भरलेलं आभाळ अन् अस्वस्थ भोवताल

संपूर्ण आयुष्य पावसावर अवलंबून असणाऱ्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते ती पावसाची.. पुरेशा पावसाची. पण कित्येकदा हा पाऊस परीक्षा बघणारा ठरतो. रडवून जातो.. अनेकांचे तर संसार उध्वस्त करून जातो.

संपूर्ण आयुष्य पावसावर अवलंबून असणाऱ्या मराठवाडय़ातील शेतकऱ्यांना प्रतीक्षा असते ती पावसाची.. पुरेशा पावसाची. पण कित्येकदा हा पाऊस परीक्षा बघणारा ठरतो. रडवून जातो.. अनेकांचे तर संसार उध्वस्त करून जातो. यंदा पाऊस सुरु झालाय, आभाळ भरलेलं आहे खरं, पण टिकणार का हा अस्वस्थ करणारा प्रश्न घेऊन अनेक जणी कामाला लागल्या आहेत. प्रत्येकीसाठी पाऊस हा जगण्याचे वेगवेगळे संदर्भ घेऊन आला आहे..
पाऊस दडून बसलेला, रुसलेला. बरसला की माहेरचा ओलावा देणारा. मराठवाडय़ातून तो हरवला. रडवून गेला. काही जणींचा संसार त्याने उघडय़ावर आणला. त्याच्या न येण्याची होरपळ वेदनादायी. अस्वस्थ करून जाणारी. आता पाऊस येतोय, पण तो पुरेपूर यायचा आहे. त्याच्या येण्याची आस आणि बरसताना मिळणारा आनंद म्हणजे काही िहदोळे सुखाचे, काही दु:खाचे. त्याचे येणे आणि न येणे यावर बरेच ठरते. संदर्भच बदलतात जगण्याचे!
 पाऊस प्रत्येकीच्या डोळ्यात निराळा. काही जणींचा पाऊस टँकरमागे धावायला लावणारा. काही जणींचा खोल विहिरीतून, आडातून पाणी उपसायला लावणारा. काही जणींचा नापिकीचा, तर काहींच्या कपाळावरचे कुंकू पुसणारा. पावसाची नाना रूपे. जगताना पाऊस किती गरजेचा हे सांगणारी.
लाडसावंगी, जिल्हा : औरंगाबाद
मराठवाडय़ात मान्सून दाखल झाला तो दिवस. मृग नक्षत्र निघण्याच्या आदल्या दिवशी, तो जोरदार बरसून गेला. कोरडय़ा शुष्क जमिनीने सगळा पाऊस गट्टकन पिऊन घेतला. उरलेला पाऊस कोरडय़ा कुसळावरून जात खड्डय़ात साचलेला. रस्त्याच्या बाजूच्या छावण्यांतून शेतकऱ्यांनी बल नेले, ते जुंपले. दुधाळ जनावरे छावणीत रवंथ करत बसली. गावातल्या बियाणाच्या दुकानात गर्दी. सहकारी सोसायटीच्या गोदामातून खतासाठी सुरू असणारे व्यवहार, काही रोखीचे, काही उधारीवर! दुचाकीवरून बियाणे आणि खताची ने-आण करणारे शेतकरी, काही जणांची नेहमीप्रमाणे चौकातल्या टपरीवर बठक. काही जणांना कामाची घाई. गावात अजून टँकर सुरू आहे. हा टँकर गावात आला की, लताबाई भालेराव यांच्या जिवाची घालमेल सुरू होते. कारण लताबाईचा आठवीत शिकणारा नातू अजय पाणी भरताना टँकरखाली चिरडला गेला. त्याच्या जाण्याचा विषय चच्रेत आला की, आजही गाव हळहळतो. अजयच्या आजीसाठी पाऊस म्हणजे टँकर!
