लाहोर रेल्वे स्थानक. सगळीकडे पोलिसांचा कडक पहारा. दिसता क्षणी असेल त्या अवस्थेत गुन्हेगारास पकडून आणा. पळून जात असल्यास गोळ्या झाडा, असा ब्रिटिश सरकारचाआदेश होता. पकडला गेल्यास त्वरित फाशी निश्चित होती. अशात एक उंच साहेब, त्यांची पत्नी आणि छोटा मुलगा असे रेल्वे स्थानकावर आले. सामान घेऊन त्यांचा नोकरही सोबत चालला होता. आपल्या साहेबांच्या कुटुंबास प्रथम श्रेणीच्या डब्यात बसवून नोकर तृतीय श्रेणीच्या डब्यात जाऊन बसला.

साहेब रणजीत सिंग आणि पत्नी सुजाता यांची चौकशी करण्यासाठी दोन इंग्रज अधिकारी आले. ते अधिक काही चौकशी करणार इतक्यात सुजातादेवींनी अत्यंत शिताफीनं आपल्या कडेवरील मूल त्या इंग्रज अधिकार्‍याकडं सोपवलं. त्या सहजपणा दाखवत म्हणाल्या, ‘‘याला थोडं सांभाळता का?’’ तो अधिकारी एकदम बावचळलाच, आणि हे कुणी मोठे अधिकारी आहेत असं समजून ते दोघे तिथून निघून गेले. रेल्वे निघाली आणि प्रचंड मोठा पोलीस पहारा असतानाही तिघं तिथून सुरक्षितपणे निसटले. संपूर्ण प्रवासात कुठेही ताण जाणवू न देता त्यांनी सहजपणे वावर केला. कोण होते ते? ते होते, महान क्रांतिकारी भगत सिंग, भारतीय क्रांतिकारी गुप्तहेर दुर्गावती वोहरा, त्यांचा मुलगा सची, आणि नोकर म्हणजे आपले महान स्वातंत्र्यसेनानी शिवराम राजगुरू! का बरं होते पोलीस त्यांच्या मागे? कुठे चालले होते ते? आणि या गुप्तहेर दुर्गावती कोण होत्या? हे जाणून घेण्यासाठी आपल्याला थोडी पार्श्वभूमी समजून घ्यावी लागेल.

भारतावर ब्रिटिशांचं पूर्ण वर्चस्व होतं तेव्हाचा काळ. स्वातंत्र्य संग्रामात भाग घेणार्‍यांवर अत्यंत कठोर कारवाई सुरू होती. आंदोलन दडपण्यासाठी ब्रिटिश सरकारकडून अटकसत्र, गोळीबार, फाशी देणं असं सगळं सुरू होतं. ‘जालियनवाला बाग’ हत्याकांड आणि ‘असहकार’ आंदोलनानंतरचा प्रचंड असंतोष भारतीयांच्या मनात होता. १९२८ मध्ये ‘सायमन कमिशन’चा विरोध करताना केलेल्या आंदोलनात लाला लजपतराय यांचा लाठी हल्ल्यात मृत्यू झाला आणि भारतीय क्रांतिकारी बदल्याच्या भावनेने पेटून उठले.

१० डिसेंबर १९२८ मध्ये क्रांतिकारी मंडळींची एक बैठक बोलावण्यात आली. त्याचं नेतृत्व एका स्त्रीकडे होतं, त्या होत्या दुर्गावती वोहरा. भगवती चरण वोहरा यांच्या पत्नी. त्या ‘हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन’ (HSRA) या क्रांतिकारी संघटनेशी जोडलेल्या होत्या. त्या संघटनेच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला, की ‘पंजाब केसरी’ लाला लजपतराय यांच्या मृत्यूचा बदला घेण्यात येईल. दुर्गादेवी म्हणाल्या, ‘‘आपण इंग्रजांना धडा शिकवलाच पाहिजे! लालाजींवर लाठी चालवणार्‍या जेम्स स्कॉटला शिक्षा मिळालीच पाहिजे. तुमच्यापैकी कोण स्कॉटच्या हत्येची जबाबदारी घ्यायला तयार आहे?’’ उत्तरादाखल भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि चंद्रशेखर आझाद यांनी हात वर केले. भगतसिंग, सुखदेव यांच्या सोबत क्रांतिकारी जयगोपाल याचीही निवड करण्यात आली. १७ डिसेंबर १९२८ या दिवशी भगतसिंग आणि सुखदेव यांनी दबा धरून गोळ्या झाडल्या, पण पोलीस अधीक्षक जेम्स स्कॉट यांच्या ऐवजी सहायक अधीक्षक जे.पी.साँडर्स यांची हत्या झाली. इंग्रज अधिकारी चवताळून उठले होते. सगळीकडे भगत सिंग, सुखदेव आणि मंडळींचा शोध सुरू झाला. त्यानंतर ओळख लपवण्यासाठी भगतसिंग यांनी त्यांची दाढीदेखील काढून टाकली. मोठी टोपी घालून ते इतके वेगळे दिसत होते, की त्यांना दुर्गादेवींनीसुद्धा ओळखलं नव्हतं.

