मला असूया वाटते आहे.. पण सजगतेनं, मोठय़ा माणसांच्या डोळ्यांनी पाहिलं की जाणवतं, या त्रासाचा संबंध माझ्या आतल्या लहानपणीच्या ‘राणीपदाच्या’ अट्टहासात आहे. ‘राणीपद’ कुणाला आवडत नाही? पण आयुष्यात कुणालाही ते सतत मिळणं कसं शक्य आहे? जेव्हा जेव्हा ते मिळत नाही तेव्हा आतमधल्या रुसलेल्या राणीला प्रेमाने समजावलं तर..
ती मला पहिल्यांदा वयाच्या अडीचाव्या वर्षी वाटल्याची आठवते. असूया. त्या वेळी आम्ही नेवाशाला राहात असू. आमचं मोठं थोरलं घर होतं. त्या घरात फक्त माझं राज्य होतं. वामन आणि लक्ष्मणमामा ही दोन अतिशय प्रेमळ माणसं घरी कामाला होती. ती दोघं माझा प्रत्येक हट्ट पुरवत. त्यांची रात्रीची कामं संपली की मी माझ्या शिशू शाळेत माझे ‘टीचर’ मला जे काही शिकवत ते, त्यांची ‘टीचर’ बनून त्यांच्याकडून करून घ्यायचे. त्यात ‘स्टँड अप, सीट डाऊन’ नावाचा खेळ होता. साधारण चाळिशीचा वामन आणि पन्नाशीचे लक्ष्मणमामा हे धोतर, सदरा आणि डोक्यावर पांढरी टोपी घातलेले माझे आज्ञाधारक विद्यार्थी. मी हातात काल्पनिक छडी घेऊन त्या बिचाऱ्यांना बोबडय़ा आवाजात मोठमोठय़ांदा ओरडून ‘स्टँड अप, सीट डाऊन’ करत उठाबशा काढायला लावायची. तेही हसत हसत काढायचे.
संध्याकाळी आई आणि मी बऱ्याचदा फिरायला जायचो. बाबा खूप कामात असायचे, पण घरी असतील तर ते पण यायचे. एका हातात आईचा हात, दुसऱ्या हातात बाबांचा; समोर सुंदर काळाशार रस्ता.. जगातलं सगळ्यात सुखी बाळ असेन तेव्हा मी. चालता चालता दमले की ‘कडेवर घे’चा हट्ट करायचा. आई एकटीच असेल तर कडेवर घ्यायची. बाबा थेट खांद्यावरच बसवायचे. त्या वेळी तर मी अखिल विश्वाची राणी आहे असंच वाटायचं मला..
त्या दिवशी आई आणि मी दोघीच फिरायला गेलो होतो. थोडय़ा वेळाने मी ‘कडेवर घे’चा हट्ट सुरू केला. पण आज आई दाद देईना. मी हट्टात थोडं रडवं मिसळून पाहिलं तरी आई बधेना. मग मी, ‘का घेत नाही कडेवर’ची भुणभुण सुरू केली. खूप वेळ ती भुणभुण ऐकल्यावर आई मला म्हणाली, ‘‘अगं, माझ्या पोटात बाळ आहे ना, मग मी जड काही नाही उचलू शकत . नाही घेणार कडेवर..’’ मला वाटलं, मीच हिचं बाळ आहे. .. पोटात कसलं परत एक बाळ .. काही नीट कळलं नाही. मग बहुधा आईनं मला, ती कशी दगदग करू शकणार नाही आता, अशा अर्थाचं समजावलं असावं. दुसऱ्या दिवशी आम्ही पुन्हा फिरायला गेलो असताना मी आईला म्हटलं, ‘‘आई, मला कडेवर घे, मी चालू नाही शकणार फार, कारण माझ्याही पोटात बाळ आहे!’’ आई भरपूर हसली. ‘का’ ते मला कळत नाही. त्या काळात बऱ्याच गोष्टी कळेनाशाच झाल्या..
