घरात येणाऱ्या अदृश्य संकटांची चाहूल तिला खूप उशिरा लागली. नंतर तर त्यांची मालिकाच झाली, त्यातच नवराही बेपत्ता झाला. दोन मुलांचा विचार करून ती धीरानं उभी राहिली आणि सावरलं सगळं, पण तरीही मोठय़ा मुलाचं हळवं, अबोल असणं तिला त्रास देतंच. त्यामुळे मुलांसाठी आई-वडिलांची भूमिका निभावून झाल्यावरही तिचं पालकत्व शिल्लक आहे ते सासूच्या रूपानं..

अलीकडे ‘आई’ नावाचा एक हृदयस्पर्शी व्हिडीओ सगळीकडे फिरत होता. आभाळ ढगांनी भरून आलंय. एका झाडाच्या शेंडय़ावर एक घरटं, त्यात किलबिलणारे चार-पाच छोटे पक्षी. एकाएकी पाऊस कोसळायला लागतो. त्या पिल्लांची आई धावत येऊन घरटय़ावर पंख पसरते अन् हळूहळू करत साऱ्या पिलांना पंखाखाली घेते. डोळे मिटून स्तब्ध, ती मिटल्या पंखांची पक्षीण आणि कोसळणाऱ्या जलधारा हे दृश्यं मनात घर करून राहिलं.. आणि आठवली एक जिवंत कहाणी..

कुठलीही स्त्री आपल्या संसारावर संकट आलं तर अशीच सर्व शक्तीनिशी उभी ठाकते. संकट व्यसनाच्या रूपानं आलं तर ती पतीवर र्निबध घालते. दारिद्रय़ाच्या रूपानं आलं तर स्वत: रात्रंदिवस खपून पिल्लांच्या चोचीत घास भरवते. रोगाच्या रूपानं आलं तर सावित्री होऊन यमाला रोखू पाहते. पण संकट जर अदृश्यच असलं आणि कुठून येतंय कळलंच नाही तर..? पुण्याच्या जुई मेढेकरची कथा काहीशी अशीच आहे. आपल्या संसार नौकेला भगदाडं पडली आहेत हे प्रारंभी कळलंच नाही. कारण त्यात बोळे भरून रंगसफेदी केली जात होती. हळूहळू भगदाड आहे हे दिसलं. अन् त्याचं कारण शोधेपर्यंत काही र्वष उलटून गेली..

शाळा-कॉलेजात लाजरीबुजरी पण हुशार जुई एका पांढरपेशा मध्यमवर्गीय घरातली, शिस्तीत वाढलेली मुलगी. श्रीमंती नव्हे पण सुबत्ता होती. आजोबा घरातले कर्ते. अतिशय कष्टाळू. त्यांनी जुईच्या मनावर स्वावलंबनाचे संस्कार केले. त्यामुळे कॉलेजात असताना जुई शिकवण्या करून स्वावलंबी झाली. पण तिला करिअर करायचंच नव्हतं. छोटं घर, सुखी संसार. माफक अपेक्षा होत्या तिच्या. बी. कॉम्. होता होता आजोबा अचानक वारले. कुणीतरी स्थळ सुचवलं अन् म्हटलं, ‘‘वर्षांच्या आत लग्न करा नाहीतर तीन र्वष थांबावं लागेल.’’ मुलाला चांगल्या कंपनीत नोकरी, एकच बहीण, कर्ते आई-वडील, मेढेकरांच्या स्थळात नाही म्हणण्यासारखं काही नव्हतंच. त्यामुळे जुईचं झटपट लग्न झालं.

