आरती कदम

जगभर गाजलेल्या स्त्रीवादी चळवळीतलं एक महत्त्वाचं नाव म्हणजे बेट्टी फ्रीडन. त्यांचं जन्मशताब्दी वर्ष संपत असतानाच त्यांच्या कार्याचा आठव करणं गरजेचं, कारण स्त्रीमुक्तीची वाट त्यांनी विस्तारली, नव्हे त्याचा महामार्ग केला. फक्त चूल आणि मूल यात अडकलेल्या अमेरिकी स्त्रियांना त्यांच्यातल्या बौद्धिक संपदेचं आत्मभान तर दिलंच, पण त्याचबरोबर त्यांच्या हक्क,अधिकारांसाठी लढणंही शिकवलं. त्याचबरोबरीनं  भारतात, महाराष्ट्रातही ही स्त्रीमुक्तीची चळवळ फोफावली.. म्हणूनच यंदाच्या ८ मार्चच्या ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’निमित्ताने बेट्टी फ्रीडन आणि त्यांच्या ‘द फेमिनाइन मिस्टिक’ विषयी.. 

Bombay high court, verdict, Compensation, acid attack victims
अ‍ॅसिड हल्ल्यातील जुन्या पीडितांना नवीन योजनेचा लाभ मिळणार
Loksatta vasturang Lessons from redevelopment buildings Layout of flats
पुनर्विकासाचे धडे : कौटुंबिक अवकाश जपू या!
study of psychology, digital campaigning in elections
निवडणुकांतील डिजिटल प्रचारतंत्रामागे मानसशास्त्राचा अभ्यास
Loksatta Chaturang women movement Miscarriage Status of Abortion Laws
स्त्री‘वि’श्व : माझं शरीर,माझी निवड!

मी सुखी आहे. मोठं घर, मोठय़ा पदावरचा नवरा, चार मुलांची आई. सगळी भौतिक सुखं आहेत. पण.. काहीतरी अपूर्ण आहे..  घरची कामं मी नाही करायची तर कोण करणार? माझं बाईपण त्यातच तर आहे. आई होण्यात आणि बायको होण्यात..  मी सतत घरची कामंच करत असते, तरी कामं पूर्णच होत नाहीत. एक संपलं की दुसरं समोर असतंच. सुटकाच होत नाही कधी माझी.  मुलं शाळेत आणि नवरा ऑफिसला गेला की एकटेपण धावून येतं. मी वाट पाहात राहते त्यांची दिवसभर..  मला घरकामांशिवाय दुसरं काही येतच नाही. मी कायम कुणावर तरी अवलंबून असते. माझी निर्णयक्षमता संपली आहे. आत्मविश्वास गमावून बसलेय मी.  अलीकडे कारणाशिवाय रडू येतंय. मुलांवरची चिडचिड वाढलीय. काय होतंय मला.  माझं अस्तित्व तरी आहे का या जगात?  विसाव्या शतकाच्या सुरुवातीच्या टप्प्यात अमेरिकी स्त्रियांना पडलेले हे प्रश्न अगदी अलीकडेपर्यंत सर्वत्र, अगदी भारतातही ऐकायला येत होते.. येत असतातच.. पण आता जरा वेगळय़ा स्वरूपातही..

बेट्टी फ्रीडन यांनी पहिल्यांदा १९५० ते ६० दरम्यान जेव्हा या प्रश्नांना नीट समजून घेतलं तेव्हा ‘नाव नसलेली’ ही समस्या एकी-दोघींची नाही, तर बहुसंख्य अमेरिकी स्त्रियांची आहे हे त्यांच्या लक्षात यायला लागलं आणि एकटीचं वाटलेलं हे ‘बाईपणाचं दु:ख’ वैश्विक झालं. बेट्टी या अमेरिकेतील स्त्रीवादी कार्यकर्त्यां. मुळात लेखिका, पत्रकार. एका सर्वेक्षणाच्या निमित्तानं त्यांनी या स्त्रियांशी बोलायला सुरुवात केली आणि दु:खाला वाचा फुटली.. स्त्रिया बोलू लागल्या आणि ‘फेमिनाइन मिस्टिक’ अर्थात बाईपणाचं, स्त्रीत्वाचं गूढ उकलायला लागलं.. 