एके दिवशी सुखदेव भगवती चरण वोहरा यांच्या घरी गेले. भगवती चरण तेव्हा भूमिगत होते. पत्नी दुर्गादेवी घरी होत्या. त्यांना सगळे दुर्गाभाभी म्हणत. त्यावेळी दुर्गाभाभी लाहोरमधल्या महिला महाविद्यालयात प्राध्यापिका होत्या. सुखदेव यांना चिंतेत बघून दुर्गाभाभी म्हणाल्या, ‘‘काय झालं? इतके का चिंताग्रस्त दिसताय…’’ सुखदेव म्हणाले, ‘‘संघटनेच्या कामासाठी पाचशे रुपयांची गरज आहे. इतकी मोठी रक्कम कशी उभी करणार?’’ यावर दुर्गाभाभी त्वरित म्हणाल्या, ‘‘मी देते पैसे. माझे साठवलेले पैसे देशाच्या कामी आले याहून मोठी गोष्ट कोणती?’’ त्या काळात पाचशे ही फार मोठी रक्कम होती.

भगतसिंग आणि सुखदेव यांना लाहोरमधून गुपचूप बाहेर काढणं अत्यंत आवश्यक होतं. भगतसिंग आणि राजगुरू वेश बदलून दुर्गाभाभींकडे आले, तेव्हा त्यांना ओळखताच आले नाहीत. भगत सिंग म्हणाले, ‘‘भाभी, मला रोज बघणार्‍या तुम्हीही मला ओळखू शकल्या नाहीत, तर इंग्रज नक्कीच मला ओळखू शकणार नाहीत. मग भगत सिंग बनले एक मोठे अधिकारी, दुर्गा भाभींनी त्यांच्या श्रीमंत पत्नीची भूमिका घेतली. आणि त्यांच्याबरोबर स्वत:चा छोटा मुलगा सची याला घेतलं आणि नोकर बनून सोबत होते, राजगुरू! भगतसिंग आणि राजगुरू या दोघांकडेही गोळ्या भरलेल्या बंदुका होत्या. त्यांनी रेल्वेच्या प्रथम श्रेणीची दोन तिकिटं काढली आणि तिसर्‍या वर्गाचं एक.

भगतसिंग नाव बदलून बनले रणजीतसिंग, दुर्गाभाभी बनल्या सुजाता. संपूर्ण रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात असताना, त्यांना पकडण्याचे आदेश असताना दुर्गाभाभींच्या मदतीनं तिघं तिथून निसटले. कानपूरला पोहोचल्यावर त्यांनी कोलकातासाठी (तेव्हाचं कलकत्ता) दुसरी ट्रेन पकडली.

दुर्गाभाभींनी त्यांची सहयोगी सुशीलादीदी यांना कोलकाताला तार पाठवली होती. तारेत लिहिलं, ‘‘मी भावासोबत येत आहे.’’ त्यावेळी भगवती चरणजी सुशीला दीदींकडेच होते. ते दुर्गाभाभींना आणायला गेले तेव्हा त्यांनी एका कुलीचा वेश घेतला होता. गुढघ्यापर्यंत धोतर आणि दाढीही वाढवलेली होती. स्थानकावर सगळ्यांना सुरक्षित बघून त्यांचा ऊर भरून आला आणि आपल्या पत्नीच्या धाडसाचं त्यांना कोण कौतुक वाटलं. भगतसिंग यांना कोलकाता इथं सोडून दुर्गाभाभी लाहोरला परतल्या.

