scorecardresearch

मानिनी आजाबाय

पतीच्या बाहेरच्या ‘गुंतवणुकी’विषयी सासरच्याच लोकांनी ‘त्यात काय बिघडलं’

मानिनी आजाबाय

पतीच्या बाहेरच्या ‘गुंतवणुकी’विषयी सासरच्याच लोकांनी ‘त्यात काय बिघडलं’ असं म्हटलं त्या क्षणी ही मानिनी आजाबाय सासरचा वैभवसंपन्न वाडा आणि जमीनजुमला सोडून पुण्याला निघून आली. एका घरी काम करून मुलांसाठी, त्यांच्या हिश्शासाठी १२ वर्षे लढली. तोपर्यंत मोठय़ा झालेल्या मुलानं त्यांना पुन्हा गावी नेलं. तिथेही कडवट न होता संघर्ष करत राहिली. ज्या पतीमुळे एवढं सगळं घडलं त्याला त्याच्या पडत्या काळात सावरलंही, पण उंबऱ्याबाहेर ठेवूनच.

त्यांचं प्रथमदर्शन माझ्या मनावर पक्कं कोरलं गेलं आहे. उंच, सडपातळ, ताठ शरीरयष्टी. मुलायम दूधगोरी अंगकांती, टपोरे डोळे कपाळावर बंद्या रुपयाएवढं कुंकू, अगदी लालभडक कोरडं कुंकू, बघायलालाही जड वाटावा एवढा मोठा अंबाडा डोक्यावरच्या पदरामधूनही सहज जाणवणारा, गर्भरेशमी हिरवीगार साडी – नऊवार! मराठी सिनेमातल्या रूपवान पाटलीणबाईच समोर उभ्या होत्या जणू. विसंगत होतं ते हातात एक गाठोडं आणि अंगावर एकही अलंकार नसणं.

पुढे त्यांची सविस्तर कथा कळली. त्यांच्या कानावर बरेच दिवस पतीच्या बाहेरच्या ‘गुंतवणुकीची’ कुणकुण येत होती, पण ज्या दिवशी सासरच्याच लोकांनी ‘त्यात काय बिघडलं’ असं म्हटलं त्या क्षणी ही मानिनी सासरचा वैभवसंपन्न वाडा आणि जमीनजुमला सोडून पुण्याला निघून आली. कुणाच्या तरी ओळखीनं पहिला आधार म्हणून त्या आमच्या घरी आल्या आणि १२ वर्षे राहिल्या. आमच्या भल्या मोठय़ा एकत्र कुटुंबात एक छोटय़ा मुलानं त्यांना बोबडय़ा बोलात ‘आजाबाय’ म्हणून हाक मारली आणि तेच त्यांचं नाव झालं. आमच्या घरात दोन पणज्या होत्या, पण आजी नव्हती. आजाबाय माझ्या मोठय़ा काकूच्या वयाच्या. पण आजीच्या मानानं राहिल्या. आता मागे वळून पाहताना वाटतं, त्यांनी एखाद्या मोलकरणीच्या कामालाही नाही म्हटलं नाही. सुगरणीपासून मोलकरणीपर्यंत सर्व भूमिका केल्या. पण मानानं. आमच्या घराच्या आधारानं त्यांनी आपल्या सासरच्या लोकांवर केस केली आणि इस्टेटीत वाटा मागितला. मुलांचा ताबा मागितला. तो मिळाल्यावर मुलांना पुण्यात वसतिगृहात ठेवून शिकवलं. घटस्फोट लगेच मिळाला. दोन-तीन वर्षांमध्ये, पण इस्टेटीतल्या वाटय़ासाठी त्या बारा र्वष झगडल्या.

किती कठीण दिवस होते ते. मुलांच्या खर्चाची रक्कम वेळेवर मिळायची नाही. पैसे मागायला गावी जावं तर सासू-दीर अपमान करायचे. मुलांच्या मनात तुमची आई भांडकुदळ आहे असं भरवायचे. मुलांनाही गावी उनाडायला आवडायचं. कान पकडून वसतिगृहात डांबणारी आई त्रासदायक वाटायची. आमच्या घरून मुलांना काही गोड-धोड किंवा वह्य-पुस्तकं पाठवली तरी मुलांना बहुधा ते आवडायचं नाही. माझी आई त्यांना सणाला घरी बोलावायची, पण मुलांचा ओढा गावाकडेच राहिला. मला आठवतंय, घर तुटल्यावर आजाबाय आल्या तेव्हा त्यांच्या संतापाची धग त्यांना डोळ्यात दिसायची. त्यांना मी कधीही रडताना पाहिलं नव्हतं. पण पुढे पुढे मुलांसाठी त्या हळव्या व्हायच्या. एकदाच त्या घळाघळा रडल्या त्या मोठय़ा मुलासाठी. मॅट्रिक झाल्यावर पुढे शिकायचं नाही असं सांगून तो गावी निघून गेला. तो नेहमी त्याची आजी आणि काकाच्या बाजूनं उभा राहिला. आईला इस्टेटीत वाटा न देण्यासाठी त्यानं पुढे साक्ष दिली. आजाबायचा नवरा या सगळ्यात मूकस्तंभ होता. त्यानं पत्नीचा कधी शब्दांनी अपमान केला नाही. पण कधी कर्तेपणानं पैसेही दिले नाहीत. आपली दुसरी बायको घेऊन शेतात राबत राहिला. शेतघरातच बिऱ्हाड थाटलं.

