काळाच्या ओघात नात्यांचा प्रवाह बदलत राहतो. जोडप्यांत व्यक्तिगत स्वातंत्र्य दोघांनाही हवंच असतं, पण नोकरीधंद्यात मिळणार्‍या यशाच्या संधी पाहता नात्याची घडी नीट ठेवण्यासाठी कुणा एकाला माघार घ्यावी लागते. असे निर्णय जोडप्याच्या परस्पर संवादाने, सहमतीने घेतले आणि प्रत्येकाने जोडीदाराच्या स्वप्नांचा आदर केला तर ‘सामंजस्याचं सहजीवन’ अनेक वर्षं टिकून राहतं.

समाजात कुठल्याही व्यवस्था कधी स्वतंत्रपणे काम करत नसतात. एकाचा परिणाम दुसर्‍यावर होतच असतो. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, आर्थिक परिस्थिती बदलत असेल तर त्याचे परिणाम कुटुंब आणि विवाह व्यवस्थेत उमटणार हे उघड आहे. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे शिक्षणाच्या शाखा जशा विस्तारल्या तसे आर्थिक उत्पन्नाचे स्रोतही विस्तारले. सामाजिक सुधारणा आणि राजकीय पुढाकार यातून शिक्षणाच्या संधी मुलांच्या बरोबरीने मुलींनाही मिळाल्या. ‘संरक्षण सेवा’ क्षेत्रासारखी फक्त पुरुषांची मक्तेदारी असलेली क्षेत्रही जेव्हा स्त्रियांंसाठी खुली झाली तेव्हा स्त्रियांंच्या आकांक्षांना ती खुणावू लागली. या आणि अशा अनवट क्षेत्रात स्त्रिया पोहोचल्या तेव्हा जोडीदार निवडताना त्यांची नोकरीशी असलेली वेगळी बांधिलकी आणि वचनबद्धता समजून घेऊन सहकार्य करणारा जोडीदार मिळणं गरजेचं झालं.

बायको जर, वैमानिक असेल तर तिच्या कामाच्या वेळा या दिवसा आठ ते पाच अशा असूच शकणार नाहीत. तिच्या कामाच्या वेळा तिला अनेक कौटुंबिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊ देणार नाहीत. हे सर्व स्वीकारणारा जोडीदार आणि कुटुंब ही तिची व्यावसायिक गरज बनली. या बदलत्या परिस्थितीने वैवाहिक नात्यांचे वेगवेगळे प्रकार जन्माला घातलेले आपल्याला दिसतात. मेघा आणि संकेत ‘डेट’ वर भेटले तेव्हा पहिल्याच भेटीत तिने स्पष्ट केलं की, तिला अतिशय अनवट, अवघड क्षेत्रात करियर करायचं आहे. एक नवरा म्हणून संकेत तिचा अशा वेगळ्या वाटेवरचा सोबती होऊ शकतो का? याचा विचार उभयतांमध्ये झालेल्या चर्चेतून दोघांनाही करायचा होता. पुढे त्यांचं लग्न झालं. दोन मुलं झाली. संकेतचं त्याच्या व्यवसायात उत्तम बस्तान बसलं. मेघाचं अत्यंत कठीण प्रशिक्षण, निवडीसाठीची खडतर तयारी, यशस्वी निवड, त्यानंतरचं पुढील प्रशिक्षण, मग प्रत्यक्ष नियुक्ती…असा अतिशय कठीण प्रवास दोघांनी एकमेकांना सहाय्य करत समांतरपणे पार केला. त्यांचे पालक त्यांना जमेल तसा आधार देत राहिले; पण जबाबदारी त्या दोघांनीच पेलली. स्थिरस्थावर झालेला अनेक वर्षांचा बाडबिस्तारा गुंडाळून दोघे मेघाच्या नियुक्तीच्या नव्या गावी गेले. मला संकेत भेटला तेव्हा मेघा परदेशात प्रशिक्षण घेत होती आणि संकेत नुकताच त्यांची पाच वर्षांची मुलगी आणि आठ महिन्यांचा मुलगा घेऊन, अनेक तासांचा प्रवास करून, भारतात आला होता. मी आधी या अत्यंत वेगळ्या यशाबद्दल त्यांचं अभिनंदन केलं आणि म्हटलं, ‘‘दोन एवढ्या लहान मुलांना घेऊन तू एकट्याने इतका लांबचा प्रवास कसा केलास?’’ तो हसतहसत अगदी सहज म्हणाला, ‘‘तुम्ही हा प्रश्न मेघाला विचारला असता का?’’ मी खजील झाले. नवरा, बायको भूमिकांबद्दल पूर्वग्रह असलेल्या मेंदूचं ‘प्रीप्रोग्रामिंग’ कसं काम करतं!

