विवाहबाह्य संबंधांचे अनेक पदर आहेत. असे संबंध कोणत्याही कारणांनी जुळले जात असले तरी मूळ नात्यावर होणारे त्याचे परिणाम, त्यातून विभक्त होणारी कुटुंबे यातून वैवाहिक नात्यांना बसणारी झळ कधीही न भरून निघणारीच असते. अतिशय भावनिक व्यक्तींना विशेषत: स्त्रियांना यातून सावरणे अधिक कठीण होत जाते. नात्यांचा, भावनांचा हा गुंता कसा वाढत जातो, काय आव्हाने येतात, हे सांगणारा विवाहबाह्य संबंधांविषयीच्या लेखांचा अंतिम भाग.

विवाहबाह्य संबंधांच्या विविध घटनांकडे बघताना काही जणांच्या बाबतीत हे संबंध अधिकच गहिरे होताना दिसतात. एकमेकांच्या सहवासात अपूर्णतेची पोकळी भरली जाते. मनाची हुरहुर वाढते. भेटींचं प्रमाण वाढतं. भावनिक, बौद्धिक संवादातील आर्तता, खोली वाढायला लागते. या भावनिक, वैचारिक देवघेवीतून आपण समृद्ध होतो आहोत असं दोघांनाही जाणवायला लागतं. हरवलेलं काहीतरी गवसतं आहे असा एक आत्मिक समाधानाचा अनुभव यायला लागतो. अशा एखाद्या उत्कट क्षणी कळत नकळत नातं मनोमिलनाकडून शरीर मीलनाकडेही जाऊ शकतं. मग ही गुंतवणूक अधिक तीव्र होत जाते. दोन माणसं आता एकमेकांशिवाय राहू शकत नाहीत. भेटी वाढतात. कायमस्वरूपी एकत्र येण्याच्या आणाभाका होतात. घरातल्यांपासून आता हे लपून राहू शकत नाही. त्याचे व्हायचे ते परिणाम होतात आणि सगळेच जण याचा दाह सोसतात.

इतकं खोलवर जाऊनही या नात्याचा शेवट वैवाहिक नात्यात होताना दिसतोच असं नाही. मूळ जोडीदार, मुलंबाळं, नातेवाईक असे अनेक निरोधक या मार्गावर असतात. कुणाचीही याला मान्यता नसते. यामध्ये सगळ्यांची इतकी ओढाताण होते की, ते ताण असह्य होऊन दोघांपैकी एक वा दोघेही ही रस्सीखेच थांबवण्याचा निर्णय घेतात; किंवा त्यांना हा निर्णय घ्यावा लागतो. सहसा भावनाप्रधान, संवेदनशील, कवी मनाची किंवा कलाकार वृत्तीची माणसं अशा नात्यात एकत्र आलेली असतील तर या विवाहबाह्य नात्याची अखेर दोघांसाठीही अतिशय वेदनादायी होते. आमच्याकडे येणार्‍या काहींच्या किंवा सभोवतालच्या उदाहरणांमधून असंही दिसतं की पुरुषांची मानसिकता अधिकतर शरीरप्रधान तर स्त्रियांची अधिकतर भावनाप्रधान असते. त्यामुळे स्त्रिया स्वत:ला अशा प्रेमात मन:पूत झोकून देतात. अनेक पुरुष मात्र आपल्या संसाराच्या एका दरडीवरील सुरक्षित पाऊल जराही सुटू न देता या नात्यात राहातात आणि हे संबंध उघड झाले की, त्या मूळ दरडीकडे परततात. स्त्रियांना यातून सावरणं अतिशय अवघड होतं. फसवणुकीची वेदनादायी भावना खूप दिवस, कधीकधी वर्षंही, त्यांच्या मनात राहते.

