मनापासून एखाद्या गोष्टीची वाटणारी भीती तुमचं आयुष्य आमूलाग्र बदलवू शकतं? याचं उत्तर ‘हो’ असं आहे आणि त्याचं उदाहरण आहे –  एलिझाबेथ होम्स् – जगातील सर्वात तरुण आणि ४.६ अब्ज डॉलर्स कमावणारी सर्वात श्रीमंत (सेल्फमेड) तरुणी!
नुकत्याच जाहीर झालेल्या जगातल्या ५०० अतिश्रीमंत व्यक्तींच्या यादीत एलिझाबेथने गेल्या वर्षीपासून cr12आपलं स्थान गाजवायला सुरुवात केली आहे. तिचा व्यवसाय आहे- ब्लड टेस्ट. आजही ब्लड टेस्ट करायला जायचं म्हटलं की, समोर येते ती रक्त भरलेली सिरींज्.  नर्स आपल्या हातातल्या शिरेत भलीमोठी सुई खुपसते आणि हळूहळू आपलंच रक्त त्या सिरींजमध्ये उतरत जाताना आपण फक्त पाहात राहतो. रक्त काढून घेतल्यानंतरही ती शारीरवेदना काही काळ आपल्याबरोबर राहतेच. एलिझाबेथलाही या इंजेक्शनची, त्याच्या सुईची भीती होती. आणखी एक भीती तिला वेढून होती, ती म्हणजे काकांच्या कर्करोगाची. त्याचं वेळीच निदान झालं असतं तर वेळीच उपचार करता आले असते, पण..
तिच्या अभ्यासाचा आणि शोधाचा तोच उद्देश ठरला आणि तोच तिच्या व्यवसायाचा केंद्रबिंदूही. तिने इंजेक्शनला या प्रक्रियेतूनच हद्दपार केलं. रक्त तपासणीसाठी तुमच्या बोटावर हलकीशी पिन टोचली जाते आणि बाहेर येणारं एक ते दोन थेंब रक्त फक्त घेतलं जातं आणि तेच अनेक निदानांसाठी वापरलं जातं; अगदी कोलेस्टोरलपासून कर्करोगापर्यंत कोणत्याही. अशा रीतीने रक्त गोळा करून लॅबोरटरीत पाठवून संबंधित डॉक्टरांशी संपर्क साधणारी, ही व्यवस्था करणारी तिची कंपनी म्हणजे थेरॅनोस – (थेरपी आणि डायग्नोसिस). ही कंपनी तिने सुरू केली २००३ मध्ये, तेव्हा तिचं वय होतं फक्त १९ वर्षे. स्टॅन्डफोर्ड विद्यापीठात केमिकल इंजिनीयरिंगला असतानाच तिच्यातल्या प्रयोगशीलतेने तिला या गोष्टीचा शोध लावायला भाग पाडलं. ती म्हणते, ‘‘सुई टोचण्याचा अत्याचार आणि तोही वेगवेगळ्या तपासण्यांसाठी अनेकदा कशासाठी करायचा? पारंपरिक पद्धतीपेक्षा अत्यंत स्वस्त, अत्यंत सहज आणि मुख्य म्हणजे एकाच वेळी अनेक रोगांचं निदान करणारी पद्धत उपलब्ध करून देणे याच उद्देशाने हे प्रयोग झाले.’’ आणि हे प्रयोग मानवजातीसाठीच उपकार ठरत आहेत. आज तिच्या नावावर अमेरिकेची १८ आणि इतर देशांची ६६ पेटंट्स आहेत आणि सह-शोधक म्हणून तर शंभराच्या वर पेटंट्स आहेत. विविध आजारांवरची सुमारे २०० निदानं करणाऱ्या तिच्या या कंपनीने २०१४ मध्ये १० अब्ज डॉलर्सचा टप्पा गाठला.
कॉलेजमध्येच असताना तिची संशोधन प्रकल्पासाठी ‘प्रेसिडन्ट्स स्कॉलर’ म्हणून निवड झाली आणि त्यासाठी तिला ३ हजार डॉलर्स स्टायपेन्डही मिळू लागलं. हळूहळू आपल्या प्रयोगांवरचा विश्वास वाढत गेला आणि तिने आईवडिलांनी तिच्या पुढील अभ्यासासाठी ठेवलेल्या पैशांतून एक कंपनी सुरू केली ज्याचं नाव तिने नंतर ‘थेरॅनोस’ ठेवलं. पुढे तिच्या कामाचा वेग इतका वाढला की, तिने कॉलेज सोडायचा निर्णय घेतला. तिचे प्राध्यापक म्हणालेही, ‘‘डिग्री तरी मिळव.’’ पण आपल्याला काय करायचे आहे, हे खूप स्पष्टपणे माहीत असणाऱ्या तिला त्याची आवश्यकता वाटली नाही. कंपनी वाढू लागली. काही पार्टनरही घेतले. पुढे वादही झाले, पण ती त्यातून बाहेर पडली. नंतर तिने ‘वॉलग्रीन’ या ड्रगस्टोर्सची चेन असणाऱ्या कंपनीशी पार्टनरशिप केली ज्याच्या माध्यमातून अक्षरश: हजारो वेलनेस सेंटर्स उभारण्यात आले, जिथे थेट रुग्णांना वा ग्राहकांना डॉक्टरांच्या शिफारशीशिवाय रक्त तपासणी करून दिली जाते. आज जगभरात तिची ही सोपी, स्वस्त रक्त तपासणी केंद्रे पसरली आहेत.
अमेरिकेचे माजी परराष्ट्रमंत्री हेन्री किसिंजर यांनी, ‘जगातल्या आरोग्य सुरक्षेमध्ये आमूलाग्र बदल घडवण्यासाठी समर्पित तरुणी’ या शब्दांत तिचं कौतुक केलंय.. अर्थात तिने ते मिळवलंय, ध्येयनिष्ठ प्रगल्भतेने..

आरती कदम – arati.kadam@expressindia.com