scorecardresearch

एक एक मूल मोलाचे..

शाळाबाह्य़ मुले आपल्याला येता-जाता दिसतात. तशी ती कोणाला दिसली तर त्यांनी आम्हाला दूरध्वनीवरून कळवावे एवढी अपेक्षा.

शिक्षण सर्वासाठी : रजनी परांजपे

‘एक एक मूल मोलाचे, एक नागरिक अभियानांतर्गत २०११ पासून आजपर्यंत पंधरा हजारांहून अधिक शिक्षणबाह्य़ मुले शोधून काढून शाळेत दाखल केली गेली आहेत. या कामासाठी सुजाण नागरिकांची आवश्यकता असते. त्यातूनच वस्ती-वस्तीत ‘शिक्षणमित्र’ तयार करण्याची कल्पना पुढे आली आणि यशस्वी ठरली. आत्तापर्यंत १४९ शिक्षणमित्र मिळाले असून ४२ टक्के रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत. त्यांच्यापकी ४१ जण स्वत: निरक्षर आहेत, पण त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले आहे.’

‘एक एक मूल मोलाचे. एक नागरिक अभियान’ – (एव्हरी चाइल्ड काऊंट्स) या नावाने २०११ मध्ये आम्ही एक प्रकल्प सुरू केला. प्रकल्पाचा उद्देश होता पुणे शहरातील एकही मूल शाळाबाह्य़ राहणार नाही हे बघण्याचा. शहरातील एकेक शाळाबाह्य़ मूल शोधून काढायचे आणि त्याला शाळेपर्यंत पोहोचवायचे तर त्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यकच. म्हणून प्रकल्पाचे नावच ‘एक एक मूल मोलाचे, एक नागरिक अभियान’ असे दिले.

शाळाबाह्य़ मुले आपल्याला येता-जाता दिसतात. तशी ती कोणाला दिसली तर त्यांनी आम्हाला दूरध्वनीवरून कळवावे एवढी अपेक्षा. त्यापुढे जाऊन कोणाला वाटले तर त्यांनी त्या मुलांना शाळेत दाखल करावे, त्यांना शाळेत आणण्याची व्यवस्था करावी, अशी निरनिराळी कामे आवड आणि सवड असल्यास नागरिक करू शकतील, किंबहुना तशी ती करण्याची गरज आहे, असे वाटून आम्ही नागरिक सहभागातून हा प्रकल्प उभा करण्याचे स्वप्न पाहिले. प्रकल्प चालूच आहे. २०११ पासून आजपर्यंत पंधरा हजारांहून अधिक मुले शोधून काढून शाळेत दाखल केली. त्यांची शाळापूर्व तयारी करून घेण्यासाठी, दिवसाचे दोन-तीन तास अशी शाळापूर्व तयारी शिबिरेही घेतली. जरूर पडेल तिथे-तिथे मुलांसाठी शाळेत नेण्या-आणण्याची सोयही केली. या उपक्रमापाठोपाठच आणि या उपक्रमातून मिळालेल्या अनुभवावरून ‘मुलांच्या शिक्षणात पालकांचा सहभाग’ असा एक दुसरा प्रकल्पही २०१३ मध्ये सुरू केला.

प्रकल्पात नागरिक सहभाग मिळवण्यात आम्ही फार यशस्वी झालो नाही हे खरे; पण आम्ही कल्पना न केलेल्या दुसऱ्या एका ठिकाणाहून आम्हाला मदतीचा हात मिळाला. आम्ही ज्या वस्त्यातून काम करत होतो त्या वस्त्यातूनच आम्हाला अशी माणसे भेटली, की ज्यांना आपल्या वस्तीतील मुलांसाठी काही तरी करावे असे वाटत होते. त्यासाठी कष्ट करण्याची, वेळ देण्याची त्यांची तयारी होती. वस्तीमध्ये असलेल्या अशा मंडळींचा हात धरून आपण हा प्रकल्प पुढे नेऊ शकतो. त्यांना थोडी माहिती आणि थोडे प्रोत्साहन दिले तर वस्तीतील मुलांना शाळेत घालण्याचे, नवीन आलेल्या पालकांना शाळेचे महत्त्व पटवून देऊन, त्यांना शाळेची माहिती देण्याचे काम ही मंडळी करू शकतात हे लक्षात आले आणि त्यातूनच वस्ती-वस्तीत ‘शिक्षणमित्र’ तयार करण्याची कल्पना पुढे आली.

