अंबाच्या बहिणींना दिवेलागणीच्या आत घरात येण्याचं बंधन, पण तीच वेळ हिच्यासाठी मात्र नाक्यावर किंवा बस-स्टॅण्डवर उभं राहण्याची. जगण्यातली ही विसंगती मन चिरणारी! म्हटलं, ‘‘बहिणीच्या, भावाच्या लग्नात वावरताना तुला कसं वाटलं असेल.’’ ती शांतपणे म्हणाली, ‘‘आठवत नाय फारसं. पण अगुदरच म्हाईत व्हतं देवदासी व्हायचंय.’’ पदरात एक मुलगा, एक मुलगी. त्यांना हॉस्टेलवर राहून शिक्षण दिलं. लग्न लावून दिलं नि आज आजी झाल्यानंतरही रोजची रोजी रोटी त्याच मार्गाने कमावते आहे पण संघटनेचं कामही करतेआहे. नवीन आलेल्या मुलींना आरोग्याची काळजी घ्यायची शिकवणही देते आहे. त्यांचे प्रश्न सोडवते आहे..

महाराष्ट्रातल्या एका मध्यम शहरातल्या सध्या दुथडी भरून वाहत असलेल्या नदीच्या कडेकडेने मी चालत होते. छोटासा घाट होता. एक मंदिर होतं. आपल्याकडे सगळे संगम, सगळे घाट पवित्र समजले जातात. शेकडो लोकांची पापं धुऊन पोटात घेत इथून नदी पुढे पुढे वाहत जाते. आज मी एक वेगळाच घाट शोधत होते. ज्या घाटावर समाजातल्या वासनेची पापं धुवून निघतात. त्यांचा निचरा होतो. आणि माणुसकीचा प्रवाह पुढे खळाळत राहतो. कधी तो घाट असतो, कधी ती आळी असते. मोठय़ा शहरांमध्ये तो विशिष्ट रोड असतो. तर कुठे त्याला उघड उघड लाल बत्ती म्हटलं जातं. शब्द, निरनिराळ्या भाषांची, संस्कृतीची झूल पांघरून आले तरी अर्थ एकच असतो. शरीरविक्रय, देहाचा व्यापार. जुना शब्द वेश्याव्यवसाय आणि आताच्या भाषेत सेक्स ट्रेडिंग!

तिथेही होते असे रस्ते.. अशा गल्ल्या. रस्ता शोधला, पण बाजाराच्या कोलाहलात मन उकलून गप्पा कशा होणार म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी ‘ती’च्या राहत्या घरी भेट ठरवली. दीड खोलीचं घर. भिंतीवरच्या भरपूर देवदेवता ताजी फुलं लेवून प्रसन्न स्थानापन्न! उदबत्तीचा दरवळ. ‘ती’ नेमकी कुणाची भक्त? महत्त्वाचं नव्हतंच, तिच्या मन:पूर्वक पूजेचा दरवळ पुरेसा होता.

‘ती’ वयात आल्याबरोबर देवाला सोडलेली, देवदासी म्हणून. घरच्यांचा काही नवस होता. त्यांनी तो फेडला.

काय आहे ‘ती’चं नाव? शक्ती, काली, रेणुका, दुर्गा, यल्लम्मा, अंबा..

‘‘तुम्ही काहीही म्हना, चालतंय मला’’ प्रसन्न मोकळं हसली अन् ‘‘गरम गरम च्या घ्या पैला’’ म्हणून अंबानं आम्हा दोघींचे पेले भरले, भोवती खेळणाऱ्या नातवंडांना ‘‘जरा गपा आता’’ असं दटावत माझ्या पुढय़ात आरामात येऊन बसली.

अंबाच्या बहिणींना दिवेलागणीच्या आत घरात येण्याचं बंधन, पण तीच वेळ हिच्यासाठी मात्र नाक्यावर किंवा बस – स्टॅण्डवर उभं राहण्याची. जगण्यातली ही विसंगती मन चिरणारी. म्हटलं ‘‘बहिणीच्या, भावाच्या लग्नात वावरताना तुला कसं वाटलं असेल.’’ ती शांतपणे म्हणाली, ‘‘आठवत नाय फारसं. पण अगुदरच म्हाईत व्हतं ना देवदासी व्हायचंय.’