 ४ फेब्रुवारी १९२१ मध्ये जन्मलेल्या बेट्टी यांचं गेल्या वर्षी जन्मशताब्दी वर्ष होतं. यंदाचं १०१ वं वर्ष. विसाव्या शतकाच्या मध्यावर त्यांनी लिहिलेल्या ‘द फेमिनाइन मिस्टिक’ या पुस्तकाच्या माध्यमातून दुसरी स्त्रीवादाची लाट पसरवण्याचं श्रेय त्यांनाही दिलं जातं. स्त्रिया समानतेच्या कायदेशीर हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या, मतदानाचा हक्क, नोकरीत समान संधी, समान वेतन, गर्भपाताचा अधिकार, बाळंतपणाची रजा मिळणं अशा अनेक गोष्टी स्त्रियांना माहीत होत गेल्या. त्यासाठी संघर्ष सुरू झाला. अनेक अधिकार मिळतही गेले. पण हे झालं नंतरच्या टप्प्यात. त्याआधी स्त्रीला तिच्या मानसिक खच्चीकरणातून बाहेर काढणं गरजेचं होतं. त्याचं भान तिला मिळवून देणं गरजेचं होतं.

  ही स्त्री घरच्या मर्यादेत अडकलेली होती. दुय्यम मानल्या गेलेल्या तिला मुळात माणूस म्हणून अस्तित्व तरी आहे का, हा प्रश्न विचारून सिमॉन द बोव्हार यांनी स्त्रीमनात खळबळ माजवली होतीच. पहिल्या नाही, तर ‘सेकंड सेक्स’ म्हणूनच वागवल्या गेलेल्या पुरुषप्रधान संस्कृतीतल्या स्त्रीला आत्मभान येण्याची ती सुरुवात होती. हे पुस्तक प्रसिद्ध झालं ते १९४९ मध्ये. त्यानंतर सुमारे १४ वर्षांनी १९६३ मध्ये ‘द फेमिनाइन मिस्टिक’ हे बेट्टी फ्रीडन यांचं पुस्तक प्रसिद्ध झालं. तोपर्यंत बाई ही ‘फक्त चूल आणि मूल’ आणि ‘रांधा-वाढा-उष्टी काढा’ यातच पिचलेली होती. आई आणि बायको या दोनच भूमिका यशस्वीपणे पार पाडणे म्हणजेच बाईपण हे मनावर कोरल्या गेलेल्या ‘संस्कारां’ मध्येच स्त्रीजीवनाची इतिश्री मानत होती.

मानत होती हे जरी खरं असलं, तरी ती समाधानी होती का? तर नाही. बेट्टी यांनी या प्रश्नी अनेकींना बोलतं केलं. डॉक्टरांशी, विशेषत: मानसोपचारतज्ज्ञांशी बोलायला सुरुवात केली. तेव्हा अनेक गोष्टींचा उलगडा व्हायला लागला. अर्थात हे सर्वेक्षण अमेरिकी स्त्रियांचं आणि बहुतांशी गौरवर्णियांचंच असल्यानं त्यांच्या परिप्रेक्ष्यातूनच विचार केला गेला. त्यामुळे इतर विकसनशील देशांमध्ये जरी बाईपणाचे अनेक प्रश्न तेच असले तरी त्याला एक चौकट होतीच. रोग,गरिबी,भूक यांचे पदर आणि त्याला फुटणाऱ्या टोकदार वेदना अमेरिकी स्त्रीच्या जगण्यात नव्हत्या, तरीही शारीरिक कष्ट, मानसिक असंतुष्टता, असमाधान, अस्वस्थता, चिंता, एकटेपणा, नैराश्य, आणि त्यातून उद्भवणारे बाईपणाचे आजार देशांच्या सीमारेषा ओलांडून सर्वत्र पसरले होते.

