आर्थिक आणि सामाजिक बदलांच्या झपाट्यात वृद्ध पिढीची उत्पादकता आकसून गेली. ज्ञानाकलन, नवं तंत्रज्ञान अवगत करून घेणं वृद्धांना कठीण जात असल्याने समाजाच्या उत्पादकतेमधला त्यांचा सहभाग आटत गेला. आणि वृद्ध व्यक्तीचे हे समाजापासूनचे तुटलेपणच आजच्या काळातली गंभीर समस्या बनली आहे. त्यासाठीच वृद्धांच्या जगण्याला एखादा लहानसा जरी उद्देश मिळाला, तरी त्यांची जगावरची, जगण्यावरची चिडचिड थांबते. आणि मग साहजिकच नात्यातलीही.

या सदरात प्रसिद्ध झालेल्या पहिल्या दोन लेखांनंतर माझ्या ई-मेलवर आलेल्या प्रतिक्रिया वाचताना महाभारतातल्या वृद्ध विदुरांची आठवण आली. तसं, महाभारतातल्या सगळ्याच वृद्धांची शोकांतिका झाली. विदूर हे ज्ञानी वृद्ध होते. जेव्हा जेव्हा त्यांनी सल्ला दिला, मार्गदर्शन केलं, तेव्हा तेव्हा, ‘‘तुम्ही आता वृद्ध झालात, तुम्हाला राजकारण समजत नाही’’, असं म्हणून त्यांच्या पुढच्या पिढीने त्यांना बाजूला सारलं. म्हणजे, बदलत्या काळाने तयार होणाऱ्या समस्यांमधून विदुरांचीही सुटका झाली नाही.

वृद्ध पालकांचं पालकत्व हा ज्वलंत विषय असल्याचं अनेकांनी लिहिलं. काहींनी खदखद व्यक्त केली. स्वत:चे अनुभव कळवले. आपापल्या घरातले पेच सांगत मार्गदर्शन मागितलं. आपल्याच कुटुंबातल्या वृद्धांची काळजी घेणं, हे पेचाचं का होऊन जातं? कुटुंबातल्याच व्यक्तींचे स्वार्थ, अहंकार, बेजबाबदार वृत्ती, नातेसंबंधातला कोरडेपणा, कडवटपणा, दोन पिढ्यांच्या विचारांतला, जीवनशैलीतला फरक ही पेचाची कारणं घरोघरी असतात. समंजसपणे त्यावर तोडगा काढता येतो. भूतकाळ मागे टाकून, मतभेदाचे मुद्दे बाजूला ठेवून मार्ग काढता येतात. यासाठी व्यावसायिक समुपदेशकांचीही मदत घेता येते. पण, वृद्धांचं पालकत्व ही समस्या तीव्र होण्याचं कारण फक्त कौटुंबिक आणि व्यक्तिविशिष्ट नाही. बदलत्या अर्थकारणाचा, त्यातून बदलत गेलेल्या समाजरचनेचा प्रभाव आपल्या जगण्यावर, कुटुंबांवर, नातेसंबंधांवर पडत असतो, हे लक्षात घ्यायला हवं.

सध्या, वृद्धापकाळासाठी आणि वृद्ध व्यक्तींसाठीच्या वस्तू आणि सेवा यांचा बाजार तेजीत आहे. त्याची चर्चा नंतर करू. आधी वृद्धांच्या समस्यांशी अर्थकारणाचा कसा संबंध पोचतो, ते बघूया. अर्थव्यवस्था बदलत गेली. तसं जुन्या नातेसंबंधांचं स्वरूप बदलत गेलं. स्त्रियांच्या जगण्यात झालेल्या परिवर्तनानंतर कुटुंबसंस्था बदलू लागली. मुलांची, घरातल्या म्हाताऱ्यांची काळजी स्त्रीने घ्यायची, हे वर्षानुवर्षं ठरलेलं होतं. स्त्री घराबाहेर पडू लागल्यावर कुटुंबकारण बदलू लागलं. वृद्धांची जबाबदारी कुटुंबावर येऊन पडली. औद्याोगीकरणामुळे, शहरीकरणामुळे एकत्र कुटुंब विस्कळीत झाली.

आणखी एक मोठा बदल घडायला सुरुवात झाली. वैद्याकीय प्रगतीमुळे माणसांची आयुर्मर्यादा वाढू लागली. सरासरी आयुर्मान १९९१मध्ये वयवर्ष ५५ होतं. आता ते ७० वर्षांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे घरोघरी जास्त म्हातारी माणसं दिसू लागली. एकत्र कुटुंबांमध्ये वृद्धांना खात्रीने सांभाळलं जात होतं. विभक्त कुटुंबांमध्ये तसं राहिलं नाही. कौटुंबिक नात्यांचे बंधही सैलावले. संबंध, नाती याहून पैसा, मालमत्ता याला महत्व आलं. दीर्घायुष्यामुळे उदरनिर्वाह, वैद्याकीय उपचारांसाठी करावा लागणारा खर्च वाढत जातो.

