वैवाहिक, कौटुंबिक, सामाजिक, अगदी व्यावसायिक नात्यांमध्येही वेगवेगळ्या प्रसंगी आपण शब्दांना सोबत करणार्‍या वेगवेगळ्या स्पर्शांचा अनुभव घेत असतो. पाठीवर पडलेली कौतुकाची थाप जशी माणसं सहसा विसरत नाहीत तसंच विरहाची वेदना मागे ठेवून एखादं नातं विरून जातं तेव्हाही त्या नात्यातले स्पर्श कधीच विसरता येत नाहीत. अगदी धरलेल्या आणि सोडलेल्या हातांचे सुद्धा!

प्रेमात पडलेल्या माणसांमधली सुरुवातीची भीड चेपून परस्परांमध्ये विश्वास निर्माण झाल्यानंतर एकमेकांना सहज केलेला स्पर्श दोघांनाही हवाहवासा असतो. कधी तो हृदयाचे ठोके वाढवतो तर कधी कधी नकळत डोळे पाझरवतो. भावनांची नेमकी अभिव्यक्ती स्पर्शाइतकी कशातूनच होत नाही. त्याला डोळ्यांतील भाव आणि योग्य देहबोली यांची जोड मिळाली तर ती भावनांच्या अभिव्यक्तीची पूर्तीच म्हणायला हवी!

एकदा माझ्या ८७ वर्षांच्या आईबरोबर व्यायाम करताना दोन्ही हातांनी तिचा चेहरा धरून मान सरळ कशी ठेवायची हे तिला दाखवत होते, तेव्हा लक्षात आलं की तिच्या गालांच्या तुकतुकीत त्वचेचा स्पर्श खूपच मुलायम आहे! वाटलं, इतक्या वर्षांत आपण आपल्याच आईच्या गालांना कधीच कसा हात लावला नाही? त्या स्पर्शातून तिचं प्रेम माझ्या शरीरभर झिरपलं. अगदी हरखून गेले मी! असे साधे सरळ हवेहवेसे स्पर्श आपण सहजच का बरं करू शकत नाही? माझा मेहुणा मात्र माझ्या अंथरुणाला खिळलेल्या वडिलांना भेटायला यायचा तेव्हा अगदी सहजपणे त्यांचे हात थोपटत, पाय दाबून देत, ‘‘कसे आहात बाबा?’’, असं अतिशय प्रेमाने विचारायचा. बाबांना खूप बरं वाटायचं. माझ्या एका मैत्रिणीला असं वाटतं की, ती आणि तिची सासू यांच्यामध्ये स्पर्शाच्या माध्यमातून ‘शब्देवीण संवादु’ होऊ शकतो. तर दुसर्‍या एका मैत्रिणीचं तिच्या अविवाहित नणंदेबरोबर बहिणीसारखं नातं निर्माण झालं आहे; कारण तिला असं वाटतं की, तिच्या नणंदेचा समजूतदार स्पर्श तिला अनेकदा तणावमुक्त करतो.

नुकतंच मी वाचलं की, टेनिसपटू अल्कराझला जेव्हा कळलं की, शारीरिक तंदुरुस्तीअभावी त्याला टेनिस स्पर्धांमधून माघार घ्यावी लागणार आहे, तेव्हा तो मनाने खूप खचला. तेव्हा त्याच्या वडिलांनी त्याला प्रेमभराने मिठीत घेऊन सांगितलं, ‘‘आमच्यासाठी तू आणि तुझी तब्येत जास्त महत्त्वाची आहे. तू वाईट वाटून घेऊ नकोस.’’ वडिलांच्या त्या स्पर्शाने आणि शब्दांनी त्याला उभारी दिली. वैशाली या बुद्धिबळपटूच्या तेवढ्याच सुप्रसिद्ध भावानं, प्रज्ञानंदनं वयाने लहान असूनही तिच्या महत्त्वाच्या सामन्यात उपस्थित राहून तिला इतका धीर दिला की, सामना जिंकल्यावर तिने पहिली मिठी त्याला मारली. हे असे छोटे छोटे स्पर्श नातं घट्ट करायला महत्त्वाचे ठरतात.

समुपदेशनाच्या क्षेत्रात स्पर्शाला विशेष महत्त्व आहेच, परंतु एरवीही एखादी व्यक्ती मणामणाचं चिंतेचं ओझं नि अपार वेदना घेऊन तुम्हाला भेटायला येते आणि हळूहळू हुंदके देत आपलं मन मोकळं करते. त्यांचं दु:ख आपल्यापर्यंत पोहोचलं की समोरच्या व्यक्तीचं वय, लिंग, सामाजिक-आर्थिक स्तर यापलीकडे जाणारी ती मानवी मनाची पीडा तुम्हाला आरपार भिडते. तुमच्याही नकळत तुम्ही उठता. तुमची पावलं तुम्हाला त्या व्यक्तीजवळ नेतात आणि तुमचा हात आपसूक त्या व्यक्तीच्या पाठीवरून नि:शब्दपणे फिरायला लागतो. तुमच्या प्रत्येक थोपटण्याबरोबर अश्रूंचे बांध फुटतात, पुरुषही हमसून हमसून रडतात. ‘याआधी मन असं कधी मोकळं झालंच नव्हतं’ असं म्हणतात. याला समुपदेशनातील ‘कॅथार्सिस’, ‘रॅपो बिल्डिंग’ असं म्हणत असले, तरी या शब्दांपलीकडे भावनांचा अथांग समुद्र पसरलेला असतो.