 या अमेरिकी स्त्रीचा जेव्हा अभ्यास केला गेला तेव्हा काहीजणी गुपचूप उपचार घेत होत्या हे लक्षात आलं. पण तिचे प्रश्न शारीरिक नसल्यानं प्रथमत: डॉक्टरांनाही त्यावर उपाय करता येत नव्हते. ही ‘नाव नसलेली समस्या’ कळण्यासाठी मानसोपचार उपयोगी पडला, तोही अनेकींच्या बाबतीत तेच घडल्यानंतर. ज्याला  डॉक्टरांनी नाव दिलं, ‘हाऊसवाइफ सिन्ड्रोम.’  ‘मी घरातच असते. माझा व्यवसाय काय, तर हाऊसवाइफ असणं. मी फक्त घराच्या, नवऱ्याच्या, मुलांच्या सेवेत असते. त्यांना हवंनको ते बघणं यात दिवस कधी संपतो तेच कळत नाही. मी खूप थकतेय, माझी चिडचिड होतेय. कुणाचं माझ्याकडे लक्ष नाही. मी एकटी पडलेय..’ या भावना हळूहळू या स्त्रियांचा ताबा घ्यायला लागल्या. त्यातच भर म्हणजे दिवसभराच्या कामानं मरगळलेली ती रात्री तरी नवरा आपल्याला ‘जिवंत करेल’ या अपेक्षेत, प्रतीक्षेत असायची, तर दिवसभराचा दमलेला तो रात्री सरळ झोपून जायचा. हिचा संताप उद्वेगात बदलत जायचा. काही वेगळं घडतच नव्हतं तिच्या आयुष्यात. स्त्रीची कोंडी व्हायला लागली.

बेट्टी यांनी स्त्रीच्या या कोंडमाऱ्यासाठी जबाबदार धरलं ते स्त्रियांसाठीच्या मासिकांना, स्त्रीला दिल्या जाणाऱ्या शिक्षणाला आणि मुख्यत: जाहिरातदारांना. मासिकं आणि नियतकालिकांनी ‘स्त्रीजन्मा ही तुझी कहाणी’चे गोडवे गायला सुरुवात केली होती. स्त्रीजन्माचं सार्थक मुलांना वाढवण्यात आणि संसारासाठी आयुष्य वेचण्यात आहे, याचे पाठ पढवत ठेवल्यानं तेच अंतिम सत्य आहे, अशी बाईचीही समजूत होत गेली. ज्या कुणी करिअर करू पाहात होत्या, घराबाहेर पडल्या होत्या त्या कसं आपलं ‘स्त्रीत्व’ गमावून बसल्या आहेत, असं चित्र रंगवण्यात आलं. त्यामुळे आम्ही ‘करिअर वूमन’ आहोत हे सांगायचीही अनेकींना लाज वाटू लागली. ज्यांनी करिअर सोडायला नकार दिला आणि जर घरात काही कमी-उणं झालं तर त्याचा सारा दोष तिच्या करिअरला देणं सुरू झालं. एक नवीनच ‘करिअर वूमन गिल्ट सिन्ड्रोम’ अनेकींना अस्वस्थ करू लागला.

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा बेट्टी यांनी या पुस्तकात मांडला, तो म्हणजे आधुनिक उपकरणांच्या शोधामुळे या ‘हाऊसवाइफ’चं काम कमी व्हायच्या ऐवजी उलट वाढलं. बेट्टी या पुस्तकात लिहिते,आजची ती अगदी तिच्या आजीपेक्षाही जास्त काम करायला लागली आहे. जेव्हा वॉशिंग मशीन घरात आलं, तेव्हा दिवसातून एकदा वा दोन दिवसांनी एकदा धुवायचे कपडे दिवसातून दोन दोनदा मशीनमध्ये टाकले जाऊ लागले. साहजिकच कपडे धुवायला टाकणं, ते वाळत घालणं, सुकवणं, इस्त्री करणं ही कामं वाढली. व्हॅक्युम क्लीनर आला आणि घराची सफाई दिवसातून दोनदोनदा सुरू झाली. तीच गत मिक्सरची. तिच्याकडेही करण्यासारखं घरकामापलीकडे दुसरं काही नव्हतंच. शिवाय आदर्श आई आणि आदर्श पत्नी होण्यातलं सुख यातच आहे, या भ्रमात जाहिरातदारांनी तिला मुद्दाम अडकवलं होतंच.

