त्या नेत्ररोगतज्ज्ञ, आपलं कर्मगाव निवडलं ते मेळघाट. पती डॉ.आशीष सातव यांच्यासह आदिवासी रुग्णाची सेवा करण्यात आयुष्य घालवणाऱ्या. त्यांच्यासाठी नवनवी आव्हानं स्वीकारणाऱ्या, ‘महान’ ट्रस्ट व कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्रामच्या वतीने गेली १६ वर्षे अनेक उपक्रम राबवणाऱ्या  डॉ. कविता सातव यांच्या वैद्यकीय आयुष्यातील  सुख-दु:खाचा हा प्रवास.
निसर्गाने दोन्ही हातांनी मुक्त उधळण केलेल्या वनराजीत वसलेलं मेळघाट. मेडिकलला असताना जेव्हा मी पछमडीला सहलीला गेले तेव्हाची निसर्गरम्य परिसराची ओढ निसर्गाने टिपली व आयुष्यभरासाठी मेळघाटात राहण्याची देणगी दिली, असे वाटते!
मी आणि पती डॉ. आशीष (सातव) आम्ही दोघांनी जेव्हा मेळघाटात येऊन वैद्यकीय सेवा करण्याचा निर्णय घेतला तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. पण आम्ही आमच्या निर्णयावर ठाम होतो. खरं तर सुरुवातीचे दिवस तसे काळजी वाटावेत असेच होते. कारण नागपूरला असताना शासकीय वैद्यकीय रुग्णालयात ५०-७५ रुग्णांची तपासणी करण्याची सवय होती, तेही फक्त नेत्ररोगीच! आणि येथे आल्यावर, डोळ्यांसाठी वेगळा डॉक्टर असतो याचीसुद्धा लोकांना कल्पना नाही. त्यामुळे डोळ्यांव्यतिरिक्त इतर रुग्णच यायचे तेही खूप कमी. इथपासूनच परीक्षेला सुरुवात झाली होती. पण आता मागे वळून पाहताना या सामाजिक कार्याकडे वळण्याची पाश्र्वभूमी कशी तयार झाली, याची बीजं सापडली.
सामाजिक कार्यासाठी आयुष्य झोकून द्यायचे असे काही ठरले नव्हते. पण आई-वडिलांचे संस्कार नेहमीच मुलांमध्ये खोलवर रुजतात. माझी आई प्राथमिक शाळेची शिक्षिका. लहानपणापासून तिचे कष्टाळू जीवन मी बघत होते. शाळा, त्यानंतर स्कॉलरशिपचे क्लासेस व इतर शिकवण्या ती घेत असे. आम्हा चार भावंडांचे यथायोग्य सांभाळून ती प्रत्येक वेळी शेजाऱ्यांच्या अडचणींनाही हजर असे, वेळ पडली तर स्वत: त्यांना दवाखान्यात नेऊन भरतीही करत असे. त्याचप्रमाणे वडीलही धार्मिक वृत्तीचे. गरिबांविषयी अतिशय कनवाळू. त्यामुळे अडलेल्यांना मदत करायला आमचं घर सदैव पुढे असायचं. वनखात्याची नोकरी करताना ते बुलडाण्याहून अकोल्याला घरी परत येत, तेव्हा कधी पायात चप्पल नसे तर कधी शर्ट किंवा आईने विणलेले स्वेटर नसे. कुणातरी गरिबाला ते येता येता दिलेले असे!
मी मेडिकलला शिकत असताना, मेळघाटातील धडाडीच्या कार्यकर्त्यां स्मिता कोल्हे यांच्या चष्म्याची काच एकदा फुटली व त्या डॉ. सातवांसोबत माझ्या मोठय़ा बहिणीकडे तपासणीसाठी आल्या. ती नेत्ररोगतज्ज्ञ आहे. त्या वेळी गप्पांमधून डॉ. आशीष  यांच्या लग्नाचा विषय निघाला. त्यानंतर सारासार विचार केल्यानंतर माझ्या लग्नाचं नक्की करण्यात आलं. म्हणूनच काहीसं योगायोगाने मात्र पूर्ण विचारांती मी रुग्णसेवेच्या या पवित्र कार्यात सहभागी झाले.