तुमचा स्पर्श, सागर आणि किनारा यांना एकमेकांच्या जवळ आणतो. नात्याची बांधणी सुरू होते.

स्पर्श म्हणजे नाती निर्माण करणारं, त्यातील प्रेमाचे बंध वृद्धिंगत करत ते नातं अतूट बनवणारं एक अत्यंत प्रभावी माध्यम आहे. ‘हृदयस्पर्शी’ हा शब्दच या दृष्टीने पुरेसा बोलका आहे. ‘मर्मबंधातील ठेव’, ‘या हृदयीचे त्या हृदयी घातले’, या शब्दांना स्पर्शाशिवाय अर्थच निर्माण होऊ शकत नाही. कवी सुरेश भट यांच्या ‘सजण दारी उभा’ या कवितेतील ‘तीच मी राधिका तोच हा श्रीहरी, हृदय माझे कसे मीच हृदयी धरू’ या ओळी तर नात्यातील स्पर्शाची, प्रेमाची आध्यात्मिक उंची गाठतात. पती-पत्नीच्या वैवाहिक नात्यात अशी उंची किती जोडप्यांमध्ये गाठली जात असेल? मुळात संसार करण्याच्या जगरहाटीच्या प्रेरणेने एकत्र आलेले हे स्त्री-पुरुष नर-मादीच्या आदिम नैसर्गिक प्रेरणेकडे डोळसपणे बघतील तर स्पर्शाची किती तरी विविध रूपं, रंग, आयाम, विभ्रम समरसून अनुभवू शकतील.

सई परांजपे यांनी दिग्दर्शित केलेल्या आणि नसिरुद्दीन शाह व शबाना आझमी अभिनित ‘स्पर्श’ चित्रपटात नात्यातील अतितरल संवेदनशीलता किती उत्कटपणे उलगडली आहे. ‘आँधी’ चित्रपटातील ‘तेरे बिना जिंदगी से कोई शिकवा तो नहीं’ या गीतात संजीवकुमार आणि सुचित्रा सेन यांच्या केवळ भावमुद्रा परस्परांना स्पर्शही न करता स्पर्शाच्या पलीकडचं असं काही बोलतात की आपल्याही मनात वेदनेची कळ उठते. तिच्या अंगावर कोट चढवणार्‍या त्याच्या पुसटशा स्पर्शात तिच्याविषयीचे काळजीयुक्त प्रेम ओतप्रोत भरलेले जाणवते. तर मेघना गुलजार यांच्या ‘राझी’ या चित्रपटात लग्नाच्या पहिल्या रात्री ती आपल्या पतीकडे थोडा वेळ मागते. त्यांच्यातील नवं नातं स्पर्शाविना उमलायचं थांबतं. मात्र तिच्या विनंतीचा आदर करत तो वेगळा झोपतो तेव्हा त्याची अबोल, कमालीची संयत, सहिष्णू आणि समजूतदार देहबोली आपल्या मनाला मात्र खोलवर स्पर्शून जाते. लग्नाच्या नात्यात अशा समजुतीला किती महत्त्व आहे ना.

तर ‘‘तू दोर्‍यात झेंडूची फुले
ओवीत होतीस, माळ गुंफीत होतीस.
फुले ओवता ओवता,
सगळा दोरा केशरी होत गेला…
तुझ्या माझ्या संबंधात
मला एवढंच सांगायचं आहे.’’

कवी शंकर वैद्य यांच्या या ओळींना मनातील भाव पोचवायला स्पर्शाची गरज लागलीच कुठे?

खरं तर नाती कुठलीही असोत, त्याला उदात्ततेचा स्पर्श झाला की ती अलौकिकच बनतात. असा स्पर्श द्वैत आणि अद्वैत यांतील सीमारेषा नव्हे का? पण स्पर्शाच्या या संकल्पनेला आपण भारतीयांनी नेहमी उपेक्षेने का मारले हे न कळे. मानवाच्या आदिम प्रेरणांचा शोध घेऊन त्यांचा पुरुषार्थ सांगणार्‍या संस्कृतीमधून महर्षी वात्स्यायन या भारतभूमीतच निर्माण झाले. ‘काम’ हा त्यातील एक पुरुषार्थ. त्यांचा वैश्विक आणि सार्वकालिक श्रेष्ठ असा ‘कामसूत्र’ हा ग्रंथ सिद्ध झाला. त्यात लैंगिक नात्यातील स्पर्शाचं महत्त्व अधोरेखित केलेलं आहे; पण शरीरसुखाला ‘टॅबू’ समजण्याचं पतन भारतीय समाजात कसं आणि कधी झालं कोण जाणे. तो शरमेचा, संकोचाचा विषय झाला. त्याचा प्रारंभबिंदू असणारा स्पर्श हा विषय तरी त्यातून कसा सुटणार होता? त्यामुळे स्पर्श हे सशक्त, निरोगी, निर्मळ, निर्हेतुक आणि संवेदनशीलही असू शकतात हे आपल्या समाजाने कधी समजूनच घेतलं नाही बहुधा.