गंमत म्हणजे या सगळय़ा सोयीसुविधा मिळाव्यात म्हणून श्रीमंत नवरा मिळवण्याचा कल वाढू लागला. मुली शिक्षण अर्धवट टाकून लग्न करू लागल्या, तीन-चार-पाच मुलांची आई होऊ लागल्या आणि मग त्यातच ‘रमू’ लागल्या. आपल्याला दुसरं काही करता येतंय, आपण लहानपणी गात होतो, चित्र काढत होतो, खेळात चॅम्पियन होतो हेही त्या विसरू लागल्या. ज्यांचं लग्न होत नव्हतं त्या संसारोपयोगी अधिक शिक्षण, विविध अभ्यासक्रम शिकत गेल्या. मात्र तरीही नवरा नाही मिळाला की नैराश्यात जात होत्या. पण तरीही त्या विवाहित स्त्रियांपेक्षा बऱ्या असायच्या, कारण नवऱ्याची मर्जी राखण्याचं वाढीव काम त्यांच्यावर नव्हतं. कधी तिचं थकणं तर कधी त्याचं थकणं, यामुळे लैंगिक गरजा पूर्ण न झाल्यानं आणखीनच नवे प्रश्न उभे राहिले. त्याच काळात अमेरिकेत सेक्शुअल वा लैंगिक विषयांची, फीमेल फॅन्टसीची नाटकं, चित्रपट आणि पुस्तकं मोठय़ा प्रमाणावर लोकप्रिय होत गेली. दुसरीकडे पुरुषांच्या लग्नबाह्य संबंधाचं, घटस्फोटांचंही पेव फुटलं. अशा वेळी वेगवेगळी मासिकं ‘संसार कसा टिकवावा’, ‘नवऱ्याची मर्जी कशी राखाल’, ‘लग्न सांभाळण्याच्या क्लृप्तय़ा’, ‘बाईपणाची सार्थकता’ याचं ज्ञान वाटू लागली. सतत घराच्या आणि मुलांच्या प्रश्नांनी वैतागलेली ती स्वत:ची मासिक पाळी, गरोदरपण, बाळंतपणाच्या वेदना हे सगळं एका बाजूला सहन करत होतीच, तर दुसरीकडे आदर्श आई होण्याच्या नादात मुलांवर नको इतका पहारा, शिस्त, अतिसंरक्षक असणं, सतत त्यांच्या मागे असणं करू लागली. याचा मुलांवर नकारात्मक परिणाम होत गेला. यातून तिचा ‘हाऊसवाइफ फटीग’ वाढू लागला. संसारासाठी पहाटे उठणारी ती १०-१० तास झोपून राहायला लागली, मरगळलेली वाटू लागली. काहीतरी चुकतंय हे तिलाही कळत होतं, पण काय ते कळत नव्हतं. हे आपलं एकटीचं दु:खं आहे, असं वाटत असतानाच मन हलकं करण्यातून ‘फेमिनाइन मिस्टिक’च्या रूपात बाईपणाचं गूढ लक्षात यायला लागलं..