मुळात, मी एवढी असताना माझ्या आई-बाबांना दुसरं बाळ हवंच का आहे, हेच कळेना. वाटलं, ‘माझ्यात काही गडबड वाटते आहे का काय यांना़  म्हणजे, मी पालेभाजी खात नाही, हट्ट करते म्हणून हे दुसरं बाळ आणणार की काय?’  गंमत म्हणजे यानंतरचा माझा भाऊ जन्माला येईपर्यंतचा आठ- नऊ महिन्यांचा काळ मला आता अजिबात आठवत नाही. त्याआधीचं आठवतं, त्यानंतरचं आठवतं, मधलं कुठे हरवलं कोण जाणे..
त्या काळात नंतर बहुधा मला माझ्या आजोळी रहिमतपूर गावी माझ्या आजी, अण्णांबरोबर ठेवलं असावं. माझा भाऊ ‘जय’ जन्मल्यानंतर ‘बाळ बघायला’ म्हणून आई ज्या हॉस्पिटलमध्ये होती तिथे आजी, अण्णा आणि मी गेल्याचं आठवतं आहे. पाळण्यात माझा भाऊ होता. मी त्याच्याकडे फारसं पाहिलं नाही. मी दारातून आत आल्या आल्या, मी खूप दिवसांनी दिसले म्हणून असणार आई मला जवळ ओढून कवटाळून रडली होती असं आठवतं. त्यांनी मला फार बरं वाटलं होतं. त्यानंतर काही दिवसांनी त्या बाळाला घेऊन आम्ही पुन्हा आमच्या नेवाशाच्या घरी आलो. त्यापुढचे माझे दिवस पंचाईतीचे होते. मी तीन वर्षांची. त्या बाळाविषयी मला नक्की काय वाटतं आहे तेच कळत नव्हतं; प्रेम वाटत नव्हतं. पण इतर लोक त्या बाळाला बघून इतके खूश होत होते, विशेषत: आधी फक्त माझे असलेले माझे आई-बाबा. की मीही खूश व्हायला हवं असं वाटत होतं. पण आई सारखी त्या बाळाला दूध पाजते म्हणून रागही येत होता. माझा भाऊ खूप गोड गबदुल्या होता. तो तान्हा आणि मी तीन वर्षांची असताना काढलेल्या एका फोटोत मी त्याचे गोबरे गाल हिंस्रपणे ओढताना दिसते आहे. माझं ‘राणी’चं स्थान हिरावून घेणाऱ्या त्या गबदुल बाळावर जबरदस्ती प्रेम करायची ती माझी केविलवाणी धडपड असणार.
तो काळ माझ्या आयुष्यातल्या अनेक ‘सुरुवातींचा’ होता. ‘असूये’ बरोबर माझ्या आतल्या महत्त्वाकांक्षेचीही ती सुरुवात होती. महत्त्वाकांक्षा.. आई-बाबांचं लक्ष भावाकडून माझ्याकडे वळवण्याची! या सगळ्यात जगावेगळं काहीच नाही. आसपास पाहते तेव्हा कळतं, ही तर कमी-अधिक तपशिलाच्या फरकानं प्रत्येक घराचीच गोष्ट. या गोष्टीतलं सगळंच स्वाभाविक. माझ्या आई-बाबांना दुसरं बाळ हवं असणं स्वाभाविक, मला ते त्या वयात समजू न शकणं स्वाभाविक, बाळ छोटं असल्याने आई-बाबा त्याच्याकडं जास्त लक्ष देणं स्वाभाविक आणि खरं तर त्यामुळे मला वाटणारी असूयाही स्वाभाविकच. त्या लहान वयात ती माझ्यातनं निरागसपणे व्यक्त होत राहिली. त्यामुळे तिची भीती नाही वाटली कधी. त्या वयात तिच्या-माझ्यातल्या मोकळेपणाचं ती परकी किंवा ‘वाईट’ पण नाही वाटली कधी.. पण मोठं होता होता तिचं-माझं नातं बदलत गेलं. तिचं असणं ‘वाईट’ असतं असं वाटायला लागलं. तिची लाज वाटायला लागली. त्या लाजेमुळे मी तिच्याशी अनेक खेळ खेळायला लागले. कधी ती माझ्यात नाहीच