धार्मिक प्रथेच्या पांघरुणाखाली हा सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक शोषणाचाच बळी. पण तीच प्रथा, हे कटू वास्तव स्वीकारायची ताकद देत असेल का? सुरुवातीचा काळ कठीणच असणार. अनोळखी जग, आरोग्याचे प्रश्न, आर्थिक पिळवणूक योग्य मोबदला नाही मिळाला तरी करणार काय..

पण अंबानं तो टप्पा केव्हाच मागे टाकला होता. तिच्या स्मरणातदेखील त्याला फारसं स्थान नव्हतं.

किती जग बदललं, संस्कृती विकसित झाल्या तरी सुखाचा शोध हा क्षणिक शारीरिक क्रीडेत गुंतून राहतो तोवर वास्तव बदलत नाही. तोवर हा व्यापार, हा शरीरविक्रय – व्यवहार थांबणार नाही हे तिचं मत.

अंबाला एक मुलगी आणि एक मुलगा. दोघं चांगली शिकली. मुलगी सासरी सुखात. मुलीचा तिसरा मुलगा पाळण्यात आणि तिच्या दोन मुली बाजूला खेळत होत्या. कुटुंब आनंदात होतं. अंबाला विचारलं, ‘‘मुलं होण्याचा निर्णय तुझा स्वत:चाच, कुणी मालक मिळाला होता का गं?’’ तिनं हसून हळू आवाजात सांगितलं. ‘‘आपली मुलं आपली जबाबदारी, बाकी सारं अळवावरचं पाणी आसतं ताई.’’ अंबाची आई तिच्याबरोबर राहत होती. सुरुवातीला सारं कुटुंब एकत्रच होतं. नंतर भावांची लग्नं झाली. एक व्यवसायाचा मुद्दा सोडला तर सारं कुटुंब निम्नआर्थिक स्तरातल्या इतरांसारखंच, एकाच वस्तीत एकोप्यानं, खेळीमेळीनं राहत होतं.

मुलांच्या शिक्षणाचा विषय निघाला आणि अंबा खुलली. ‘‘हे सारं संघटनेमुळे.’’

‘वेश्या अन्य मुक्ती परिषद’ आणि ‘संग्राम’ या दोन संघटनांमुळे दैनंदिन जीवन सुकर झालं. ‘नॉलज मिळालं ताई, आमचं आरोग्य सुधारलं’ अंबा आता संघटनेची भाषा बोलायला लागली. खरं होतं तिचं. संघटनेनं या मुलींना मोठा आधार दिला होता, स्वाभिमानाची ठिणगी फुलवली होती. अंबानं पहिलीपासूनच मुलांना हॉस्टेलवर ठेवलं. सुरुवातीला सर्वसाधारणपणे शाळांमध्ये आईच्या नावापासूनच मुलांना इतर मुलं हैराण करतात. शिक्षिका चांगल्या मिळाल्या तर पुढं सुरळीत होतं. अंबा म्हणते, ‘‘प्राब्लेम कुटं नसतो ताई, आसनारच ना शाळेत बी, पन पोरांनी तोंड दिलं असनार.’’

पूर्वी या मुलांचं शाळा सोडण्याचं प्रमाण खूपच असायचं. पण ‘वॅम्प’ संघटनेच्या आधारामुळं आता ते कमी झालं. मीना सेशु यांचं नाव मुलं फार आदरानं घेतात. मीना मॅडमनं सगळ्या वस्त्यात प्रारंभी संध्याकाळच्या शाळा सुरू केल्या होत्या. संध्याकाळच्या वेळी पोरं मोकाट फिरू नयेत म्हणून. आता तर सांगलीत संघटनेनं होस्टेलच उभारलंय. अंबाचा मुलगा आता स्वत:ची नोकरी सांभाळून संघटनेचं काम करतो. मुलगी घरात होती पण फारसं बोलत नव्हती. पोरांमध्ये रमली होती. आपल्या प्रश्नांच्या सुईनं त्यांच्या आयुष्याची वीण उसवायचा आपल्याला काय अधिकार, मुलांनी आधीच खूप प्रश्नांना तोंड दिलं असणार, असं वाटून मी तिला छेडलं नाही जास्त.