सुरुवातीचे नवलाईचे दिवस, नंतर सासरच्या अपेक्षांना पुरं पडण्याची धडपड.. पहिल्या मुलाचा जन्म. सारं काही क्रमानं झालं. हळूहळू जुईच्या लक्षात येऊ लागलं की अत्यंत बुद्धिमान, तीन-चार भाषांवर प्रभुत्व असणाऱ्या पतीला नोकरी नाही; किंवा कधी नव्हतीच बहुतेक. सुरुवातीला त्याचे आई-वडील सांभाळून घेत होते, पण नंतर मुलगा कमवत नाही म्हणून घरात अशांती आली. संभाषण कलेत कुशल असणारा आणि कुणाचंही मन चटकन जिंकून घेणारा तिचा पती एक धड नोकरी वा उद्योग नेटाने करण्याऐवजी झटपट श्रीमंत होण्याच्या मागे लागलेला आहे हे लक्षात यायला लागलं. कारण तिच्या हातात काहीच पडत नव्हतं. शेवटी जुईने घराजवळच्या बालवाडीत नोकरी धरली. शिकवण्या सुरू केल्या. मग घरकामावरून वादंग उठलं. पतीला कुठेतरी यश मिळावं म्हणून तिनं स्वत:चे दागिने विकून त्याला संगणक घेऊन दिला. त्यानं सतत वेगवेगळ्या व्यवसायांच्या बढाया मारल्या. घरात कधी थोडा पैसा यायचा. कधी अजिबात नाही. या तणावानं घरातली नाती धोक्यात आली.

पालकत्वाची प्रारंभीची पायरी म्हणजे मुलाचं शिक्षण. हौसेनं मोठय़ा मुलाला इंग्रजी माध्यमात घातलं. पण शाळेतले निरोप जुईपर्यंत पोहचतच नसत. तिला एस. एस. सी. बोर्डातून आलेला नोकरीचा कॉलही असाच गायब झाला. घरातल्या तणावानं मिटून गेलेलं छोटं पोर शाळेत कशालाच प्रतिसाद देत नसे. अखेर जड मनानं जुईनं त्याला मराठी शाळेत घातलं. इतके दिवस सासरच्या अडचणी तिने माहेपर्यंत पोहोचू दिल्या नव्हत्या. पण किती दिवस झाकणार? अखेर एक दिवस भाऊ माहेरी घेऊन जाण्यासाठी हजर झाला. तेव्हा जुईचे पती नाशिकला नोकरी करतो म्हणून तिकडे घर करून राहिले होते. तिथेही ते जास्त दिवस टिकले नाहीत. पैसे संपल्यावर परत आलेच. एव्हाना पतीचा अस्थिर स्वभाव, वेळोवेळी होणारी घराबाहेरची गुंतवणूक जुईला समजून चुकली होती. अदृश्य संकटाचं स्वरूप नेमकं पुढे आलं तोपर्यंत दुसऱ्या मुलाचा जन्म झाला होता. भाऊ कितीही चांगला असला तरी दोन मुलं घेऊन त्याच्या संसारात अडचण होऊन राहायचं नाही असं जुईनं ठरवलं. अधूनमधून घरी येणाऱ्या पतीशी निश्चयानं संबंध तोडले. त्याच्यावर पांघरूण घालणाऱ्या घरातल्या ज्येष्ठांना तशी स्पष्ट कल्पना दिली आणि सारं लक्ष मुलांवर केंद्रित केलं.

