घरातल्या वृद्धांना सांभाळताना अनेकदा बाहेरच्या मदतनीसाची गरज लागण्याची वेळ येते. आजारी, विकलांग किंवा झोपून असलेल्या रुग्णांना उठवणं, बसवणं, चालवणं, डायपर बदलणं, अंघोळ घालणं, त्यांचे राग-लोभ सांभाळणं यासारखी कामं रुग्ण-मदतनीस करतात. असं चोवीस तास, महिनोन् महीने काळजी वाहाणार्या रुग्ण-मदतनीसांचं जग आणि जगणंही जाणून घ्यायला हवं.

आमच्याकडे हे अनेकदा घडायचं. दिवसभरात कितीही चवदार पदार्थ करून पुढ्यात नेले, तरी आई तोंड फिरवायची. ती उपाशी राहिली की आम्ही अस्वस्थ. मग मदतनीस मुलगी सूत्रं हाती घ्यायची, आम्हा बहिणींना खुणेने आईच्या पुढ्यातून गायब व्हायला सांगायची, आश्चर्य म्हणजे आम्ही वाढून दिलेलं ताट आईसाहेबांनी काही वेळातच संपवलेलं असायचं, अखेर आम्हाला हुश्श वाटायचं! 

   पूजा, रुपाली, यामिनी, गजाला, नीलम, वैभवी, प्रियंका, मानसी, ममिता, रंजना, रूक्षा, संजना, सोनल अशा २० ते २५ वयोगटातल्या कितीतरी मुली आपापल्या गावा-राज्यातून येऊन कौशल्याने, आत्मविश्वासाने विविध कुटुंबांमधल्या वृद्धांची सेवा करतात. हे त्यांचं पगारी काम. हो, जरूर. पण नात्यागोत्याच्या नसलेल्या आजारी, विकलांग, वृद्ध व्यक्तीला हाताळणं, न्हाऊ-खाऊ-पिऊ घालणं, वेळप्रसंगी त्यांचे नैसर्गिक विधी उरकणं, त्यांचे राग-लोभ सांभाळणं, त्याच व्यक्तीभोवती स्वत:चा दिनक्रम आखणं, असं चोवीस तास, महिनोन् महिने करत राहणं याचं मोल रुपया-पैशांत करण्यापलीकडचं!

 एखादा दीर्घ आजार, शस्त्रक्रियेनंतरचा काळ, पडझडीतून ‘फ्रॅक्चर’ होणं, अशासारख्या कारणाने घरातल्या वृद्धांना सांभाळताना बाहेरच्या मदतनीसाची गरज लागण्याची वेळ येते. कारण रुग्णाकडे चोवीस तास लक्ष देण्याइतका वेळ घरातल्यांकडे नसतो. अनेक घरांत वृद्धांचा सांभाळ करणारेदेखील त्यांच्याहून थोडे कमी वयाचे, तब्येतीच्या तक्रारी सुरू झालेले वृद्धच असतात. अशा वेळी पैशाने परवडणार्यांकडे बाहेरून ‘काळजीवाहक’ (केअरगिव्हर किंवा केअरटेकर’) मदतीसाठी बोलावण्याचा पर्याय असतो. वृद्धसेवेतली आपली मोठी गरज भागवणार्या या रुग्ण-मदतनीसांचं जग आणि जगणं जाणून घ्यायला हवं.

