वंदना कुलकर्णी
एकीकडे वैवाहिक नात्यांतलं रितेपण आणि दुसरीकडे समाजात आलेला मोकळेपणा, स्त्री-पुरुषांचा वाढलेला एकत्र वावर या सामाजिक बदलाचा परिणाम दिसू लागला तो विवाहबाह्य संबंधातून. वैवाहिक नात्यातील भावनिक बंधांची उणीव, जोडीदाराच्या भावनिक सोबतीअभावी येणार्या एकाकीपणाची जाणीव न उमगलेल्या अनेकांनी जुन्या नात्यांचे असफल धागे घट्ट केले नाही; तर विवाहबाह्य नवीन नात्यांची वीण बांधायला घेतली. गेल्या काही वर्षांत समाजात विवाहबाह्य संबंधांची ही बीजं नेमकी का रुजत आहेत? हे सांगणार्या लेखाचा भाग पहिला.
बर्याच वर्षांपूर्वी आशा बगे यांची एक कथा वाचल्याचं स्मरतं आहे. लग्न होऊन एक भावनाप्रधान मुलगी नवर्याची नोकरी असलेल्या शहरात येते. वेगळा प्रदेश, निराळी भाषा, ओळखी नाहीत. ती एकटी पडते. नवरा असंवेदनशील. अति महत्त्वाकांक्षी. अखंड कामात बुडालेला. स्वकेंद्रित. त्याच्या हाताखाली काम करायला तो एका तरुणाला नोकरीत घेतो. तो साधा, सरळ, तिच्यासारखाच संवेदनशील. तोही या गावाला, नव्या नोकरीला पूर्ण नवखा. बुजर्या स्वभावाचा. हा त्याला घरी जेवायला बोलावतो. अधूनमधून बोलवत राहतो. स्वत: मात्र अनेकदा वेळेवर घरी येत नाही. त्यातून तो तरुण आणि त्याची बायको यांची ओळख वाढते. दोघांनाही आपापल्या कुटुंबांची उणीव खूप जाणवत असते. नव्या, वेगळ्या परिस्थितीबरोबर कुणाच्या प्रेमाच्या आधाराशिवाय जुळवून घ्यायला अवघड जात असतं. त्यांच्याही नकळत ते एकमेकांची एकाकीपणाची पोकळी भरून काढतात. भावनिक जवळिकीतील आस्था त्यांना आधार देते. आश्वस्त करते. तो नवरा मात्र त्याचा वेगळा अर्थ लावतो. कामाच्या व्यग्रतेत आपले आपल्या नवीन वैवाहिक नात्याकडे, तिच्याकडे संपूर्ण दुर्लक्ष होते आहे याची त्याला जराही जाणीव नसते. तो त्याचा स्वभावच नसतो. त्याचा अहंकार इतका दुखावला जातो की तोंड दाबून बुक्क्यांचा मार अशा सूडबद्धीने त्या दोघांना त्रास देत तो त्या दोघांची कशी कोंडी करतो याबद्दलची ती गोष्ट होती.
सई परांजपे लिखित ‘जास्वंदी’ या नाटकानेही व्यावसायिक असणार्या नवर्याचे अहोरात्र काम करताना आपल्या पत्नीकडे संपूर्ण दुर्लक्ष होणं, तिच्या भावनांबद्दल बेदखल असणं आणि अखेर त्याची परिणती म्हणजे तिच्या आयुष्यात अवचितपणे आलेल्या नवर्याच्याच मित्रामध्ये झालेली तिची गुंतवणूक… ही नात्यातील आंदोलनंही परिणामकारकरीत्या टिपली होती. तर महेश मांजरेकरांच्या ‘अस्तित्व’ या चित्रपटाचा नायकही असाच आत्ममग्न, स्वप्रेमात, पत्नीकडे एक माणूस म्हणून सोडाच, पण ‘माझा’ संसार सांभाळणारी, केवळ एक गृहिणी म्हणून बघणारा, तिच्या मानसिक गरजांबद्दल असहिष्णू… असा चित्रित केला होता. एक दिवस तिचं नैसर्गिकरीत्या फुललेलं एक सहज सुंदर नातं लक्षात आल्यावर, तिने आपल्याशी प्रतारणा केली हा आरोप करून तो तिला घराबाहेर काढतो. ज्या नवर्याला, घराला, संसाराला आपण आपलं मानलं, त्यासाठी आपल्या अत्यंत आवडीच्या गायनासह सर्व काही सोडलं, त्या घरात आपलं एक माणूस म्हणूनही काही अस्तित्व नाही, या अत्यंत वेदनादायी धक्क्यातून ती घर सोडायचं ठरवते आणि आपल्या आत्मसन्मानाच्या दिशेने प्रवास सुरू करते. तर महेश भट यांच्या ‘अर्थ’ चित्रपटात नवर्यावर मनस्वी प्रेम करणारी, सुखी संसाराची स्वप्न बघत असलेली भावुक नायिका, नवर्याचे विवाहबाह्य संबंध समजल्यावर कोसळते. माफी मागायला आलेल्या नवर्याला, ‘‘मी असं केलं असतं तर तू मला घरात घेतलं असतंस? असं विचारते. तो ‘‘नाही…’’ म्हटल्यावर घराचं दार लावून घेते. एक व्यक्ती म्हणून स्वत:ला सक्षम बनवण्याच्या अत्यंत बिकट प्रवासात अखेर तिला तिच्या स्वतंत्रपणे जगण्याचं प्रयोजन सापडतं.