शारीरिक परावलंबित्वापेक्षा पैशांसाठी दुसऱ्यांवर अवलंबून राहावं लागणं अधिक त्रासाचं असल्याचा अनेकांचा अनुभव आहे. व्यक्तीचं कुटुंबातलं स्थान त्या व्यक्तीची मिळकत, कुटुंब चालवण्यातली तिची सक्रियता, कुटुंबासाठी व्यक्ती किती उपयोगी आहे, यावर ठरतं. शेती हाच मुख्य आधार होता, तेव्हा गावातल्या, घरातल्या वृद्धांचा सामान्यत: मान राखला जायचा. वाढत्या वयामुळे ते काम करेनासे झाले की, शेतीची जबाबदारी तरुण पिढीवर सोपवली जायची. म्हाताऱ्यांनी कमावलेलं ज्ञान, अनुभव याचा लाभही तरुण पिढीला मिळायचा. औद्याोगिक समाजात बदलाचा वेग वाढू लागला. कुटुंबातले तरुण कामधंद्यासाठी शहरांत येणार आणि म्हातारी मंडळी गावांतच राहणार, असं सुरू झालं.

गावांतल्या मोठाल्या घरांत एखादी आजी-आजोबांची जोडी त्यांनी बांधून ठेवलेल्या माणसांच्या आधारावर राहातेय. आणि शहरातल्या चाळीतल्या एखाद्या खोलीत त्यांच्या मुलांचं चौकोनी कुटुंब गर्दी करून राहातंय, असं दिसू लागलं. मुलं परदेशी निघून जायला सरुवात झाली. या क्रमात वृद्धांचं सामाजिक स्थान घसरत गेलं. यानंतर जागतिकीकरणाचा टप्पा आला. अर्थकारणाची दिशा बदलत गेली. माहिती-तंत्रज्ञानाचा काळ अवतरला. इंटरनेटचं जाळं पसरलं. जागतिक बाजारपेठा जवळ आल्या. डिजिटल तंत्रज्ञानाने जग व्यापलं. त्यानंतरचा टप्पा कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि ऑटोमेशन या तंत्रज्ञानाचा, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील आमूलाग्र बदलांचा. या आर्थिक आणि त्यामुळे होणाऱ्या सामाजिक बदलांच्या झपाट्यात वृद्ध पिढीची उत्पादकता आकसून गेली.

मुळात, बदलांशी जुळवून घेण्याची इच्छा वयानुसार कमी झालेली. त्यासाठीचं ज्ञानाकलन, नवं तंत्रज्ञान अवगत करून घेणं वृद्धांना कठीण जात असल्याने समाजाच्या उत्पादकतेमधला त्यांचा सहभाग आटत गेला. त्यांच्या वाट्याला उपेक्षा येऊ लागली. क्वचित, हेटाळणी आणि तुच्छतादेखील. वृद्ध व्यक्तीचं कुटुंबातल्या तरुण पिढीपासून, समाजापासूनचं तुटलेपण ही आजच्या काळातली गंभीर समस्या आहे. आपण नकोसे झालो आहोत, निरुपयोगी ठरलो आहोत, जगायचं कशासाठी असं वाटण्याचे जीवघेणे परिणाम होतात.

नोकरदार व्यक्तींचं सेवानिवृत्तीनंतर काय होतं? उत्पन्न घटतं. निवृत्त होणाऱ्या बापाचा किंवा आईचा शेवटचा पगार आणि त्यांच्या मुलामुलीच्या नोकरीतला पहिला पगार सारखाच असल्याचा अनुभवही अनेकांचा असेल. मग रोजचा घरखर्च नव्याने मिळवायला लागलेल्या मुलामुलीने करावा, असंही काही कुटुंब ठरवतात. पालकांची ऐपत असेल तर तुमची मिळकत तुमच्याच भविष्यासाठी ठेवा, असंही मुलांना सांगितलं जातं. निवृत्तीनंतर रोजच्या जगण्यात मोठा बदल होतो. नोकरीमुळे होणारा सामाजिक संपर्क थांबतो. शारीरिक श्रम कमी होतात. कामातून मिळणारं समाधान हरवतं. नोकरीत असताना हवा असलेला फावला वेळ नकोसा वाटू लागतो. निराश वाटू लागतं. आणि या सगळ्यामुळे आरोग्य बिघडायला सुरुवात होते. महागड्या आरोग्य सुविधांमुळे आर्थिक नियोजन कोलमडतं. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या पार पाडताना स्त्रिया तरुणपणी सहसा स्वत:च्या आरोग्याची हेळसांड करतात. त्याचे परिणाम वृद्धपकाळात त्यांना तीव्रतेने जाणवतात.