वस्तीत शिक्षणमित्राचे काम कोण करू शकेल हे खरे तर शोधावे लागत नाही. कुठल्याही गटात अशी, इतरांसाठी काही तरी करावे अशी इच्छा असणारी, माणसे असतातच. पालक गटाची बैठक असो किंवा पथनाटय़, भूमिका नाटय़, खेळ किंवा हळदीकुंकवासारखे समारंभ असोत, आपल्याशी बोलण्याचा प्रयत्न करणारी, आपल्या कामात मदत करण्यासाठी उत्सुक असलेली, आपल्याला चहापाणी देऊ करणारी, ‘आमच्या घरी या’ म्हणून आग्रह करणारी मंडळी भेटतातच. याच मंडळींच्या उत्साहाचा, त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेचा उपयोग करून त्यांच्यातूनच वस्तीतील मुलांच्या शिक्षणासाठी काम करणारी मंडळी तयार करण्याचे काम आम्ही मागच्या वर्षी जाणीवपूर्वक केले आणि कल्पना येणार नाही, पण त्यातून जवळजवळ दीडशे कार्यकत्रे तयार झाले.

‘शिक्षणमित्र’ निवडणे, त्यांना त्यांच्याकडून अपेक्षित असलेल्या कामांबद्दल स्पष्टपणे कल्पना देणे, त्यांना आवश्यक असणारी माहिती पुरवणे, त्यासाठी लागणारी कौशल्ये त्यांच्यात विकसित होतील अशा प्रकारचे प्रशिक्षण देणे व त्यांचा कामातला उत्साह टिकून राहावा, त्यांना येणाऱ्या अडचणी सोडवण्यात गरजेनुसार त्यांना मदत करावी या हेतूने त्यांच्याशी सतत संपर्कात राहणे, हे या कामातले महत्त्वाचे टप्पे.

मुले शाळेत दाखल व्हावीत यासाठी पालकांव्यतिरिक्त कोणाला तरी प्रयत्न करण्याची गरज पडते याचाच अर्थ पालक त्याबाबतीत जागरूक नसतात किंवा उदासीन असतात. तेव्हा शिक्षणमित्राचे पहिले काम वस्तीतील शाळेत न जाणाऱ्या मुलांचा तपास घेणे आणि त्यांच्या पालकांना शिक्षणाचे महत्त्व आणि जवळची शाळा, शाळेचे नाव, पत्ता याची माहिती देणे. त्याचबरोबर ‘शिक्षण हक्क कायदा’, त्यातील मुख्य तरतुदींची, उदा. शाळाप्रवेशासाठी जन्मदाखला, जातदाखला लागत नाही आदी माहिती देणे. त्यासाठी त्यांना स्वत:ला कायद्याची, आजूबाजूच्या परिसरांतील शाळांची आणि वस्तीतील मुलांची, पालकांची माहिती असणे गरजेचे. आपण त्यांना कायदा, शाळा, शाळेचा पत्ता याबरोबरच वस्तीतील पालक आणि मुलांची माहिती कशी काढायची याची कल्पनाही द्यायची.

दुसरे महत्त्वाचे काम मुले शाळेत दाखल झाली की नाही हे पाहणे आणि पालकांना मदतीची गरज असली तर त्यांच्याबरोबर जाऊन किंवा त्यांना जमत नसेल तर स्वत: पुढाकार घेऊन मुलाला शाळेत दाखल करणे. तिसरे, नेहमी दुर्लक्षित राहणारे, पण अत्यंत महत्त्वाचे काम म्हणजे शाळेत जाऊन मुलांच्या प्रगतीचा, त्यांना येणाऱ्या अडचणींचा आणि शिक्षकांच्या त्यांच्याबद्दलच्या तक्रारींचा आढावा घेणे. थोडक्यात, मुले शाळेत दाखल केल्यावर त्यांचा पाठपुरावा करणे.