एक उदाहरण आठवतंय, छान मैत्र असलेलं एक वैवाहिक नातं… नवर्‍याच्या आकस्मिक जाण्याने अकल्पितपणे कोमेजलं. या धक्क्यातून बाहेर येऊन संसाराच्या अनेक अवघड जबाबदार्‍या पेलताना तिला फार अवघड जात होतं. ती तिच्या व्यक्तिमत्त्वामुळे मित्रमैत्रिणीत खूप लोकप्रिय होती. थोडा काळ उलटल्यावर अनेक मित्रांनी तिच्याशी ‘अफेअर’ जुळवण्याचा प्रयत्न करून पाहिला. ‘‘तुम्ही तुमचं वैवाहिक नातं संपवून माझ्याशी लग्न करणार आहात का?’’, असा थेट प्रश्न विचारल्यावर सारे मागे हटले. आपण ‘फ्लर्टिश’, ‘वुमनायझर’ किंवा बाहेरख्याली असे शब्द ऐकलेले असतात. सर्वसाधारणपणे त्या त्या माणसांच्या तशा व्यक्तिमत्त्व प्रकारामुळे त्यांच्याकडून तसं वर्तन घडत असतं. पुरुषप्रधान समाजात पुरुषांना मिळणार्‍या अशा वर्तनाच्या सवलतीमुळे हे प्रकार त्यांच्याकडून अधिक होताना दिसत असले, तरी अलीकडे स्त्रियाही यात बर्‍याच प्रमाणात गुंतताना दिसतात. ‘फ्लर्टिंग’ आणि ‘अफेअर’ यातील रेषा दिवसेंदिवस इतकी धूसर होत चालली आहे, खरं तर त्या त्या व्यक्तीच्या स्वत:शी प्रामाणिक असण्यावरच सगळं ठरत असतं. काही ‘पॅरनॉइड’ व्यक्तिमत्त्व इतरांवर सहज विश्वास ठेवू शकत नाहीत. अशा वेळी स्वामित्व भावनेपासून (पझेसिव्हनेस) संशय घेण्यापर्यंत, वर्तनाच्या विविध छटा दिसतात. अनेक कारणांनी लैंगिकदृष्टया असमर्थ असलेले, विशेषत: पुरुष, अतिशय असुरक्षित, अस्वस्थ असतात. आपल्यामुळे अतृप्त असलेला जोडीदार बाहेर कुणात तरी गुंतेल अशी त्यांना सतत भीती, चिंता वाटत असते. त्यामुळे ते सतत जोडीदारावर आणि त्यांच्या फोनवर पहारा ठेवून असतात. प्रत्यक्षात जोडीदाराचं प्रेमप्रकरण वगैरे काहीच नसतं; पण जोडीदाराच्या या संशयग्रस्ततेमुळे ते हतबल होऊन जातात. विश्वासच पणाला लागलेलं ते नातं मग सतत ‘रोलर कोस्टर राइड’ मधून जात राहतं. भांडणं होत राहतात. जोडीदाराविषयी संशय या विषयावर ‘आप की कसम’, ‘शक’, गुलजार यांचा ‘अचानक’, असे कितीतरी हिंदी चित्रपट येऊन गेले आणि लोकांना आवडलेही.

विवाहबाह्य नात्यात अलीकडच्या काळात आणखी एक भर पडली आहे ती ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहणार्‍यांची. विशेषत: स्त्रिया जेव्हा बाळंतपणाला काही काळासाठी माहेरी जातात तेव्हा अशी संधी काही पुरुष घेताना दिसतात. म्हणजे आपण आपल्या पत्नीचीच नाही तर त्या कोवळ्या अर्भकाचीही प्रतारणा करतो आहोत याची लाज ना त्या पुरुषाला असते ना खंत त्या प्रेमप्रकरणातील बाईला. बरेचदा अशी व्यक्ती कार्यालयीन सहकारी किंवा ‘जिमनॅझियम’मधली मैत्रीण असण्याची शक्यता जास्त असते. अलीकडे ‘युनिसेक्स जिम’ ही जागा विवाहबाह्य संबंधांचे आगार झाली असल्याचे सांगितले जाते.