नोव्हेंबर १९९८ साली आम्ही ‘महान’ ट्रस्ट व कस्तुरबा हेल्थ सोसायटी, सेवाग्राम यांच्या वतीने धारणी तालुक्यात भाडय़ाच्या चार झोपडीवजा खोल्यांमध्ये हॉस्पिटल सुरू केले. त्यानंतर कोलुपूर या गावात पहिली ओपीडी सुरू केली. कालांतराने उतावली येथे आमचं आत्ताचं हॉस्पिटल सुरू झालं, महात्मा गांधी आदिवासी रुग्णालय. या भागाला आम्ही नाव दिलं – ‘कर्मग्राम.’
मला या भागात येऊन दृष्टिनिगडित समस्यांसाठी प्रामुख्याने काम करण्याची इच्छा होती. तेच माझं ध्येय होतं. पण लोकांमध्ये तितकीशी जागृतीच नसल्याने माझं काम अडखळत सुरू झालं. मग ठरविलं आपणच रुग्णांपर्यंत पोहोचायचं. माझा मुलगा, अथांग चार महिन्यांचा असतानाच मावशीबाईंना सोबत घेऊन लोकांची घरोघरी जाऊन तपासणी करणं, आवश्यक असल्यास सोबत आणून त्यांना भरती करून घेणं त्यांच्यावर विनामूल्य शस्त्रक्रिया करणं अशी सुरुवात केली. विशेष म्हणजे या रुग्णांना जेवणही घरातूनच द्यावं लागे. तेव्हा दळणवळणाच्या सुविधा फारशा नव्हत्या. त्यामुळे दोन्ही डोळ्यांनी आंधळे असलेले मोतीबिंदूचे रुग्ण जेव्हा एका डोळ्याची शस्त्रक्रिया करून जात. तेव्हा पुढच्या वेळी येताना नातेवाईक वा ओळखीचे यांना घेऊन येत. अशाच प्रकारे हळूहळू दवाखान्यातील रुग्णांची संख्या वाढली. मी डोळ्यांची डॉक्टर त्यामुळे इतर उपचार मला करता येतील का, अशी भीती रुग्णांच्या मनात असायची. पण मी प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहिले. डोळ्यांचे रुग्ण बघायचेच पण वेळ पडली तर तापाने फणफणलेले, आजाराने खंगलेले रुग्णही पाहायचे.
मुळातच मेळघाट हा घनदाट अरण्याचा भाग. इथली लोकसंख्या अंदाजे तीन लाखांच्या आसपास व त्यातलेही ७५ टक्क्यांहून अधिक लोक आदिवासी, कोरकू जमातीचे. शेती हेच त्यांच्या उपजीविकेचे मुख्य साधन. तर काही जण शेतमजुरी करणारे. त्यामुळे त्यांच्याकडे अठराविश्वे दारिद्रय़. घरात वीज नाही, शिक्षणाचा गंध नाही त्यामुळे त्यांची परिस्थिती भयावह होती. आम्ही कामाला सुरुवात केली त्या वेळी तर येथली आरोग्यस्थिती गंभीर होती. बालमृत्यू व कुपोषण यांच्यासाठी हा भाग बदनाम होता. म्हणूनच वैद्यकीय उपचार घेण्याविषयीच्या अंधश्रद्धा व अज्ञान यांचा सामना आम्हाला प्रामुख्याने करावा लागला. भाषेचा अडसर होताच, मग हळूहळू उपयोगात येणारे शब्द शिकून घेतले. दवाखाना तोही अशा भागात त्यामुळे आर्थिक पाठबळाची सातत्याने आवश्यकता भासायची. पण इच्छा प्रबळ असल्याने परमेश्वराची अनेक रूपं या ना त्या व्यक्तींमधून प्रकट होऊन आजपर्यंत एकही रुग्ण विन्मुख गेला नाही.