कामांची एवढी यादी वाचल्यावर कदाचित दुसऱ्यांच्या मुलांसाठी एवढा प्रपंच कोण करणार, असा विचार आपल्या मनात येईल, पण करणारी माणसे आहेत आणि आश्चर्य वाटेल, पण आम्ही तयार केलेल्या १४९  शिक्षणमित्रांमधील  ६२ जण (४२ टक्के) रोजंदारीवर काम करणारे मजूर आहेत आणि त्यांच्यापकी ४१ जण स्वत: निरक्षर आहेत; पण त्यांना शिक्षणाचे महत्त्व पटले आहे आणि दुसऱ्याच्या मुलांसाठी, समाजासाठी काही तरी करण्याची त्यांची इच्छा ‘आपण काही तरी केले पाहिजे’ या विचारांशी न थांबता प्रत्यक्ष काम करायला उद्युक्त करण्याइतकी सशक्त आहे, प्रबळ आहे.

गेल्या वर्षभरात या सर्व शिक्षणमित्रांनी मिळून साडेतीनशेहून जास्त पालकांना मुलांना शाळेत घालण्याचे महत्त्व पटवून दिले. एवढेच नाही दीडशेहून जास्त मुलांना स्वत: नेऊन शाळेत घातले आणि जवळजवळ सातशे मुलांच्या अभ्यासाचा, शाळेत येणाऱ्या अडीअडचणींचा तपास घेतला आणि त्याची माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. कोणी लिहून, तर कोणी तोंडी माहिती दिली. यातील काही ‘शिक्षणमित्र’ खूप तळमळीचे कार्यकत्रे आहेत, तर काही प्रारंभशूर. त्यांचे प्रमाण म्हणाल तर तळमळीचे कार्यकत्रे ५८ टक्के आणि नावापुरतेच काम करणारे १४ टक्के. उरलेले सगळे मधल्या पायरीवरचे. तेव्हा चित्र तसे उत्साहवर्धकच. पेला अध्र्याहून जास्त भरलेला.

आम्ही शिक्षणमित्रांना कसलेही प्रलोभन दाखवलेले नाही. कुठलाही मोबदला नाही. मग त्यांना यातून काय मिळते? ते त्यांच्याच पकी एकाच्या शब्दांत ऐका. जत्रीबाई साहू स्वत: निरक्षर, परप्रांतीय. त्यांचा अनुभव सांगताना त्या म्हणतात, ‘‘वस्तीत कोणीही नवीन कुटुंब आले किंवा शाळेत न जाणारे मूल दिसले की ते शाळेत का जात नाही हे विचारण्याची आणि त्याला ताबडतोब शाळेत दाखल करण्याची मला सवयच लागली आहे. कधी कधी शाळेत दाखल करताना अडचणी येतात. मुलांकडे जन्मदाखला नसला की काही शाळा मुलांना दाखल करून घेत नाहीत. आपण कायदा सांगितला की, इकडून तिकडे, तिकडून इकडे फिरवतात. तुम्ही इथे काम करायला आला आहात तर तेच करा. कशाला पाहिजे तुम्हाला शाळा? असे म्हणणारेही भेटतात. ऐकून वाईट वाटते; पण मी प्रयत्न सोडत नाही. मुलाला शाळेत दाखल करून देतेच. या कामामुळे माझा स्वत:वरचा विश्वास वाढला. आपणही काही करू शकतो असे आता वाटते. खूप समाधान मिळते.’’

जत्रीबाईला जे मिळते तेच अशा कामातून सर्वाना मिळते- ‘समाधान’ आणि खरे तर माणसाला दुसरे काय हवे असते? rajani@doorstepschool.org chaturang@expressindia.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Education for all idea in education friends akp

ताज्या बातम्या