हे सध्याच्या काळातील अत्याधुनिक पतीपत्नींचं नातं म्हणता येईल का? मेघा आणि संकेतला या समानतेच्या नात्यातील आपल्या कर्तव्य आणि जबाबदार्‍यांची पूर्ण कल्पना होती आणि त्यासाठी त्यांच्या मनाची तयारीही झालेली होती. त्यामुळे या प्रवासात त्यांना अनेकदा एकमेकांपासून दूर राहावं लागलं तरी त्यांचे परस्परातील ऋणानुबंध मात्र गहिरे आणि वर्धिष्णूच होत गेले. ही अत्यंत कठीण परीक्षा त्यांच्या जगण्याचा सहज भाग होती.

गेल्या अनेक वर्षांचा काळ असा गेला आहे, जेव्हा घरातील कर्ता पुरुष हा धोरणकर्ता, नियोजनकर्ता आणि निर्णयकर्ताही असायचा. घरातील प्रत्येकाची भूमिका आणि त्यानुसार जबाबदार्‍या आणि कर्तव्य ठरलेली असायची. कालौघात आपल्या समाजाचा ‘विस्तारित एकत्र कुटुंब’ ते ‘दोघांचंच कुटुंब’ असा प्रवास होताना दिसतो. प्रवास म्हटल्यावर मोटार आठवली. संसारातल्या या मोटारीचे ‘स्टेअरिंग’ पुरुषाच्या हातात असायचं. वैवाहिक नात्याचा विचार केला तर त्यावेळी पत्नी मागच्या सीटवर असायची. याला पती-पत्नी मधील पारंपरिक नातं असं म्हणता येईल. ्त्रिरया मिळवत्या झाल्यावर चित्र लगेच बदललं, असं नाही. कितीतरी बायका नोकरी करत ‘संसार’ या केवळ एका शब्दात सामावणार्‍या शंभर गोष्टी सांभाळत होत्याच. आपला पगार कसा खर्चावा याचंही स्वातंत्र्य त्यातील अनेकींना नव्हतं, तर निर्णयस्वातंत्र्य ही गोष्ट दूरच! त्यामुळे गाडी कुठे, कशी न्यायची, कधी थांबवायची याबरोबरच एक्सलरेटर आणि ब्रेकचा ताबा चालकाकडेच असायचा. हळूहळू स्त्रिया मागच्या सीटवरून पुढच्या सीटवर सरकल्या. हातात प्रत्यक्ष स्टेअरिंग आलं नाही, तरी समोरच्या अनेक गोष्टी आता त्यांच्या दृष्टिपथात यायला लागल्या. त्यात स्वत:चा विस्तारणारा अवकाश दिसायला लागला. त्या मार्ग-बदल सुचवू लागल्या. प्रवास अधिक सुखाचा, सुरक्षित होण्यासाठी वेगळे पर्याय सुचवू लागल्या. नवरा बायकोचं नातं हळूहळू परस्परपूरक व्हायला लागलं.