इथे बऱ्याच खेडय़ांमध्ये वीज नसल्याने आदिवासी केरोसीनच्या बाटलीच्या झाकणातून वात टाकून दिवा म्हणून वापरतात. रात्रीच्या वेळी उंदीर किंवा मांजराच्या धक्क्याने बाटली पडून बांबूच्या झोपडीला आग लागते व भाजल्याने अनेकांना इजा होते. अशा वेळी बोटे एकमेकांना चिटकणं, मान चिटकणं अशा घटना घडतात. त्या वेळी रुग्णांची स्थिती भयंकर असते. आतापर्यंत अशा अनेक केसेसमध्ये डॉ. दिलीप गहाणकरी, डॉ. निसळ, डॉ.जनाई, डॉ.कोठे, डॉ.हाजरा, डॉ.धोपावकर, डॉ.चांडक, डॉ.जांबोरकर, डॉ.बोराखडे, डॉ.गर्के, डॉ.गहुकार इ. अशा अनेकांनी गेली सात र्वष आपलं कौशल्य पणाला लावून गरीब आदिवासी रुग्णांचं आयुष्यच बदलून टाकलं आहे.
या प्रवासात अनेक आव्हानात्मक प्रसंगही आले. एकदा नऊ महिने उलटून गेलेली गर्भवती आली. सिझेरियनची शक्यता म्हणून मी तिला शहरात मोठय़ा दवाखान्यात जाण्याचा सल्ला दिला. चार दिवसांनी तिचे नातेवाईक कसंही ‘करून चला, बाळाचं डोकं थोडं दिसत आहे, पण बाहेर निघत नाही.’ अशी विनवणी करू लागले. माझ्याजवळ मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेसाठी लागणारी नवीन खरेदी केलेली अवजारे होती. विश्वासाच्या बळावर आणि वैद्यकीय अनुभवांच्या जोरावर मी प्रसूती करवली. मुलगा झालेला दिसताच नातेवाईकांनी लोखंडी कपाटं, पेटय़ा वाजवायला सुरुवात केली. पण बाळ अजूनही पूर्ण बाहेर आलेलं नव्हतं. माझ्या हातापायांना प्रथमच कापरं भरलं. मेळघाटातील ही आपली पहिलीच रुग्ण व तिचं बाळ जन्मजात मृत आहे की काय, अशी शंका येऊ लागली. पण क्षणात विचार बाजूला सारून मी त्याला प्रथमोपचार दिले व बाळ अस्फुटसे रडले. त्यानंतर दवाखान्यात नेऊन त्याच्या घशातला स्राव काढला. घरी परत येऊन बघते तर ही रुग्ण रक्ताच्या थारोळ्यात पडलेली. त्वरित मोतीबिंदूच्या छोटय़ाशा अवजारांच्या मदतीने टाके मारले. इतकं होऊनही परीक्षा सुरूच होती. बाळाच्या आईला प्रसूतीनंतर एक आठवडा उलटला तरी दूध नव्हते. तेव्हा अथांग सहा महिन्यांचा होता. मग र्अध दूध अथांगला व र्अध त्या बाळाला अशी विभागणी झाली. आज अथांगचा तो दूधभाऊ बघितला की आनंदाश्रू येतात!
नंतर एकदा एका रुग्णाची डोळ्यांची छोटेशी शस्त्रक्रिया केली व देखरेखीनंतर त्याला घरी पाठवलं. मात्र रुग्ण दोन-तीन दिवसांत दगावला. त्याच्या कुटुंबीयांनी, गावकऱ्यांनी एकच गोंधळ घातला. माझ्या चुकीच्या शस्त्रक्रियेनेच तो गेल्याचा समज करून घेतला. माझ्या उपचाराबाबत मला खात्री होती. अखेर त्याचा शवविच्छेदन अहवाल आल्यावर त्याला आतडय़ांचा काही आजार होता, त्याने तो गेल्याचं समोर आलं. त्या वेळी हे प्रकरण मिटलं. पण त्याच गावातून पुढचा रुग्ण येईपर्यंत मन थाऱ्यावर नव्हतं.