या चारही कलाकृती किंवा दूरचित्रवाणीवरील ‘घुटन’ ही याच विषयावरची भावस्पर्शी मालिका वीस-पंचवीस वर्षांहून अधिक काळ जुन्या. अत्यंत वास्तवदर्शी. पुरुषसत्ताक समाजात, स्वकेंद्रित नवर्याकडून होणार्या स्त्रीच्या भावनिक घुसमटीची त्या अत्यंत संवेदनशीलतेने दखल घेणार्या होत्या. आज इतक्या वर्षांनंतरही आपल्या विवाह आणि कुटुंब संस्थेला वैवाहिक नात्यातील भावनिक बंधांच्या उणिवेची, जोडीदाराच्या भावनिक सोबती अभावी येणार्या एकाकीपणाची जाणीव किती झाली आहे कोण जाणे!
वास्तविक असे संबंध आपल्याकडे पूर्वापार चालत आलेले आहेत. पुरुषाने ठेवलेली ‘अंगवस्त्र’ असं त्याला म्हटलं जायचं. जयवंत दळवी यांच्या ‘बॅरिस्टर’ नाटकात घरातीलच नातेवाईक बाल- विधवांचा कसा गैरफायदा घेतात यावर भाष्य केलं होतं. फक्त त्यात गुप्तता पाळली जायची. स्त्रीचं घरातील स्थान नगण्य असल्याने व घराबाहेर तिला काही स्थानच नसल्याने असे संबंध निर्वेधपणे चालू राहायचे. त्या स्त्रीची सगळीकडून ससेहोलपट व्हायची. त्या काळात विवाहबाह्य संबंध हा विषय माणसांच्या मनात आला तरी इतका उघडपणे बोलला जात नव्हता. मात्र त्यातले खरे आरोपी आपणच आहोत याचे भानही नसलेले पुरुष, नवरेशाहीचा ‘अहंकार’ दुखावला गेल्यामुळे, आपल्या पत्नीविषयी जराही संशय आला तरी आपल्या पत्नीलाच आणि त्या पुरुषाला आरोपी करत. काही त्रासही देत.
बदलत्या काळाबरोबर स्त्री आपल्या हक्कांविषयी जागरूक होत गेली. आत्मसन्मान जपताना तिने विभक्त होणंही अधिक पसंत केलं. ‘समाज काय म्हणेल?’ या भीतीपोटी अनेक संसार तसेच चालूही राहिले. जिथे ्त्रिरयांनी पुरुषांची फसवणूक केली, तिथे प्रश्न अधिक बिकट बनले. आपल्या पुरुषार्थाचा अपमान समाजापुढे आणणं त्यांच्या पुरुषी अहंमुळे त्यांना कमीपणाचं वाटलं. त्यामुळे हे विवाहविच्छेद घरापुरते राहिले. काहींनी घटस्फोटानंतर दुसरं लग्न केलंही.
आजकाल स्त्रियाही यात गुंतायला लागलेल्या दिसतात. अर्थात स्त्री-पुरुष दोघंही एकत्र आल्याशिवाय ‘अफेअर’ होईलच कसं? पती-पत्नींच्या नात्यात नेमकं काय बिघडलं आहे किंवा त्या नात्याचा खरा अर्थ काय? त्यात कोणत्या उणिवा राहात आहेत? या सगळ्याच्या मुळाशी माणसं ना तेव्हा जात होती, ना आज जात आहेत.