वयाच्या दहाव्या, अकराव्या वर्षीच स्वतंत्रता सेनानी भगवती चरण वोहरा यांच्याशी दुर्गादेवींचा विवाह झाला होता. त्यांचे वडील बाके बिहारी भट इलाहाबाद येथे तेव्हा जिल्हा न्यायाधीश होते. दुुर्गावतींनी पतीसमवेतच आपलं शिक्षण पूर्ण करता करता अनेक गुप्त कारवायांमध्ये खूप महत्त्वाची भूमिका बजावली. क्रांतिकारींना कारागृहात कपडे पाठवले जायचे, तेव्हा दुर्गाभाभी कपड्यांची शिवणं उसवून त्यात संदेश असलेल्या चिठ्ठ्या शिवून टाकत. कागदावर रुईंच्या फुलांचा आणि कांद्याचा रस वापरून निरोप लिहिले जात. रस वाळला की कागदावरील अक्षरं गायब होत असत. कारागृहामधील क्रांतिकार्‍यांना अशा चिठ्ठ्या मिळाल्या, की ते विस्तवाच्या आचेवर ते कागद धरत. मग सगळा संदेश स्पष्ट वाचता येई. कारागृहातील सुरक्षा कर्मचार्‍यांना चुकवून असे संदेश पोचवणं फार धोकादायक होतं, परंतु दुर्गाभाभी तेही करत होत्या. एकदा त्या टोपलीत फळं घेऊन चालल्या होत्या. रस्त्यात त्यांना पोलिसांनी अडवलं. ‘‘टोपलीत काय आहे?’’

‘‘फळं, भाज्या आहेत साहेब.’’ ‘‘इतक्या मोठ्या टोपलीत? दाखव बरं?’’ इतर कुणी सामान्य व्यक्ती असती तर घाबरून गेली असती. पण त्यांनी शांतपणे टोपली दाखवली. वेगवेगळी फळं होती. खाली काही बटाटेही होते. ‘‘बटाटे काढून दाखवू?’’ त्यांना दुर्गाभाभींनी विचारलं. ‘‘नको, जा.’’ म्हणून पोलिसांनी सोडलं. थोडं पुढे गेल्यावर त्यांनी चालण्याचा वेग वाढवला, कारण बटाट्याखाली बॉम्ब होते! पकडल्या गेल्या असत्या तर सगळी संघटना धोक्यात आली असती.

प्रसिद्ध पत्रकार आणि लेखक कुलदीप नायर यांनी ‘विदाउट फीअर : द लाईफ अँड ट्रायल ऑफ भगत सिंग’ या त्यांच्या पुस्तकात नमूद केलं आहे, की स्वातंत्र्यसेनानी चंद्रशेखर आझाद यांना पिस्तूल आणि शस्त्र हवे असताना दुर्गाभाभींनी त्यांचे दागिने विकून शस्त्र खरेदी करण्यास मदत केली होती. संदेश वहन आणि शस्त्र-अस्त्र पुरवठा अशी अत्यंत जोखमीची कामं तर त्यांनी अनेकदा केली. क्रांतिकारकांच्या प्रवासासाठी त्या नेहमी पदरचे पैसे खर्च करत असत. सत्यनारायण शर्मा यांच्या ‘क्रांतिकारी दुर्गाभाभी’ या पुस्तकात त्यांनी केलेल्या अनेक साहसांबद्दल माहिती मिळते. राजेंद्र राजा लिखित ‘दुर्गा भाभी : अदम्य साहसी महिला’ या पुस्तकात त्यांच्या धैर्यपूर्ण क्रांतिकारी आयुष्याची गाथा वाचायला मिळते.