वृद्धांना विविध आरोग्यसेवा देणारा आणि रोजगार उपलब्ध करणारा उद्योगच भारतातल्या मोठ्या शहरांत फोफावलाय. सर्वाधिक मागणी रुग्ण-मदतनीसांना आहे. वृद्धांची वाढती संख्या, त्यांना सांभाळण्याच्या वाढत्या गरजा, विखुरलेली कुटुंबं. दुसर्या बाजूला, काम मागणार्या हातांची वाढती संख्या, रुग्ण-मदतनीस ही वेगाने वाढणारी सेवा, मात्र ती असंघटित आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी वर्षभरात दीड लाख बहुकुशल काळजीवाहूंना प्रशिक्षित केलं जाईल, अशी घोषणा अर्थसंकल्पात केली आहे. या सेवा महानगरकेंद्रित आहेत. गुणवत्ता वाढ, प्रमाणीकरण, नियमन आणि पोहोच वाढवण्याची गरज या सेवेला आहे. महाराष्ट्रात वृद्धांना सांभाळण्याच्या कामात सुमारे ४०० पेक्षा अधिक नोंदणीकृत संस्था आणि ४० हजार प्रशिक्षित मुलं-मुली आहेत. यातही मुली ९५ टक्के आहेत. मुलग्यांची कमतरता असल्याने वृद्ध पुरुषांच्या देखभालीचं कामही मुलीच करतात. वंचित समाजातल्या युवक-युवतींचा कौशल्यविकास आणि त्यांना अनुरूप रोजगार विनामूल्य मिळवून देण्यात आघाडीवर असलेल्या ‘प्रथम’ संस्थेत गेली दहा वर्षं आरोग्यक्षेत्राची जबाबदारी सांभाळणारे पुनीत पुजारी आणि रुग्ण-मदतनीस पुरवणारे सर्फराझ यांच्यासह काही खासगी संस्थाचालक यांनी ही माहिती दिली. ‘जनरल ड्युटी असिस्टंट ’ नावाचा ३ ते ४ महिन्यांचा अभ्यासक्रम केल्यावर रुग्णालयात किंवा घरी रुग्णसेवा करण्याची पात्रता प्राप्त होते.  अंथरुणाला खिळलेल्या (‘बेडरिडन’) रुग्णांना हाताळणं, उठवणं-बसवणं-चालवणं, खाऊ-पिऊ घालणं, यात नाकातल्या नळीद्वारे अन्न भरवणं (राइस ट्युब फीडिंग) हेसुद्धा आहे. डायपर बदलणं, आंघोळ घालणं, रक्तदाब, प्राणवायू, साखर पातळी तपासणं यासारखी कामं शिकवली जातात. दहावी-बारावी पास, पुढच्या शिक्षणासाठी अर्थपाठबळ नाही, उलट कुटुंबासाठी लवकरात लवकर कमवण्याची निकड, शहरात स्थलांतर करण्याची तयारी असलेली मुलं-मुली रुग्ण मदतनीसाचं काम निवडतात.  एरवी १५ ते ३५ हजार रुपये शुल्क असलेलं हे शिक्षण विनामूल्य देणार्या ‘प्रथम’सारख्या काही संस्था आहेत. रुग्ण-मदतनीस पुरवणार्या ‘होमकेअर’ संस्था प्रशिक्षित मुला-मुलींच्या कायदेशीर कागदपत्रांची पडताळणी करून त्यांना काम देतात. त्यामुळे ‘जीडीए’ केल्यावर लगेचच कमाई सुरू होते. अनुभवातून कामात सफाई येत जाते.

रुग्णालयात काम करण्याच्या तुलनेत घरी सेवा देण्याचा मोबदला दुप्पट असतो. मदतनीस पुरवणारी संस्था चोवीस तासांसाठी मासिक सुमारे चाळीस हजार घेते. मात्र त्यांच्या या कामाचा मजबूत कणा असलेल्या मुला-मुलींना तुलनेने कमी मोबदला देते. बारा तासांच्या कामाला १२ ते १८ हजार आणि चोवीस तासांच्या कामाला सुमारे २५ हजार असा मोबदला मिळतो. आजच्या बिकट आर्थिक काळात हेही नसे थोडके, असंच म्हणायचं. काही संस्था त्यांना विमा, भविष्य निर्वाह निधीच्या कक्षेतही आणतात. रजा सहसा बिनपगारी असते. एकीच्या जागी दुसरी मदतनीस संस्थेने पाठवल्यानंतरच रजा मिळते.  वर्ष-दोन वर्षांतून मुलं-मुली महिनाभर रजा घेऊन आपल्या गावी जातात. गावाहून परतल्यावर त्यांच्यासाठी काम हजर असतंच. मराठी मुलांपैकी सुमारे ९५ टक्के मुलं-मुली विदर्भातून अकोला, अमरावती, गडचिरोली जिल्ह्यातून येतात. आदिवासी मुलीही असतात. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, झारखंड या राज्यातूनही मुलं-मुली येतात. 