आज एकविसाव्या शतकाच्या पुढच्या पंचवीस वर्षांमध्ये प्रवेश करताना ‘विवाहबाह्य संबंध’ हा विषय समाजात उघडपणे बोलला जातो आहे. २०१० च्या दशकात दिवसभरात दहा समुपदेशनाची सत्रं केली तर आठ सत्र या ‘पकडल्या गेलेल्या’ विवाहबाह्य संबंधांची असायची. अर्थात कधीकधी हे पालकांचे चोरटे संबंध ‘टेक्नोसॅव्ही’ मुलांच्या लक्षात आलेले असायचे! गेल्या पंचवीस वर्षात सातत्याने वाढत असलेल्या प्रकरणांचा अभ्यास करताना असं लक्षात येतं की, प्रत्येकाचा संपर्कसाधन बनलेला आणि खासगीपणा देणारा मोबाइल फोन हा जरी याच्या केंद्रस्थानी असला, तरी असे संबंध शक्य करणारा तो एक केवळ साधन आहे. परंतु या विवाहबाह्य संबंधांच्या मुळाशी आहे आपापल्या वैवाहिक नात्यातील भिन्न भिन्न भावना. कुणाला त्या नात्यात अपूर्णता वाटत असते तर कुणाला असमाधान. कुणाचे अपेक्षाभंग झालेले असतात तर कुणी वैफल्यग्रस्त असतं. कुणाला एकाकीपण खात असतं तर कुणाला दुखरेपण. कधी नात्यात अतिशय साचलेपण, कंटाळवाणेपण आलेलं असतं तर कधी नातं विखारी (टॉक्सिक) झालेलं असतं. सातत्याने दुर्लक्ष, अनादर, उपमर्द, अपमान, पाणउतारे यामुळे दुखावलेली मनं दुरावलेली असतात. विजोड जोडप्यांमध्ये विषाद भरून राहिलेला असतो. तर संसारातील भावनिक, वैचारिक, लैंगिक सहजीवनाचा अभाव नात्यातील आत्माच गमावून बसलेला असतो.
गेल्या २५ वर्षांत जग फार झपाट्यानं बदललं. समाजात आलेला मोकळेपणा, स्त्री-पुरुषांचा सर्वत्र एकत्र वावर, कामाच्या ठिकाणी नित्यनेमे होणारा सहवास, दौरे, बदल्या, नियुक्त्या (पोस्टग्िंज) आदींमुळे घरापासून लांब राहावं लागणं, दूरस्थ नाती (लाँग डिस्टन्स), विविध माध्यमांतून स्त्रीपुरुष नात्याची होणारी बाजारू मांडणी, जागतिकीकरण आणि विविध संस्कृतींच्या सरमिसळीमुळे बदललेली मूल्यं, समाजाचा कमी झालेला दबाव किंवा त्या दबावाला फारसं न जुमानण्याची वृत्ती… अशा एक ना अनेक कारणांनी विवाहबाह्य संबंधांसाठी जमीन सुपीक झालेली दिसते आहे का? पण त्या विरुद्ध ओरडा करून माणसं परावृत्त होतील का? कारण त्याची बीजं काही गोष्टीत दिसतात, ती अशी…
वैवाहिक नाती मुळात अनेक कारणांनी बिनसलेली असतात. त्यामधला रस आटलेला असतो. परस्परांविषयी तुच्छता, अनास्था, अनुत्सुकता, कौतुकाचा अभाव आणि दोषांवर मात्र सतत बोट असल्याने नाराजी, राग, अशा परस्परांविषयीच्या नकारात्मक भावनांमुळे सहजीवन ढवळून निघालेलं असतं. ते ‘सह’जीवन न उरता, समाजाच्या भिडेखातर किंवा सुरक्षिततेच्या गरजेपायी एका छताखाली व्यतीत केलेलं प्रत्येकाचं स्वतंत्र जीवन असतं! वैवाहिक साहचर्यात आनंदी, समाधानी असलेली विवाहित व्यक्ती सहसा (तिच्यामध्ये काही विशिष्ट व्यक्तिमत्त्वाचे आणि वर्तनाचे कंगोरे असल्याशिवाय) अशा विवाहबाह्य नात्याकडे का बरं वळेल? घरात पोट छान भरत असलेली व्यक्ती बाहेर जेवायला का बरं जाईल? त्यात, विवाहपूर्व समुपदेशन हा विषय विचारांच्या कक्षेतही नसल्यामुळे मुळात फसलेली जोडीदाराची निवड! नंतर जुळवून घेण्याच्या क्षमतांचा अभाव. नातं दुरुस्त करण्यासाठी घ्याव्या लागणार्या कष्टांचा अवघड प्रवास करण्याऐवजी, एकीकडे ‘संसारा’ची घडी विस्कटू न देता दुसरीकडे नावीन्याचा आनंद घेत केलेला ‘टाइमपास’! एकनिष्ठता हे विवाहातील महत्त्वाचं मूल्य मानलं तर जोडीदारासाठी ही प्रतारणाच असते. दोन विवाहित जोडप्यांमधील दोघांचे असे विवाहबाह्य