याच नात्याच्या पुढच्या टप्प्यात आपल्या आयुष्याचं ‘सुकाणू’ आपल्या हातात असावं, असं अनेक मुलींना वाटायला लागलं. त्याच सुमारास करिअरची संधी आणि पैशांचं आकर्षण यातून सुरुवातीला बरेच मुलगे आणि कालांतराने मुलींनीही स्थलांतर केलं. आधी ‘परदेशस्थ स्थळ’ असलेल्या मुलाची बायको बनून ‘डिपेंडंट’ व्हिसावर मुली बराच काळ जात राहिल्या. परंतु नंतर सर्वार्थाने स्वतंत्र होत गेलेल्या मुली स्वत:च्या कर्तृत्वावर आणि हिमतीवर परदेशस्थ झाल्या. परदेशात गाडी चालवता येण्याला पर्याय नाही. त्यामुळे स्वत: गाडी चालवण्यातील स्वातंत्र्य आणि मजा अनुभवता यायला लागली. दूरवरच्या प्रवासात आलटून-पालटून गाडी चालवल्यामुळे जोडीदाराच्या विश्रांतीचीही सोय झाली ती वेगळीच! सहजीवनाचा आनंद दुणावला. भारतातल्या ्त्रिरयांही यथावकाश याच मार्गाने गेल्या. ज्यांनी कुटुंबनियोजन केलं, त्यांनी पहिली काही वर्षं या ‘हनिमून काळा’तील आनंद घेतला. या परस्परपूरक नात्यात पंचाहत्तर टक्के ‘सहजीवन’ तर पंचवीस टक्के ‘स्वत:चा अवकाश’ असा तोल या जोडप्यांनी साधला. काळ पुढे गेला तसं मूल ही उभयतांची समान जबाबदारी मानून, परस्परपूरक पालकत्वाची मजाही ते अनुभवताना दिसतात.

आमची एक स्नेही आहे. ती स्वत: शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी लग्न ठरताना दोघांनी विचार-विनिमय केला तेव्हा नोकर्‍या दोघांच्याही असल्या, तरी करियर एकालाच करता येईल हे त्यांच्या लक्षात आलं. तेही चांगल्या पदावर काम करत होते, पण पत्नीची तिच्या क्षेत्रातील ओळख, क्षमता, भविष्यातील संधी आणि एकूण कामाचे विशेष स्वरूप लक्षात घेऊन त्यांनी गरज पडेल तेव्हा आपलं करिअर मागे ठेवून एक पाऊल मागे यायचं ठरवलं. तिनेही काही तडजोडी केल्या. संसार सांभाळत नोकरी केली. वेगवेगळ्या शिष्यवृत्ती मिळवून ती जेव्हा संशोधन आणि त्याचं सादरीकरण यानिमित्तानं जगभर फिरली तेव्हा यजमानांनी नोकरी सांभाळत आपली आई आणि मुलगा यांचा व्यवस्थित सांभाळ केला. पत्नीच्या यशाचं कौतुक करत, तिला हवा असलेला पाठिंबाही दिला. उभयतांच्या या समजूतदार स्वीकारामुळे दोघांचं सहजीवन समाधानी राहिलं. आज निवृत्तीनंतर त्या उभयतांचा गृहस्थाश्रमाचा एकत्र प्रवासही दृष्ट लागेल असाच आहे.

आता जागतिकीकरणानंतर तर अशी उदाहरणं मोठ्या प्रमाणावर वाढू लागलेली आहेत, कारण विवाहसंस्था आणि कुटुंबसंस्था टिकण्यासाठी ती काळाची गरज बनली आहे. आभा आणि पराग दोघंही उच्च शिक्षण घेऊन वरिष्ठ पदांवरच्या नोकर्‍यांमध्ये रुजू झाले. तिच्या विषयात शिक्षण घेतलेले तसे मोजकेच; त्यामुळे तिला तिच्या करियरमध्ये अनेक संधी भराभर मिळत गेल्या. त्यातून देशा-परदेशात वास्तव्य, भ्रमंती, दोन्हीही घडायचं. यामुळे त्या दोघांना अनेकदा एकमेकांपासून लांब राहावं लागेल, याची लग्नाआधी पूर्वकल्पना होती. म्हणून दोघांनाही मुलांची आवड असूनही मूल नको असा निर्णय घेतला.