पाल्यांच्या आर्थिक समस्याही बिकट आणि गुंतागुंतीच्या झाल्या आहेत. बेरोजगारीची समस्या आजवर कधीही नव्हती इतक्या मोठ्या प्रमाणावर देशाला भेडसावतेय. नोकरीधंदा आपल्या राहत्या गावा-शहरात मिळण्याची शाश्वती नाही. लहान-मोठ्या शहरात दोन खोल्यांचं घर विकत घेण्यासाठीही लाखो रुपयांचं कर्ज, तेही महागडं घ्यावं लागतंय. कर्ज परतफेडीत आयुष्याची उमेदीची वर्षं संपून जातायत. गावी राहणाऱ्या आईबापाला शहरात आपल्याबरोबर राहायला आणायची इच्छा असली, तरी जागेच्या टंचाईमुळे ते शक्य होत नाही.

मराठवाडा, सोलापूर, पंढरपूर इथून येऊन पुण्यात स्थायिक होण्याची धडपड करणाऱ्या काही तरुण-तरुणींना मी ओळखते. आई-वडिलांना आजारपण आलं, तर मोठ्या डॉक्टरना दाखवण्यासाठी पुण्यात आणणंही त्यांना सहजी साध्य होत नाही. उपचारांसाठी त्यांना जास्त काळ राहायची वेळ आली, तर वेगळं घर भाड्याने घेणं परवडत नाही. या तरु ण-तरुणींची लग्न झालेली असली, त्यांना मुलं असली की, मर्यादित मिळकतीत खर्च म्हाताऱ्यांसाठी करायचा की, लहान मुलांसाठी, असाही प्रश्न पुढ्यात येऊन ठाकतो.

‘‘माझ्या आयुष्याची आता थोडीच वर्ष उरली आहेत, माझ्यावर खर्च करू नका,’’ असं मुलांना सांगणारे समंजस वृद्ध स्त्री-पुरुषही मी पाहिलेत. आणि निवृत्ती वेतन किंवा साठवलेला पैसा फारसा नसल्याने जगणं पूर्णपणे मुलांवर अवलंबून होऊन गेलेल्या वृद्ध पालकांची कुचंबणादेखील पाहिली आहे. थकल्या वयातही काही स्त्री-पुरुषांना काम करत राहावं लागतं. अनेकदा आपलं घर, जमिनीचा तुकडा ते मायेपोटी किंवा मुलांनी आपला सांभाळ करावा या इच्छेनेही मुलांच्या नावे करतात. अनेकदा मुलंच पालकांची मालमत्ता जबरदस्तीने स्वत:च्या नावे करून घेतात आणि नंतर त्यांना वाऱ्यावर सोडतात, असंही घडतं.

हेही वाचा

‘हेल्पएज इंडिया’ या संस्थेच्या ‘Bridge the Gap: Understanding Elder Needs’ (२०२२) च्या राष्ट्रीय अहवालानुसार, भारतातील ४७ टक्के वृद्ध आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे कुटुंबावर, मुलांवर अवलंबून आहेत. यामुळेच कोणत्या ना कोणत्या स्वरूपाच्या शोषणाचा, उपेक्षेचा अनुभव त्यांच्या वाट्याला आला आहे. ५७ टक्के वृद्धांना स्वत:च्या आर्थिक स्थितीबद्दल असुरक्षित वाटतं. पैसे मिळवण्यासाठी वयाच्या ८०व्या वर्षीही १३ टक्के पुरुष आणि ३ टक्के स्त्रियांना काम करावं लागतं. तर, ‘मौत का भी इलाज हो शायद, ज़िंदगी का कोई इलाज नहीं’ (फिराख गोरखपुरी) अशी ही वृद्ध पालकांची स्थिती. यावर काहीच उपाय नाही का? नक्की आहे.

पालक आणि पाल्य दोन्ही बाजूकडच्यांनी काही ना काही मार्ग काढला आहे, काढता येतो. त्याची सुरुवात एकमेकांना आपलंसं करण्याने होते. वृद्धांच्या जगण्याला एखादा लहानसा जरी उद्देश मिळाला, तरी फरक पडतो. त्यांची जगावरची चिडचिड थांबते. ‘द अनवाइंडिंग’ हा २५ मिनिटांचा लघुपट आहे. लेखन आणि दिग्दर्शन ब्रेंडन डेव्हिस यांचं. डेव्हिड या वृद्ध शोकाकुल विधुराचा एकाकीपणाचा, निरुद्देश जगण्याचा, निराशेच्या गर्तेत जाण्याचा, आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंतचा प्रवास अचानक एक सुखद, प्रसन्न वळण घेतो. त्याच्याकडे फूड डिलिव्हरी करायला आलेल्या, त्याच्या नातीच्या वयाच्या ली या मुलीकडून चिनी भाषा शिकता शिकता तिच्याशी झालेल्या अनपेक्षित मैत्रीतून त्याला जगण्याचा उद्देश मिळतो. ही एकट्या डेव्हिडची नाही, जगभरातल्या कोणाही वृद्ध व्यक्तीची कथा आहे. लिलीकडून मिळणारा आपलेपणा डेव्हिडसाठी जगण्याची उमेद बनतो. जगायचं कशासाठी, या प्रश्नाचं उत्तर त्याला सापडतं.
●kulmedha@gmail.com