भालेरावांच्या घराच्या पुढच्या बाजूला एक चौक. उस्ताद लहुजी साळवे यांच्या नावाच्या चौकातच टँकर थांबायचा. अजयच्या मृत्यूनंतर सार्वजनिक विहिरीत पाणी टाकले जाते. लोक तेथून ते उचलतात. लताबाईचे जगणेच पावसाशी घट्ट नाते सांगणारे. त्या रानोमाळ भटकून गवताचा भारा गोळा करतात. घरी चार शेळ्या, त्यांना लागणारा झाडपाला आणि गवत आणणे हेच त्यांचे जगणे. पाऊस नीट आला नाही तर?  प्रश्नानेदेखील त्यांना अस्वस्थ व्हायला होतं. नातू जाण्याने हळव्या झालेल्या लताबाई सांगतात, ‘‘पाऊस असता तर टँकर नसला असता. तसं झालं असतं तर माझा नातू देवाघरी गेला नसता.’’
जगण्याची वीण रेखीव अशी नसतेच. त्याचे धागे आडवे-उभे कसे असतील? अजयच्या मृत्यूनंतर एका राजकीय पक्षाने या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत केली. त्यातील १५-२० हजार रुपये लताबाईच्या मुलाने काढले. काही वर्षांपूर्वी भालेराव कुटुंबीयांना घरकुलासाठी २८ हजार रुपये मंजूर झाले होते. पसे कमी पडले. त्या घराला ना पट ना दरवाजे. छतासाठी पत्रे आणायचे तेव्हा राहून गेले. मदतीच्या पशातून ते आता घर उभारलं जातय. बल विकत घेऊन शेतीची कामे रोजंदारीने तो करेल, थोडा पैसा हाताशी लागेल, जगणं थोडं सुसह्य़ होईल, असे लताबाई सांगतात. पाऊस न येण्याचा हा संदर्भ जगणेच बदलून टाकणारा. चुटपुट लावणारा!
एक पाऊस कधीचा हरवलेला. सारे काही कोरडे करून जाणारा. अलीकडे तर त्याचे येणेही चिंता वाढणारे. कारण त्याच्या न येण्याने सारे अर्थकारणच थिजलेले. अस्वस्थ करणारा असा भोवताल औरंगाबाद, जालना जिल्ह्य़ात सर्वत्र दिसतो, एक पाऊस पडून गेल्यानंतरही. रस्त्याच्या बाजूला आता हिरवळ डोकावू लागली आहे. पडलेल्या पावसानंतर रान भुसभुशीत करण्याची, मशागतीची कामं सुरू झाली आहेत. तुळसाबाई पवार सांगत होत्या, “प्रत्येक काम वेळेवर झालेलं बरं असतं. नाय तर काहीच हाती लागत नाही.’’
एक पाऊस येऊन गेलाय. आता त्यांची लगबग सुरू झाली. तुळसाबाईचे पती वखरणी करत होते आणि त्या रानातला काडी कचरा गोळा करत होत्या. त्यांची सून त्यांना मदत करत होती. त्यांच्यासाठी घाईचे दिवस सुरू झाले आहेत. एक पाऊस झाला असला तरी विहिरीला अजून पाणी आलेले नाही. गावात येणाऱ्या टँकरचा शेतातच घर करून राहणाऱ्या तुळसाबाईला उपयोग होत नाही. त्यामुळे सकाळी उठल्यावर १० परस खोल असणाऱ्या विहिरीत उतरायचे. घागरीने पाणी भरायचे. घरात दोन म्हशी, त्यांना पाणी पाजण्यातच अर्धा दिवस जातो. पाण्याची कसरत झाली की त्या कामाला लागतात. पवारांच्या घरी या वर्षी कर्जाऊ बियाणे आले आहे. खतही येऊन पडले आहे. तुळसाबाईसह घरातील सगळेजण मोठय़ा पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. जर मोठा पाऊस झाला तर तुळसाबाईचे पाणी उपसण्याचे कष्ट वाचतील. चार पसे हाती येतील. त्यांच्यासाठी न आलेला पाऊस अधिक कष्टाचा तर होताच, पण गरिबीत ढकलणारा होता. दहा एकर शेताची मालकीण असणाऱ्या तुळसाबाईला पावसाची प्रतीक्षा आहे. या वर्षी पाऊस आला आणि पीक हाती लागले की, दुसऱ्या मुलीचं लग्न करायचे आहे. त्यासाठी कष्ट करणे तर भागच आहे. तुळसाबाईला पाऊस हवा आहे, कारण त्यांची एक मुलगी वयात आली आहे.. पाऊस न येण्याचा हा संदर्भ त्यांच्यासाठी हा असा गरजेचा!