शिशू शाळेत असताना मोठा मुलगा अगदी मिटून गेला होता. आजी, आजोबा, आत्या आणि बाबा या साऱ्यांचाच तो लाडका होता. पण एकीकडे आई अन् बाकी सारे दुसरीकडे यात या मुलाची फार ओढताण झाली. आई सारखी कामात का हे समजण्याचं त्याचं वय नव्हतं, त्यामुळे तो आईपासून तुटत चालला होता. जुईमधल्या हळव्या आईची ही सत्त्वपरीक्षाच होती. तिनं प्रसंगी मानसोपचारतज्ज्ञांची मदत घेतली. त्यांच्या सल्ल्यानुसार वागत गेली. मुलालाही हळूहळू समजत गेलं की अभ्यास घेणं, वळण लावणं हे सारं आईच करते आहे. बाकी कुणीच त्याचा, त्याच्या प्रगतीचा किंवा त्याच्या मनाचा विचार करत नव्हतं. समजूत येत गेली तसतसा मुलगा आईकडे परतू लागला. आज मोठा पदवीधर होऊन नोकरीला लागला आहे. त्याला जुन्या आठवणी नको वाटतात. त्याला नाटक, नृत्य, खेळ सगळ्यात रस होता. पण त्यानं स्वत:ला आक्रसून घेतलं आणि त्याचं बालपण घरातल्या माणसांच्या ताणतणावानं कोळपून गेलं याचा सल आहेच त्याच्या मनात.
धाकटा मात्र धिटुकला झाला. जुईनं त्याला अगदी लहानपणी स्वत:च्या माहेरी ठेवला, त्यामुळे याचं गाडं लाडाकोडात मार्गी लागलं. धाकटा आता सी. ए. करत आहे. त्याच्यापाशीही वडिलांच्या सांगाव्या अशा आठवणी नाहीतच. २००७ मध्ये ते मुंबईला जातो सांगून घरातून बाहेर पडले ते अद्याप परतलेच नाहीत. मुलांच्या दृष्टीनं आई हेच सर्वस्व आहे. लहानपणी हट्ट केल्यावर आईनं हॉटेलमध्ये नेलं तर एक प्लेट दोघांत वाटून द्यायची. स्वत: फक्त पाणी प्यायची हे त्याला अजूनही आठवतं. मुलं आईला खूप मानतात. तिला जपतात. ज्या लोकांनी आपल्याला दु:ख दिलं त्यांची पर्वा कशाला करायची असे काही मूलभूत वादाचे मुद्दे आहेत, पण मुलं आईशी घट्ट जोडलेली आहेत.
जुईला आता दीनानाथ हॉस्पिटलमध्ये नोकरी आहे. ही नोकरी मिळाल्यापासून तिच्या आयुष्याला थोडं स्थैर्य आलं. सासूबाई आता अनेक चुका मान्य करतात. जुईला वाटतं, त्यांनी तेव्हाच थोडा समजूतदारपणा दाखवला असता तर दोघींनी मिळून नवऱ्याला सुधारलं असतं. मुलांना वडिलांचं छत्र लाभलं असतं.

तिच्या नवऱ्याला बेपत्ता ठरवण्याची कायदेशीर प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे काही गोष्टी थोडय़ा सुकर होतील. भाडय़ाच्या का होईना पण सासरच्या घराचा आधार जुई पकडून आहे. ‘या प्रवासात बाहेर मला सगळीकडे चांगलीच माणसं भेटली. त्यांच्यापुढे माझा ‘जग चांगलंच आहे’ हा विश्वास टिकून राहिला’ असं ती म्हणते. दीनानाथ हॉस्पिटलच्या डेंटल विंगचे वरिष्ठ आणि सहकाऱ्यांनी जुईला खूप आधार दिला. आत्मसन्मान जपला तिचा. जुईला वाटतं, सकाळी घरकाम, नोकरी मग टय़ूशन्स यातून मुलांना वेळ कमी दिला. खायचे-प्यायचे लाड मनासारखे नाही करता आले, पण मुलांना मात्र ती जगातली सर्वोत्तम, आदर्श आई वाटते यातच सगळं आलं.
‘आई म्हणून मला धाकटय़ाची फारशी काळजी नाही वाटत. तो मनमोकळा आहे, खंबीर आहे. मोठा मात्र हळवा, अबोल आहे. त्याला समजूतदार साथीदार मिळावी, सासू म्हणून कसं वागायचं, कसं सुनेला प्रेम द्यायचं ते मी कित्येक र्वष स्वत:शी घोकते आहे..’ जुई हसत हसत सांगते.

आई आणि वडिलांची दोघांची भूमिका करून जुईचं पालकत्व संपत नाही. तिच्या पालकत्त्वाच्या आदर्शामध्ये सासूची भूमिकाही समाविष्ट आहे तर.. कमालच आहे जुईची!

– वासंती वर्तक
vasantivartak@gmail.com