स्त्री-पुरुषांचं कुठलंही नातं असो, त्याकडे नेहमी नर आणि मादी असंच बघितलं गेलं का? भाऊ-बहीणही तारुण्यात पदार्पण करते झाले की अंतर राखून वागू लागतात. त्यामुळे मित्रमैत्रिणींच्या अतिशय सशक्त, खेळकर नात्यातही एकमेकांना उत्स्फूर्त टाळी देणं, शाबासकी देणं, खांद्यावर सहज हात टाकणं हेही अनेकदा आक्षेपार्ह ठरतं, तिथं हातात हात देणं-घेणं वगैरे तर फारच पुढच्या, जवळपास अशक्यच पायर्‍या. मात्र काळाबरोबर या स्पर्शाची परिभाषा, त्याची अभिव्यक्ती हे सारं बदलत गेलं.

स्त्री-पुरुषांच्या नैसर्गिक वैविध्यात समानतेचा सुंदर धागा गुंफून माणसांची नाती स्पर्शामधून उन्नत, उदात्तही झाली आणि काही वेळा त्यांचा दर्जा अनेक पातळ्यांवर घसरतही गेला. खासगी स्पर्श उघडेवाघडे झाले, नि:संकोचपणाऐवजी त्याच्या आक्रमक, काहीशा निर्लज्ज प्रदर्शनाकडे गेले. स्पर्श करताना स्थल-काल-भवताल याचं भान सुटत गेलं. पहिल्या स्पर्शातील गोडवा, सलज्जता, आसुसलेपण, शिगेला पोहोचलेली उत्कटता, तोपर्यंत बाळगलेला संयम, बुजरेपण, नवखेपण, निरागसता हे सारं हळूहळू लोप पावत त्या स्पर्शात एक उथळपणा, भडकपणा, कधी कधी तर वखवख, उन्माद येत गेला. जुन्या गाण्यांमधील स्पर्शाने उमलून आलेल्या भावनांची वर्णनं भावुक, बाळबोध वाटू लागली. मनोभावे होणार्‍या स्पर्शातून उच्च दर्जाचं गुणात्मक नातं, सहजीवन ध्वनित होण्याऐवजी, प्रेयसीवर कधी एकदा अधिकार मिळवतोय, तिला स्पर्श करतोय, ही भावना दृग्गोचर होऊ लागली.

विवाहपूर्व लैंगिक नाती अनुभवणं अनेकांसाठी सामान्य झालं. प्रियकराच्या स्पर्शाने लाजणार्‍या, बावरणार्‍या, आनंदाने मोहरून जाणार्‍या ऐन यौवनामधील प्रेमिका काळाच्या पडद्याआड गेल्या तशा प्रणयातील नवख्या स्पर्शाने रोमांचित झालेल्या त्या प्रणयी जोड्याही कालबाह्य होत गेल्या.

या सगळ्यात भर म्हणून स्त्रीची कांती सुंदर करण्यार्‍या, काया मृदू, चमकती करणार्‍या वेगवेगळ्या मलम आणि लोशनच्या जाहिरातींनी स्पर्शाच्या आदिम संकल्पनेवर सौंदर्याचं, देखणेपणाचं रोपण केलं. ‘असणं’ यापेक्षा ‘दिसणं’ वरचढ झालं. मनाऐवजी कायेचं सौंदर्य, कृत्रिम सुगंध याने एकमेकांना आकर्षित करणारं प्रेम मानवी नातेसंबंधांच्या दृष्टीने उथळ होत गेलं.

नात्यांना नवनवे अर्थ-आयाम देणार्‍या, आधार देणार्‍या, आस्था दाखवणार्‍या, माया करणार्‍या किती तरी सुंदर, हव्याहव्याशा वाटणार्‍या स्पर्शांना माणसा-माणसांमधील कित्येक नाती आता पारखी होतात तेव्हा मन व्यथित होतं; पण एखादी वस्तू दुर्लभ झाली की तीच हवीहवीशी वाटते, नाही का? हा स्पर्श वंचित होण्यातूनच कदाचित त्याचे मोल, हवेहवेपण माणसांना नव्याने उमगेल. माणूस अधिक सहृदयी बनेल. या निसर्गनिर्मित स्पर्शाला मग थेट एक आध्यात्मिक उंचीही लाभेल.

कवी सारंग भणगे यांच्या शब्दांत,
‘तुझ्या स्वरात माझी भरून आस आहे, तुला न भेटता तुझाच‘स्पर्श’ भास आहे !’’

(उत्तरार्ध समाप्त)

vankulk57@yahoo.co.in