिळाल्यास त्याचा वेध घ्यायला मला आवडेल.

– मंगला गोडबोले

मराठीतील सर्व दृष्टी आडची सृष्टी ( Drushti-aadchi-srushti ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Life story of mangala godbole

ताज्या बातम्या