 हे सगळं अभ्यासल्यानं परिस्थितीचं गांभीर्य लक्षात आल्यानंतर बेट्टी यांनी या स्त्रियांमध्ये आत्मभान आणण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. नाटककार इब्सेननं १८७९ मध्ये ‘डॉल्स हाऊस’मधल्या नोराच्या माध्यमातून घरातली बाहुली होण्यास नकार देणाऱ्या स्त्रीचा ठेवलेला आदर्श अनेकींसमोर होताच. बेट्टी यांनी नोकरी, करिअर करणाऱ्या स्त्रियांचा आदर्श या स्त्रियांसमोर ठेवायला सुरुवात केली. घर सांभाळून नोकरी करणारी ती आनंदी आहे, कारण तिनं कामं कमी केली आहेत, किंवा त्यासाठी इतरांची मदत घेतली आहे किंवा कामात शिस्त आणली आहे.. संसाराच्या पलीकडे अंगीच्या नानाविध कला, ज्यात त्या व्यक्तीचं खरं अस्तित्व आहे ते वाढवा.. संसार महत्त्वाचा आहेच, पण ते म्हणजे सर्वस्व नाही. कितीही केली तरी रोज रोज तीच तीच कामं करण्यात तुमच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्याचा असा कितीसा कस लागणार आहे?.. हे बेट्टी यांनी पटवून दिलं. तुमची बुद्धिमत्ता, ज्ञानाचा वापर वेगळय़ा कारणांसाठी, समाजासाठी केला, तर तुम्ही आनंदी व्हाल, याचा संदेश त्यांनी स्वत:च्या उदाहरणानं घालून दिला. बेट्टी यांना तीन मुलं. त्यांचा त्यांनी योग्य सांभाळ केला. नवऱ्याबरोबर न पटल्यामुळे घटस्फोटही घेतला, पण आवडीची पत्रकारिता केली, पुस्तकं लिहिली. ‘द फेमिनाइन मिस्टिक’ या पुस्तकाबरोबरच त्यांनी ‘द सेकंड स्टेज’, ‘इट चेंज्ड माय लाइफ: राइटिंग ऑन विमेन मूव्हमेंट’, ‘बियॉन्ड जेंडर’, ‘द फाउंटन ऑफ एज’,आणि ‘लाइफ सो फार’ हे आत्मचरित्रपर पुस्तकही लिहिलं. आणि पुढे त्यांनी आपलं सगळं आयुष्य फेमिनिझमसाठी, स्त्रियांच्या अधिकारांसाठी वाहून घेतलं. 

घर आपलंच असतं. कुटुंबीयांच्या आनंदात आपला आनंद असतोच, मात्र आपल्याला स्वत:चा आनंदही उपभोगता यायला हवा. आतापर्यंत ते न समजण्याची ‘फेमिनाइन मिस्टेक’ दुरुस्त करून ‘फेमिनाइन मिस्टिक’ समजून घ्यायला बेट्टी यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अनेकींना भाग पाडलं. अपेक्षेप्रमाणे हे पुस्तक ‘बेस्टसेलर’ ठरलं. हे पटल्यामुळेच पुढे अनेक अमेरिकी स्त्रिया बेट्टी यांच्याबरोबर अनेक अधिकार मिळवण्यासाठी, कायद्यात बदल घडवून आणण्यासाठी आंदोलनात भाग घेऊ लागल्या. स्त्रियांना मतदानाचा हक्क मिळावा यासाठी २६ ऑगस्ट १९७० रोजी त्यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या राष्ट्रव्यापी ‘वूमन्स स्ट्राइक फॉर इक्वालिटी’मध्ये एकटय़ा न्यूयॉर्कमधून ५० हजार लोक सहभागी झाले होते. स्त्रीवादी चळवळ अधिक व्यापक होण्यासाठी या आंदोलनाचा चांगलाच उपयोग झाला. तत्पूर्वी १९६६ मध्ये बेट्टी यांनी ‘नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वूमन’ (NOW) ची सहस्थापना केली. त्याच्या पहिल्या अध्यक्ष झाल्या. गर्भपाताचा अधिकार असो, वा नोकरीतील समानता, यासाठीची आंदोलनं, चळवळी वाढत गेल्या. सिमॉन द बोव्हार,

केट मिलेट, ग्लोरिया स्टेनिम, जर्मेन गिअर अशा अनेक स्त्रीवादी कार्यकर्त्यां चळवळीत सामील होत गेल्या. स्त्रीवादाची ही लढाई जरी अमेरिकेत सुरू होती, तरी तिचे पडसाद सर्वत्र पसरू लागलेच. भारतातही १९७५ ला स्त्रीमुक्तीची लाट आलीच. त्याचा अनेकींना अनेकार्थी फायदा झाला. आपल्याकडच्या स्त्रीमुक्ती चळवळीनं अनेकींना आत्मभान दिलं. (त्याविषयीचे लेख आजच्या पुरवणीत पान १ वर आहेतच) म्हणूनच बेट्टी फ्रीडन आपल्यासाठीही तितक्याच महत्त्वाच्या ठरतात.