कर्जत , जिल्हा : जालना
दुष्काळाने होरपळलेला भोवताल. रस्त्यांच्या दोन्ही बाजूला करपून गेलेल्या फळबागा. रब्बी हंगामातदेखील पेरणी न झालेले मोठे क्षेत्र. काळ्याभोर रानात पहिला पाऊस येऊन गेलेला. हे गाव तसे दुष्काळी म्हणून देशभर पोहचलेले. गावातही तसेच काहीसे वातावरण. गावात वळणाच्या रस्त्यावर शाळा, त्याच्यासमोर एक चहाची टपरी. लटकणारी पाण्याची बाटली. काही लोक बसलेले. नुकताच पाऊस झाल्याने रोजगार हमीचे काम बंद झालेले. त्यामुळे मंदाबाई बनसोडे आणि त्यांचा मुलगा घरीच होते. गणेश बनसोडेच्या वडिलांनी मार्च महिन्यात स्वतची जीवनयात्रा संपवली. जमिनीवर काही पिकलं नाही. दोन मुलींच्या लग्नासाठी काढलेले कर्ज काही फिटले नाही आणि आता त्यांच्या पत्नी मंदाबाईच्या नशिबी वैधव्य आले आहे. कापूस लावला होता त्यांनी, पण काहीच पिकले नाही. नवरा गेला आणि मंदाबाईचा मुलगा मुंबईवरून नोकरी सोडून परत आला आहे. आता त्या आणि गणेश दोघेजण रोजगार हमीवर जातात, कारण आजही त्यांना सावकाराचे कर्ज चुकवायचे आहे. नव्याने एकरभर रानात पेरणी करायची आहे. गरजा कितीही कमी केल्या तरी किमान जगण्यापुरते कमाविण्यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. पाऊस त्यांच्यासाठी सर्वस्व. तो आला असता आणि पिकलं असतं तर कदाचित त्यांचे कुंकू वाचले असते. सरकारी मदत मिळाली. पण त्याचा उपयोग झाला नाही. ७० हजार अनामत ठेव आणि ३० हजाराची रोख मदत. रोख रक्कम त्यांनी सावकाराला देण्याचे ठरविले आहे. त्यामुळे बियाणे आणि खतासाठी त्यांना सावकाराशिवाय पर्याय नाही. त्यांना आता प्रतीक्षा आहे ती चांगल्या पावसाची.
जगदाळवाडी, जि. उस्मानाबाद
गाव सोलापूर जवळच्या करमाळा तालुक्याजवळ. गावात एस. टी. बस जात नाही. मोठा पाऊस आला तर नदी पात्रातून पोहून जावे लागते. चारशे-साडेचारशे लोकसंख्या. अजूनही सारे शिवार कोरडे. त्यामुळेच सुकमनबाईच्या जिवाला घोर लागलेला. पाऊस अजून आलाच नाही. नुसतेच आभाळ भरून येते. तो आला की सुकमनबाईचा कधी गळा भरून येतो, तर कधी डोळे भरून येतात. कारण मार्च महिन्यात त्यांच्या पतीने आत्महत्या केली. कोणाचे तरी देणे होते, एवढेच ते सांगायचे. लाख- दीड लाखाची रक्कम सावकाराला द्यायची कोठून, या चिंतेत अंबादास गिरी यांनी वयाच्या ५५व्या वर्षी गळफास लावून आत्महत्या केली. तेव्हा त्यांच्या चार एकर कोरडवाहू शेतीतून फक्त एक पोतभर ज्वारी पिकली. १०० पेंढय़ा कडबा एका बलाला पुरणारा नव्हता. डोक्यावर खासगी सावकाराचे कर्ज. तेव्हा सुकमनबाईचा एक मुलगा नाशिकमध्ये रंग लावायचे काम करत होता. दुसऱ्या मुलाने शिक्षण सोडले होते. उन्हाळ्यात भारनियमन त्यामुळे रात्री साडेआठच्या सुमारास सार्वजनिक पाणवठय़ावर पाणी भरावे लागे. सुकमनबाई त्या नादात होत्या. घरातीलच एका आडूला अंबादास गिरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली.