संबंध आल्यास, चार जणांचं आयुष्य विस्कटतं. विवाहबाह्य संबंध हे वैवाहिक, तसंच कौटुंबिक नात्यांनाही ढवळून काढतात. लहान किंवा अर्धवट वयाच्या मुलांची तर अपरिमित हानी होते. काही विवाह विच्छेदापर्यंतही जाऊ शकतात. तसं झालं नाही तरी अनेकदा नात्याला गेलेला तडा सांधला जात नाही. अशा उसवलेल्या नात्यात राहण्याचा कोणता आनंद मिळत असेल? त्यापेक्षा, कोणते टाके घातले असता हे नातं सांधता येऊ शकेल असा विचार करता येऊ शकतो. समुपदेशन यासाठी नक्की दिशा देऊ शकतं. विवाहबाह्य संबंधांची प्रकरणे समुपदेशकापर्यंत तुलनेने कमीच पोचत असली, तरी मदतीसाठी आलेल्या प्रकरणांमध्ये मूळ पतीपत्नी नातं सांधलं जाण्याचं प्रमाण मोठं आहे. अशा समुपदेशनाचा उद्देश मूळ वैवाहिक नातं घनिष्ठ करता येईल का हे बघणं, हाच असतो. आपली चूक मान्य करून, केलेल्या कृतीची जबाबदारी स्वीकारून, भावनांची सुयोग्य हाताळणी करत, ही फट यशस्वीपणे बुजवण्याची ही एक विवेकी प्रक्रिया असते. गेल्या काही वर्षांत समुपदेशनाविषयी असलेला बाऊ कमी झाल्याने, आता जोडपी हा फायदा तरी घेऊ शकतात, घेताना दिसतात. मूळ नातं सहसा कुणाला तोडायचं नसतं.
अशा विवाहबाह्य संबंधांची उदाहरणं द्यावी तेवढी थोडी! बहिणीकडे शिक्षणासाठी राहायला आलेल्या तरुणीने आपल्या मेव्हण्याशी जोडलेले भावबंध (पुढे जाऊन दोघांनी लग्नही केलं!). आपल्या प्रेमविवाहाला विरोध झाल्यामुळे दबावाखाली दुसर्या कुणाशी लग्न करून पूर्वीचे प्रेमसंबंध चालू ठेवणारे तर अनेक. दूरस्थ (लॉँग डिस्टंस) नात्यातील विरहात अकल्पितपणे कुणीतरी आयुष्यात येऊन भावनिक नातं जुळणं. सत्तर-ऐंशीच्या दशकात, अनेकांना शाळा-महाविद्यालयांमधील मैत्रीमध्ये एकमेकांविषयी भावना निर्माण होते; परंतु त्या व्यक्त करता येत नसत. आता शाळेतल्या वर्गमित्र-मैत्रिणींचे ‘व्हॉट्सअप’ ग्रुप जमले, त्यांची ‘गेट-टुगेदर्स’, सहली सुरू झाल्या तेव्हा विशेषत: आत्ताच्या वैवाहिक जीवनात ज्यांना दुर्लक्षित, वंचित वाटत होतं, ज्यांचं वैवाहिक नातं दुरावलेलं आहे, अशांच्या त्या वेळच्या अबोल भावना आता एकमेकांशी बोलताना व्यक्त व्हायला लागल्या. महाविद्यालयामधील असफल प्रेमाच्या आठवणी जाग्या झाल्या. कितीतरी गोष्टींमध्ये आपलं कसं छान जमायचं याचं स्मरण एकमेकांना झालं.
असे पूर्वीचे, परंतु आता नव्याने जागे झालेले, मनोबंध सहसा संसाराच्या आणि जबाबदार्यांच्या आड येताना मात्र सहसा दिसत नाहीत. ते फार पुढे नेण्याचं धाडसही अनेकांमध्ये नसतं. आता चालू असलेले संसार विस्कटता कामा नयेत हा सारासार विवेक असतो. मनात रुजलेली एक मूल्यव्यवस्था असं काही करूही देत नाही. लैंगिक संबंधांच्या पायरीपर्यंत तर क्वचितच कुणी पोचतं. सारा ‘प्रेम संवाद’ सहसा मोबाइलच्या माध्यमातूनच चालतो. एकमेकांना कधी भेटत असतील तर तेव्हा थोड्या वेळात एकमेकांचं सर्व चांगलंच दिसतं; किंबहुना चांगलं तेच दाखवलं जातं. दोन घटका आनंदात जातात. माणसं सुखावतात. गुलाबाच्या फुलाचे काटे त्याचा देठ धरणार्यालाच टोचतात, फूल छानच असतं, तद्वतच! त्यामुळे अनेकांच्या आयुष्यामध्ये हा काही घटकांचा ‘ओॲसिस’च असतो. आता अशा या संबंधांकडे कसं बघावं हा प्रश्नच. मात्र काही जणांच्या बाबतीत हे संबंध अधिकच गहिरे होतात. त्यातून काही गुंतागुंत निर्माण होते का? असेल, तर कोणती? बघूया पुढच्या भागात.
vankulk57@yahoo.co.in