आजाबाय लग्नाआधी चौथी शिकलेल्या होत्या. आमच्या घरात त्या दुपारी लहान मुलांजवळ बसून इंग्रजी शिकल्या. वकिलांशी बोलायचं, केस पुढे रेटायची, स्वत:च्या मुलांच्या हिताकडे बघायचं हे सगळं त्या उपजत बुद्धीनं करायच्या. कधी कधी आजोबांचा सल्ला घ्यायच्या. या सगळ्या काळात आजाबाय आमच्या घरातली कामं उरकून संध्याकाळी दोन घरी स्वयंपाकाला जायच्या. मुलांना मिळणाऱ्या सासरच्या पैशातली एक पैसुद्धा त्यांनी स्वत:साठी वापरली नाही. उलट आमच्या घरच्या पगारात प्रारंभी वकिलाची फी आणि मुलांचं शिक्षण केलं त्यांनी. धाकटा मुलगा मात्र आजाबायला धरून राहिला. आईच्या प्रेमात राहिला. बारा वर्षांनी आजाबायला शेतघराचा अर्धा भाग आणि जमिनीचा एक तुकडा मिळाला. तिथे त्यानं मानानं आईला राहायला नेलं. गावात इलेक्ट्रिकल सामानाचं दुकान टाकून आयटीआयमधल्या शिक्षणाचं सार्थक केलं.

आमचं घर सोडून जाताना या ‘मानिनी’नं कमालच केली. त्यांना मिळालेल्या प्रत्येक पै पैचा हिशेब त्यांनी बारा र्वष लिहून ठेवला होता. अंदाजे पगाराची एक रक्कम वजा करता उरलेले पैसे स्वत: शेती करून फेडीन असं सांगितलं त्यांनी. वडिलांनी पैसे घेतले नाहीत ही गोष्ट वेगळी आणि कसे घेणार? आजाबायनं आमच्यासाठी भरभरून केलं होतं. प्रेमानं आणि कष्टानं. त्यांच्या परतफेडीचं पारडं निश्चितच जड होतं. त्या हाडाच्या शेतकरी होत्या. भुईला आपण एका हातानं दिलं तर ती शतपटीनं परत करते ना, तशा या आजाबाय. साधी मिरचीही जून असली तर त्या उभी चिरायच्या. बिया काढून मातीत टाकायच्या. कितीतरी रोपं, मिरच्या सगळ्या नातेवाईकांना द्यायच्या. तीच गोष्ट भाजीचीही. आमच्या अंगणात त्यांनी खूप भाज्या काढल्या होत्या.

आजाबायची कसोटीची वेळ गावी गेल्यावरही टळली नव्हती. शेजारी एका बाजूला सवत तर शेतात दुसऱ्या बाजूला दीर. दोघांनी त्यांना खूप त्रास दिला. भाजीपाल्यात गुरं सोडणं, ऐन मोक्याच्या क्षणी त्यांच्या शेताचं पाणी तोडणं. पण आजाबाय सर्वाना पुरून उरल्या. समाधानानं शेती करत राहिल्या. पुण्यात कामाला आल्या की त्यांच्या शेतातला भाजीपाला, आवळे, लोणची, मोरावळा, खूप काही घेऊन यायच्या. आपल्या खमकेपणाच्या कथा सांगून आम्हाला हसवायच्या. त्यांच्या ताठ-मानी आणि तत्त्वनिष्ठ स्वभावामुळे कशी रोज खलनायिकेची भूमिका करावी लागते असं सांगताना नकळत डोळे पुसायच्या.

अवघा दहा-बारा वर्षांचा संसार, नंतर बारा वर्षांचा वनावास आणि लढाई. त्यानंतरही बारा र्वष सवतीचा आणि निष्क्रिय नवऱ्याचा शेजार सहन करूनही आजाबाय कधी कडवट झाल्या नाहीत. ज्या मुलांनं त्यांचा अपमान केला, अबोला धरला, त्याची पत्नी आणि मुलं आजाबायला मानतात. प्रेमानं येतात. आजाबायला अलीकडेच एक शेतकरी महिलेचा गौरवही प्राप्त झालाय. पण त्यांनी खरी कमाल केली म्हणजे सवतीच्या अचानक मृत्यूनंतर त्यांनी आपल्या नवऱ्याला आजपर्यंत सांभाळलं आहे. अगदी आम्हालासुद्धा त्या म्हणायच्या, ‘‘आपण कुणाचा अपमान नाही करायचा.’’ पूर्ण अबोला धरूनच पण नवऱ्याचं खाणं पिणं आणि शुश्रूषा त्या उत्तम सांभाळतात. आयुष्याच्या अखेरीला त्यांचं एकटेपण संपवण्याची इच्छा नवऱ्यानं दाखवली, पण आजाबायनं त्यांना आपल्या उंबऱ्याबाहेर ठेवूनच सारी कर्तव्य पार पाडली. आज आजाबायचं घर मुला-नातवंडांनी गाजतं गोकुळ आहे. तारे पलीकडून त्यांचा जोडीदार, मूकपणे पत्नीचं कौतुक करत असेल का? आरामखुर्चीत बसून, आपण आपल्याच कर्मानं या चित्राबाहेर राहिलोय हे त्याला सलत असेल का?

आजाबायनं नव्वदीत प्रवेश केला आहे. कपाळावरचं कुंकू तसंच लालभडक आहे. डोळ्यातून अपार माया ओसांडते आहे. भेटून निघताना आजाबाय मला सांगत आहेत, ‘‘माझ्या एकलेपणाविषयी तुला हवं ते लिही, पण त्यांच्याविषयी वावगा शब्दही काढायचा नाही. नाही तर तुझं घर उन्हात बांधेन हो.’’

हे ऐकता ऐकता आजाबायबरोबर माझेही डोळे वाहताहेत..

vasantivartak@gmail.com

मराठीतील सर्व एकला चालो रे ( Ekla-chlo-re ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या