श्रद्धा

विश्वास. गाढ श्रद्धा. अनेकदा हा विश्वासच आपल्याला अनेक संकटांतून बाहेर काढतो. एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवला की ते सापडतं ज्याची कधी कल्पनाही केली नसेल.

विश्वास. गाढ श्रद्धा. अनेकदा हा विश्वासच आपल्याला अनेक संकटांतून बाहेर काढतो. एखाद्यावर पूर्ण विश्वास ठेवला की ते सापडतं ज्याची कधी कल्पनाही केली नसेल.
विमान वॉशिंग्टनच्या दिशेनं आकाशात झेपावलं आणि काही मिनिटांतच सारे प्रवासी निश्चिंत झाले. आपापल्या कामाला लागले. माधवरावांनी सकाळी वाचायचं राहिलेलं वर्तमानपत्र वाचायला सुरुवात केली. त्यांच्या पत्नी सुधाताई मात्र कुतुहलाने विमानातल्या इतर प्रवाशांकडे पाहू लागल्या. त्यातले काही जण त्यांच्यासारखेच नवखे. पहिल्यांदा विमानात चढलेले. काही मात्र अगदी सराईत. त्यांच्याच पुढच्या खुर्चीवर एक १२ वर्षांची मुलगी, सोनिया बसली होती. एकटीच असावी बहुधा. तिच्या बाजूची सीट रिकामी होती. कानात इयरफोन घालून ती आपल्या गाण्यांच्या राज्यात रमली होती. सुधाताईंना जरा आश्चर्य वाटलं. तिची तंद्री भंग करावी असं वाटलं नाही म्हणून त्यांनीही बॅगेतलं पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली..  एक सुरळीत, निश्चित प्रवास सुरू झाला होता, पण काही तास गेले आणि  वातावरणात बदल घडू लागला. जोराचा पाऊस सुरू झाला. विजा चमकू लागल्या. काही क्षणातच पावसाने रौद्र रूप धारण केलं तसं विमानातले सारेच प्रवासी घाबरले. प्रत्येकाने देवाचा धावा सुरू केला. माधवराव व सुधाताईंनी एकमेकांचे हात हातात घेतले. त्यांनी बघितलं, सोनिया मात्र शांत होती. ती आपल्या जाग्यावरून हलली नाही की इयरफोन काढले नाहीत. ती निश्िंचत असल्यासारखी बसली होती. इतक्यात विमानाच्या पायलटचा आवाज आला. ‘मित्रांनो, घाबरू नका. सीटबेल्ट लावा. थोडा वेळ लागेल, पण आपण निश्चितपणे मुक्कामावर पोहोचू. तुम्ही सुखरूप आहात, रहाल.’ त्याचा आश्वासक आवाज प्रवाशांना दिलासा देऊन गेला. पण नंतर पावसाचा जोम अधिकच वाढला. आता मात्र विमान हेलखावे खाऊ लागलं तसा साऱ्याच प्रवाशांचा धीर सुटू लागला. सुधाताईंनी तर मोठमोठय़ाने देवाला आळवायला सुरुवात केली. माधवरावांचं लक्ष सोनियाकडे गेलं. अद्यापही तिच्या चेहऱ्यावर भीती नव्हती की तिला कुणाचा आधार घ्यावासा वाटला नाही. आता तिने इयर फोन काढून टाकले होते, पण आपल्या सीटवरच ती शांतपणे बसून राहिली होती. त्यांना आश्चर्य वाटलं. थोडय़ा वेळाने खरंच पाऊस थांबला आणि हळूहळू वातावरण निवळलं. हलणारं विमान पुन्हा एकदा स्थिर झालं आणि निश्चित दिशेने वेग घेऊ लागलं. साऱ्या प्रवाशांनी सुटकेचा निश्वास टाकला.. तासाभरात विमानतळ दिसू लागला आणि सारे प्रवासी खरोखरच तणावमुक्त झाले. सोनियासोडून. ती कधी तणावात नव्हतीच. माधवरावांना याचं राहून राहून आश्चर्य वाटत होतं. शेवटी त्यांना राहावेना. विमान थांबल्यावर त्यांनी तिला गाठलंच. त्यांनी विचारलं, एवढय़ा मोठय़ा वादळातून आपण बाहेर आलो. मी पाहात होतो, तू एकदाही घाबरली नाहीस की कुणाला काही विचारलं नाहीस. असं कसं? तुला भीती नाही वाटली? सोनिया म्हणाली, ‘अजिबात नाही. आपण सुखरूप विमानतळावर उतरणार याची मला खात्री होती.’ माधवरावांना आता खरोखरच आश्चर्य वाटलं. ‘ते कसं काय,’ त्यांनी विचारलं. ‘सोप्प आहे,’ सोनिया म्हणाली, ‘हे विमान माझे पायलट बाबा चालवत होते आणि मला सुखरूप घेऊन जाण्याचं वचन त्यांनी आईला दिलं होतं..’
याला म्हणतात विश्वास. गाढ श्रद्धा. अनेकदा हा विश्वासच आपल्याला अनेक संकटांतून बाहेर काढतो. एखाद्याने सांगितलेली गोष्ट पूर्ण विश्वासाने केली की ते सापडतं ज्याची कधी कल्पनाही केली नसेल. आयुष्यच सापडतं अनेकदा ..