काही वेळा नवरेही आपल्या व्यथा सांगतात. अनेक स्त्रिया विवाहातील लैंगिक संबंधांबद्दल कमालीच्या उदासीन असतात. ते टाळण्यासाठी सतत काहीतरी कारणं देतात. दमले आहे, तब्येत ठीक नाही, मूड नाही, घरात इतर माणसं आहेत वगैरे. मुलं मोठी होईपर्यंत त्यांना आपल्याच खोलीत किंवा पलंगावरही दोघांमध्ये झोपवतात. या कारणांना कंटाळून नवर्‍याचा संयम अखेर संपला तर त्यांचं ‘घ्या एकदा उरकून…’ असं तटस्थपणे म्हणणं किंवा ‘माझ्या भावना तुम्ही समजून घेत नाहीत, जबरदस्ती करता.’, ‘आता मुलं झाली तरी तुमचं हे वागणं किती दिवस चालणार आहे? शोभतं का तुम्हाला?’ इथपासून ‘इतकं राहवत नसेल तर जात जा बाहेर’ इथपर्यंत बोलणार्‍या स्त्रिया आहेत. असं कितीतरी नवरे सांगतात. या स्त्रिया समुपदेशनाला यायलाही तयार होत नाहीत. अशा वेळी काहीजण कळत नकळत एखाद्या नात्यात गुंततात. अनेक पुरुष असंही सांगतात, ‘‘ऋतुसमाप्तीच्या सुमारास (मेनोपॉझ) किंवा त्यानंतर अनेक स्त्रियांचा लैंगिक नात्यातील रस संपतो. अशा वेळी त्या सतत लैंगिक संबंध नाकारतात आणि आमची अतिशय घुसमट होते.’’

आणखी एक वेगळंच प्रकरण आठवतंय. एकदा एक स्त्री भेटायला आली होती. ती म्हणाली, ‘‘माझी माहेरची पार्श्वभूमी अशी होती की, कोणतंही स्थळ मला पसंतच करत नव्हतं. वय वाढत होतं. वडील नव्हते. आई अस्वस्थ होत होती. माझ्या ऑफिसमधल्या सहकार्‍यांनी तिथलाच एक मुलगा सुचवला. तोही तयार झाला. लग्न झालं. तो संसाराच्या कुठल्याही जबाबदार्‍यांना चुकत नव्हता. परंतु त्याचं व्यक्तिमत्त्व असं होतं की तो कुणाशीही, कुठलेही बंध जुळवून घेऊ शकायचा नाही. ना संवाद, ना स्पर्श. मुलं होणं हा खरं तर अपघातच होता. मला कोणतंही वैवाहिक सुख मिळत नव्हतं. एकदा अपघातानं एक कॉलेजमधला मित्र एका हॉस्पिटलमध्ये भेटला. त्याची बायको तिथे तिचे शेवटचे श्वास मोजत होती. गेली काही वर्षं तिची मनोभावे सेवा हेच त्याचं आयुष्य होतं. त्याच्या त्या विमनस्क अवस्थेत आम्ही भेटलो. एकमेकांशी गप्पा मारल्या. मी त्याचं आस्थापूर्वक सांत्वन केलं. एकमेकांचे फोन नंबर घेतले. पुढे थोड्याच दिवसांत ती गेली आणि तो नैराश्याच्या गर्तेत गेला. अतिशय आनंदी सहजीवन होतं त्यांचं. त्याला तिचा विरह झेलता येत नव्हता. त्याने मला फोन केला. नंतर आम्ही एकमेकांना भेटायला लागलो. आमची भेट त्याला सावरायला मदत करत होती आणि मला अर्थपूर्ण, भावपूर्ण नातं अनुभवण्याची संधी देत होती. आम्ही एकमेकांच्या जवळ आलो. नात्याचा असा अनुभव मी प्रथमच घेतला. तृप्त झाले. मुलांपासून काही लपवलं नाही. त्यांना आपले वडील कसे आहेत हे माहीत होतं. त्यांनी समजून घेतलं. नवराही वाईट माणूस नव्हता. कुणाचाही सहचर बनण्यासाठी लागणार्‍या भावनिक, वैचारिक, लैंगिक क्षमताच त्याच्यामध्ये नव्हत्या. मात्र तरुण मुलांच्या भविष्याकडे बघून मी हरवलेल्या सुखाचा समृद्ध अनुभव घेऊन, परस्पर समजुतीने त्या नात्यातून बाहेर पडले. माझ्या एकाकीपणात ते कुपीत जपलेले सोनेरी क्षण मला साथ देतात. आणि मला ते पुरेसे असतात. ‘मिस्टर अँड मिसेस अय्यर’ चित्रपटामध्ये तरी वेगळं काय दाखवलं होतं?