दर काही महिन्यांनी ते एकत्र यायचे तेव्हा उभयतांच्या आवडीचे अनेक उपक्रम करून आनंद लुटायचे. त्यांचा ‘सहजीवनाचा अवकाश’ आणि ‘स्वत:चा अवकाश’ असा जवळजवळ समप्रमाणात असायचा. त्यांच्या नात्यात नवरा-बायकोच्या साचेबद्ध कल्पना किंवा ठरावीक धारणांचे पूर्वग्रह कधीच नव्हते. परस्परांपासून दूर असताना ते संपर्क साधनांच्या माध्यमातून एकमेकांशी नेहमी जोडलेले राहिले आणि संवादाच्या देवाण-घेवाणीतून, समृद्धही होत राहिले. एकत्र असताना संयुक्तपणे, तर एकेकटं राहात असताना स्वतंत्रपणे आणि सक्षमपणे त्यांनी आपापल्या आयुष्याचं ‘सुकाणू’ सांभाळलं. या नात्याला समान नातं म्हणता येईल, नाही का? प्रसिद्ध उद्योगपती फिरोज पूनावाला आणि ७०-८० च्या काळात उच्चपदस्थ झालेल्या लीला पूनावाला यांचंही समानतेवर आधारलेलं असंच सुंदर नातं आहे. मग आत्ताच्या काळात अशी जोडपी दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

गेल्या काही दशकांत ्त्रिरयांंनी विविध क्षेत्रात जी उत्तुंग झेप घेतली आहे, त्यातून पारंपरिक पती-पत्नी नात्याच्या उलट ‘आधुनिक’ पद्धतीचं वैवाहिक नातं समोर येत आहे. बायकोने आपल्या कर्तबगारीवर संसाराच्या केंद्रस्थानी असण्यात त्यांच्या नवर्‍यांना कोणताही कमीपणा वाटत नाही, असे आता अनेक उदाहरणांमधून दिसते. सामाजिक, व्यावसायिक परिस्थिती बदलणार तशी ही वैवाहिक नाती या बदलांना आपलंसं करत विवाहाचं मार्गक्रमण करणार. ते दोघे त्या नात्यात समाधानी असतील तर कुणाला काय फरक पडावा? उलट यातून विवाहसंस्था बळकटच होत जाईल.

यातलं नेमकं कुठलं नातं आपल्याला हवं आहे आणि ते निभावताही येणार का? हे मात्र विवाहाआधी समजायला हवं. बरेचदा मुलींना किमान ‘परस्परपूरक’ नातं हवं असतं तर मुलग्यांना ( त्यांनी उघडपणे व्यक्त केलं नाही तरी मनातून) पारंपरिक नातं हवं असतं. दोघंही हे स्पष्टपणे व्यक्त करत नाहीत आणि मग अपेक्षाभंगाचे चटके बसायला लागले की धुसफूस सुरू होते. स्वत:चं व्यक्तिमत्त्व, लहानपणापासून आपल्याला कसं वाढवलं गेलं, घरातील माणसांचं आपापसातील नातं, आपल्यावर काय बिंबवलं गेलं, चूक-बरोबरच्या अविवेकी कल्पना आणि त्यातून निर्माण होणार्‍या अविवेकी अपेक्षा या सगळ्याचं ‘सार’ जोडीदार निवडीत उमटतं. म्हणून ही निवड सावधपणे होणं गरजेचं आहे.

‘समान’ तसंच ‘आधुनिक’ वैवाहिक नात्याचा विचार तेच करू शकतात, जे नवरा-बायको या नात्याचा नेमका अर्थ समजण्याइतके सुजाण आणि सहिष्णू असतात. वैवाहिक नात्याचा विकास आणि ‘माणूस’ म्हणून आपलं विकसित होत जाणं त्यांच्यासाठी जितकं महत्त्वाचं असतं तितकंच ते कुटुंबसंस्था निकोप होण्यासाठीही गरजेचं असतं. अशा वैवाहिक नात्यांनी निर्माण केलेल्या पाऊलवाटा, येणार्‍या काळात हळूहळू प्रशस्त होत विवाह संस्थेला विश्वासार्ह बनत जातील, एवढं नक्की.