scorecardresearch

विश्वास आणि प्रेम हाच बंध!

काही काळानंतर आनंदाची बातमी आम्हा दोघांच्या आयुष्यात आली, पण ते बाळ मी गमावलं. नंतर ‘घराण्यासाठी वारस हवा’ या मानसिकतेमधून माझं सासरी आगमन झालं.

विश्वास आणि प्रेम हाच बंध!

सुमेधा लिम्हण

लग्न म्हणजे दोन व्यक्ती नाही, तर दोन कुटुंबं एकत्र येतात, हे वास्तव मला आमच्या प्रेमविवाहानंतर समजलं. या गोष्टीला १५ वर्ष पूर्ण झाली आहेत. मला माझा नवरा अनपेक्षितपणे भेटला, तेव्हा ती अनपेक्षित भेट प्रेमात कधी बदलली हेच समजलं नाही. निव्वळ दोन महिन्यांच्या भेटीत आम्ही लग्न करायचं ठरवलं होतं. माझ्या नवऱ्याचं नाव, संभाजी. अगदी नावाला शोभेल असा तो भारतीय संरक्षण सेवेतील एक लढवय्या. त्याच्या याच गोष्टीच्या प्रेमात मी अनपेक्षितपणे पडले. घरच्यांच्या विरोधात जाऊन लग्न केलं. शेवटी मध्ये आली ती जात. माझ्या आई-वडिलांनी शेवट गोड केला, पण सासरी त्यांनी सुरुवातीला घराची पायरीसुद्धा चढू दिली नाही. या सर्व कसरतीमध्ये मी पुण्यातून शिक्षण पूर्ण केलं. पण समस्या संपत नव्हत्या. नवऱ्यानं साठवलेला पैसा संसार जोडण्यात जात होता. गरजा वाढत होत्या. पण यातही न डगमगता आम्ही संसार सुरू केला.

   काही काळानंतर आनंदाची बातमी आम्हा दोघांच्या आयुष्यात आली, पण ते बाळ मी गमावलं. नंतर ‘घराण्यासाठी वारस हवा’ या मानसिकतेमधून माझं सासरी आगमन झालं. या वेळी फिरतीनिमित्त आम्ही वेगवेगळय़ा शहरांमध्ये फिरलो. याच काळात आमच्या मुलाचा- सोहमचा जन्म झाला. पण त्याच्या जन्मावेळेस प्रचंड वैद्यकीय समस्या होत्या. उपचारांसाठी पैशांची चणचण भासू लागली, कारण खर्च खूप आणि जबाबदाऱ्या वाढत  चालल्या होत्या. तरीही जमाखर्चाचा ताळमेळ माझा नवरा योग्य रीतीनं करत होता. पण त्याची तारेवरची कसरत मला बघवत नव्हती. तेव्हा मी ठरवलं की आपण आपल्या संसाराचा आधारस्तंभ होणं गरजेचं आहे. मुलाचा जन्म झाल्यानंतर मीसुद्धा संसाराचा गाडा उचलू लागले. मुंबईत लालबागमध्ये भाडय़ाच्या खोलीत आमचा छोटा संसार चालू होता. माझ्या मुलाचा सांभाळ शेजारच्यांनी केला आणि मी भायखळा इथे एका इम्पोर्ट-एक्स्पोर्ट कंपनीमध्ये ‘स्टाफ इनचार्ज’ म्हणून नोकरी करू लागले. खर्चाचा ताळमेळ हळूहळू बसू लागला होता. त्यातच माझ्या मुलाला बालदम्याचं निदान झालं. त्याचं आजारपण वाढू लागलं, त्या कालावधीमध्ये मला माझी नोकरी सोडावी लागली, कारण मुलाची तब्येत दिवसेंदिवस ढासळत चालली होती. तेव्हाच नवऱ्याचा भारतीय नौदलातला नोकरीचा कालावधीही संपला. मग आम्ही ठरवलं, की पनवेलमध्ये एक फ्लॅट घ्यायचा आणि तिथे राहायला जायचं. मुंबईच्या चाळीतल्या घरातून आम्ही फ्लॅटमध्ये आलो होतो आणि आमच्यासाठी तो राजवाडाच होता जणू! माझ्या नवऱ्याला एका खासगी कंपनीत नोकरी लागली. पण नेमकी आर्थिक मंदी आली. घराचे हप्ते चालू झाले होते. येणारी सर्व पेन्शन हप्त्यांमध्ये जात होती. घर चालवणं आव्हानच वाटू लागलं होतं. मी पुन्हा नोकरी सुरू केली, ती वाहतूक क्षेत्राशी संबंधित. मग नवऱ्याला एका विदेशी कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी लागली. आणि आमचा संघर्ष संपला..

    दरम्यान, माझं करिअरसुद्धा वेगळय़ा वळणावर पोहोचलं आणि मी निवेदन क्षेत्रात पाऊल टाकलं. बरोबरीनं पत्रकारिता आणि समाजकार्य यांची जोडही होती. यात माझ्यावर विश्वास ठेवून मला साथ देणाऱ्या माझ्या नवऱ्याला मानाचा मुजराच करावासा वाटतो! विश्वास आणि प्रेम हाच बंध आमच्यातलं नातं दृढ करत आहे.

   विश्वास, प्रेम, संघर्ष, आनंद, दु:ख, मैत्री, या सर्व गोष्टींचा अनुभव मी आणि माझ्या नवऱ्यानं एकत्रितरीत्या गेली कित्येक वर्ष घेतला आणि असाच यापुढेही घेत राहू!

sumedhalimhan90@gmail.com

मराठीतील सर्व चतुरंग ( Chaturang ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 26-11-2022 at 00:06 IST

संबंधित बातम्या