आदिवासी गरीब, अंधश्रद्धाळू असले तरी त्यांच्याकडून शिकण्यासारखं खूप काही आहे. एक तर ते फार प्रामाणिक असतात. फीसाठीचे १०-२० रुपये कमी असतील तर बाजाराच्या दिवशी येऊन नक्कीच परत करतील. खूप साठवणुकीची वृत्ती नाही. अतिशय मेहनती आहेत. कितीही गरीब असले, संकटात असले तरी त्यांच्या चेहऱ्यावर दिसतं ते निखळ हास्य. जोपर्यंत दोन्ही डोळ्यांनी दिसत नाही तोपर्यंत शस्त्रक्रियेसाठी येणं टाळणार व एका डोळ्याची शस्त्रक्रिया झाल्यावर ‘आता तर दिसतंय, म्हणून दुसरा डोळा आता एवढय़ात नाही करायचा’ असं म्हणून परत कामाला जुंपून घेणार. उपचार करणं, शस्त्रक्रिया करणं किती आवश्यक आहे ते कळकळीने समजावून सांगतो. तेव्हा क्लिनिकमध्ये असेपर्यंत ‘हो’ म्हणतात. मात्र नंतर फिरकत नाहीत. अशा वेळी प्रयत्न फोल झाले असे वाटते. पण विचार केल्यावर असं वाटतं रोजीरोटीचा प्रश्न शेवटी सर्वानाच प्राधान्याचा वाटणार! मात्र आपण प्रयत्न करणं सोडता येणार नाही हे पटलं.
जेव्हा मी मेळघाटात आले, तेव्हा मी या निर्णयावर ठाम होते, की मी डोळ्यांच्या रुग्णांव्यतिरिक्त कुणालाही तपासणार नाही. पण या संकल्पाला पार सुरुंग लागला. ‘रुग्ण हाच देव’ हा संस्कार आपोआप रुजला. सुरुवातीला अथांग लहान असल्याने सूक्ष्म टाके घालण्याची व्यवस्था माझ्याकडे होती. पण वेळ पडल्यावर त्याचा वापर मी बलाने-शेळीने शिंग मारलं म्हणून झालेल्या जखमा शिवायला केला. गोफण फिरवताना दगडाने फाटलेले ओठ, लोंबकळणारे ओठ किंवा अस्वलाने लचका तोडलेली जखम मी याच साहित्यावर बरी केली. आदिवासींच्या आयुष्याची समरूप होऊ लागल्यावर त्यांची अगतिकता खऱ्या अर्थाने कळू लागली. त्या वेळी वैद्यकीय शिक्षणाचा बाऊ मागे पडला व बलगाडीच्या चाकाच्या आऱ्याने फुटलेलं डोकं, झाडावरून पडल्याने किंवा ओंडका पायावर पडल्याने झालेल्या जखमा असणारे रुग्ण प्लॅस्टिक सर्जन वा जनरल सर्जनकडे कसे पाठवावेत , हा विचार येऊ लागला. कारण मी शहरात जाण्याचा सल्ला दिला तर पशाअभावी, गरिबीमुळे, भाषेमुळे हा आदिवासी कुठेच जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत त्याच्यावर उपचार झालेच पाहिजेत, हा धडा मिळाला.  
अनेकदा आणीबाणीच्या परिस्थितीत मी दूरध्वनीवरून डॉ. निसळ व डॉ. जाजूंच्या सहकार्याने पेशंटच्या स्थितीची माहिती देऊन त्यांच्याकडून योग्य ते मार्गदर्शन घेऊन यत्किंचितही वेळ न दवडता रुग्णावर उपचार केले आहेत. तेव्हा कुठे या भागात आपण सेवा देऊ शकतोय, हा आत्मविश्वास हळूहळू येऊ लागलाय.