अलीकडे तर वृद्धांना आजार नसला तरी सोबत म्हणून या मुला-मुलींची सेवा मागितली जाते. परदेशी असणारे पाल्य आपल्या भारतातल्या पालकांसाठी ही व्यवस्था करतात. वृद्धांशी गप्पा मारायच्या, हिंडा-फिरायला सोबत करायची, गरजेनुसार सामान आणून द्यायचं अशी कामं ही मुलं-मुली करतात. या मुलींशी बोलणं झालं.  बारावीपर्यंतचं शिक्षण संपवून नोकरी करता करता पदवी मिळवायची, असं त्यांनी ठरवलं होतं. गावातल्या बचतगटातून, अंगणवाडी ताईकडून किंवा गावात येणार्या काही तज्ज्ञ मंडळींकडून ‘जीडीए’ची माहिती मिळाली.  गावात कामाच्या-कमाईच्या संधी मोजक्या. १५० ते २०० रुपये रोजीवर शेतमजुरी, रोजगार हमीचं काम किंवा फक्त मोसमी मागणी असलेलं ब्युटी पार्लर, क्वचित जेमतेम दोन, अडीच हजार रुपये मासिक मोबदल्याचं कंत्राटी शिक्षिकेचं काम मिळतं. जिल्हा पातळीवर शहरात काम शोधणंही अवघड, कारण गाव ते शहर प्रवास न परवडणारा. म्हणून जीडीए अभ्यासक्रम करून थेट मुंबईत दाखल होण्याचा पर्याय त्यांनी निवडला. 

मुंबई-पुण्यातलं रुग्ण-मदतनीसाचं काम त्यांच्या गावात मान मिळवून देतं, असं त्या सांगतात. चोवीस तासांच्या कामामुळे घरामध्ये राहायला मिळतं, घरभाडं, जेवणाचा खर्च वाचतो. सुरुवातीला त्यांना स्वत:च्या घराची आठवण येते. सवयीच्या चवीचं जेवण मिळत नाही, पण समजून घेणारं कुटुंब मिळालं की, त्यांना सुरक्षित वाटतं. काही कुटुंबांत मात्र त्रास दिला जातो. घरातल्या एखाद्या पुरुषाचं वागणं खटकण्यासारखं असतं. त्यांना घरातली भांडी घासणं, केरवारा अशी अन्य नियमबाह्य  कामं सांगितली जातात. प्रत्येक वेळी नियमावर बोट ठेवणंही शक्य होत नाही, असं या मुली म्हणतात.  मुलींचा कल जुळवून घेण्याकडे, विश्वास कमावण्याकडे असतो. काही मुली संकोचापोटी त्रास सहन करतात. संस्थेकडे याविरुद्ध तक्रार केली, तर सहसा दखल घेतली जाते. काही वेळा मुलीही वाईट वागतात. रुग्णाला नीट हाताळत नाहीत. पैशांची उचल मागतात. त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासाचा गैरफायदा घेतात. कुटुंबाकडून त्यांच्याही गैरवर्तनाची तक्रार संस्थेकडे केली जाते. अन्य मुलीला ते काम दिलं जातं.

विशी-पंचविशीतल्या या मुली त्यांच्या पगारावर स्वत:चं अख्खं कुटुंबच चालवतात. धाकट्या भावंडांचं शिक्षण, घराची डागडुजी, आई-वडिलांचं औषधपाणी, स्वत:चं पदवीशिक्षण, भविष्यासाठी बचत, अडीअडचणीला नातलगांना, मैत्रिणींना उसने पैसे देणं. या कर्तृत्वामुळे गावामध्ये यांची पत वाढते. कारण त्यांच्यातल्या शंभरातल्या फक्त पाच-दहा मुली मुंबईत यायची हिंमत करतात. यासाठी कुटुंबाचा पाठिंबा मिळाल्याचं त्या आवर्जून नमूद करतात. कामाच्या जागी राहून जखडायला होतं. संधी मिळाली की सुट्टी घेऊन त्या मुंबईमध्ये फिरण्याची हौस भागवतात. ‘गेटवे ऑफ इंडिया’, चौपाटी, मरिन ड्राईव्ह, हाजी अली दर्गा, महालक्ष्मी, सिद्धिविनायक मंदिरं ही त्यांची आवडती ठिकाणं.