विवाहबाह्य संबंधांचे इतके वेगवेगळे आयाम असू शकतात. शेवटी यामधील माणसांची प्रगल्भता हे आयाम ठरवतात. उभयपक्षी फसवणूक करणारेही असतातच. ‘व्यक्ती तितक्या प्रकृती’ या उक्तीनुसार प्रत्येकाचा स्वभावधर्म आणि मानसिक जडणघडण, भावनांची अभिव्यक्ती या नात्याला दिशा देत असतात. दोन सज्ञान व्यक्तींमध्ये हे घडत असतं. त्याची जबाबदारी त्यांनी घ्यायची असते. जेव्हा असे संबंध उघडकीस येतात तेव्हा पहिली प्रतिक्रिया असते, ते अमान्य करण्याची. अधिकच लपवण्याची. जोडीदारही काही वेळा ‘तो/ ती असं करणं शक्यच नाही, माझ्यावर किती प्रेम आहे’ अशी स्वत:चीच खोटी समजूत घालतात. नंतर प्रतारणेची भावना फणा वर काढते. दु:ख, राग, असाहाय्यता, चिंता अशा भावना पेटून उठतात. ‘मला राहायचेच नाही तुझ्याबरोबर’, असं विफल होऊन म्हणताना, पूर्ण परिस्थितीचा विचार झालेला असतोच असं नाही. या घटनेचे पडसाद कसे उमटतील, हे कळायला पहिल्या धक्क्यातून सावरावं लागतं. या गोष्टीचा बभ्रा न करता, घटनेची हाताळणी महाकठीण असली तरी विवेकानं आणि संयमानंच करावी लागते. अनेक कारणांनी मनावर ताबा राहिलेला नसू शकतो; पण ही चूक वेळीच उमगणं, त्याची प्रामाणिक कबुली देणं, जोडीदाराच्या भावना समजून घेऊन, गमावलेला विश्वास परत संपादन करण्यासाठी कष्ट घेणं महत्त्वाचं असतं. विवाह समुपदेशन यामध्ये बरीच मदत करू शकतं.

विवाहबाह्य संबंध विवाहविच्छेदापर्यंतही जाऊ शकतात. विशेषत: जेव्हा एखादी व्यक्ती ते भावनिकदृष्ट्या स्वीकारूच शकत नसेल किंवा अशा गोष्टींची पुनरावृत्ती होत असेल किंवा ते एकापेक्षा अधिक व्यक्तींबरोबर होताना दिसतात, तेव्हा कुणीच ते सहन करणं अवघडच असतं. आपला आत्मसन्मान जपताना माणसं विभक्त होणं पसंत करतात. विविधतेचं स्वाभाविक, नैसर्गिक आकर्षण प्राणीमात्रांना असतंच. वैवाहिक बांधिलकी फार दीर्घकालीन आहे.

आजकालची पिढी एकीकडे आत्मविश्वास असलेली, तर दुसरीकडे असुरक्षितही. मला ‘स्पेस’ हवी आहे म्हणताना, दुसर्‍याचा मोबाइल फोन मात्र चोरून बघत राहणं नेमकं कशात बसतं? कारण लग्नाआधी वा लग्नानंतर अनेक जणांशी प्रेमसंबंध येतात किंवा सभोवार तसं दिसत राहतं, तेव्हा वैवाहिक नात्यातील विश्वासाचा पाया सदैव डळमळीत राहतो. मग वैवाहिक नाती निकोप कशी राहायची? पुढच्या पिढ्यांना, नात्यांच्या बांधिलकीबद्दल, त्यांच्या प्रगल्भ हाताळणीबद्दल कुणी आश्वस्त करायचं? विवाह आणि कुटुंबसंस्थेतील धुरिणांनी यावर गांभीर्याने विचार करण्याची कधी नव्हे इतकी गरज आज जाणवते आहे.
vankulk57@yahoo.co.in