गप्पांमधून लक्षात येत गेलं, नुसतं अभ्यास, पालकसभा, पास होणं, आवडीचा अभ्यासक्रम हे प्रश्न नव्हतेच अंबाच्या समोर. या भेटीत मुलांनी काही मागितलं तर ते खरेदी करण्यासाठी पैसे साठवून आठवणीनं पुढच्या महिन्यात ते घेऊन जायचं. होस्टेलवर पोरांना भेटायचं, त्यांच्या शिक्षकांना भेटायचं, त्यांना हवं-नको विचारून परत निघायचं. सुटीत पोरं घरी आली की अंबाची आई लक्ष ठेवायची. अंबा हळूच सांगते, ‘‘सुटीत तर लई काळजी बगा. आडवयात पोरी नादी लागू नै, पॉजिटिव होऊ नै, कोणाच्या नादानं, म्हणून जिवाला धसका.’’ एवढंच नाही तर शहरात काम मिळवण्याच्या आशेनं पोरं घर सोडून गेलेली आहेत आजूबाजूची, म्हणून तर अंबानं शाळा संपल्याबरोबर पोरीचं लग्न लावून दिलं. जावई भला मिळाला. अंबाच्या जिवाचा घोर कमी झाला.

अंबा अजिबातच शिकलेली नाही. तिचे आई-वडील कर्नाटकातून रस्त्याची कामं करत करत महाराष्ट्रात येऊन पोचले. पण आज अंबा संघटनेचं काम करते. नव्या मुलींना आरोग्याची, एचआयव्हीची माहिती देणं, नव्या मुलींना नियमित भेटून त्यांचे प्रश्न सोडवणं ती आत्मविश्वासानं करते आहे. मुलाला तर आईचा खूप अभिमान आहे. आईनं काहीच कमी पडू दिलं नाही, जिद्दीनं शिकवलं. तो म्हणाला, ‘‘आम्हाला कुणी पास- नापासाचं दडपण नाही आणलं. मी शिक्षण सोडू नये एवढंच आईनं पाहिलं. लहानपणी आजूबाजूलाही कुणाचे वडील फारसे दिसलेच नाहीत,’’ त्यामुळे वडिलांसाठी झुरणं किंवा आईला प्रश्न विचारणं असं फारसं मुलांनी केलं नाही. आणि अंबानंही कधी एकदा प्रश्न मनाला नाही लावून घेतला.

‘‘हो, आम्हीही व्यापार करतो आणि व्यापाराचे सारे नियम दोन्ही बाजूंनी पाळायला हवेत.’’ असं म्हणण्याइतकी जागृती आणि आत्मविश्वास या स्त्रियांना आहे आता. एडस्, कायद्याचा बडगा, शोषण आणि व्यवस्थेकडूनही शोषण याविरुद्ध त्या हातात हात घालून उभ्या आहेत. अंबा म्हणते तसं त्यांची ‘कम्युनिटी’ हे जगाच्या रोकडय़ा व्यवहाराचं नेमकं प्रात्यक्षिक आहे. काही तासांपुरतं ‘युनिफॉर्म’ चढवून ‘काम’ करावं. परत आलं की घरच्या कामाला लागावं. आईची सेवा करावी. स्वयंपाक करावा. हे आता तिचं नित्य कर्म झालं आहे.

सकाळीच पूजा करून अंगारा लावलेली, नातवंडांवर रागावणारी, बाळंतीण मुलीचे लाड करणारी अंबा अगदी टिपिकल आजी शोभत होती. फक्त ही चाळिशीतच आजी झाली होती. स्त्री रूपाचं पावित्र्य आपल्याकडे फक्त योनिशुचितेशी जोडलं जातं म्हणून.. नाही तर ही आजी काही वेगळी नव्हती. घरातला स्वयंपाक आटोपल्यावर मला निरोप देऊन, मेक-अपचा भरगच्च ‘युनिफॉर्म’ चढवून ती तिच्या कामावर हजर होणार होती. नेहमीसारखीच..

वासंती वर्तक

vasantivartak@gmail.com