या सगळ्या जणींनाच  शहरातला मोकळेपणा आवडतो. इथे कुणी कुणाच्या चौकशा करत नाही. नोकर्या मिळतात. भाड्याच्या जागा मिळतात. इथे भविष्यकाळ आहे, असं त्यांना वाटतं. गावामध्ये कामंच नाहीत. शिवाय बंधनं असतात. लोकांना उगाच इतरांच्या उचापती करायच्या असतात. जातीपातींप्रमाणे मोहल्ले, वस्त्या असतात.  इथे मुस्लीम मुलीसुद्धा हिंदू घरांमध्ये काम करतात, तर काही ठिकाणी मुस्लीम आहे म्हणून त्यांना नाकारलंही जातं. यामिनी तमिळ घरात काम करताना ती भाषा शिकली. आमच्या घरी राहिलेल्या मुलींना आईच्या सहवासात गाणं आवडू-समजू लागलं. त्या सांगतात, ‘मुंबईत वावरताना ‘स्मार्ट’पणा येतो, अडचणींतून मार्ग काढायचं समजतं. कसं राहावं, रीतीभाती कशा असाव्यात हे शिकायला मिळतं.  वेगवेगळ्या भाषा,  छंद, खाद्यपदार्थ  समजतात.  चारचौघांत बोलायची भीती जाते. आत्मविश्वास वाढतो.  प्रेमळ लोक असले की चांगली नाती जुळतात. म्हणूनच लग्न करून मुंबईतच संसार थाटायची स्वप्नं त्या बघतात.

आमच्याकडे पालकांचे मदतनीस म्हणून काही वर्षं घरी राहिलेल्या मुला-मुलींशी आमचं प्रेमाचं नातं जुळलं. आई-नानांच्या जाण्यानंतरदेखील ते टिकून आहे. या अनेक मुला-मुलींमुळे दिलासा मिळायचा. नाना ‘डिमेंशिया’ मुळे कधीतरी आक्रमक व्हायचे. मदतनीस मुलांवर उगारायला त्यांचा हात पुढे व्हायचा. मुलं शांतपणे ते हाताळत असत. जेव्हा आईची तब्येत उत्तम होती. ती या मुलांशी गप्पा मारायची.  राजकारणावर तर त्यांच्या  वृत्तवाहिन्यांपेक्षा भारी चर्चा चालायच्या. मदतनीस गोविंदची बायको कृत्रिम दागिने घडवायची. ते विकण्याआधी तो आईची पसंती विचारून घ्यायचा. ‘करोना’ची साथ आली त्याच्या एखादा महिना आधी नाना गेले. हे मदतनीस आमच्या संपर्कात होतेच. ‘करोना’ काळामध्ये त्यांची कामं गेल्याचं कळल्यावर आईने तिच्या निवृत्तिवेतनामधली काही रक्कम दोन्ही मदतनीस मुलांना द्यायला सुरुवात केली, अगदी त्यांना दुसरी कामं मिळेपर्यंत. 

पुढे आईसाठी चार-पाच मदतनीस मुलींचं दीर्घ काळ राहाणं झालं. आई त्यांच्या केसाला तेल लावायची, वेण्या घालायची. आई आणि त्या एकमेकींचे लाड करायच्या. आई मुलींच्या आयांशी फोनवरून बोलायची. मुलींची लग्नं घाईने करू नका, मुलींच्या पसंतीनेच करा, असं सांगायची. सगळ्या कुटुंबीयांची विचारपूस करायची. आम्ही या मुलींचे वाढदिवस करायचो. त्यांची आमच्याकडून साध्या साबण-टूथपेस्टचीही अपेक्षा नसायची. या मुला-मुलींबद्दल आम्हाला कधीही कणभरदेखील अविश्वास वाटला नाही. आईच्या अखेरच्या काळातल्या मदतनीस रुपालीने सुट्टीवर जाताना तिच्या जागी येणार्या पूजाला दिलेल्या सूचनांमध्ये मोठ्या जिव्हाळ्याने लिहिलं होतं, ‘‘आजींचा ‘मूड’ गेल्यास अमिर खां यांचं गाणं यूट्यूबवर लावावं, निहारिकाचा (आईची पणती)  विषय काढावा’’.  हा तर सख्ख्या नातवंडांपेक्षाही तसूभर जास्तच ओलावा. मी आईच्या बरोबरीने रुपालीलादेखील एक छानशी गोधडी शिवून दिली. पत्रकार सुनील तांबे यांनी  ‘मान्सून – जन गण मन’ या त्यांच्या पुस्तकाच्या अर्पणपत्रिकेत त्यांच्या आईला सांभाळणार्या मदतनीस मानसीचाही उल्लेख स्वत:च्या भावंडांच्या बरोबरीने केलाय.  आपल्या पालकांच्या मदतनीसांच्या कामाला अशी उत्कट दाद द्यावीच की!

kulmedha@gmail.com