आम्ही दोघांनी ठरवून सामाजिक कार्याचा अध्याय आयुष्यात सुरू केला. पण हा निर्णय माझ्यातल्या आईला सहज पचवता आला नाही. अथांगला काही महिन्यांचा असल्यापासूनच त्याला बालदमा असल्याचं निदान झालं. त्याला वारंवार अ‍ॅटक्स येत. त्या वेळी आपण स्वत: डॉक्टर असून त्याला अद्ययावत सेवा देऊ शकत नाही, असं वाटायचं. पण हळूहळू यातूनही बाहेर पडले. आत्ताही अथांग शाळेच्या सुट्टीच्या काळात आजी-आजोबांकडे किंवा पुण्याला काकांकडे जातो, त्या वेळी तिथल्या शहरी वातावरणात चांगला रमतो. लहानपणी तो कधी कधी काही गोष्टींचा हट्ट करायचा. पण आता मात्र ‘ते सग्गळं छान असलं तरी मी मेळघाटातच परत येणार,’ असं तो निक्षून सांगतो. तेव्हा बरं वाटतं. तो लहान असताना कडक उन्हाळ्याच्या काळात त्याच्या पाळण्यावर चादर ओली करून टाकायचो व झोका द्यायचो. आहे त्यात समाधानी राहायला शिकलो, हेच आजवरच्या प्रवासाचं गमक असावं.
२००७-२००८ च्या दरम्यान मला थोडा हृदयाचा त्रास जाणवू लागला. पण त्यातूनही मार्ग निघाला. तरी कधीही हे सोडून जावं, असा विचारसुद्धा मी केला नाही. त्यातून आता संस्थेचं काम खूप वाढलं आहे. आरोग्यसेविकांना प्रशिक्षित करून गावोगावी आरोग्यसेवेची जगजागृती करायची, त्यांच्यामार्फत रुग्णाच्या घरी देखरेखीखाली उपचार करायचे, अशी पद्धत आता आम्ही सुरू केलीय. गेल्या पाच वर्षांत गावोगावच्या आरोग्यसेवकांनी ७५ हजारांहून अधिक रुग्णांवर उपचार केले आहेत. आमच्या ‘बेअर फूट डॉक्टर्स’च्या संकल्पनेला चांगलं यश आलं आहे. तर भारतीय वैद्यकीय संशोधन संस्थेचा पुरस्कारही मिळाला आहे. विशेष म्हणजे बाळाची घरीच देखरेखीखाली काळजी घेण्याने बालमृत्युदर आटोक्यात आला आहे. हेच मॉडेल संपूर्ण मेळघाटात राबवण्याचा प्रस्ताव महाराष्ट्र शासनाने ठेवला आहे.
    महान, खोज यासारख्या मेळघाटातील काही सेवाभावी संस्थांनी एकत्र येत ‘समुपदेशक’ नावाचा एक अभिनव उपक्रम राबविला. या उपक्रमांतर्गत सरकारी रुग्णालयांच्या कामकाजावर व आरोग्यसेवांच्या उपलब्धतेसाठी या संस्था स्वत:हून लक्ष ठेवू लागल्या. कारण सरकारकडे निधी आहे पण गरजूंपर्यंत पोहोचणारी यंत्रणा नाही. ती आमच्यामार्फत उभी केली. याचे अत्यंत चांगले परिणाम पाहायला मिळाले. रुग्णांना तपासणाऱ्या डॉक्टरांच्या व कर्मचाऱ्यांच्या सेवेत तत्परता आली, पर्यायाने लोक उपचारासाठी पुढे येऊ लागले, रुग्णभरती होऊ लागली. औषधांची उपलब्धता, वैद्यकीय उपकरणांचा वापर वाढला. एकूणच आरोग्याविषयीची जनजागृती रुजू लागली. मात्र यामुळे व्यवस्थेतील काही व्यक्तींचे हित दुखावलं जाऊ लागलं व अचानकपणे सरकारकडून हा उपक्रम बंद केला गेला. आम्ही याविरोधात न्यायालयात जनहित याचिका दाखल केली. शेवटी मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याच्या आरोग्य खात्याने हा उपक्रम पुन्हा सुरू केला. यामुळे सुमारे १७ सरकारी रुग्णालयांमधील सेवेचा दर्जा सुधारला आहे.