एक काळ असा होता की, लाहोर येथे दुर्गाभाभींच्या घरात विस्फोटके बनवण्याचं काम सुरू होतं. त्या दरम्यान भगतसिंग आणि बटुकेश्वर दत्त यांनी दिल्लीत असेम्ब्लीमध्ये बॉम्ब फेकला आणि त्यांना अटक झाली होती. त्यांना न्यायालयात नेताना गाडीवर बॉम्ब फेकून त्यांची सुटका करवून आणावी, अशी दुर्गाभाभी यांची अत्यंत धाडसी योजना होती. बॉम्ब तयार होते. भगवती चरण वोहरा यांना बॉम्बची पडताळणी करायची होती. एका बॉम्बचा ट्रिगर तपासताना बॉम्बचा स्फोट झाला आणि त्यातच भगवती चरण यांना वीरगती प्राप्त झाली. भगतसिंग यांची सुटका करण्याची योजना कार्यान्वित होऊ शकली नाही. भगवती यांच्या निधनानंतर सुरक्षा कारणांसाठी दुर्गाभाभी त्यांचे परिचित केवल कृष्ण यांच्याकडे एक मुस्लीम स्त्री बनून ‘पर्दा करून’ राहिल्या. पती हजला गेलेले आहेत तोपर्यंत या आमच्याकडं राहतील, असं केवल यांनी शेजार्‍यांना सांगितलं होतं.

दुर्गाभाभींनी अनेकदा वेगवेगळी वेशभूषा करून बिकट परिस्थितीतून स्वत:ची सुटका करवून घेतली होती. पती वियोगाचं दु:ख बाजूला ठेवून दुर्गाभाभींनी त्यांच्या गुप्तचर कारवाया सुरूच ठेवल्या होत्या. भगतसिंग यांना फाशीची शिक्षा सुनावल्यावर ब्रिटिश गव्हर्नरची हत्या करून बदला घेण्याची त्यांची इच्छा होती. १९३० मध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या योजनेनुसार दुर्गाभाभी, विश्वनाथ वैशंपायन आणि सुखदेव राज यांना खास मुंबईला पाठवलं गेलं. पोलीस आयुक्त लॉर्ड हेली यांच्या हत्येची जबाबदारी त्यांच्यावर सोपवण्यात आली होती. दुर्गाभाभी आणि साथीदार यांची कार लेमिंग्टन रोडवर उभी होती. त्याच्या उलट दिशेने मलबार हिल्सकडून येणारी एक कार दिसली. साथिदाराकडून सूचना मिळाली, ‘‘शूट!’’ बंदूक चालवण्याचं प्रशिक्षण घेतलेल्या दुर्गाभाभींनी आणि सुखदेव राज यांनीही गोळ्या झाडल्या, पण त्यात लॉर्ड हेली ऐवजी सार्जंट टेलर आणि त्यांच्या पत्नीची हत्या झाली. लॉर्ड हेली यांना ओळखण्यात चूक झाली होती! कारचे चालक जनार्दन बापट यांनी त्वरित कार तिथून बाहेर काढली आणि सगळे तिथून निसटले. त्यावेळी चंद्रशेखर आझाद यांना ही अशी चूक सहन झाली नाही. आपले मोलाचे क्रांतिकारी चुकीच्या गोष्टींमुळे गमावण्याची जोखीम त्यांना अर्थातच नको होती. तोपर्यंत त्या हल्ल्यात एका स्त्रीचा हात आहे याची इंग्रजांना कल्पना आली होती. २३ मार्च १९३१ मध्ये भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फाशीची शिक्षा झाली. दुर्गाभाभींचे साथीदार एक एक करून देशासाठी शहीद झाले होते. आपल्या मुलाला नातेवाईकांच्या हाती सोपवून त्यांनी शांतपणे स्वत:ला अटक करवून घेतली. तीन वर्षांच्या कारागृहवासानंतर पुराव्या अभावी त्यांची सुटका करण्यात आली. १९३६ मध्ये लाहोर सोडून त्या काही दिवस गाझियाबाद इथं राहिल्या. नंतर त्या लखनौ येथे गेल्या. तिथे त्यांनी एक शाळाही काढली. काही काळ अध्यापन केलं. १९९९ मध्ये त्यांचं निधन झालं. भारतीय स्वातंत्र्य लढ्यात एका निडर गुप्तहेराची भूमिका पार पाडणार्‍या या वीरांगनेला शतश: नमन.

adaparnadeshpande@gmail.com