असं समजून मी आत असणाऱ्या तिच्याकडे दुर्लक्ष करून वरवर हसरा, सामंजस्याचा मुखवटा लावला आहे. पण कधी मात्र तिला आतल्या आत दाबण्याचे प्रयत्न फोल ठरून ती बळजबरी बाहेर आली आहे. तिला दाबायचा प्रयत्न केला की ती फार त्वेषानी बाहेर येते, असा माझा अनुभव आहे आणि तेव्हा ती समोरच्यावर कितीही निर्घृण वार करू शकते. मग तिची अजूनच लाज वाटते. कधी ती माझा पूर्णच ताबा घेते आणि माझ्या आणि समोरच्यामध्ये एक थंड पडदा सोडते. बर्फाचा. त्या पडद्यातून ना मला बाहेरचं दिसू शकतं ना त्या समोरच्या माणसाला आतलं.. या सगळ्या खेळांमध्ये खूप दमछाक होत आहे. तिची आणि माझीही तीच दमछाक मला आसपासच्या कितीतरी जणांची होताना दिसते आहे. माझ्या तिच्या मारामारीसारखी मारामारी मला जवळजवळ प्रत्येकाच्याच आत दिसते आहे. कुणी मान्य करते, कुणी नाहीच म्हणत राहील. मला तिचं-माझं नातं नेमकं कशा कशातनं जात आहे हे निकडीनं पहावंसं वाटतं आहे. कारण तिची माझी मारामारी मला पुन्हा पुन्हा त्याच स्फोटांच्या ठिकाणी आणून सोडते आहे. मला पुन्हा पुन्हा तेच आयुष्य जगायला लावते आहे. नकळत्या वयात जे झालं ते झालं, पण या कळत्या वयात तिचा दु:स्वास सोडून तिला समोर बसवून तिच्या खेळाकडे नीट बघायची वेळ आली आहे. असूयेचा खेळ.. तिच्या खेळात मला एक साचा दिसतो. त्यात ज्याच्यामुळे माझं ‘राणीपद’ धोक्यात येतं तो स्पर्धक बसणार. म्हणजे माझा भाऊ. माझा पहिला स्पर्धक. समोर परीक्षकांच्या दोन खुच्र्या, ज्यात आई-बाबा बसलेले. इथपर्यंत ठीक. पण आता होतं काय, हळूहळू भाऊ आणि मी मोठे होतो. तो त्याच्या क्षेत्रात जातो. मी माझ्या. मग तो माझा स्पर्धक उरतंच नाही. मग तो त्या असूयेच्या खेळातल्या साच्यातून उठून निघून जातो आणि त्या साच्यात माझ्या क्षेत्रातलं दुसरं कुणीसं येऊन बसतं- ज्या व्यक्तीमुळे माझं त्या क्षेत्रातलं ‘राणीपद’ धोक्यात आलं आहे, असं मला वाटत असतं. आता मी मोठी झालेली असते, घरातून बाहेर पडलेली असते, आई-बाबांपासून स्वतंत्र झालेली असते. त्यामुळे परीक्षकांच्या खुर्चीतले आई-बाबाही उठून गेलेले असतात. तिथे येतात त्यावेळचे असे कुणीतरी ज्यांच्यासमोर मला स्वत:ला सिद्ध करायचं असतं. म्हणजे लहानग्या वयातला लहानगा खेळ आपण मोठे झालो हे विसरून आपण पुन्हा पुन्हा खेळत राहतो. वरवर पाहता वाटत राहातं, त्या समोरच्या माणसामुळं मला त्रास होतो आहे, त्याच्यामुळे मला असूया वाटते आहे.. पण सजगतेनं, मोठय़ा माणसांच्या डोळ्यांनी पाहिलं की जाणवतं, या त्रासाचा संबंध माझ्या आतल्या लहानपणीच्या ‘राणीपदाच्या’ अट्टहासात आहे. ‘राणीपद’ कुणाला आवडत नाही? पण आयुष्यात कुणालाही ते सतत मिळणं कसं शक्य आहे.. जेव्हा जेव्हा ते मिळत नाही तेव्हा आतमधल्या रुसलेल्या राणीला प्रेमाने समजावलं तर..