स्त्रीला आत्मभान येण्यासाठी ही चळवळ जागतिक होणं गरजेचं होतंच. त्याप्रमाणे अनेक स्त्रिया घराबाहेर पडल्या, आर्थिकदृष्टय़ा स्वतंत्रही झाल्या. त्यांच्या बुद्धिमत्तेचा, कौशल्याचा कस लागेल असं करिअरही अनेकींनी सुरू केलं. त्यासाठी काहींनी सहकाऱ्यांच्या, कामवाल्यांच्या मदतीची ‘सपोर्ट सिस्टीम’ तयार केली. त्या थोडा मोकळा श्वास घ्यायला लागल्याही, पण ते सर्वच जणींच्या बाबतीत झालं का, याचा विचार केला तर या प्रश्नाचं उत्तर मात्र नकारार्थीच मिळतं. ‘द फेमिनाइन मिस्टिक’नं चूल आणि मूल यात अडकलेल्या अमेरिकी स्त्रीला बाहेर काढण्यात नक्कीच मदत केली. त्याचे पडसाद म्हणून अनेक देशांतल्या अनेक स्त्रिया ‘घराबाहेर’ पडल्या. पण त्यांच्यामागचा संसार सुटला का? उलट नोकरी आणि घर यांच्यामधली तारेवरची कसरत त्यांच्या नशिबी आली. मधला काळ- विशेषत: ऐशी-नव्वदीचा काळ हा अशा पिचलेल्या स्त्रियांचाच होता. त्यामुळे पुन्हा काही प्रश्न आ वासून उभे राहिले. नोकरी वा करिअर केल्यानं आत्मविश्वास, आत्मभान मिळालेली स्त्री ते टिकवू शकली का?  तिच्या श्रमाचं श्रेय तिला न देण्याची पुरुषी मानसिकता त्या बदलू शकल्या का? नोकरीवरून घरी परतल्यावर नवऱ्याइतकाच आराम तिला मिळातो का? तिला निर्णयस्वातंत्र्य आहे का? तिचं दुय्यमत्व खरंच नाहीसं झालं आहे का? तिच्याकडे माणूस म्हणून पाहिलं जात आहे का? ‘चतुरंग’नं केलेल्या छोटेखानी सर्वेक्षणात बदलत्या पिढीची सकारात्मकता दिसते आहे, पण त्यालाही मर्यादा आहेतच. पण हळूहळू का होईना, बदल घडतो आहे. गेल्या ५०-५५ वर्षांच्या वैचारिक घुसळणीतून एक महत्त्वाचा विचार सशक्तपणे पुढे आला, तो म्हणजे स्त्रीमुक्ती समाजात खोलवर रुजायला हवी असेल तर गरज आहे ती मुलग्यांच्या, पुरुषांच्या मानसिकतेतल्या बदलाची, त्यांच्या कृतीशील वागण्याची आणि हे घडलं तरच स्त्री खऱ्या अर्थानं माणूस ठरेल.  काही प्रमाणात का होईना पण व्यवहारातही ही स्त्री-पुरुषांतील समानता-परस्परपूरकता दिसू लागली आहे. हेच बहुधा सिमॉन द बोव्हार, बेट्टी फ्रीडन आदींनी लावलेल्या आणि भारतातही पसरलेल्या स्त्रीवादी चळवळीच्या वृक्षाला लागलेलं रसाळ गोड फळ असावं.

arati.kadam@expressindia.com