 आज सुकमनबाईसमोर प्रश्न आहे, पुढे काय? चार एकरावर पेरणीसाठी करावी लागणारी आत्तापर्यंतची कसरत त्यांना आठवली की, अजूनही त्यांच्या डोळ्यात पाणी तरळते. कारण घरी एकच बल. दुसरा बल दिराच्या घरी. दोघा भावांनी एकत्रित पेरायचे. जे पिकेल त्यावर जगायचे. एक पोतं ज्वारी झाली तेव्हा खाणारी तोंडं आणि आलेलं पीक यांचा नुसता अंदाज घेतला तरी पोटात ढवळायचे. ते गेले तेव्हा कोणी तरी सांगितले, अंबादास गिरी व्यसनाधीन होते. पोलिसांनीही तशीच नोंद केली. गरिबीमुळे आणि कर्जबाजारीपणामुळे झालेला मृत्यू चुकीचा नोंदवला. पण परंडा तालुक्यातील अ‍ॅड. संतोष सूर्यवंशी यांनी आत्महत्येची सगळी माहिती मिळवली. कारणे शोधली, तेव्हा महसूल प्रशासनानेही हे प्रकरण कर्जबळीचे आहे की नाही हे तपासायचे ठरविले. अजून प्रकरण पात्र की अपात्र हे ठरायचे आहे. आता आभाळ भरून येत आहे आणि  सुकमनबाईच्या  मनात भीती दाटली आहे. त्यांच्या दोन मुलांनी मजुरी करून मिळवलेल्या रकमेतून कशीबशी हातातोंडाची गाठ पडते. पुन्हा ज्वारीचे बियाणे कोणाकडून तरी आणावे असा विचार करत जगणाऱ्यांना पावसाची आस लागली आहे. सुकमनबाईला ) मदत मिळेल का? कोण देणार? या प्रश्नांची उत्तरे अधांतरी आहेत. ती अवस्था त्यांच्या डोळ्यात दिसते. त्यांच्या मुलाच्या डोळ्यातही चिंतेची किनार पाहायला मिळते. पण सरकारी व्यवस्थेला ती दिसेल? माहीत नाही, पण पाऊस यावा, नदी, नाले, ओढे वाहते व्हावेत. त्यात कोरडेपण हरवून जावे. जगण्याची उमेद आता फक्त पावसावर अवलंबून आहे. तो जगदाळवाडीत यायचा आहे.     
 १०० टक्के पावसावर अवलंबून असलेला हा शेतकरी दरवर्षी पावसाची मोठय़ा आतुरतेने वाट पाहतो. पण अनेकदा तो रुसतो आणि मग अनेक यक्षप्रश्न पिंगा घालायला लागतात. कुणाला रोजच्या खाण्याची वानवा तर कुणाला आपल्या मुलीचं लग्न करायचा ताण. सगळ्या गोष्टी शेवटी पैशाशी येऊन थांबतात. अनेकदा हे पावसाचं आणि पैशांचं गणित काही जुळत नाही आणि मग यंदा कुणाकुणाचे बळी पडणार, हा प्रश्न सतावत राहतो. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या विधवा पत्नींच्या डोळ्यात बघताना पाऊस आला नाही तर.. असा प्रश्न डोकावला तरी अंगावर सरसरून काटा येतो. कोरडेपण डोळ्यात दिसते आणि एकच आर्जव पावसाला करावीशी वाटते, आता नको रे बाबा अंत पाहू!

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Farmers wives stories

ताज्या बातम्या