आतापर्यंत २० ते ३० हजार रुग्णांना शस्त्रक्रिया व ओपीडीतील उपचारांच्या माध्यमातून अंधत्त्व येण्यापासून रोखले आहे. गावोगावी, नियमित तत्त्वांवर शिबिरे भरवून व घरोघरी जाऊन उपचार देण्याच्या पद्धतीने त्यासाठी पुढाकार घेतला आहे.
मेळघाटातील आदिवासी व्यसनाच्या चक्रव्यूहात अडकले आहेत. अगदी म्हाताऱ्या बायका, मुले यांचीही यातून सुटका झालेली नाही. कधी कधी तर उपचाराला येतानासुद्धा त्या नशेत असतात. अशा वेळी दु:ख होते. गावोगावी उपचारासाठी जाताना व्यसनमुक्तीसाठीही प्रयत्न करावे लागतात. अनेक गावात चौथी ते सातवीपर्यंत शाळा आहेत. तर काही गावांत बारावीपर्यंतच्या शिक्षणाचीही सोय आहे. मी आरोग्यसेविकांच्या मदतीने शाळांमध्ये जाऊनही मुलांची नेत्रतपासणी करते. त्यामुळे शाळेत जाणारी नातवंडे आजी-आजोबांना हाताला धरून ओपीडीत घेऊन येतात. ‘माझ्या आजी-आजोबांचे डोळे ठीक करून द्या,’ असा हट्ट धरतात. त्या वेळी मागास भागात शिक्षणाचं महत्त्व लख्खपणे समोर येतं.
वैद्यकीय शिक्षण घेतानाच्या सहाध्यायींपैकी अनेक जण प्लॅस्टिक सर्जन, बालरोगतज्ज्ञ वा भूलतज्ज्ञ असे त्या त्या विषयात पारंगत झाले आहेत. त्यांच्या मदतीचा हात आम्हाला मिळू लागल्याने कामाचा व्याप वाढवणं सोपं झालं. काही जणांच्या मदतीशिवाय हा प्रवास अशक्य होता, ते म्हणजे सुशीला नायर, धीरूभाई मेहता, हलबे सर, रमेशभाई, निमिषभाई व केअरिंग फ्रेंड्सचा चमू. तसेच नागपुरातील तरुण नेत्रतज्ज्ञ, आमचे दोन्हीकडचे नातेवाईक व मित्रपरिवार यांच्यामुळे इथवरचा प्रवास शक्य झाला.
मेळघाट म्हणजे मागासलेला, कुपोषणग्रस्त व दुर्लक्षित भाग अशी इथली प्रतिमा झाली आहे. ती सुधारावी, विकसित भागांशी तुलना करण्याच्या फूटपट्टीच्या आसपास तरी मेळघाट दिसावा, यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत. आयुष्य नदीसारखं असलं पाहिजे. नदी वाहतीच शोभते. पण ती जेव्हा गिरिशिखरांवरून, कडेकपारीतून, पठारावरून वाहत पुढे जाईल, तेव्हाच तिच्या वाहण्याला आगळं सौंदर्य प्राप्त होतं. तसंच आपल्या आयुष्याचंही असावं, सरधोपट आयुष्य मिळमिळीत वाटतं. अनेक आव्हानांना-संकटांना सामोरं जाऊन ते अधिक अर्थपूर्ण होतं, याची प्रचीती आली आहे.
(शब्दांकन- भारती भावसार)
संपर्क-डॉ. कविता सातव
महात्मा गांधी आदिवासी रुग्णालय,
धारणी तालुका, अमरावती -४४४ ७०२
भ्रमणध्वनी- ९४२३११८८७७
 वेबसाइट- http://www.mahantrust.in