 विराज एक तरुण मुलगा आणि त्याच्या प्राध्यापकाची ही गोष्ट. विराज अगदी आजच्या काळातला. मस्तमौला मुलगा. केसांची फॅशन, ढगळ कपडे. तो त्यांच्या धर्मशास्त्राच्या वर्गाला येत असे. पूर्णत नास्तिक. त्याच्या आणि प्राध्यापकाची नेहमीच वादावादी व्हायची. ईश्वर हा विषय त्याच्यासाठी वज्र्य होता. त्याचं बोलणं नेहमी उपहासाचं असायचं. प्राध्यापकाने त्याला चमत्कारिक या विशेषणाखाली टाकून दिलं. शेवटच्या दिवशी तो त्या प्राध्यापकाकडे आला आणि थोडय़ाशा उपहासाच्या सुरात म्हणाला, ‘का हो सर, मला कधी सापडेल देव?’ सरांची प्रतिक्रिया उत्स्फूर्त होती, ‘नाही.’ तो जायला वळला. चार-पाच पावलं त्यानं टाकली असतील इतक्यात सर त्याला म्हणाले, ‘तुला देव नाही सापडणार.. पण देवाला तू सापडशील..’ विराज निघून गेला. वर्गातून आणि त्यांच्या आयुष्यातूनही.
 सरांना खरं तर आपल्या दुसऱ्या वाक्याचं कौतुक वाटलं होतं. ‘देवाला तू सापडशील.’ मी किती चांगली गोष्ट सांगितली होती, पण विराजला ती कळली असेल का, त्यांना प्रश्न पडला, पण तो प्रश्न तिथेच राहिला..
काही वर्षे गेली आणि सरांना ती दु:खद बातमी समजली. विराजला कर्करोग झाल्याची आणि तोही शेवटच्या टप्प्यावर असलेला. सरांना त्याला भेटायची तीव्र इच्छा झाली, पण एक दिवस अचानक तोच त्यांना भेटायला आला. दोघंही अवघडले. पण विराज आता बराच सावरला होता. थोडय़ा इथल्या तिथल्या गप्पा झाल्यावर त्याने सरांना सांगितलं, तुमच्या शिकवण्याचा मला खूप फायदा झाला. विशेषत: तुमचं शेवटचं वाक्य. ‘देवाला मी सापडेन.’ मी खूप विचार केला सर या वाक्याचा आणि खूप तीव्रतेने देवाचा शोध घेऊ लागलो. देवाची करुणा भाकायला लागलो. त्याची सतत प्रार्थना करू लागलो. पण तो काही द्रवत नव्हता. एके दिवशी या निष्फळ प्रयत्नांना मी सोडून द्यायचं ठरवलं. त्याच्यापेक्षा महत्त्वाचं काम मला करायचं होतं. वर्गात तुम्ही एकदा सांगितलं होतंत, आयुष्यात निराशा येते, कारण आपण प्रेम करायला विसरतो. विशेषत: ज्यांचं आपल्यावर प्रेम आहे, त्यांना आपण सांगतही नाही की त्यांच्यावर आपलं किती प्रेम आहे ते. मी हे प्रत्यक्षात आणायचं ठरवलं आणि लक्षात आलं, असं सांगणं खूप कठीण असतं. विशेषत: बाबांसारख्या माणसांना. एकदा मी मनाचा हिय्या केला आणि त्यांच्याजवळ गेलो. ते पेपर वाचत होते. मी म्हटलं, तुमच्याशी बोलायचं आहे, त्यांनी अविश्वासाने माझ्याकडे पाहिलं. मी म्हटलं, हे मी कधी तुम्हाला सांगितलं नाही. हे सांगायचं असतं हे मला माहीत नव्हतं. पण तीव्रतेने वाटलं म्हणून सांगतोय. माझं तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. आत्तापर्यंत मी तुमच्या मनाविरुद्ध वागलो, पण त्यामागे तुम्हाला दुखावणं हा हेतू नव्हताच कधी.. बाबांनी अविश्वासाने माझ्याकडे पाहिलं. ते जागेवरून उठले आणि मला कडकडून मिठी मारली. आयुष्यात पहिल्यांदा मी एक गोष्ट बघत होतो, बाबांच्या डोळ्यातले अश्रू. ती रात्र आम्ही फक्त बोलत होतो. मला जाणवत होती ती त्यांची मिठी, त्यांचे अश्रू आणि त्याचं माझ्यावरलं प्रेम. आई आणि धाकटे भाऊ यांना हे सांगणं मला फारच सोपं होतं. पण एक गोष्ट लक्षात आली. इतक्या साध्या गोष्टी सांगायला आपण का बिचकतो, का उशीर करतो? मला माझ्या आयुष्यातली अत्यंत महत्त्वाची गोष्ट मिळाली.. पण किती उशिरा?
 देव माझ्या पुढय़ात उभा होता. अखेर त्याने मला शोधून काढलं होतं. जेव्हा मी त्याला शोधत होतो, तेव्हा तो सापडला नाही. पण जेव्हा मी त्याचा शोध थांबवला, तेव्हा तो मला असा सापडला.
सरांनी त्याची पाठ थोपटली. ते म्हणाले, आपण देवाला वेगळ्या रूपात पाहतो. आपल्याला वाटतं, देव म्हणजे आपली खासगी मालमत्ता आहे. तो आपले सारे प्रश्न सोडवणारा आहे, आपल्या गरजेला तातडीने धावून येणारा आहे. पण देव प्रेम आहे. जो प्रेमात जगतो, प्रेम करत जगतो, तो देवाबरोबर जगतो. देव त्याच्याबरोबर जगतो.
 विराज शांतावला होता.. त्याच्या मनातली अनेक प्रश्नचिन्हं आता गळून गेली होती, उरली होती ती अमाप श्रद्धा, विश्वास.. प्रेमावरचा!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Faith