मला या घडीला माझ्या ‘सलमा’ नावाच्या भूमिकेची आठवण होते आहे. ‘साठेचं काय करायचं?’ हे राजीव नाईक लिखित नाटक. यात दोनच व्यक्तिरेखा. सलमा आणि अभय. अभय अ‍ॅड जगतातला. अतिशय महत्त्वाकांक्षी. ‘साठे’ नावाच्या दुसऱ्या एका अ‍ॅड आणि फिल्म मेकरशी सतत स्पर्धा करणारा. त्याला वाटणाऱ्या साठेविषयीच्या असूयेनं त्याचं संपूर्ण आयुष्य व्यापून गेलेलं.. इतकं, की सलमा आणि अभयच्या शृंगारातसुद्धा जणू तो त्या दोघांमध्ये काल्पनिकरीत्या उभा ठाकलेला. सलमा हे सगळं समजू पाहणारी, कधी शांतपणे कधी हतबल होऊन. मात्र त्या असूयेमागे फरपटत एका क्षणी अभय जेव्हा ‘लाच देण्याचं’ काळं पाऊल टाकू पाहतो तेव्हा मात्र सलमा ठामपणे त्याला थांबवायला उभी ठाकते. ‘सलमा’ हीसुद्धा एक माणूसच. तिलासुद्धा असूया वाटते. दोन प्रसंगांत ती स्वच्छ दिसते. ती कॉलेजमध्ये शिकवत असते. तिच्याऐवजी दुसऱ्याच एका प्रोफेसरला बढती मिळते तेव्हा तिला दु:ख होतं. असूया वाटते. पण ती ते लपवत नाही. त्यापासून पळत नाही. ती ते व्यक्त करते पूर्णपणे. ती ते ‘आपलं’ म्हणते, ‘ओन’ करते. एका प्रसंगात ती अभयच्या पूर्वी घडलेल्या प्रेमप्रकरणाषियी बोलते, तेव्हाही त्या ‘दुसऱ्या’ मुलीविषयी तिला वाटलेली असूया लपत नाही. तिला उद्देशून म्हणते, ‘‘दीज लिप्स हॅव बीन टचड्, दीज हँडस हॅव बीन टचड्.. हे (तुझ्याबद्दलचं) फिलिंगच गेलं नव्हतं माझं, कितीतरी दिवस..’’ पण तिची असूया कधीच तिला तिचा तोल ढळू देत नाही. तिला त्या असूयेची लाज वाटत नाही, त्याविषयी मोकळेपणा वाटतो. म्हणूनच कदाचित सलमा त्यातून चटकन् स्वत:ला बाहेर काढू शकते, समजावू शकते आणि शांत होऊ शकते. सलमा मला खूप काही शिकवू पाहते आहे. मला ते शिकायचं आहे.
मुळात अनसूया म्हणजे असूयाच नसणं, हे संस्कारांचं शिकवणं आता मला  पटत नाही आहे. असूया नसणंच हे अस्वाभाविक खोटं आहे. मला वाटतं ‘सलमा’ ही खऱ्या अर्थानं अनसूया आहे. कारण ती ‘असूये’शी ‘तू मुळात मला वाटतेसच का आणि कशी?’ असं अवास्तव भांडण भांडत नाही. ती तिला ‘आपले’ पणानं स्वीकारते आणि म्हणूनच तिच्या पार जाऊ शकते. मात्र मला ‘अभय’ ही समजू शकतो, कारण तो माझ्या आतही आहे. पण मला अभयचं आयुष्यं जगायचं नाही. कारण त्याचं आयुष्य हे त्याचं उरलंच नाही. ते ‘साठेचं’ होऊन गेलं आहे. मला माझं एकुलतं एक आयुष्य ‘माझं’ म्हणून जगायचं आहे. मी  ते इतक्या सहजासहजी दुसऱ्या कुणाचं होऊ देणार नाही. तशी मी बरीच स्वार्थी आहे!
असूया ही वाटणारच. तिच्यामुळं स्वत:चा ‘अभय’ होऊ द्यायचा का ‘सलमा’, हा ज्याचा त्याचा प्रश्न. मी, माझ्यातल्या ‘अभय’ला ‘स्वीकारून त्याला ‘सलमा’च्या वाटेनं चालायला मदत करण्याचा सजग निर्णय घेते आहे…