एक पुरुष अत्यंत वेगाने पोळी-भाजी करतो तर ते आपल्याला का जमू नये? असा पोक्त विचार करून या कलेत पारंगततेच्या जवळपास जावे असा निश्चय केला. या विचारात एक मासिक चाळत असताना, ‘पाककृती’ या सदरात, ‘विविध चवींची सूप्स’ हा लेख पाहण्यात आला. गरमगरम सूप हा तर माझा आवडता पदार्थ. पहिलाच आयटेम होता ‘टोमॅटो सूप’. नीट वाचले. अरे काय अवघड आहे यात? करून पाहूया..
निवृत्तीनंतर करायचे काय? हा प्रश्न आऽऽ वासून माझ्यापुढे कधीच असणार नव्हता. लेखनाशिवाय इतरही अनेक छंद मला होते. घरातील माझ्याशिवाय सगळीच, अगदी पत्नीसुद्धा, अर्थार्जनासाठी दिवसभर घराबाहेर राहणार होते. त्यामुळे बँकांची वगैरे कामे करायला एक विनामूल्य कारभारी मिळाला. त्याचीही खंत करण्याचे कारण नव्हते. तरीही नवीन काही तरी शिकायचे असा निग्रह केला होता. पत्त्यांतील वेगवेगळे डाव शिकण्यातही मला तथ्य नव्हते. मग काय शिकायचे?
हा संभ्रम आमच्याकडे अनेक वर्षे स्वयंपाक रांधणाऱ्या ‘महाराज’ने सोडविला. एक पुरुष अत्यंत वेगाने पोळी-भाजी करतो तर ते आपल्याला का जमू नये? असा पोक्त विचार करून या कलेत पारंगततेच्या जवळपास जावे असा निश्चय केला. भात टाकता तर येतच होता. कधी फडफडीत तर कधी गोळा झाला तरी तो पोटभरीसाठी उपयुक्त होत असेच. आता भाताबरोबर काय तयार केले म्हणजे सर्वाच्या गैरहजेरीत जेवणाची भ्रांत पडणार नाही? या विचारात एक मासिक चाळत असताना, ‘पाककृती’ या सदरात, ‘विविध चवींची सूप्स’ हा लेख पाहण्यात आला. गरमगरम सूप हा तर माझा आवडता पदार्थ. पहिलाच आयटेम होता ‘टोमॅटो सूप’. नीट वाचले. अरे काय अवघड आहे यात? एकदा विचार आला की सौभाग्यवती कामावरून परतल्यावर तिच्या मार्गदर्शनाखाली हा नवीन धडा घ्यावा, पण नाही. सौ.ला. सरप्राइज दिले तर खरी मज्जा येईल. आत्ताच करून बघायचे.
‘साहित्य आणि कृती’ वाचून काढली. ‘टोमॅटो’ दहा मिनिटे शिजवावेत? फारच सोप्पे. ‘टोमॅटोची साले अलगद काढून घ्यावीत.’ ..गरम टोमॅटोला हात घातला आणि चटका बसल्यामुळे त्याच वेगाने मागे घेतला. म्हटलंय ना, ‘आधी हाताला चटके, मग..’ याचा प्रत्यय आला तरी ते जमलेच, आणि पहिली स्टेप झाली.
‘एक कांदा बारीक चिरून घ्यावा.’ या कृतीने मात्र डोळ्यात घळाघळा पाणी आले. पण आता मागे पाऊल घ्यायचेच नव्हते.
‘पॅनमध्ये चमचाभर तूप टाकून कांदा, सोनेरी होईपर्यंत परतावा.’ कांदा सोनेरी कसा होतो हे कधीच माहीत नव्हते. तरी केले. ‘त्यात अर्धा चमचा मीठ आणि दोन चमचे जिरे मिसळावे.’ आता आली पंचाईत. जिरे कसे दिसतात, त्याची अधुंकशी कल्पना. फडताळातील पारदर्शक बाटल्या शोधल्या. त्यात दोन सारख्या दिसणाऱ्या होत्या. यातील जिरे कोठले? संभ्रम. गंधशक्तीने तो प्रश्न सोडविला. दुसऱ्या बाटलीत होता ‘ओवा.’ पोट दुखत असताना कधी तरी घेतलेला ओवा.
जिरे भुरभुरून मिश्रण पुन्हा परतून घ्या आणि सर्व मिश्रण टोमॅटोच्या लगद्यासह (याला म्हणे टोमॅटो प्युरी म्हणतात.) मिक्सरमध्ये मिनिटभर फिरवून घ्या.. मिक्सर हाताळण्याची ही पहिलीच वेळ. सूप पातळ असते हे अनुभवल्यामुळे त्यात कपभर पाणीही घातले. मिक्सर घरऽऽकन् सुरू झाला आणि वरचे सैल झाकण उडाले आणि चेहऱ्यावर ते गरम मिश्रण भसकन उडाले. चेहरा चांगलाच भाजला. थंड पाण्याने धुतला तरी भाजल्याच्या खुणा राहिल्याच. प्रयोग स्थगित केला.
संध्याकाळी पत्नी घरी परतली, तेव्हा तोंडावर रुमाल धरून खोटे हसून तिचे स्वागत केले. तिने खसकन रुमाल ओढला आणि लालबुंद चेहरा पाहून ती हबकलीच.
‘अहो काय झालंय?’ तिचा चिंताग्रस्त प्रश्न. मी अर्धवट अवस्थेत पडलेल्या मिक्सरकडे बोट दाखविले. त्याचे अवलोकन केल्यानंतर परिस्थिती तिच्या लगेच लक्षात आली.
‘कोणी सांगितले होते तुम्हाला हे नसते उद्योग? करायचे होते तर मी येईपर्यंत धीर नव्हता?’ जळजळीत प्रश्न.
‘न.. न.. नाही.. सरप्राइज द्यायचे होते.’ चाचरत कसाबसा उत्तरलो.
‘देवाऽऽ,  बरं तर बरं, डोळ्यावर नाही उडाले. वाचलात. आता लक्षात ठेवा स्वयंपाकघरात लुडबुड करण्याचे तुम्हाला काही कारण नाही,’ सौ.चा सज्जड दम.
काही तरी नवीन शिकण्याचा आमचा इरादा, भाजलेल्या चेहऱ्यामुळे ‘कोल्ड-स्टोअरेज’मध्ये कुलूपबंद झालाय..

There is no end to the songs of Dalits
गीतांचा भीमसागर… : दलितांच्या सुरांना अंत नाही!
Loksatta chaturang Think rationally disbelief restless
इतिश्री: भावनेवर तर्कशुद्ध मात!
Vanchit Bahujan Aghadi Changes Lok Sabha Candidates in maharashtra ahead of lok sabha 2024 Election
‘वंचित’ चा फेरबदल कोणाच्या फायद्याचा? कोणाच्या सांगण्यावरून?
lokrang, shekhar rajeshirke, documentary making, journey, for, nature documentaries, family contribution,
आम्ही डॉक्युमेण्ट्रीवाले: माहितीपटांचा गृहोद्योग…